मुंबई (Amit Shah Asiatic Society Mumbai) : मुंबईतील ज्ञानाचे प्रमुख केंद्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ‘एशियाटिक सोसायटी ऑफ मुंबई’मध्ये आज रविवार, दि. १३ सप्टेंबर रोजी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह उपस्थित राहणार आहेत. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील हे सुद्धा याप्रसंगी उपस्थित असतील. दि. ४ जुलै झालेल्या 'एशियाटिक टुमॉरो' पॅनलच्या दणदणीत विजयानंतर आज अमित शाह यांचा हा पूर्वनियोजित दौरा संपन्न होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, एशियाटिक सोसायटी ऑफ मुंबईच्या अध्यक्षपदाची धुरा सांभाळल्यानंतर डॉ. विनय सहस्रबुद्धे यांनी अनेक मान्यवरांना सोसायटीला भेट देण्याचे निमंत्रण दिले होते. त्या निमंत्रणाचा स्वीकार करत अमित शाह ही भेट देत आहेत. १९८४ मध्ये कोलकाता येथील एशियाटिक सोसायटीला २०० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने 'इन्स्टिट्यूट ऑफ नॅशनल एमिनन्स' (राष्ट्रीय प्रतिष्ठेची संस्था) हा दर्जा देण्यात आला होता. (Amit Shah Asiatic Society Mumbai)
असाच दर्जा 'एशियाटिक सोसायटी ऑफ मुंबई'लाही मिळायला हवा होता. चार वर्षांपूर्वी वार्षिक सर्वसाधारण सभेत यासंदर्भात ठराव मंजूर करण्यात आला होता, मात्र पूर्वीच्या व्यवस्थापनाने त्याचा योग्य पाठपुरावा केला नाही. आता केंद्रीय गृहमंत्र्यांच्या या थेट भेटीमुळे या प्रलंबित मागणीला गती मिळून सकारात्मक निर्णय होईल, अशी आशा व्यक्त केली जात आहे.
त्याचबरोबर राज्य सरकारकडे असा आग्रह होता की, पूर्वी एशियाटिक सोसायटीकडे असलेले 'राज्य मध्यवर्ती ग्रंथालय' गेल्या ३५ वर्षांपासून राज्य सरकार सांभाळत आहे. हे ग्रंथालय कलिना येथे निर्माणाधीन असलेल्या नवीन इमारतीत लवकरात लवकर हलवावे, अशीही मागणी व्यवस्थापन समितीने राज्य सरकारकडे केली आहे. (Amit Shah Asiatic Society Mumbai)
दि. ४ जुलै रोजी संपन्न झालेल्या निवडणुकीत निवडणुकीमध्ये डॉ. विनय सहस्रबुद्धे यांच्या नेतृत्वातील ‘एशियाटिक टुमॉरो’ या गटाने बाजी मारत विजयश्री खेचून आणला होता. या निवडणुकीत अध्यक्षपदाचे उमेदवार असलेल्या डॉ. विनय सहस्रबुद्धे यांना ३४९ मते मिळाली होती, तर कुमार केतकर यांना केवळ १४७ मतांवर समाधान मानावे लागले होते. त्याचबरोबर उपाध्यक्षपद, छाननी समिती, व्यवस्थापन समिती आदी पदांवरसुद्धा ‘एशियाटिक टुमॉरो’च्या उमेदवारांनी विजयाची मोहोर उमटवली होती. यावेळी झालेल्या निवडणुकीत एकूण ५१७ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. (Amit Shah Asiatic Society Mumbai)
'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक