लोकमान्य गणपत्युत्सव : ज्ञान, भक्ती आणि एकात्मतेचा उत्सव!

    13-Sep-2026
 
Lokmanya Tilak Ganeshotsav
 
१४ विद्या ६४ कलांचा अधिपती असलेला गणनायक, सर्वांसाठी प्रथम पूजनीयच. मराठी वाङ्मयात संतांनीही, त्यांच्या कवनाप्रारंभी गजाननाची करुणा भाकल्याचे दिसते. ते स्वातंत्र्यलढ्यातही लोकमान्य टिळकांनीही गणरायाच्या उत्सवाला सार्वजनिक स्वरुप देत, स्वातंत्र्याचा मंत्र जनमानसाला दिला. आज गणरायाच्या उत्सवाचे स्वरुप ते त्याचे गणरायाचे रुप यांवर सर्वदूर चर्चा घडतना दिसते. अशावेळी संत ज्ञानेश्वर आणि लोकमान्य टिळक यांच्या विचारातील गणरायाच्या आणि त्याच्या उत्सवाचा मागोवा घेणारे लेख...
 
पुण्याचे आणि गणेशोत्सवाचे नाते अतूट आहे. तेथील गणेशोत्सवास मार्गदर्शन लाभले, ते खुद्द लोकमान्य टिळकांचे! मेळे, शास्त्रीय संगीताचे कार्यक्रम, नामवंत वक्त्यांची व्याख्याने, यामुळे पुण्यातील गणेशोत्सवाची शोभा सुरुवातीपासूनच वाढली. धार्मिकता, पारंपरिकता आणि सामाजिक समरसतेचे दर्शन येथील उत्सवात घडते. सध्या सजीव-निर्जीव पौराणिक व ऐतिहासिक देखावे, रोशणाईयुक्त सजावट, मोठे महाल आणि ढोल-ताशा पथके यांचा जमाना आला असून, तंत्रज्ञानावर आधारित देखावे आणि सामाजिक प्रबोधनपर देखावेही इथे दिसतात. महाराष्ट्राच्या सार्वजनिक जीवनावर या गणेशोत्सवाने प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे, कळत-नकळत प्रभाव पाडला आहे; आपला ठसा उमटवला आहे. अर्थताच, हे सारे अतिशय सहजतेने आणि स्वाभाविकपणेच होऊन गेले.
 
लोकमान्य टिळकांना भारतीय आध्यात्मिक व सांस्कृतिक परंपरांची सखोल जाण होती. ‘भगवंताचे अधिष्ठान’ आपल्या ‘राजकारणा’ला व हिंदूंच्या सामर्थ्यवर्धनास उपयोगी पडावे असेच त्यांना वाटे. हिंदूंनी संघटित व्हावे व अन्यायाचे निर्दालन करावे, अशी तळमळही लोकमान्य टिळकांना लागली होती. पण, त्यासाठी नवा पंथ, नवी संस्था कशाला? जुन्या उत्सवांनाच नवे स्वरूप देण्याचे त्यांनी ठरविले. यासाठी त्यांनी घरोघरी होणार्‍या हिंदूंच्या गणेशोत्सवासच, सार्वजनिक स्वरूप दिले, एक समाजहिताचे साधन बनवले आणि राजकीय जागृतीचा पाया घातला. गणेशोत्सवाच्या मेळ्यांतील पदांनी, सर्व स्तरांतील लोकांपर्यंत हे जागृतीचे लोण पोहोचवले. दहा-दहा दिवस शेकडो सार्वजनिक गणपतींपुढे व्याख्याने होऊ लागली, कीर्तने रंगू लागली, पोवाडे खणाणू लागले आणि मेळे दणाणू लागले. एकेक मेळा म्हणजे पाच-पंचवीस तरुणांचा, कसलेल्या शरीराचा व लाठी-कवायत शिकलेल्यांचा ताफाच असे. खड्या आवाजाने भक्तीचे सूर काढणाच्या कार्यकर्त्यांचे ते जणू शिबीरच. हे मेळे म्हणजे स्वराज्याचे मळेच!
 
"उत्सवाद्वारे लोकांना धार्मिक, नैतिक व राजकीय शिक्षण देणारे लोक, जुन्या व नव्या लोकांस अत्यंत प्रिय वाटतात,” अशी शिकवण ‘केसरी’तून वारंवार देऊन, टिळकांनी सुशिक्षितांना गणेशोत्सवाकडे वळविले.लोकमान्य टिळकांना भारतीय सांस्कृतिक प्रबोधनाच्या आधारेच, देशवासीयांमध्ये देशभक्तीची प्रेरणा निर्माण करायची होती. त्यासाठी त्यांनी अनेक उपक्रम हाती घेतले. यात ‘सार्वजनिक गणेशोत्सवा’चा उल्लेख प्रामुख्याने करता येईल.
 
‘सार्वजनिक सभे’चे काम करत, गणेशोत्सव सुरू करताना लोकमान्यांनी विचारपूर्वकच पावले टाकलेली होती. पारतंत्र्यामुळे स्वाभिमानशून्य झालेल्या समाजात स्वत्वाची जाणीव निर्माण व्हावी आणि त्याचबरोबर समाजातील शक्तींचा योग्य रीतीने अविष्कार व्हावा, यासाठीच टिळकांनी विविध चळवळी व उपक्रम सुरू केले. हे उपक्रम यशस्वी करण्यासाठी ते लोकशिक्षण करीत. त्यासाठी त्यांनी ‘केसरी’तून लेखनही केले. गणपती उत्सवाबाबतचे लोकमान्यांचे लेखन वाचले, तर त्याबाबतीतील त्यांचा दृष्टिकोनही केवळ धार्मिक उत्सव सुरू करण्याचा नसल्याचे लक्षात येईल. गणपती उत्सवातून अध्यात्मपरता वाढावी अशीच टिळकांची भूमिका असती; तर त्यांनी त्यांच्या अग्रलेखांतून ‘गणपती’ या देवतेचे स्वरूप, मोक्षसाधनेतील उपासनेचे स्थान, याबद्दल विवेचन केले असते. परंतु, लोकमान्यांची ही भूमिका निश्चित नव्हती. गणपती उत्सवाला सामाजिक स्वरूप यावे, त्यानिमित्ताने विविध सामाजिक कार्यक्रम व्हावेत, भाषणांच्या द्वारा लोकजागृती व्हावी, असाच आग्रह लोकमान्यांनी धरला. या दृष्टीनेच ‘केसरी’तून या विषयावर लिहिताना त्यांनी, गणपती उत्सवाच्या सामाजिक आशयावरच अधिक भर दिला. समाज एकत्र येऊन, त्याचा सामाजिक दृष्टिकोन जागृत झाला म्हणजे, मग राष्ट्रवादाची शिकवण चांगल्या रीतीने देता येईल, असे लोकमान्यांना वाटत होते. त्यांनी कायमच ‘गणेशोत्सवा’कडे, राष्ट्रवादाची आधुनिक संकल्पना समाजात रुजविण्याचे साधन म्हणूनच पाहिले.
 
‘कादंबरीकारास मात्र कल्पनागम्य देखावा,’ असे वर्णन करून, टिळकांनी १८९४च्या उत्सवाचे आणि रम्य देखाव्यांचे हृद्य वर्णन मोठ्या उल्हासाने पुढीलप्रमाणे केले आहे- "गणपतीच्या मूर्ती खरोखरच प्रेक्षणीय होत्या. मेळ्यांचा सरंजाम पाहून तर आमची मतिच गुंग झाली. मेळ्यांतील प्रत्येक इसमाचा तो उज्ज्वल पोशाख, ताल धरण्यासाठीची हातात धरलेली त्याची ती चित्रविचित्र काठी, एकाच ठेयाने पडणारे सर्वांचे ते पाऊल, पद्ये म्हणणारांचा तो मनोहर आवाज, बाकीच्या लोकांचे भक्तिरसाने ओथंबलेले ते गाणे, सर्वत्र स्वधर्माच्या स्तुतीने भरलेले ते कर्णमधुर आलाप, आमच्या मराठेबंधूंचा तो वीरश्रीपूर्वक उत्साह आणि त्यांची ती भव्य निशाणे इत्यादि गोष्टी एके ठिकाणी नव्हे, दोन ठिकाणी नव्हे, शंभर ठिकाणी पाहण्याचा आम्हांस अलभ्य लाभ झाला.”
 
