बॉक्स ऑफीसवर दररोज नवनवीन विक्रम रचले जातात आणि मोडलेही जातात; पण जेव्हा कोणताही गाजावाजा न करता, प्रदर्शित झालेला एखादा चित्रपट इतिहास रचतो, तेव्हा सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसतो. आध्यात्मिक गुरू नीम करोली बाबा यांच्या जीवनावर आधारित ‘हनुमान अंश’ हा चित्रपट सध्या देशभरातील चित्रपटगृहांमध्ये धुमाकूळ घालत आहे. कोणतीही मोठी प्रसिद्धी न करता, दि. ७ ऑगस्ट रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने विशेषकरुन उत्तर आणि पश्चिम भारतातील प्रेक्षकांना चित्रपटगृहांकडे आकर्षित केले. त्यानिमित्ताने या चित्रपटाविषयी आणि त्याच्या कमाईच्या वाढत्या आलेखाचा आढावा घेणारा हा लेख...
साधारणपणे चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झालेल्या चित्रपटांची कमाई चौथ्या किंवा पाचव्या आठवड्यापर्यंत मंदावते; पण विशाल चतुर्वेदीच्या ‘हनुमान अंश’च्या बाबतीत तसे झालेले दिसत नाही. चित्रपटगृहांमध्ये महिनाभराहून अधिक काळ लोटल्यानंतरही प्रेक्षकांचा उत्साह तसूभरही कमी झालेला नाही. किंबहुना, तिसर्या आठवड्यापासून हा चित्रपट बघायला प्रेक्षकांची गर्दी व्हायला लागली, हेही एका चमत्कारापेक्षा कमी नाहीच. त्यामुळे ‘हनुमान अंश’चा बॉस ऑफीस प्रवास हा भारतीय चित्रपटसृष्टीच्या इतिहासातील सर्वांत अनोख्या आणि प्रेरणादायी प्रवासांपैकी एक ठरला आहे, असे म्हटले तर वावगे ठरु नये.
दि. ७ ऑगस्ट रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला पहिल्याच दिवशी थंड प्रतिसाद मिळाला. तथापि, सुरुवातीला चित्रपट पाहिलेल्या प्रेक्षकांनी सोशल मीडिया आणि मौखिक प्रसिद्धीद्वारे चित्रपटातील भक्तिपूर्ण वातावरण आणि कथेची प्रशंसा करण्यास सुरुवात केल्यामुळे, प्रदर्शनाच्या तिसर्या आठवड्यापर्यंत चित्रपटगृहे खचाखच भरली होती.
एकीकडे यशचा बिग बजेट चित्रपट ‘टॉसिक : अ फेअरी टेल फॉर ग्रोन-अप्स’ प्रेक्षकांच्या अपेक्षा पूर्ण करू शकला नाही, तर दुसरीकडे केवळ दोन कोटी रुपयांच्या तुटपुंज्या बजेटमध्ये बनलेल्या, आध्यात्मिक गुरू नीम करोली बाबा यांच्यावरील ‘हनुमान अंश’ या चित्रपटाने इतिहास रचला. बॉक्स ऑफीसवर या चित्रपटाने कधीही न घडलेला कीर्तिमान स्थापित केला आहे. या चित्रपटाने असे काही साध्य केले, जे आजपर्यंत इतर कोणत्याही चित्रपटाने केलेले नाही. दरम्यान, ओटीटी प्लॅटफॉर्मवरून थेट मोठ्या पडद्यावर झेप घेतलेल्या ‘मिर्झापूर : द मुव्ही’ या चित्रपटाची तगडी टक्कर असतानाही ‘हनुमान अंश’ पाय रोवून उभा आहे. दुसरीकडे, यशचा ‘टॉक्सिक’ हा एक महागडा दाक्षिणात्य चित्रपट आणि अक्षय कुमार-सैफ अली खानचा ‘हैवान’ या चित्रपटांना बॉक्स ऑफीसवर पाणीही मागता आलेलं नाही. ‘हनुमान अंश’ची सुरुवात संथ होती; चित्रपटाची पहिल्या आठवड्यात केवळ १०.८ लाख आणि दुसर्या आठवड्यात चार लाख कमाई झाली होती. मात्र, तिसर्या आठवड्यात कमाईत नाट्यमय वाढ झाली आणि १०.४ कोटी कमाई करून त्याने सर्वांना आश्चर्यचकित केले. त्यानंतर, चौथ्या आठवड्यात या चित्रपटाने तब्बल ६१ कोटींची कमाई, करत १५० कोटींचा टप्पा सहज ओलांडला.
