युद्ध आता रणांगणाऐवजी थेट समाजामध्ये लढले जाते. आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने शत्रू जनतेला संभ्रमित करून, युद्ध जिंकू शकतो. त्यामुळे या धोक्याकडे सजगपणे बघणे आवश्यक झाले आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर बदलत्या तंत्रज्ञानाचे वाढते धोके आणि भारताची राष्ट्रीय सुरक्षा या संदर्भात परिस्थितीचा मागोवा घेणारा हा लेख...
चीन, पाकिस्तान, ‘डीप स्टेट’, ‘वेस्टन वर्ल्ड’मधले काही देश भारताचे शत्रू आहेत. यांना भारताची प्रगती खुपते. या देशांचे भारतामधील हस्तक, ‘समाज माध्यमां’चा गैरवापर करून, भारताविरुद्ध ‘नॅरेटिव्ह’ युद्ध, माहिती युद्ध लढत आहेत. समाज माध्यम हे अलीकडे, युवकांचे माहितीचे मुख्य साधन झाले आहे. अनेक तरुण वर्तमानपत्र किंवा दूरदर्शनपेक्षा ‘इन्स्टाग्राम’ रील्स, ‘युट्यूब’ शॉर्ट्स, ‘व्हॉट्सअॅप’ फॉरवर्ड्स किंवा इन्फ्लुएन्सर व्हिडिओंमधूनच माहिती घेतात. यातील समस्या अशी की, समाज माध्यमांचे ‘अल्गोरिदम’ लोकांचे लक्ष वेधणारी सामग्रीच पुढे ढकलतात. त्यामुळेच राग, भीती, धक्का किंवा द्वेष निर्माण करणारी सामग्री अधिक वेगाने पसरते.
यातून पुढील परिणाम होतात :
- समाजात ध्रुवीकरण वाढते.
- लोक एकमेकांविषयी संशयी होतात.
- संस्थांवरील विश्वास कमी होतो.
- कट्टर विचारसरणीला बळ मिळते.
- लोकशाही संवाद कमकुवत होतो.
- यालाच ’अटेंशन इकॉनॉमी’चे दुष्परिणाम म्हटले जाते.
- भारतीय युवक : सर्वांत मोठे लक्ष्य
भारताची जवळपास निम्मी लोकसंख्या ३५ वर्षांखालील आहे. त्यामुळे भारतीय युवक हे माहिती युद्धातील प्रमुख लक्ष्य ठरतात. ऑनलाईन गेमिंग, इन्फ्लुएन्सर संस्कृती, मनोरंजन आणि डिजिटल जाहिरातीच्या माध्यमातून, युवकांच्या विचारांना प्रभावित केले जाते. कधी कधी हे प्रभाव सांस्कृतिक, सामाजिक किंवा आर्थिक स्वरूपाचेही असतात. काही वेळा युवक नकळतपणे, चुकीची माहिती पुढे पाठवतात. अनेकदा माहितीची पडताळणी न करताच, ती पुढे पाठवली जाते. त्यामुळे प्रत्येक युवक हा माहिती युद्धातील संभाव्य सैनिक किंवा लक्ष्य असू शकतो.
राष्ट्रीय सुरक्षेवरील परिणाम : भविष्यातील युद्धांत शत्रूला, भारतीय सीमांना लक्ष्य करण्याची गरज नाही. तो भारतीय समाजामध्येच अविश्वास, अस्थिरता आणि विभाजनाद्वारे नुकसान करु शकतो. अफवांच्या आधारे सांप्रदायिक दंगली भडकवणे, निवडणुकां प्रभावित करणे, आर्थिक घबराट निर्माण करणे, सशस्त्र दलांच्या मनोबलाचे खच्चीकरण करणे, सरकारवरील विश्वासावरही प्रहार करता येतो. यामुळे राष्ट्रीय सुरक्षेचा प्रश्न केवळ सीमांच्या सुरक्षेपुरताच मर्यादित नाही. तो मानसशास्त्र आणि सामाजिक एकतेशीही जोडला जातो.
भारताविरुद्धचे नवीन रणांगण : अलीकडे युद्धाचे स्वरूप झपाट्याने बदलत आहे. आज मात्र एखाद्या देशाच्या नागरिकांच्या मनामध्ये शंका, अविश्वास, भीती आणि गोंधळ निर्माण करणेही, युद्धातील प्रभावी शस्त्र झाले आहे. यालाच संज्ञानात्मक युद्ध किंवा ‘नॅरेटिव्ह’ युद्ध म्हणतात. भारतासारख्या लोकशाही देशात हे युद्ध, विशेषतः धोकादायक ठरते. भारतात ९० कोटींपेक्षा अधिक इंटरनेट वापरकर्ते असून, अनेक भाषा, विविध धर्म, जाती, प्रादेशिक अस्मिता आहेत. त्यामुळे भारत हा माहिती युद्धासाठी एक सोप्पे लक्ष्य ठरतो.