लोकमान्य टिळकांची गणेशोत्सवात होणारी भाषणे त्या काळाचा विचार केल्यास, चांगलीच स्फोटक होती. लोकमान्य टिळकांनी या उत्सवाला जे राष्ट्रीय महोत्सवाचे स्वरूप दिले ते काकासाहेब खाडिलकरांनुसार, "लोकांच्या स्वाभाविक ओघाला कोणते वळण दिले असता राष्ट्रहित सहजगत्या साधणारे आहे, ते लोकनायक होऊ पाहणार्‍याने लोकांत मिसळूनच समजावून घेतले पाहिजे. गणेशोत्सवातील भाषण असो, अथवा मार्केटात बोलावयाचे असो, लोकांना जागे करण्यासाठी आणि प्रतिकाराला सिद्ध करण्यासाठी त्यांनी वाणीचा जितका उपयोग केला, तितका दुसर्‍या कोणी क्वचितच केला असेल.”
 
‘कायद्याने सुधारणा होता कामा नये,’ हा आग्रह टिळकांनी ज्याप्रमाणे सुधारकांविरुद्ध धरला; त्याचप्रमाणे ‘असा कायदा करून आमच्या धार्मिक चालीरीतीत ढवळाढवळ न करण्याचे तुम्ही आश्वासन दिले आहे, त्याला जागा,’ असा इशाराही त्यांनी राज्यकर्त्यांना दिला. गणेशोत्सवाला त्यांनी व्यापक सार्वजनिक स्वरूप दिले. धार्मिक भावनेचा व ऐतिहासिक परंपरेचा आश्रय घेण्याच्या व सामान्य शेतकर्‍यांमध्ये व मध्यमवर्गीयांमध्ये असंतोष निर्माण करण्याच्या या तंत्राचा अवलंब टिळकांनी केल्यामुळे, राज्यकर्त्यांच्या मनात त्यांच्याविषयी संशय निर्माण होऊ लागला. कारण, धार्मिक भावना दुखावल्या गेल्यास त्याचे परिणाम काय होतात, याची थोडीशी चुणूक १८५७च्या बंडात राज्यकर्त्यांना दिसली होती. धार्मिक भावनेच्या आधारावर हिंदू व मुसलमान एकत्र आल्याचे, ते अखेरचे महत्त्वाचे उदाहरण होते. यामुळेच धर्मभावना प्रबळ असल्यामुळे तिच्या आधारावर दोन्ही जमातींना एकत्र येऊ देता कामा नये, हेच इंग्रजांच्या राजकीय धोरणाचे एक महत्त्वाचे सूत्र झाले. निरनिराळ्या प्रश्नांवर पद्धतशीरपणे असंतोष निर्माण करण्यास टिळकांनी प्राधान्य दिले आणि त्याचबरोबर धार्मिक भावनेच्या साहाय्याने, अधिकाधिक लोकांना एकत्र आणण्याचेही प्रयत्न त्यांनी केले.
 
‘गणपत्युत्सव’ सुरू करण्यामागे लोकमान्य टिळकांचे विविध हेतू होते. यात उत्तमातील उत्तम कीर्तने व्हावीत, प्रवचने व्हावीत, प्रबोधनात्मक कार्यक्रम व्हावेत, शूरवीरांचे दांडपट्टे लोकांनी बघावेत, पारंपरिक विद्यांचे आणि कलांचे दर्शन तिथे व्हावे; त्यातून १८ पगड जाती एकत्र येऊन, सर्व समाजबांधवांनी उत्सव साजरा करावा, असे त्यांना वाटे.
 
