राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी त्यांच्या अमेरिका, कॅनडा आणि ब्रिटन या तिन्ही देशांच्या दौर्यात, आपल्या संबोधनातून हिंदुत्वाची व्याख्या आणि व्याप्ती अतिशय स्पष्टपणे जगासमोर मांडली. धर्म, जाती, पंथ, भाषा, प्रदेश या सगळ्यांपलीकडे जात, डॉ. मोहनजी भागवत यांनी प्रस्तुत केलेले हिंदुत्व आणि मानवतेवरील सखोल विवेचन हे सध्याच्या धु्रवीय जागतिक परिप्रेक्ष्यात दीपस्तंभ ठरावे.
भारताच्या इतिहासात विद्यापीठे ही सामाजिक चळवळींची महत्त्वपूर्ण केंद्रे राहिली आहेत, जिथे तरुणपिढीला अपरिचित विचारधारा आणि विविध अनुभवांची ओळख होते. परंतु, हेच एकाकीपण विद्यापीठांना संशयास्पद विचारसरणी आणि देशविरोधी संघटनांसाठी प्रमुख भरती केंद्रांमध्येही बदलू शकते. मग यावर आपण समाज म्हणून नेमके काय उपाय करू शकतो? तर याचे उत्तर म्हणजे, आपण ऐकले पाहिजे, शिकले पाहिजे आणि सजगही राहिले पाहिजे. यांपैकी अनेक गट, मोठा निधी आणि अशा अजेंड्यांद्वारे प्रेरित असतात; जे कदाचित सामान्य हिताचे नसतील. पण, तरीही ते अनेकदा आपले लक्ष कोणत्या मुद्द्यांकडे वेधतात, हे समजून घेतले पाहिजे. ते स्वतःच्या विचारसरणी आणि कथानकांचा पद्धतशीरपणे प्रचार करतात, ज्यामुळे काही मुद्द्यांना लक्षणीय प्रसिद्धी मिळते; तर तितकेच वैध असलेले इतर मुद्दे सोयीस्कररीत्या दुर्लक्षित राहतात.
अनेक तरुणांना सर्वप्रथम विद्यापीठातच धर्म आणि भू-राजकीय मुद्द्यांचा, विशेषतः भारताच्या संदर्भातील संगम अनुभवायला मिळतो. यामुळे भारताचे सरकार, राजकारण, शेजारी देश आणि जागतिक संघर्षांवर जोरदार चर्चा होऊ शकते. या चर्चांमध्ये अनेकदा भारत आणि हिंदूंना प्रामुख्याने बहुसंख्याकवादी, असहिष्णू किंवा धार्मिक अल्पसंख्याकांच्या समस्यांसाठी जबाबदार ठरवणारे कथानकही (नॅरेटिव्ह) मांडले जाते. आणि राजकीय मुद्द्यांवरील हीच टीका कधीकधी हिंदू धर्म, हिंदू संघटना किंवा संपूर्ण हिंदू समाजावरच व्यापक आरोप करण्यापर्यंत मजल मारते.
दि. २९ ऑगस्ट रोजी न्यूयॉर्कमध्ये ‘एक जग, एक मानवता’ या कार्यक्रमातील भाषणात, रा. स्व. संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी हिंदुत्व आणि मानवता यावर भाष्य केले आणि त्यांच्या संदेशाचा सखोल अर्थ समजून घेण्याचे आवाहन केले. त्यांनी स्पष्ट केले की, हिंदुत्व हे आपल्या अस्मितेची आणि मानवतेची एक सखोल समज दर्शवते, जी आपल्या ऐतिहासिक वारशात खोलवर रुजलेली आहे. हिंदुत्वाला नाकारणे म्हणजे त्याचा गैरसमज करून घेणे, जे एखाद्या व्यक्तीच्या स्वतःच्या शारीरिक वैशिष्ट्यांना नाकारण्यासारखेच आहे. त्यामुळे हिंदुत्वाला विरोध करणे म्हणजे, मानवतेलाच विरोध करण्यासारखे आहे. हिंदुत्व सामाजिक संदर्भातील सर्व मानवतावादी पैलूंशी संबंधित आहे आणि ते जागतिक कल्याणाचे प्रतीक आहे. हिंदुत्वाचा जागतिक दृष्टिकोन समान वारसा आणि मातृभूमी असलेल्या लोकांना एकत्र आणतो, जो ध्रुवीकरण आणि संकुचित विचारसरणीच्या विरुद्ध आहे.