चीनचे ‘थ्री वॉरफेअर्स’ आणि मनांवरील नियंत्रण:
चीनने अनेक वर्षांपूर्वीच, तीन प्रकारच्या युद्धांची संकल्पना विकसित केली आहे.त्यामध्ये जनमत युद्ध, मानसशास्त्रीय युद्ध, कायदेशीर युद्धाचा समावेश होतो. चीनच्या ‘पीपल्स लिबरेशन आर्मी’चे उद्दिष्ट प्रतिस्पर्धी राष्ट्राच्या निर्णय क्षमतेवर आणि सामाजिक एकतेवर प्रभाव टाकण्याचे आहे. अभ्यासांनुसार, चीन मनांवरही प्रभुत्व मिळवण्याचा प्रयत्न करीत आहे. समाज माध्यम, कृत्रिम बुद्धिमत्ता, डेटा विश्लेषण, ‘बॉट नेटवर्स’ आणि ‘डिजिटल प्लॅटफॉर्म’चा वापर करून, माहितीवर नियंत्रण मिळवण्याचा त्याचा उद्देश आहे. गलवान संघर्षानंतर भारताविरुद्ध दिशाभूल करणार्या बातम्या, व्हिडिओ आणि समाज माध्यम मोहिमा राबवल्याचे समोर आले होते. याचा उद्देश चीनच्या कृतींना योग्य ठरवणे हाच.
पाकिस्तानचे नॅरेटिव्ह युद्ध : पाकिस्तान अनेक दशकांपासून भारताविरुद्ध ‘माहिती युद्धा’चा वापर करत आहे. काश्मीर-प्रश्न, मानवाधिकार, धार्मिक ध्रुवीकरण आणि दहशतवादांसारख्या मुद्द्यांवर, जागतिक मतप्रवाह प्रभावित करण्याचा त्याचा प्रयत्न असतो. कारगिल युद्धादरम्यान सुरुवातीच्या काळात, पाकिस्तानने आंतरराष्ट्रीय स्तरावर दिशाभूल करणारे कथानक निर्मितीचा प्रयत्न केला होता. त्याचप्रमाणे समाज माध्यमाच्या युगात ‘बॉट नेटवर्स’ आणि खोट्या प्रचार मोहिमांद्वारे, भारताविरुद्ध वातावरण तयार करण्याचे प्रयत्न अनेकदा दिसले आहेत.
२०२५ मधील भारत-पाकिस्तान संघर्ष काळात, दोन्ही बाजूंनी ‘डीपफेक’ व्हिडिओ, कृत्रिम ऑडिओ संदेश आणि दिशाभूल करणार्या दृश्यांचा वापर झाला. यामुळेच युद्ध माहितीच्या क्षेत्रातही लढले जात असल्याचे स्पष्ट झाले.
‘डीपफेस’ : सत्य आणि असत्यातील सीमारेषा पुसणारे शस्त्र : कृत्रिम बुद्धिमत्तेच्या मदतीने तयार केलेले ‘डीपफेक’ व्हिडिओ आणि ऑडिओ, हे नव्या युद्धातील सर्वांत धोकादायक शस्त्र. एखादा नेता, लष्करी अधिकारी, प्रत्यक्षात कधीही न बोललेले शब्द बोलताना दाखवणे, आता तांत्रिकदृष्ट्या शय आहे. त्यामुळे सामान्य नागरिकांना सत्य आणि असत्यांमधील फरक करणे, अधिकच कठीण होत आहे. २०२६ मध्ये पश्चिम आशियातील संघर्षाच्या संदर्भात, भारतातील वरिष्ठ नेत्यांचे आणि अधिकार्यांचे कथित व्हिडिओ समाज माध्यमांवर प्रसिद्ध झाले होते. नंतर ते कृत्रिमरीत्या तयार केलेले असल्याचे आढळले. अशाच घटनांमुळे काही मिनिटांत, लाखो लोकांची दिशाभूल होऊ शकते. ‘ओआरएफ’च्या अभ्यासानुसार, भारताला ‘एआय’द्वारे होणार्या दिशाभूलीचा धोका सर्वाधिक आहे. ‘एआय’आधारित फसवणूक, आवाजाची नक्कल आणि ‘डीपफेस’ यांचे प्रमाण झपाट्याने वाढते आहे.
भारताने काय करावे?
