गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर धोकादायक पादचारी पूल बंद; कोणते पूल होणार बंद? वाचा सविस्तर

आयआयटी मुंबईच्या स्ट्रक्चरल ऑडिटमध्ये पूल असुरक्षित; पुनर्बांधणीसाठी तोडण्याची शिफारस

 
 Mumbai Foot Over Bridge
 
मुंबई (Mumbai Foot Over Bridge) : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने मशीद आणि माटुंगा परिसरातील चार पादचारी पूल बंद करण्यात येणार आहेत. या पुलांची संरचनात्मक स्थिती असुरक्षित असल्याचे आयआयटी मुंबईच्या तपासणीत आढळून आले असून, तातडीने पादचारी वाहतूक बंद करून पुनर्बांधणीसाठी पूल पाडण्याची शिफारस करण्यात आली आहे. यासंदर्भात बृहन्मुंबई महानगरपालिकेने मध्य रेल्वे प्रशासनाला सूचना दिल्या आहेत.
 
मशीद आणि माटुंगा स्थानकांवरील या चार पादचारी पुलांची २७ ऑगस्ट २०२६ रोजी बीएमसी आणि रेल्वेच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत संयुक्त पाहणी करण्यात आली होती. त्यानंतर ३१ ऑगस्ट रोजी आयआयटी मुंबईने चारही पुलांचे स्वतंत्र संरचनात्मक तपासणी अहवाल सादर केले. या अहवालांमध्ये पुलांच्या महत्त्वाच्या संरचनात्मक भागांची झीज झाल्याचे तसेच गंज लागल्याचे निदर्शनास आले आहे. (Mumbai Foot Over Bridge)
 
गणेशोत्सवाच्या काळात रेल्वे स्थानकांवर आणि परिसरात प्रवाशांची तसेच पादचाऱ्यांची मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर संरचनात्मकदृष्ट्या असुरक्षित ठरलेल्या पुलांचा वापर सुरू राहिल्यास सुरक्षेचा धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे कोणतीही अनुचित घटना टाळण्यासाठी हे पूल तातडीने बंद करणे आवश्यक असल्याचे बीएमसीने मध्य रेल्वेच्या निदर्शनास आणून दिले आहे. (Mumbai Foot Over Bridge)
 
या चारही पुलांवरून पुढील सूचना मिळेपर्यंत पादचाऱ्यांचे कोणतेही आवागमन होणार नाही, याची खात्री करण्याची विनंती महापालिकेने रेल्वे प्रशासनाला केली आहे. तसेच, पुलांची पुनर्बांधणी करण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्याची शिफारसही करण्यात आली आहे. जनहित आणि सार्वजनिक सुरक्षेच्या दृष्टीने पादचारी पूल बंद करण्याच्या प्रक्रियेत प्रवासी आणि नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन मध्य रेल्वेने केले आहे. गणेशोत्सवाच्या काळात सुरक्षित आणि शिस्तबद्ध प्रवासासाठी प्रवाशांनी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असेही रेल्वे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. (Mumbai Foot Over Bridge)

कोणते पूल बंद होणार?
 
१. भंडारी पादचारी पूल, मशीद – किमी ०/५-६
 
२. मशीद स्थानक पादचारी पूल – किमी १/२-३
 
३. भाऊ दाजी रोडवरील माटुंगा लेव्हल क्रॉसिंग पादचारी पूल – किमी १०/२२-२३
 
४. गुरु नानक हायस्कूलजवळील माटुंगा-धारावी पादचारी पूल – किमी ११/१४-१५





गायत्री श्रीगोंदेकर

मूळची अहिल्यानगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूट मधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयात पदव्युत्तर शिक्षण. २०१९मध्ये मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर रुजू. सद्यस्थितीत 'इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट' विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. राज्यातील पायाभूत सुविधांविषयी फिल्ड रिपोर्ट आणि लेखनात रस.
संबंधित मजकूर