१८९५च्या ‘यंदाचा गणपत्युत्सव’ या लेखात, टिळकांनी उत्सवाच्या वाढत्या प्रमाणाबाबत आनंद व्यक्त केला आहे. त्यात राष्ट्राचा अभ्युदय, ऐयाची वृद्धी, एक धर्म, एक राजा आणि एक भाषा ही राष्ट्रीयत्वाची प्रधान अंगे असल्याचेही त्यांनी नमूद केले आहे. गणेशोत्सवाच्या सुरुवातीच्या काळात, टिळकांच्या व्याख्यानांचे विषय ‘तत्त्वज्ञान’ असे. सुक्ष्मरित्या पाहिल्यास, टिळक ‘गीता-रहस्य’ची तयारीच मनोमन करीत असल्याच दिसते. १९०७ सालच्या गणेशोत्सवात लोकमान्य टिळकांनी जी व्याख्याने दिली, त्यात त्यांच्या मनात उसळणारा संताप एकसारखा व्यक्त होत होता. या भाषणात उमटलेल्या शब्दामागे विलक्षण निर्धार होता. ते म्हणत, "सध्याची स्थिती जर तुम्हास असह्य झाली नसेल, तर हे राष्ट्र जितया लवकर मरेल तितकेच बरे! कृतघ्न लोकांनी या भूमीला भार होण्यापेक्षा, दुसरे कोणी येऊन ती सनाथ करतील” हे त्यांचे उद्गार! १९१४च्या गणेशोत्सवाच्या मिरवणुकीत टिळकांनी भाग घेऊ नये, ही सरकारची इच्छा टिळकांनी मान्य केली. त्यावेळी ही इच्छा ‘त्या वर्षापुरतीच मान्य’ असेही पुण्याच्या कलेटरला त्यांनी कळवले. एवढेच नव्हे, तर त्या उत्सवात ‘राजद्रोही’ पुढार्‍यांचा जयजयकार करू नका, फार काय तर त्यांच्या नातेवाइकांचाही पुष्पहारादिकांनी गौरव करू नका, असा बंदीचा हुकूमच ‘मॅजिस्ट्रेट’ने सोडला.
 
गणेशोत्सवाचे स्वरूप दिवसेंदिवस वाढत चालले. त्याचे महत्त्व चिरोल साहेबाने पुढील शब्दांनी वर्णिले आहे, "आपल्या राजकीय चळवळीस धर्माचा पाठिंबा असला म्हणजे चांगले, या उद्देशाने हिंदुस्थानातील अत्यंत लोकप्रिय देव जो गणपति, तो आपल्या सर्व चळवळींचेच आदिदैवत करण्याची लुप्ति टिळकांनी लढविली.”
 
सार्वजनिक गणेशोत्सव १३०व्या वर्षापुढे पाऊल टाकावयाला निघाला असताना, या उत्सवाचा वेगवेगळ्या अंगांनी, मोकळेपणाने आणि निकोप दृष्टीने विचार करणे गरजेचे झाले आहे. आपल्या स्वातंत्र्यलढ्यात लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सवाला सार्वजनिक स्वरूप द्यावयाचे ठरविले, ते सर्वसामान्य माणसापर्यंत राजकीय विचार जाऊन पोहोचावा, त्याच्या अंतःकरणाला तो भिडावा यासाठीच. ब्रिटिश साम्राज्यवादाचे जोखड झुगारायचे असल्यास, कोणत्या दिशेने जावयाला हवे, काय काय करायला हवे याचे स्पष्ट, नेमके आणि रेखीव चित्र लोकांच्या डोळ्यांसमोर उभे राहावे यासाठीच. सामान्य माणसाचा बुजरेपणा, सत्तेपुढे भयभीत होऊन वाकण्याचा भेदरटपणा जावा, पारतंत्र्यात खितपत पडायचा प्रसंग आल्यास कोणती पावले उचलावीत याची जाणीव व्हावी; शिवाय चार माणसे जोडून एक विचाराची बळकट संघटना उभारल्याशिवाय हे कार्य तडीला नेता येणार नाही, हे मनात पक्के रुजवण्यासाठी राष्ट्रीय उत्सवासारखे एखादे माध्यम हवे, आपल्या हाती एक नवे शस्त्र पाहिजे, ही गोष्ट लोकमान्यांनी अचूक हेरली होती.
 
शैलेंद्र रिसबूड




संबंधित मजकूर