व्यापक अर्थाने हिंदुत्व हे वैयक्तिक धर्म, विचारप्रणाली किंवा उपासनापद्धतींच्या पलीकडे जाऊन सर्वांसाठी सुलभ अशी एक वैश्विक जीवनशैली प्रदान करते. एका प्रगतिशील समाजात, ते आध्यात्मिक विकासाच्या एका सर्वांगीण प्रवासाचे प्रतिनिधित्व करते; ज्यामध्ये विधी, आचरण, ध्यान आणि समाजसेवा यांचा समावेश होतो. तसेच नृत्य आणि संगीतासारख्या सांस्कृतिक पैलूंचाही स्वीकार केला जातो. हिंदुत्व सर्व व्यक्तींना समान मानत असल्याने ते जात, धर्म, भाषा किंवा लिंग या आधारावर भेदभाव करत नाही.
हिंदुत्व हे काळाच्या ओघात निर्माण झालेल्या अन्याय आणि अंधश्रद्धांना आव्हान देते आणि सर्व धर्मांमध्ये सामाजिक सुधारणांना प्रोत्साहन देते. ते हिंसाचार आणि प्रचाराने निर्माण झालेल्या विभाजनावर उपाय सुचवते आणि जागतिक हितासाठी लोकांना एकत्र आणण्याचे उद्दिष्ट ठेवते. ते वसाहतवादी हिंसाचारातून निर्माण होणार्या न्यूनगंडाच्या भावनेला विरोध करते आणि आत्मसन्मानाची भावना वृद्धिंगत करते. हिंदुत्व ‘वसुधैव कुटुम्बकम्’ या तत्त्वाचे मूर्त स्वरूप आहे, जे यावर जोर देते की, सर्व व्यक्ती एकाच कुटुंबाचा भाग आहेत.
अयं निजः परो वेति गणना लघुचेतसाम्|
उदारचरितानां तु वसुधैव कुटुम्बकम्॥
अर्थात, हा माणूस माझा आहे आणि तो नाही, ही मानसिकता संकुचित वृत्तीच्या व्यक्तींची असते. याउलट, जे स्वभावतः उदार असतात, ते संपूर्ण जगालाच आपले कुटुंब मानतात.
हिंदुत्व भारताकडे केवळ एक भौतिक ठिकाण म्हणून न पाहता एक समृद्ध, प्राचीन संस्कृती म्हणून पाहते. म्हणूनच, त्याला ‘भारतमाता’ म्हटले जाते. सावरकरांनी प्रतिपादन केले आहे की, ‘हिंदुत्व हा केवळ एक शब्द नाही, तर तो एक इतिहास आहे.’ ते राष्ट्रीय धर्म आणि घटनात्मक चौकट स्थापित करते, तसेच एक न्याय्य आणि कार्यक्षम भारत व जग घडवण्यासाठी लोकशाही आणि आधुनिकतेसह संपूर्ण समाजाच्या एकीकरणाला प्रोत्साहन देते. लोकांना विज्ञान, गणित, नीतिशास्त्र आणि जीवन कौशल्ये यांसारख्या विविध विषयांमध्ये उच्च-गुणवत्तेचे, मूल्याधारित शिक्षण दिले जाईल; जेणेकरून ते धोके, दहशतवाद, गुन्हेगारी आणि भ्रष्टाचाराचा सामना करू शकणारे बुद्धिमान, मदतशील व्यक्ती म्हणून घडतील. खरेतर, हिंदुत्व सामाजिक आदर्श वाढवण्यासाठी आणि पायाभूत सुविधा सुधारण्यासाठी सर्व धर्मांच्या आणि अगदी नास्तिकांसह विविध गटांमध्ये सहकार्याला प्रोत्साहन देते. ऐतिहासिकदृष्ट्या हिंदू धर्मात सामाजिक न्याय प्रस्थापित करण्याच्या उद्देशाने भक्ती आणि वेदांत चळवळींसारख्या विविध सुधारणावादी चळवळी झाल्या आहेत. सामाजिक सलोख्याचे सार ‘ऋग्वेदा’तील या सूक्तात सुंदरपणे मांडले आहे -
ॐ संगच्छध्वं संवदध्वं
सं वो मनांसि जानताम्|
देवा भागं यथा पूर्वे
सञ्जानाना उपासते॥
(एकत्र चाला, एकत्र बोला, विचारांमध्ये सुसंवाद असू द्या.) हिंदुत्व या विचाराला प्रोत्साहन देते की, समाजातील सदस्यांनी एकत्र यावे, एक समान समज विकसित करावी आणि एकसुरात विचार करावा. ते सामूहिक अंतर्दृष्टी जोपासण्यावर आणि चिरस्थायी सामाजिक सुसंवाद व आध्यात्मिक शांती वाढवणार्या समान ध्येयांचा पाठपुरावा करण्यावर भर देते.