संज्ञानात्मक युद्ध, ‘डीपफेस’, कृत्रिम बुद्धिमत्तेद्वारे दिशाभूल करणारी माहिती आणि ‘अल्गोरिदम’ंचा वाढता प्रभाव रोखण्यासाठी, भारताने बहुआयामी आणि दीर्घकालीन रणनीती अंगीकारली पाहिजे. सर्वप्रथम शालेय आणि महाविद्यालयीन स्तरातूनच, डिजिटल साक्षरता अनिवार्य करणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांना माहितीची सत्यता कशी पडताळायची, ‘डीपफेक’ कसे ओळखायचे, ‘अल्गोरिदम’ची कार्यपद्धती आणि ऑनलाईन प्रचार मोहिमांचे मानसशास्त्राचे प्रशिक्षण दिले पाहिजे. दुसरे म्हणजे, भारताने ‘डीपफेक’ आणि ’एआय’वर आधारित दिशाभूल शोधण्यासाठी, स्वदेशी साधनांच्या विकासासाठी गुंतवणूक करणेही आवश्यक आहे. केंद्र सरकारच्या माध्यमातून, विविध योजनांद्वारे अनेक प्रकल्प सध्या सुरू आहेत.
तिसरे म्हणजे, भारतातील सर्व प्रमुख भाषांमध्ये तथ्य पडताळणी यंत्रणेचा विकास करणे आवश्यक आहे. चौथे म्हणजे, सीमावाद, दहशतवादी हल्ले, सांप्रदायिक तणाव किंवा नैसर्गिक आपत्ती यांसारख्या राष्ट्रीय संकटांच्या वेळी सरकारने जलद आणि विश्वासार्ह माहिती नागरिकांपर्यंत पोहोचवली पाहिजे. माहितीचा अभाव हा अफवा आणि दुष्प्रचाराला खतपाणी घालतो. पाचवे म्हणजे, समाजमाध्यम कंपन्यांना त्यांच्या ‘अल्गोरिदम प्रणाली’ आणि ‘डीपफेक’ सामग्रीबाबत अधिक पारदर्शक आणि उत्तरदायी बनवणे आवश्यक आहे. भारताने ‘डिजिटल प्लॅटफॉर्म’च्या जबाबदारीसंदर्भात आधीच काही नियम लागू केले असून, ‘एआय’निर्मित सामग्रीसाठी ‘लेबलिंग’ आणि ‘मेटाडेटा’ सारख्या उपाययोजनांना प्रोत्साहन दिले जात आहे. याशिवाय, सायबर सुरक्षा आणि संज्ञानात्मक सुरक्षेला एकत्रित करून, राष्ट्रीय सुरक्षेचा अविभाज्य भाग केले पाहिजे. आजचा शत्रू केवळ संगणक प्रणालींवर हल्ला करत नाही, तर नागरिकांच्या मनांवर आणि समाजाच्या विचारविश्वावरही प्रभाव टाकतो. त्यामुळे सशस्त्र सेना, गुप्तचर संस्था, शैक्षणिक क्षेत्र, तंत्रज्ञान उद्योग आणि माध्यम संस्था यांच्यात समन्वय वाढवणे आवश्यक आहे. महत्त्वाचे म्हणजे भारताने सकारात्मक, तथ्याधारित सत्य समाजासमोर मांडली पाहिजेत. भारतीय युवकांचे विविध क्षेत्रातील योगदान प्रभावीपणे जगासमोर आणले पाहिजे. संज्ञानात्मक युद्धाच्या या नव्या युगात भारताची सर्वांत मोठी शक्ती म्हणजे सुशिक्षित, माहिती-सजग आणि राष्ट्रीय हितांविषयी जागरूक नागरिक समाजनिर्मिती होय.
एकविसाव्या शतकातील युद्धामध्ये सैन्य आणि सैनिक जितके महत्त्वाचे, तितकीच महत्त्वाची माहिती आणि मनांवरील पकडही आहे. चीन आणि पाकिस्तानसारखे प्रतिस्पर्धी, या क्षेत्रात सातत्याने गुंतवणूक करीत आहेत. त्यामुळे भारतानेही संज्ञानात्मक सुरक्षा ही राष्ट्रीय सुरक्षेची नवीन सीमा म्हणून स्वीकारली पाहिजे. भविष्यातील युद्धाचा निकाल नागरिकांच्या मनामध्ये, मोबाईलच्या स्क्रीनवर आणि डिजिटल विश्वातील माहितीच्या प्रवाहात ठरणार आहे. म्हणूनच सजग नागरिक, जबाबदार माध्यमे, सशक्त तंत्रज्ञान आणि राष्ट्रीय एकात्मता हेच भारताचे सर्वांत प्रभावी संरक्षण कवच ठरणार आहे.