मुंबई (Kamathipura Redevelopment): मुंबईच्या ऐतिहासिक कामाठीपुरा परिसराच्या पुनर्विकासाला आता वेग आला असून, प्रस्तावित समूह पुनर्विकास आराखड्याचे सादरीकरण आणि जनसंवाद कार्यक्रम शुक्रवार दि. 11 रोजी कामाठीपुरात स्थानिकांच्या सहभागाने उत्साहात पार पडला. “नागरिकांचा सहभाग, पारदर्शकता आणि संवादाच्या माध्यमातून कामाठीपुराचा सर्वांगीण, नियोजित आणि शाश्वत विकास साधणार,” असा विश्वास म्हाडाचे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वाल यांनी व्यक्त केला.(Kamathipura Redevelopment)
म्हाडाच्या मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळ आणि कामाठीपुरा विकास समितीच्या संयुक्त विद्यमाने अखिल पद्मशाली समाज सभागृहात हा कार्यक्रम झाला. खासदार अरविंद सावंत, आमदार अमीन पटेल, म्हाडाचे अधिकारी, विकासक, स्थानिक रहिवासी, भाडेकरू आणि जमीनमालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.(Kamathipura Redevelopment)
सुमारे ३४ एकर क्षेत्रावर हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प प्रस्तावित असून, त्यात ४७५ सेस आणि २५९ नॉन-सेस इमारतींचा समावेश आहे. सुमारे ८ हजारांहून अधिक रहिवासी व भाडेकरू आणि जवळपास ८०० जमीनमालक या प्रकल्पाशी संबंधित आहेत. विद्यमान रहिवाशांच्या पुनर्वसनासोबतच तब्बल ४,५०० अतिरिक्त गृहनिर्माण सदनिकांची निर्मिती करण्याचे नियोजन आहे.(Kamathipura Redevelopment)
DCPR-2034 मधील विनियम 33(9) अंतर्गत हा प्रकल्प राबविण्यात येत असून, म्हाडाला नोडल एजन्सी तसेच विशेष नियोजन प्राधिकरणाचा दर्जा देण्यात आला आहे. आधुनिक भूकंपरोधक बांधकाम, अग्निसुरक्षा, लिफ्ट, अंतर्गत रस्ते, हरित क्षेत्रे, पावसाच्या पाण्याचे संधारण, सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन यांसह विविध आधुनिक सुविधांचा आराखड्यात समावेश आहे.(Kamathipura Redevelopment)
पुनर्विकास काळात रहिवाशांना दोन वर्षांचे आगाऊ भाडे आणि पुढील एक वर्षाचे धनादेश, तसेच स्थलांतरासाठी ₹२५ हजार एकरकमी मदत देण्यास मान्यता देण्यात आली आहे. बिगरनिवासी गाळेधारकांसाठी क्षेत्रफळानुसार ₹२५ हजार ते ₹३५ हजार मासिक भाड्याची तरतूद करण्यात आली आहे. जमीनमालकांना प्रति प्लॉट ₹२५ हजार मासिक भाडे देण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे.(Kamathipura Redevelopment)
खासदार अरविंद सावंत आणि आमदार अमीन पटेल यांनी बीडीडी चाळ पुनर्वसनाच्या धर्तीवर समूह पुनर्विकासासाठी म्हाडा हा सक्षम पर्याय ठरू शकतो, असा विश्वास व्यक्त केला. नागरिकांच्या सूचनांचा विचार करून हा प्रकल्प पुढे नेण्याचे आश्वासन यावेळी देण्यात आले.(Kamathipura Redevelopment)
मूळची अहिल्यानगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूट मधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयात पदव्युत्तर शिक्षण. २०१९मध्ये मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर रुजू. सद्यस्थितीत 'इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट' विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. राज्यातील पायाभूत सुविधांविषयी फिल्ड रिपोर्ट आणि लेखनात रस.