समाजाचा दीपस्तंभ...

    11-Sep-2026
 
Narayan Kashinath Vazhe
 
शिक्षण अर्धवट राहिले; पण समाजसेवेचा वसा घेऊन गावाचे भाग्य उजळविणार्‍या एका ध्येयवेड्या माणसाची ही प्रेरक गाथा...

न हि कल्याणकृत्कश्चिद् दुर्गतिं
तात गच्छति|
- ‘भगवद्गीता’, अध्याय ६, श्लोक ४०

अर्थात, हे अर्जुना, जो सत्कर्म करतो, त्याची कधीही अधोगती होत नाही. तसेच पावसाळ्यातील मातीचा सुगंध ज्याप्रमाणे मनाला प्रसन्न करतो, त्याचप्रमाणे काही माणसांचे आयुष्यही संपूर्ण समाजाला सुगंधित करून जाते. मर्देस गावातील नारायण काशिनाथ वझे, ज्यांना सारा गाव प्रेमाने ‘खंडूभाऊ’ या नावाने ओळखतो; हे असेच एक आदरणीय व्यक्तिमत्त्व!
 
दि. १५ डिसेंबर १९३४ रोजी पालघर जिल्ह्यातील वसई-विरार महापालिका क्षेत्रातील मर्देस (कोरोटी) गावात जन्मलेल्या या माणसाने आपल्या संपूर्ण आयुष्याचा वसा निरपेक्ष समाजसेवेसाठी वाहिला. मोठ्या भावाचा दुग्धव्यवसाय सांभाळण्यासाठी नारायण यांना शिक्षणाला रामराम ठोकावा लागला. पुढे उदरनिर्वाहासाठी त्यांनी ‘बेस्ट’मध्ये नोकरीही स्वीकारली. पण, नियतीने शिक्षणाचे जे दार बंद केले, त्याच वेळी समाजसेवेचे एक विशाल अंगण त्यांच्यासाठी खुलेदेखील झाले. स्वतःच्या अपुर्‍या शिक्षणाची खंत त्यांनी कधी उराशी बाळगली नाही; उलट, ती उणीव त्यांनी आपल्या धाकट्या भावंडांच्या आणि पुढे संपूर्ण गावातील पिढ्यांच्या शिक्षणासाठी झटून भरून काढली.
 
त्यांच्यासमोर आव्हाने असंख्य होती; पण खंडूभाऊंचा एक मंत्र कायम होता- ‘कार्यकर्त्याच्या जिभेवर साखर, डोयावर बर्फ आणि पायाला चक्र असायला हवे.’ हाच मंत्र घेऊन त्यांनी अवघे आयुष्य समाजासाठी झिजवले.
 
गावासाठी जिल्हा परिषद शाळेची इमारत लोकवर्गणीतून उभी करण्यापासून त्यांच्या सामाजिक कार्याचा प्रारंभ झाला. १९६४ साली कोरोटी, मर्देस गावातील तरुणांना सोपारा येथे पाठवून संघशाखा सुरू करण्याचे धाडसी पाऊल त्यांनी उचलले. समाजातील अनिष्ट रूढी- विधवांचे केशवपन, पुनर्विवाहावरील बंदी यांच्याविरुद्ध तत्कालीन तथाकथित नेत्यांचा विरोध झुगारून त्यांनी ठाम भूमिका घेतली. हा लढा अजिबात सोपा नव्हता; पण न्यायासाठी उभे राहण्याचे धाडस त्यांनी कधीच सोडले नाही.
 
१९६१ साली ‘जगमाता नाट्यमंडळा’ची स्थापना करून त्यांनी गावाचा सांस्कृतिक वारसा जपला; २००० साली या मंडळाचा सुवर्ण महोत्सव मोठ्या थाटात साजरा झाला. गावातील तरुणांना नाटकांमध्ये सहभागी करून त्यांनी कला आणि परंपरा यांची सुंदर सांगड घातली. जगमाता मंदिरावर त्यांनी सुरू केलेली संध्याकाळी ७ वाजताची आरती आजही अखंड सुरू आहे. त्यांच्या श्रद्धेचे आणि सातत्याचे हे जिवंत प्रतीक आहे.
 
समाजातील दुर्बल घटकांसाठी त्यांनी स्वतः पुढाकार घेतला. तब्बल १८ अनाथ विधवांना शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी ते स्वतः त्यांच्या घरी जात, कागदपत्रे गोळा करत आणि स्वखर्चाने वसई पंचायत समितीत घेऊन जात. गावासाठी आधुनिक स्मशानभूमी, रस्ते आणि ग्रामपंचायत कार्यालय या सर्व वास्तू लोकवर्गणीतून उभ्या राहिल्या आणि प्रत्येक ठिकाणी खंडूभाऊंचे कष्ट व झिजणे कारणीभूत होते. ‘महात्मा गांधी तंटामुक्त मर्देस समिती’चे संस्थापक-अध्यक्ष म्हणून केलेल्या कार्याची दखल घेत शासनाने समितीला एक लाख रुपयांचे बक्षीस दिले. तेही त्यांनी स्वतःसाठी न वापरता, विद्यार्थ्यांच्या गौरवासाठी आणि विविध स्पर्धांसाठी खर्च केले.
 
दि. १५ डिसेंबर २०२२ रोजी वयाच्या ८८व्या वर्षीही त्यांनी कुटुंबाच्या सार्वजनिक जागेत पिंपळ, वड आणि औदुंबराची रोपे लावली; भविष्यात गावातील महिलांना वटसावित्री पूजेसाठी जागा उपलब्ध व्हावी, ही त्यांची दूरदृष्टी आणि परंपरा जपण्याची तळमळ. आज खंडूभाऊंचा समाजकार्याचा हा वारसा त्यांचे धाकटे बंधू रमेश वझे आणि गावातील तरुणपिढी मोठ्या श्रद्धेने पुढे चालवत आहे.
 
शिक्षणाची संधी हुकली तरी एक माणूस किती मोठे कार्य उभे करू शकतो, याचे खंडूभाऊ हे जिवंत उदाहरण. त्यांचे आयुष्य आपल्याला शिकवते- साधनांची कमतरता ही कधीच सेवेतील अडथळा ठरू शकत नाही; गरज असते फक्त मनाशी असलेल्या निष्ठेची आणि झिजण्याच्या तयारीची!
 
खंडूभाऊंसारखी माणसे समाजाला दिशा देतात, पिढ्यांना प्रेरणा देतात आणि म्हणूनच, ती खर्‍या अर्थाने समाजाचे दीपस्तंभ ठरतात. त्यांच्या या तेजस्वी वाटचालीला दै. ‘मुंबई तरुण भारत’तर्फे विनम्र अभिवादन आणि पुढील निरामय आयुष्यासाठी हार्दिक शुभेच्छा!
 
- कमलेश संखे




संबंधित मजकूर