उंदरा - मांजराच्या पाठशिवणीचा कंटाळवाणा खेळ 'हैवान'

    12-Sep-2026
Haivaan Movie Review
 
मल्याळी सुपरस्टार मोहनलाल यांच्या ‘ओप्पम’चा रिमेक असलेला ‘हैवान’ प्रदर्शित झाला असून, ‘उंदरा-मांजराचा शह-काटशहाचा सुस्त खेळ’ असेच हा चित्रपट बघून म्हणावे लागेल. मुळात, गेल्या काही वर्षांतली आकडेवारी बघितली, तर दाक्षिणात्य चित्रपटांचे सगळेच ‘रिमेक’ बॉक्स ऑफीसवर धाडकन आपटले आहेत. मग त्यात ‘जर्सी’, ‘सेल्फी’, ‘सरफिरा’, ‘भोला’, ‘शहजादा’, ‘मिली’, ‘लव्ह यापा’, ‘बागी ४’, ‘देवा’ या चित्रपटांचा प्रामुख्याने उल्लेख करावा लागेल. पण, तरीही दिग्गज दिग्दर्शक प्रियदर्शन यांनी त्यांच्याच दहा वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेल्या जुन्या चित्रपटाचा ‘रिमेक’ बनवण्याचं ठरवलं. एका हिट चित्रपटाचा ‘रिमेक’, सोबतीला १६ वर्षांनी अक्षय-सैफ ही जोडी मोठ्या पडद्यावर एकत्र येणं आणि प्रियदर्शनसारखा दांडगा दिग्दर्शक. त्यामुळे निर्मात्यांनी मोठी स्वप्न रंगविली असतील; पण त्या सगळ्या स्वप्नांचा चुराडा झाला आहे. कारण, अत्यंत संथ गतीने पुढे सरकरणारा हा चित्रपट तुम्हाला थरारापेक्षा कंटाळवाणाच अधिक वाटतो.
 
चित्रपटाची कथा मुंबईतील एका उच्चभ्रू सोसायटीमधील अंध व्यवस्थापक, श्याम राणे (सैफ अली खान) याच्याभोवती फिरते. श्यामला डोळे नाहीत; पण कान-नाक या इंद्रियांचा उत्तम वापर करण्याचे त्याचे अंगभूत कसब अगदी कमाल. श्याम इतका सक्षम आहे की गाणे आणि वाद्य वाजवण्यापासून ते कुस्तीपर्यंत तो प्रत्येक गोष्टीत पारंगत. तो शाळकरी मुलांना व्हायोलिन आणि कुस्ती शिकवतो. तो इतका उदात्त आहे की प्रत्येकजण त्याच्यावर अगदी डोळे झाकून विश्वास ठेवतो. तो त्याच सोसायटीत राहणार्‍या निवृत्त सरन्यायाधीश प्रधान (बोमन इराणी) यांचा जवळचा मित्र आणि विश्वासू. त्यांची मुलगी नंदिनीशी संबंधित एक रहस्य फक्त श्यामलाच माहीत आहे.
 
श्यामला कळते की परशुराम गोखले (अक्षय कुमार) नावाचा नुकताच तुरुंगातून सुटलेला एक कैदी न्यायाधीश प्रधान आणि त्यांची मुलगी नंदिनी यांच्या जीवावर उठला आहे. पण, जेव्हा न्यायाधीश प्रधान यांची हत्या होते; तेव्हा कथेला एक वेगळे वळण लागते. पोलिसांना लगेच श्यामवर संशय येतो. आता त्याला स्वतःचे निर्दोषत्व सिद्ध करायचे आहे आणि त्याचबरोबर परशुराम एका राक्षसाप्रमाणे जिचा पाठलाग करत आहे, त्या लहान मुलीला, नंदिनीला वाचवायचे आहे. अंध श्याम हे कसे साध्य करतो, हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला हा चित्रपट पाहावा लागेल.
 
चित्रपटाचे दिग्दर्शक आणि सहलेखक प्रियदर्शन यांनी मोहनलाल यांचे मोठेपण पाहता, या विलक्षण, बहुआयामी पात्राची कल्पना दहा वर्षांपूर्वीच केली असावी. त्यांनी मूळ पात्राला बर्‍यापैकी न्याय दिला आहे. सैफ अली खाननेही येथे तोच प्रयत्न केला आहे आणि तो अनेक बाबतींत यशस्वीही ठरलेला दिसतो. मात्र, प्रियदर्शन यांनी साकारलेले या महामानवाचे चित्रण अविश्वसनीय वाटते. उदाहरणार्थ, एवढ्या उच्चभ्रू सोसायटीचा देखभाल व्यवस्थापक असूनही, त्याला शाळकरी मुलांना संगीत आणि कुस्ती शिकवण्यासाठी आणि न्यायाधीशांसोबत गाडीतून फिरायला जाण्यासाठी सुटी मिळते. दोन कुटुंबांतील मुलामुलींचं लग्न एका सामाजिक सभेत ठरवलं जातं. पटकथेत असंख्य त्रुटी आहेत, ज्या आजच्या काळात दुर्लक्ष करण्यासारख्या नाहीत.
 
