आधी अल-फलाह विद्यापीठात, नंतर अरवली येथे बॉम्बची चाचणी!लाल किल्ला बॉम्बब्लास्ट प्रकरणी नवा खुलासा; विद्यापीठातील तीन डॉक्टरांचा मॉड्यूलशी संबंध

    11-Sep-2026   

Red Fort Blast Case
 
 
मुंबई (Red Fort Blast Case) : दिल्लीतील लाल किल्ला स्फोटाच्या प्रकरणाचा तपास करणाऱ्या राष्ट्रीय तपास संस्थेच्या आरोपपत्रातून अनेक धक्कादायक खुलासे समोर आले आहेत. या प्रकरणात एनआयएने उमर उन नबी याला मुख्य आरोपी ठरवले आहे. मात्र, आता या प्रकरणाशी संबंधित आणखी माहिती समोर आली असून, अल फलाह विद्यापीठातील तीन डॉक्टरांशी संबंधित एक मॉड्यूल या स्फोटामागे सक्रिय असल्याचा दावा करण्यात आला आहे. यात डॉ. उमर उन नबी याच्यासह डॉ. मुजम्मिल शकील गनी आणि डॉ. अदील अहमद रादर यांचा समावेश असल्याचे सांगण्यात आले आहे. या आरोपींनी फरिदाबाद परिसरातील विविध ठिकाणी स्फोटके आणि शस्त्रांची चाचणी केली. या मॉड्यूलने स्फोटकांची निर्मिती, त्यांची चाचणी तसेच शस्त्रांची खरेदी आणि चाचणी यासाठी नियोजनबद्ध पद्धतीने काम केल्याचा आरोप आहे.(Red Fort Blast Case)
एनआयएच्या आरोपपत्रानुसार, सप्टेंबर-ऑक्टोबर २०२५ दरम्यान उमर, गनी आणि जासिर बिलाल वानी या विद्यार्थ्याने विद्यापीठाच्या परिसरातील ट्यूबवेलजवळ नायट्रोग्लिसरीनची चाचणी केल्याचा एनआयएचा दावा आहे. हे स्फोटक गनीच्या फ्लॅटमध्ये तयार करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. यानंतर या तिघांनी विद्यापीठाबाहेरील एका निर्जन मैदानात स्फोटाची चाचणी केली. अशा प्रकारे स्फोटकांची क्षमता तपासण्यास सुरुवात करण्यात आली.(Red Fort Blast Case)
त्यानंतर हे आरोपी धौजच्या जंगल परिसरात गेले. तेथे उमर आणि गनी यांनी टीएटीपी या स्फोटकाद्वारे चाचण्या केल्याचा आरोप आहे. एका चाचणीसाठी वापरण्यात आलेल्या पाईपसदृश उपकरणाचे अवशेष नंतर गनीने सांगितलेल्या ठिकाणाहून जप्त करण्यात आल्याचे एनआयएने म्हटले आहे. सुरुवातीला हे आरोपी खतावर आधारित मिश्रणाचा वापर करत होते. मात्र, चाचण्यांनंतर टीएटीपीची क्षमता लक्षात आल्यानंतर त्यांनी त्याचा वापर करण्यास सुरुवात केली. त्यानंतर मोठ्या आकाराचे आयईडी तयार करण्याचे कामही सुरू करण्यात आल्याचा आरोप आहे.(Red Fort Blast Case)
शस्त्रांची खरेदी, जंगलात चाचणी फायरिंग
एनआयएच्या आरोपानुसार, अल फलाह विद्यापीठाच्या फार्माकोलॉजी विभागातील सहयोगी प्राध्यापक डॉ. शाहीन शाहिद यांनी अन्सार गजवात-उल-हिंद या संघटनेला सुमारे १६ लाख रुपये दिले. हे पैसे गनीच्या माध्यमातून पोहोचविण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे. या पैशातून क्रिन्कोव्ह रायफल, एक एके-४७ आणि दोन पिस्तुले खरेदी करण्यात आल्याचे आरोपपत्रात नमूद आहे. ऑक्टोबर-नोव्हेंबर २०२४ मध्ये अदील अल फलाह येथे आल्यानंतर गनी, अदील आणि शाहीन यांनी धौजच्या जंगलात क्रिन्कोव्ह रायफलची चाचणी फायरिंग केल्याचा एनआयएचा आरोप आहे. त्याचबरोबर उमर, गनी, शाहीन आणि वानी यांनी गुरुग्राम आणि फरिदाबादमधील बाजारपेठांतून खत, रसायने, विद्युत साहित्य, ट्रॉली बॅग, पाण्याच्या बॅगा, गॅस स्टोव्ह आदी साहित्य खरेदी केल्याचे एनआयएने म्हटले आहे. सुरुवातीला हे साहित्य विद्यापीठ परिसरातील फ्लॅटमध्ये साठवण्यात येत होते. त्यानंतर ते खोऱी जमालपूर आणि धौज येथील भाड्याच्या घरांमध्ये हलवण्यात आले.(Red Fort Blast Case)
वानीची भूमिका काय?
काझीगुंड येथे राहणारा जासिर बिलाल वानी हा पॉलिटिकल सायन्सचा पदवीधर असून तो वारंवार अल फलाह विद्यापीठात येत असल्याचे एनआयएने म्हटले आहे. स्फोटके तयार करण्यासाठी त्याने मदत केली तसेच कच्चा माल भाड्याच्या घरांपर्यंत पोहोचविण्यातही त्याची भूमिका असल्याचा आरोप आहे. उमरच्या खोलीत राहून वानीने रॉकेटसदृश आयईडी तयार केल्याचेही आरोपपत्रात नमूद करण्यात आले आहे. २०२५च्या सुरुवातीपर्यंत या मॉड्यूलने सुटकेससदृश अनेक आयईडी तयार केले होते. त्यातील काही साठा धौजमधील दुसऱ्या भाड्याच्या घरात ठेवण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे. ९ नोव्हेंबर रोजी फतेहपूर टागा येथून सुमारे २,६०० किलो अमोनियम नायट्रेट जप्त करण्यात आले. त्याच्या दुसऱ्याच दिवशी लाल किल्ल्याजवळील मेट्रो स्थानक परिसरात आय-२० कारमध्ये स्फोट झाला. एनआयएच्या म्हणण्यानुसार, उमर उन नबी हा त्या कारचा चालक होता आणि त्याने आत्मघाती हल्लेखोर म्हणून हा स्फोट घडवून आणला. या स्फोटात १५ जणांचा मृत्यू झाला, तर २९ जण जखमी झाले.(Red Fort Blast Case)
 
 
 




ओंकार मुळ्ये

'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक
संबंधित मजकूर