मुंबई (NMIA International Flights) : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून (NMIA) आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरू करण्यास आणि वाढविण्यास प्रोत्साहन देण्यासाठी भारतीय विमानतळ आर्थिक नियामक प्राधिकरणाने (AERA) सुधारित व्हेरिएबल टॅरिफ प्लॅनला मंजुरी दिली आहे. या निर्णयामुळे नवी मुंबई विमानतळावरून नवीन आंतरराष्ट्रीय मार्ग सुरू करणाऱ्या विमान कंपन्यांना लँडिंग शुल्कात मोठ्या सवलती मिळणार असून, भविष्यात प्रवाशांना अधिक थेट आंतरराष्ट्रीय कनेक्टिव्हिटी आणि किफायतशीर विमान तिकिटांचा फायदा होण्याची शक्यता आहे.
NMIAच्या प्रस्तावानुसार सवलतीसाठीची पात्रता आता ‘मुंबई महानगर प्रदेशातील नवीन मार्ग’ याऐवजी ‘नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून सुरू होणारा नवीन मार्ग’ अशी करण्यात आली आहे. त्यामुळे MMRमधील अन्य विमानतळांवरून आधीपासून सुरू असलेल्या मार्गांपेक्षा NMIAवरून नव्याने सुरू होणाऱ्या आंतरराष्ट्रीय सेवांना थेट प्रोत्साहन मिळणार आहे. (NMIA International Flights)
नवीन आंतरराष्ट्रीय प्रवासी मार्ग सुरू करणाऱ्या विमान कंपन्यांना पहिल्या वर्षी लँडिंग शुल्कात १०० टक्के सवलत मिळेल. ५ हजार किलोमीटरपर्यंतच्या कमी अंतराच्या आंतरराष्ट्रीय मार्गांसाठी दुसऱ्या वर्षी ५० टक्के सवलत देण्यात येणार आहे. ५ हजार किलोमीटरपेक्षा अधिक अंतराच्या लांब पल्ल्याच्या मार्गांसाठी दुसऱ्या वर्षी ५० टक्के, तर तिसऱ्या वर्षी २५ टक्के सवलत मिळेल.
याशिवाय, विद्यमान आंतरराष्ट्रीय मार्गांवर अतिरिक्त फेऱ्या सुरू करणाऱ्या विमान कंपन्यांनाही ७५ टक्क्यांपर्यंत लँडिंग शुल्क सवलत मिळणार आहे. आंतरराष्ट्रीय मालवाहू विमानसेवांसाठी पहिल्या वर्षी ९० टक्के, तर दुसऱ्या वर्षी ५० टक्के सवलत देण्यात येणार आहे. (NMIA International Flights)
या सवलतींमुळे अधिक विमान कंपन्यांना नवी मुंबई विमानतळावरून आंतरराष्ट्रीय सेवा सुरू करण्यासाठी प्रोत्साहन मिळण्याची अपेक्षा आहे. परिणामी नवीन आंतरराष्ट्रीय मार्गांची संख्या वाढण्याबरोबरच प्रवाशांना विविध देशांमध्ये थेट जाण्यासाठी अधिक पर्याय उपलब्ध होऊ शकतात. विमान कंपन्यांमधील वाढलेल्या स्पर्धेमुळे तिकीट दरही अधिक किफायतशीर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. (NMIA International Flights)
मालवाहतूक क्षेत्रालाही या निर्णयाचा फायदा होणार आहे. मालवाहू विमानांसाठीच्या शुल्क सवलतीमुळे नवी मुंबई विमानतळाची एअर कार्गो कनेक्टिव्हिटी वाढण्यास मदत होईल. त्यामुळे नवी मुंबईला भविष्यात आंतरराष्ट्रीय विमान वाहतूक आणि लॉजिस्टिक्स केंद्र म्हणून विकसित करण्याच्या प्रयत्नांना चालना मिळणार आहे.
अदानी एअरपोर्ट होल्डिंग्स लिमिटेड (AAHL) आणि सिडको यांच्या सार्वजनिक-खासगी भागीदारीतून विकसित करण्यात येत असलेल्या NMIAची सुरुवातीची वार्षिक प्रवासी हाताळणी क्षमता २ कोटी आहे. पूर्ण क्षमतेने विकसित झाल्यानंतर विमानतळाची क्षमता वार्षिक ९ कोटी प्रवासी आणि ३२ लाख टन कार्गो हाताळण्यापर्यंत वाढविण्याचे नियोजन आहे. AERAच्या या निर्णयामुळे या क्षमतेच्या दिशेने NMIAच्या आंतरराष्ट्रीय विस्ताराला महत्त्वाची चालना मिळण्याची शक्यता आहे. (NMIA International Flights)
मूळची अहिल्यानगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूट मधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयात पदव्युत्तर शिक्षण. २०१९मध्ये मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर रुजू. सद्यस्थितीत 'इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट' विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. राज्यातील पायाभूत सुविधांविषयी फिल्ड रिपोर्ट आणि लेखनात रस.