हिंदुत्व ही एक व्यापक आणि सहज प्रवृत्तीची विचारधारा आहे, जी सामूहिक वाढ आणि आत्मसंरक्षणाला प्रोत्साहन देते. ही विचारधारा हिंदू संस्कृतीचा समृद्ध वारसा आणि तिच्या गौरवशाली इतिहासाची कदर करणार्या लाखो आत्मजागरूक भारतीयांच्या मनात रुजलेली आहे. जागतिक कल्याणासाठी भारताला ‘विश्वगुरू’ म्हणून स्थापित करण्याची तिची आकांक्षा आहे. राष्ट्रांमध्ये सदिच्छा वाढवून केवळ राष्ट्रालाच नव्हे, तर पर्यावरण आणि आंतरराष्ट्रीय संबंधांनाही लाभ पोहोचवत, जगभर शांततेचा प्रसार करण्याचे तिचे उद्दिष्ट आहे. इतर संस्कृतींच्या किमतीवर किंवा इतर देशांवर वर्चस्व गाजवून भारताने महासत्ता बनण्याच्या कल्पनेला हिंदुत्व विरोध करते.
हिंदू धर्मात निसर्गाला दैवी मानले जाते. प्राचीन ‘ऋग्वेदा’मध्ये निसर्गाचा गौरव करणारी असंख्य स्तोत्रे आहेत, ज्यात निसर्गाला केवळ जड वस्तू म्हणून नव्हे; तर आपल्या अस्तित्वाचा अविभाज्य भाग असलेली एक पवित्र, चेतन शक्ती म्हणून पाहिले जाते. त्यामुळे त्याचे शोषण करण्याऐवजी त्याचे जतन केले पाहिजे. वैदिक ग्रंथ मानव आणि निसर्ग यांच्यातील संबंध स्पष्ट करतात, ज्यात म्हटले आहे की-
पुत्रो अहं पृथिव्याःपर्जन्यः
पिता स उ नः पिपर्तु॥
अर्थात, पृथ्वी माझी माता आहे आणि मी तिचा पुत्र आहे.
हिंदुत्व एक अशी शिक्षण प्रणाली स्थापित करू पाहते, जी प्रत्येक व्यक्तीच्या अद्वितीय राष्ट्रीय ओळखीचे संगोपन करते. पर्यावरणाची शाश्वतता सुनिश्चित करताना संशोधन आणि नवोपक्रमाद्वारे राष्ट्र आणि जगाला पुढे नेण्याचे त्याचे उद्दिष्ट आहे. ‘वेद’, ‘उपनिषदे’, ‘गीता’, ‘रामायण’ आणि ‘महाभारत’ यांसारख्या महत्त्वपूर्ण हिंदू ग्रंथांमध्ये व्यक्त केलेल्या मूल्यांचे पालन करणे, हे हिंदुत्वाच्या केंद्रस्थानी आहे. मग ते मंदिरांना भेट देणे, त्यांचे कौतुक करणे किंवा त्यांचा जीर्णोद्धार करणे असो किंवा योग आणि ध्यान यांसारख्या अभ्यासाद्वारे अध्यात्मिकतेचा शोध घेणे असो, या सर्व गोष्टी प्रशंसनीय आहेत.
हिंदुत्व, ज्याचा शब्दशः अर्थ ‘हिंदूपणा’ आहे; ते धर्माच्या भावनेचे प्रतिबिंब असून, सर्वसमावेशकता आणि व्यापकता दर्शवते. ते एकाच तत्त्वज्ञानाअंतर्गत जागतिक स्तरावर समान भूमिका शोधण्यासाठी एक व्यासपीठ उपलब्ध करून देते, ज्यामुळे एकात्मतेची एक अभूतपूर्व पातळी गाठली जाते. हिंदुत्व केवळ जातीय किंवा धार्मिक भक्तीच्या पलीकडे जाऊन राष्ट्रातील सर्व धर्मांच्या अनुयायांनी सामायिक केलेल्या सांस्कृतिक साराला सामावून घेते.
‘हिंदू’ हा शब्द समान मूल्ये, चालीरीती आणि श्रद्धा असलेल्या सामायिक वंशपरंपरेला सूचित करतो. एक सांस्कृतिक आणि राष्ट्रवादी संकल्पना म्हणून, हिंदुत्व धार्मिक सीमांमध्ये अडकून न राहता, भारताची ओळख परिभाषित करण्याचा प्रयत्न करते. व्यापक अर्थाने हिंदुत्व असे मानते की, गैरहिंदू समुदायदेखील सामायिक हिंदू संस्कृतीच्या पैलूंचा स्वीकार करतात आणि त्यांचे पालन करतात. सामाजिक संदर्भात, हिंदुत्वामध्ये भारताशी संबंधित प्रत्येक गोष्टीचा समावेश होतो.
थोडक्यात, ‘हिंदुत्व’ म्हणजे हिंदूपणा, जो मूलतः वैश्विक देवत्वाची स्वीकृती आणि एकत्वाच्या कल्पनेला एकत्रित करतो. हिंदू धर्माचे हे मूलभूत तत्त्व हिंदूंना वनस्पती आणि प्राणी, तसेच सहमानवांसहित सर्व सजीवांमधील दैवीतत्त्व ओळखण्यास प्रोत्साहित करते. हिंदू असणे हे वगळणारे किंवा अतिरेकी आहे ही कल्पना, या पायाभूत तत्त्वाशी जुळवून घेता येत नाही. असे दावे अनेकदा निवडक उदाहरणांवर अवलंबून असतात. विशेषतः स्वदेशी हिंदू आणि इतर गैरभारतीय धर्मांमधील धार्मिक संघर्षांच्या बाबतीत आणि त्यातून हिंदूंना ‘शोषक’ म्हणून चित्रित केले जाते. हे सदोष चित्रण परदेशात राहणार्या हिंदूंनाही लागू होते, ज्यांचा भारतातील धार्मिक विवादांशी कदाचित कोणताही संबंध नसेल.
केवळ कौटुंबिक वंशामुळे स्वतःला हिंदू म्हणून ओळखणे, हे ध्येय नाही. त्याऐवजी व्यक्तींनी साधक म्हणून या परंपरेशी जोडले जावे आणि तिची खोली व समृद्धी प्रत्यक्ष अनुभवावी. केवळ दुसरा दृष्टिकोन अधिक प्रभावीपणे मांडला जातो म्हणून, आपण हिंदू धर्माचा त्याग करू नये. समजून घेणे, प्रश्न विचारणे, तुलना करणे, अन्वेषण करणे आणि मग माहितीपूर्ण निवड करणे आवश्यक आहे. विश्वास आहे की, डॉ. मोहनजी भागवत यांचे हिंदुत्व आणि मानवतेवरील सखोल विवेचन, दिशाभूल करणार्या कथनांमुळे गोंधळलेल्या, संतप्त किंवा गैरसमज बाळगणार्या लोकांना मदत करेल.