चित्रपटाचा पहिला अर्धा भाग पात्रांच्या परिचयात आणि गोष्ट उभी करण्यातच जात असल्यामुळे जरा जास्तच संथ वाटतो. चित्रपटात काही मनोरंजक क्षण असले, तरी सैफ आणि अक्षय यांच्यातील पाठशिवणीचा खेळ उत्कृष्ट आहे. मात्र, श्यामला हुशार, भावनिक आणि दयाळू दाखवण्याच्या प्रयत्नांत पटकथा अनावश्यकपणे ताणलेली वाटते. यामुळे थ्रिलरचा थरार कमी होतो. प्रियदर्शनने गाणी आणि अ‍ॅक्शनची जोड देऊन मूळ चित्रपटाची जवळपास हुबेहूब नक्कल केली आहे. चित्रपटाचा वेग मंदावणार्‍या कौटुंबिक नाट्य, शेजारी आणि पोलिसांच्या उपकथानकांना त्याने अधिक संक्षिप्त करायला हवे होते. चित्रपट मूळ चित्रपटाची हुबेहूब फ्रेम-टू-फ्रेम कॉपी आहे, हे बघून ‘रिमेक’चा अट्टाहास करण्यापेक्षा ‘ओप्पम’च हिंदी डब करून प्रदर्शित केला असता, तर निर्मात्यांचे पैसे तरी वाचले असते, असे म्हणावे लागेल.
 
अभिनयाबद्दल बोलायचे झाल्यास, ही आव्हानात्मक भूमिका साकारण्यासाठी सैफने केलेले प्रयत्न कौतुकास्पद. पण, काही ठिकाणी तो प्रभावित करतो, तर काही ठिकाणी कमीसुद्धा पडतो. अक्षय कुमारच्या नकारात्मक भूमिकेमुळे चित्रपटाला ‘स्टार पॉवर’ मिळत असली, तरी परशुरामच्या पात्रातली खोली शोधण्यात तो कमी पडला आहे. पण, त्याचा पडद्यावरचा ‘ऑरा’ लाजवाब! बर्‍याच वर्षांनंतर त्याला खलनायकी भूमिकेत बघून मजा आली. साहाय्य्क भूमिकांमध्ये असरानी, बोमन इराणी, राजपाल यादव, राजेश शर्मा आणि शरीब हाश्मी यांनी आपापल्या भूमिका प्रभावीपणे साकारल्या आहेत, तर सैयामी खेर आणि श्रिया पिळगावकर यांच्या भूमिका तितयाशा प्रभावी नाहीत. चित्रपटाची गाणीसुद्धा साधारण दर्जाची आहेत. चित्रपटाचं कॅमेरा-वर्क मात्र उत्तम. त्यामुळे अनेक दृश्ये डोळ्यांना अक्षरश: सुखावून जातात.
 
एकंदरीत, जर प्रियदर्शनने दहा वर्षांपूर्वीच्या ‘ओप्पम’ची पुनरावृत्ती करण्याऐवजी उत्कृष्ट पात्रांसह या कथेची नव्याने कल्पना केली असती, तर गोष्ट वेगळी असती. चित्रपट अधिक रंजकही होऊ शकला असता. पण, सध्या तरी तो फक्त सैफ अली खान आणि अक्षय कुमार यांच्या चाहत्यांनाच तो मुख्यत्वे आवडू शकतो. १८ वर्षांनंतर ‘खिलाडी’ आणि ‘अनाडी’ला एकत्र आणूनसुद्धा खूप मोठी संधी निर्माता-दिग्दर्शकांनी घालवली, असंच ‘हैवान’ बघून म्हणावं लागेल.
 
निर्माता : के. व्ही. एन. प्रॉडशन, शैलजा देसाई
दिग्दर्शक : प्रियदर्शन
कलाकार : अक्षय कुमार, सैफ अली खान, बोमन इराणी, श्रिया पिळगावकर, सैयमी खेर, असरानी, राजपाल यादव, राजेश शर्मा, शरीब हाश्मी
 
कपिल देशपांडे




संबंधित मजकूर