मुंबई-अहमदाबाद हायस्पीड रेल्वे मार्गिकेचे काम वेगाने सुरू; २०२७ मध्ये सुरत-वापी दरम्यान पहिली धाव अपेक्षित

 
Mumbai Ahmedabad Bullet Train
 
मुंबई (Mumbai Ahmedabad Bullet Train) : देशातील पहिल्या मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या कामाला वेग आला असून, ५०८ किलोमीटर लांबीच्या या हायस्पीड रेल्वे मार्गिकेचे ६२.१६ टक्के भौतिक काम पूर्ण झाले आहे. केंद्र सरकारच्या ताज्या प्रकल्प निरीक्षण अहवालानुसार, या प्रकल्पावर आतापर्यंत ९० हजार ९६७ कोटी रुपयांहून अधिक खर्च करण्यात आला आहे.
 
सांख्यिकी व कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाच्या जुलै महिन्यातील मासिक प्रकल्प निरीक्षण अहवालात ही माहिती देण्यात आली आहे. मुंबई-अहमदाबाद हायस्पीड रेल्वे प्रकल्पाचा समावेश केंद्र सरकारच्या महत्त्वाच्या सुरू असलेल्या पायाभूत सुविधा प्रकल्पांच्या निरीक्षण यादीत आहे. या प्रकल्पाची अंदाजित मूळ किंमत सुमारे १.०८ लाख कोटी रुपये आहे. मात्र, प्रकल्पाचा अंतिम खर्च वाढून सुमारे २ लाख कोटी रुपयांपर्यंत जाण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. (Mumbai Ahmedabad Bullet Train)
 
४५३ किमी पिअरचे काम पूर्ण
 
प्रकल्पाची अंमलबजावणी करणाऱ्या नॅशनल हायस्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेडच्या माहितीनुसार, आतापर्यंत ४५३ किमी मार्गिकेवरील पिअरचे काम पूर्ण झाले आहे. तसेच ३५९ किमी लांबीच्या व्हायाडक्टचे बांधकाम करण्यात आले आहे.
 
याशिवाय २१५ किमीहून अधिक ट्रॅक बेडचे बांधकाम पूर्ण झाले असून, सुमारे २०० किमी लांबीचे ओव्हरहेड इलेक्ट्रिक मास्ट उभारण्यात आले आहेत. वेगवान गाड्यांमुळे निर्माण होणारा आवाज कमी करण्यासाठी मार्गिकेच्या २९७ किमी भागात नॉइज बॅरिअर्स बसवण्यात आले आहेत. प्रकल्पासाठी आतापर्यंत १७ नदी पूल आणि १५ स्टील पूल पूर्ण करण्यात आले आहेत. (Mumbai Ahmedabad Bullet Train)

महाराष्ट्रातील बोगद्यांच्या कामालाही वेग
 
महाराष्ट्रातील बोगदा बांधकामानेही महत्त्वाची प्रगती केली आहे. आतापर्यंत चार पर्वतीय बोगद्यांचे खोदकाम पूर्ण झाले असून, न्यू ऑस्ट्रियन टनेलिंग मेथड पद्धतीने सुमारे ५ किमी बोगद्याचे बांधकाम पूर्ण करण्यात आले आहे. मुंबई-अहमदाबाद हायस्पीड रेल्वे कॉरिडॉरची सुमारे ९० टक्के मार्गिका उन्नत स्वरूपाची आहे. उर्वरित भागात बोगदे, पूल आणि स्थानक परिसरांचा समावेश आहे. (Mumbai Ahmedabad Bullet Train)

२०२७ मध्ये सुरत-वापी दरम्यान पहिली धाव
 
रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी यापूर्वी जाहीर केल्यानुसार, भारतातील पहिली बुलेट ट्रेन ऑगस्ट २०२७ मध्ये सुरत ते वापी या सुमारे १०० किमी अंतरावर धावण्याची शक्यता आहे. हा भाग मुंबई-अहमदाबाद हायस्पीड रेल्वे कॉरिडॉरचाच एक हिस्सा आहे. संपूर्ण ५०८ किमी मार्गिका २०२९ पर्यंत टप्प्याटप्प्याने कार्यान्वित करण्याचे नियोजन आहे. यामध्ये वापी-सुरत, वापी-अहमदाबाद आणि ठाणे-अहमदाबाद या टप्प्यांचा समावेश आहे.
 
मुंबई-अहमदाबाद प्रवास अवघ्या १ तास ५८ मिनिटांत
 
बुलेट ट्रेनची कमाल वेगमर्यादा ३२० किमी प्रतितास असणार आहे. चार स्थानकांवर थांबा घेतल्यास मुंबई-अहमदाबाद प्रवास १ तास ५८ मिनिटांत पूर्ण होईल. तर सर्व १२ स्थानकांवर थांबा घेतल्यास प्रवासाचा कालावधी सुमारे २ तास १७ मिनिटे असेल. ही मार्गिका महाराष्ट्र, गुजरात आणि केंद्रशासित प्रदेश दादरा-नगर हवेलीमधून जात असून, मुंबई आणि अहमदाबादला १२ स्थानकांद्वारे जोडणार आहे. संपूर्ण कॉरिडॉर डिसेंबर २०२९ पर्यंत पूर्ण करण्याचे लक्ष्य असल्याचे रेल्वेमंत्र्यांनी सांगितले आहे. (Mumbai Ahmedabad Bullet Train)
 
 




गायत्री श्रीगोंदेकर

मूळची अहिल्यानगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूट मधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयात पदव्युत्तर शिक्षण. २०१९मध्ये मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर रुजू. सद्यस्थितीत 'इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट' विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. राज्यातील पायाभूत सुविधांविषयी फिल्ड रिपोर्ट आणि लेखनात रस.
संबंधित मजकूर