‘भारतीयत्वा’चा संस्कारकर्ता!

    12-Sep-2026
 
 Dr. Dinkar Marathe
 
भाषांवर आधारलेल्या प्रादेशिक सीमा भेदत, विद्यार्थ्यांना संस्कृतच्या सूत्रात बांधून ‘भारतीय’ म्हणून जगायला शिकवणार्‍या ज्योतिषशास्त्र-अभ्यासक डॉ. दिनकर मराठे यांच्याविषयी...

उत्तरं यत् समुद्रस्य हिमाद्रेश्चैव दक्षिणम्|
वर्षं तद् भारतं नाम भारती यत्र सन्ततिः॥
 
एखादी व्यक्ती जेव्हा केवळ एक ‘भारतीय’ म्हणून जगायचे ठरवते, तेव्हा ती एखाद्या ठरावीक धर्माची, जातीची, पिढीची किंवा भाषेची नसते; ती फक्त या देशाची एक निष्ठावान नागरिक असते. पण, असा राष्ट्रभक्त घडवण्यासाठी त्याच्यावर झालेले संस्कार आणि त्याचे गुरूही खूप मोठी भूमिका बजावतात. त्यातही, एखाद्या ‘राष्ट्रीय संस्कृत विद्यापीठा’सारख्या गुरुकुलात जेव्हा सर्व राज्यांतील विद्यार्थी एकत्र येतात, तेव्हा साहजिकच कोणी मराठी, कोणी कन्नड, कोणी गुजराती असतो; पण अंतिमतः सर्वजण फक्त ‘भारतीय’ आणि ‘संस्कृतपंडित’च होतात. मातृभाषांच्या विविधतेत संस्कृतच्या निमित्ताने एकता येते आणि मातृभाषेचीही देवाणघेवाण होत, प्रत्येक छात्र अधिक समृद्ध होतो. विशेषतः संस्कृत जाणणार्‍या व्यक्तीला इतर कोणतीही भारतीय प्रादेशिक भाषा शिकणे अगदी सोपे जाते. याचेच उत्तम उदाहरण म्हणजे, तब्बल नऊ-दहा भाषांमध्ये उत्तम संवादकौशल्य प्राप्त केलेले डॉ. दिनकर मराठे!
 
दिनकर यांचा जन्म आणि बालपण कार्कळ, उडुपीमधील. त्यामुळे घरी चित्पावनी मराठी वातावरण असले, तरी संपूर्ण शालेय शिक्षण मात्र कन्नडमध्येच झाले. मात्र, त्यांच्या शाळेतील संस्कृतचे शिक्षक श्रीधर आचार्य केवळ संस्कृतमध्येच बोलत. इतर कोणत्याही भाषेचा एकही शब्द न उच्चारण्याच्या नेमामुळे संस्कृतचे असंख्य शब्द बालवयापासूनच दिनकर यांच्या कानी पडले. श्रृंगेरीच्या संस्थानातील सन्माननीय ज्योतिषशास्त्रपंडित गोविंद हरी मराठे यांचे नातू आणि पुरोहित विरुपाक्ष मराठे यांचे पुत्र असल्यामुळे, दिनकर यांनी अजाणत्या वयापासून संस्कृत मंत्रोच्चार आणि शास्त्रपठण तर केलेच होते. त्यामुळे दिनकर यांनाही संस्कृतमध्ये रुची निर्माण झाली.
 
दिनकर यांचे शालेय शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांचे जुने स्नेही आणि तिरुपतीच्या ‘राष्ट्रीय संस्कृत विद्यापीठा’तील तत्कालीन विद्यार्थी प्रसाद गोखले यांनी दिनकर यांनाही विद्यापीठात घेऊन जाण्याचा प्रस्ताव वडिलांपुढे ठेवला आणि पुढील पाच वर्षांसाठी त्यांची रवानगी तिरुपतीला झाली. तेथे ‘प्राक्शास्त्री’ आणि ‘शास्त्री’ अभ्यासाबरोबरच त्यांना खर्‍या अर्थी संस्कृतची महती समजून घेता आली. सर्व राज्यांतील लोक असल्यामुळे त्यांच्या भाषा, संस्कृती, सण-उत्सव, वेशभूषा या सर्वांची देवाणघेवाण होत असताना, त्यातही जाणवणारी एकता हेच खरे भारतीयत्व असल्याचे दिनकर यांनी तेथे अनुभवले.
 
त्यानंतर वर्षभर श्रृंगेरीत येत, ‘शिक्षणशास्त्र’ अभ्यासून दिनकर पुन्हा तिरुपतीला गेले आणि तेथे ‘आचार्य’पाठोपाठ ‘विद्यावाचस्पती’देखील पूर्ण केले. गणित, खगोलशास्त्र आणि त्यानंतर फलादेश असे सर्व टप्पे अभ्यासत ज्योतिषशास्त्राचे त्यांनी सखोल अध्ययन केले. प्रा. श्रीपाद भट, प्रा. उन्नीकृष्णन नंबूदिरी आणि प्रा. राधाकांत ठाकूर यांच्या आशीर्वादाने त्यांनी शास्त्राभ्यासात ‘सुवर्णपदका’बरोबरच ‘बेस्ट अ‍ॅण्ड डायनॅमिक स्टुडंट अवॉर्ड’ आणि ‘वराहमिहिर प्रशस्ती’देखील मिळवली. त्यानंतर ज्योतिषशास्त्र आणि वास्तुशास्त्राचा आणखी अभ्यास करत ‘विद्यावाचस्पती’ दिनकर मराठे नागपूरच्या ‘कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठा’त ज्योतिषशास्त्र विभागात रुजू झाले.
 
डॉ. दिनकर यांच्या नियुक्तीपासूनच चालू झालेल्या ज्योतिष विभागात सेवेची तपपूर्ती केल्यानंतर त्यांची रत्नागिरीत बदली झाली. नागपूरमध्ये स्थित महाविद्यालयाचा विस्तार करण्यासाठी जी चार उपकेंद्रे सुरू केली गेली, त्यांपैकी पहिल्या-रत्नागिरीच्या ‘भारतरत्न डॉ. पांडुरंग वामन काणे संस्कृत अध्ययन केंद्रा’चे प्रमुख म्हणून डॉ. दिनकर मागील पाच वर्षांपासून कार्यरत आहेत. संस्कृतला ‘करिअर’ म्हणून निवडण्याचे प्रमाण ग्रामीण भागात कमी असताना, या उपकेंद्राच्या रूपाने रत्नागिरीत जणू संस्कृतचा सूर्योदयच झाला आहे.
 
डॉ. दिनकर मराठे हे ‘पीएचडी’च्या विद्यार्थ्यांनादेखील मार्गदर्शन करतात. शिवाय, त्यांना स्वतःला संशोधनाची आवड असल्यामुळे विविध नवनवीन विषयांचा अभ्यास करत असतात. डॉ. दिनकर यांनी ‘मेडिकल अ‍ॅस्ट्रोलॉजी’अंतर्गत ‘ज्योतिषशास्त्रातील मधुमेहविचार’ करत, मधुमेहींच्या कुंडलींचा अभ्यास केला आहे. सर्व मधुमेहींच्या कुंडलीत आढळलेल्या काही साम्यस्थळांबद्दल सांगणारे त्यांचे एक पुस्तकदेखील प्रकाशित झाले आहे. त्याचबरोबर, भूजल पातळी मोजणार्‍या ‘दकार्गल विधाना’चे प्रात्यक्षिक करत संपूर्ण विदर्भातील प्रत्येक पाणवठ्याचा प्रत्यक्ष अभ्यास करून त्यांनी प्रबंध लिहिला आहे. याशिवाय, प्राचीन भारतीय आणि आधुनिक नगररचनेचाही त्यांचा अभ्यास असून, या सर्वांसाठी आवश्यक संदर्भ एकत्रीकरणासाठी हस्तलिखित वाचनाचेही त्यांना ज्ञान आहे.
 
डॉ. दिनकर स्वतःच्या प्रबंध आणि पुस्तकरचनांसह विविध भाषांमध्ये अनुवाद करण्यातही कुशल आहेत. संस्कृत, कन्नड, मराठी, हिंदी, इंग्रजी या सर्व भाषांसह कन्नड, तेलुगू, रोमन, मोडी, देवनागरी या लिपीदेखील लिहू-वाचू शकतात. गणित, खगोलशास्त्र, फलज्योतिष, वास्तुशास्त्र अशा अनेक विषयांत प्रगल्भ असलेल्या डॉ. दिनकर मराठे यांचे स्वतःचे साहित्यात खूप मोठे योगदान असले, तरी त्यांचे मन रमते, ते विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात! डॉ. दिनकर आपल्या विद्यार्थ्यांना नेहमी विविध विषयांवर संशोधन करण्यासाठी प्रेरित करत असतात.
 
संस्कृत शिकवताना भाषांवर आधारलेल्या प्रादेशिक सीमा विसरून, केवळ एक ‘भारतीय’ म्हणून जगायला शिकवणारे डॉ. दिनकर मराठे यांच्याबद्दल ऐकले की, खर्‍या अर्थाने ‘स्वदेशे पूज्यते राजा विद्वान् सर्वत्र पूज्यते॥’ याचीच प्रचिती येते.
 
ओवी लेले
९८६९३४५७५३




संबंधित मजकूर