पाचव्या आठवड्यातही चित्रपटगृहांमध्ये या चित्रपटाची घोडदौड कायम आहे. जिथे चित्रपटाने दररोज दुहेरी अंकी कमाईची नोंद केली. पाचव्या आठवड्यात, चित्रपटाने २९व्या दिवशी दहा कोटी रुपये, ३०व्या दिवशी १६.५० कोटी रुपये, ३१व्या दिवशी विक्रमी २२.७५ कोटी रुपये, ३२व्या दिवशी १० कोटी रुपये, ३३व्या दिवशी १०.७५ कोटी रुपये आणि ३४व्या दिवशी १०.२५ कोटी रुपये कमावले. हे ऐतिहासिक आणि अभूतपूर्व आकडे देशभरातील भक्त आणि प्रेक्षकांचे ‘बाबा नीम करोली’यांच्याशी असलेले घनिष्ठ नाते स्पष्टपणे दर्शवतात.
चित्रपटाची कमाई दुसर्या दिवशीच्या दहा लाख रुपयांवरून आठव्या दिवशी २० लाख रुपयांपर्यंत घसरली. १७व्या दिवशी अचानक जादू घडली. चित्रपटाने १७व्या दिवशी २.२० कोटी रुपये कमावून सर्वांना आश्चर्यचकित केले. त्यानंतर, या चित्रपटाने मागे वळून बघितलेच नाही. ३१व्या दिवशी चित्रपटाने कमाईच्या बाबतीत सर्व विक्रम मोडले. ‘सॅकनिल्क’च्या एका अहवालानुसार, या चित्रपटाने आपल्या ३१व्या दिवशी तब्बल २२.७५ कोटी रुपयांची कमाई करून एक विक्रम रचला आहे, तर ३५व्या दिवशीही चित्रपटाची जादू कायम असून दहा कोटींची कमाई केली आहे. पाचव्या रविवारच्या कमाईच्या बाबतीत या चित्रपटाने ‘धुरंधर २’लाही मागे टाकले. ‘धुरंधर २’ने आपल्या ३१व्या दिवशी केवळ ४.६५ कोटी रुपये कमावले होते आणि त्याला ३ हजार ९१३ ‘शो’ मिळाले होते, तर ‘हनुमान अंश’ला रविवारी अंदाजे ७ हजार ७७ ‘शो’ मिळाले. त्यामुळे मोठ्या मोठ्या चित्रपटांना धोबीपछाड देत ‘हनुमान अंश’ या चित्रपटाने खरोखरच बॉस ऑफीसवर चमत्कार करून दाखवला आहे.
विशाल चतुर्वेदी लिखित-दिग्दर्शित ‘हनुमान अंश’ची कथा आध्यात्मिक गुरू बाबा नीम करोली यांच्या जीवन आणि आध्यात्मिक प्रवासावर आधारित आहे. ही कथा १२ वर्षांच्या लक्ष्मी नारायण (नीम करोली बाबा) भोवती फिरते, जो अनपेक्षितपणे आपल्या आईला गमावतो आणि पूर्णपणे खचून जातो. मग लक्ष्मी नारायण, देव सापडल्यास आपल्या आईशी पुन्हा भेट होईल, या आशेने घर सोडतो. त्याचा शोध त्याला मंदिरे, जंगले, नद्या आणि गावांमध्ये घेऊन जातो. हळूहळू, त्याचे जीवन आध्यात्मिक मार्गावर जाऊ लागते. हळूहळू, त्याच्या ध्येयपूर्तीच्या प्रवासाचा अर्थ बदलतो. भुकेल्यांना अन्न देणे, कोणताही भेदभाव न करता, लोकांवर प्रेम करणे, करुणा आणि निस्वार्थ सेवा हे त्याच्या जीवनाचा पाया बनतात. हा चित्रपट त्याचे अनुभव चमत्कार आणि आध्यात्मिक अनुभवांशीदेखील गुंफतो. अशा पद्धतीने बाबांचा प्रवास चित्रपटातून उलगडण्यात आला आहे.
विशेष गोष्ट ही आहे की, भव्यतेऐवजी, चित्रपटाचा प्रभाव त्याच्या भावनिक विषयांतून पडतो. बाबांशी संबंधित लोकप्रिय प्रसंग, जसे की त्यांचे लहानपणी प्राणी, पक्षी आणि वनस्पतींशी झालेले संवाद, मठाची जबाबदारी घेण्यास त्यांचा नकार आणि त्यानंतर त्यांना रेल्वेमधून उतरवणार्या एका इंग्रज अधिकार्याची त्यांनी मागितलेली माफी, हे सर्व कथानकात सुंदरपणे गुंफले आहेत.
या चित्रपटामुळे बाबांच्या अकबरपूर या गावात सध्या आनंदाचे वातावरण आहे. बाबांच्या कुटुंबीयांनी आणि गावकर्यांनी चित्रपटावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. बाबांवर हनुमानजींचा विशेष आशीर्वाद होता आणि चित्रपटात चित्रित केलेल्या घटना व पराक्रम पूर्णपणे सत्य आहेत, असे म्हणत बाबांच्या कुटुंबीयांनी आणि भक्तांनी चित्रपटाची प्रशंसा केली आहे.
नीम करोली बाबा हे २०व्या शतकातील एक महान आध्यात्मिक संत होते, ज्यांना त्यांचे भक्त भगवान हनुमानाचा अवतार मानत आणि ‘महाराज-जी’ म्हणूनही ओळखले जात. बाबा नीम करोली यांचा आशीर्वाद घेण्यासाठी भारत आणि परदेशांतून हजारो भाविक उत्तराखंडमधील कैंची धामला भेट देतात. त्यांना भगवान हनुमानाचा अवतार मानले जाते. उत्तराखंडमध्ये बाबा नीम करोली यांना समर्पित चार मंदिरे आहेत, जिथे हजारो भाविक भेट देतात.
नीम करोली बाबांच्या भक्तांमध्ये सामान्य लोकांपासून ते अब्जाधीशांपर्यंत सर्वांचा समावेश आहे. त्यांच्या भक्तांच्या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारतीय क्रिकेटपटू विराट कोहली, अनुष्का शर्मा, मनोज बाजपेयी, रामदास, जूलिया रॉबर्ट्स, मार्क, झुकरबर्ग, स्टीव्ह जॉब्स यांसारख्या प्रमुख व्यक्तींचाही समावेश आहे.
अशा या नीम करोली बाबा यांच्यावरील बायोपिक ‘हनुमान अंश’ने ३५ दिवसांत तब्बल १६३.१३ कोटी रुपयांची कमाई केली आहे. केवळ दोन कोटी रुपये खर्चात बनवलेल्या या चित्रपटाच्या कमाईतील ही वाढ लक्षणीय आहे. ‘हनुमान अंश’च्या कथेची आणि चित्रपटाची लोकप्रियता लक्षात घेऊन, ‘होम्बाल फिल्म प्रॉडशन्स’ने तो जगभरात प्रदर्शित करण्याची जबाबदारी घेतली. हा चित्रपट दि. ११ सप्टेंबर रोजी जगभरात प्रदर्शित झाला असून जगभरातून बाबांच्या भक्तांकडून चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळतोय. नीम करोली बाबांच्या जीवनावर आधारित चित्रपटाचे वितरक असलेल्या ‘होम्बाल फिल्म्स’ने उत्तर अमेरिका, युरोप, यूएई, ओमान, कतार, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांसारख्या देशांमध्ये ‘हनुमान अंश’ प्रदर्शित केला. कारण, नीम करोली बाबांचे भक्त केवळ भारतापुरते मर्यादित नाहीत; त्यांच्या पराक्रमाच्या कथा परदेशातही पसरल्या आहेत.
चित्रपटसृष्टीबाहेरील लोकांनी आणि बाबांच्या भक्तांनी बनवलेला हा छोटासा चित्रपट लोकांच्या हृदयाला इतका कसा स्पर्श करत आहे, यामागे खरंच काही चमत्कार आहे की आणखी काही कारण आहे, असा प्रश्न सगळ्यांना पडला आहे. ओशो यांच्यावर आधारित अमेरिकन डॉयुमेंटरी ‘वाईल्ड वाईल्ड कंट्री’, ‘आश्रम’ किंवा ‘MSG : द मेसेंजर ऑफ गॉड’ यांसारख्या वेबसीरिज, चित्रपटांच्या गर्दीत ‘हनुमान अंश’ आपली वेगळी छाप सोडतो. याच कारणामुळे साधे जीवन जगणार्या एका संताच्या या कथेने आज लाखो लोकांच्या हृदयाला स्पर्श केला आहे.
या चित्रपटाचे हे अभूतपूर्व यश पाहून, आता एक मोठा प्रश्न निर्माण झाला आहे की, येत्या काळात इतर आध्यात्मिक गुरूंवरही चित्रपट बनवण्याचा नवीन ट्रेंड येईल का? हे तर येणारा काळच ठरवेल! पण, सध्या तरी देशातील प्रेक्षक नीम करोली बाबांच्या शिकवणीतील साधेपणा आणि प्रभावामध्ये पूर्णपणे मग्न झालेले दिसत आहेत.
- कपिल देशपांडे