नुकताच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांचा अमेरिका, कॅनडा आणि ब्रिटन या तीन देशांचा ऐतिहासिक दौरा संपन्न झाला. आपल्या दौर्यांत सरसंघचालकांनी विश्वबंधुत्वाचा आणि ‘वसुधैव कुटुम्बकम्’चा जागर केला. "आम्ही सांगू तसेच तुम्ही वागले पाहिजे,” अशी दादागिरी करणार्या विपरीत मानसिकता असलेल्या देशांत जाऊन भारताच्या मानवी मूल्यांचा ‘सिंहनाद’ करणे, हे आताच्या काळात करणे आवश्यकच होते. तेव्हा, आज डॉ. मोहनजी भागवत यांच्या जन्मदिनानिमित्त त्यांना अभीष्टचिंतन करीत, त्यांच्या या तीन देशांच्या दौर्याची फलश्रुती अधोरेखित करणारा हा लेख...
रा. स्व. संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांचा अमेरिका, कॅनडा, ब्रिटन असा प्रवास झाला. तिन्ही ठिकाणी त्यांनी ‘विश्वमानव एक आहे, मानवजातीत विविधता आहे, या विविधतेची जपणूक केली पाहिजे,’ हा विषय मांडला. यापूर्वी, रज्जूभैया आणि सुदर्शनजी या दोघांचे सरसंघचालक म्हणूनही विदेशात प्रवास झाले आहेत. त्यांच्या प्रवासाची उपद्व्यापी मीडियाने विशेष दखल घेतली नाही. परंतु, मोहनजींच्या प्रवासाची उपद्व्यापी मीडियाने नको तेवढी दखल घेतली, याचे कारण काय?
पहिली गोष्ट अशी की, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ भारतात आता शक्तिस्थानावर आहे. संघाला वगळून देशात कोणतीही चळवळ चालू शकत नाही. सत्तेच्या राजकारणाशी संघाचा प्रत्यक्ष संबंध नसला, तरी भाजपच्या रूपाने संघ स्वयंसेवक सत्तास्थानी आहे. राजकीय सत्ता आणि समाजसत्ता या दोन्ही सत्तांवर संघविचारांचा प्रभाव आहे आणि तो दिवसेंदिवस वाढत जाणार. डॉ. मोहनजी भागवत या शक्तीचे प्रतिनिधित्व करतात. दुर्बळ माणसाची कुणी दखल घेत नाही, शक्तिमानाची दखल सर्वजण घेतात.
अमेरिकेच्या ‘मेडिसन स्क्वेअर’ कार्यक्रमाला भरपूर प्रसिद्धी मिळाली. या कार्यक्रमाला विरोध करणार्या काही संघटना पुढे आल्या. न्यूयॉर्कचे मुस्लीम महापौर झोहरान ममदानी यांनी त्याला विरोध केला. ममदानी एका शक्तिस्थानावर आहेत. त्यामुळे त्यांच्या विरोधाला भरपूर प्रसिद्धी मिळाली. त्यांचे म्हणणे असे होते की, संघाचा हिंदू राष्ट्रवादी दृष्टिकोन संकुचित आहे आणि संघाचा प्रभाव चिंताजनक आहे. ‘मी या कार्यक्रमाच्या विरोधात आहे,’ असे त्यांनी जाहीर केले. परंतु, कार्यक्रम रद्द करण्याचा त्यांना अधिकार नव्हता.
डॉ. मोहनजी भागवत यांच्या कार्यक्रमाला ‘हिंदूज फॉर ह्युमन राईट्स’, ‘यूएस कमिशन ऑन इंटरनॅशनल रिलिजिअस फ्रीडम’ यांनी तीव्र विरोध केला. ‘यूएससीआयआरएफ’ या संघटनेने मोहनजींचा व्हिसा रद्द करावा, अशीही मागणी केली. ब्रिटनमधील मुस्लीम संघटनांनीही हाच सूर आळवला. मोहनजींच्या प्रवासामुळे ब्रिटनमधील शांतता बिघडेल, हिंदू अधिक आक्रमक होतील, अशाप्रकारची आवई त्यांनी उठवली.
ज्यांनी विरोध केला आहे, त्यांचे मुद्दे असे आहेत :
- राष्ट्रीय स्वयंसेवक संघ भारतीय जनता पक्षाच्या विवादास्पद नीतींचे समर्थन करतो. त्यात गोरक्षा, धर्मांतरविरोधी कायदा, नागरीकरण सुधारणा कायदा, या सर्व गोष्टी अल्पसंख्य मुसलमान आणि ख्रिश्चनांच्या विरोधी आहेत.
- विदेशातून धार्मिक अल्पसंख्य गटांना जे धन येते, त्यावर निर्बंध घालणारा कायदा सरकार करू पाहात आहे. याचा फटका ख्रिश्चन आणि मुस्लीम संघटनांना बसेल.
- ‘यूएससीआयआरएफ’ या संघटनेने अशी मागणी केली की, ‘धार्मिकदृष्ट्या भारत हा विशेष काळजी करावी असा देश आहे,’ असे अमेरिकन शासनाने घोषित करावे.
या सर्व मागण्यांचा जर विचार केला, तर सुज्ञ वाचकांच्या लगेच लक्षात येईल की, भारताला दुर्बळ करू इच्छिणार्या सर्व संघटनांच्या या मागण्या आहेत. ‘नागरिकत्व सुधारणा कायदा’ हा विविध कारणांमुळे इस्लामी देशातून भारतात येणार्या हिंदूंना संरक्षण देणारा आहे. भारत सोडून हिंदू जाणार कुठे? तसेच, ‘गाय ही आपली माता आहे,’ अशी सर्व भारतीयांची भावना आहे. गाय हा उपयुक्त पशू नसून, गाय म्हणजे ‘गोविज्ञान’ आहे आणि गेल्या २०-२५ वर्षांत त्यावर मौलिक संशोधन झाले आहे. मुसलमानांना वाटते की, गाय कापणे हा त्यांचा अधिकार आहे. गोमांस खाणे हा ख्रिश्चनांना त्यांचा अधिकार वाटतो. गोहत्या बंदीला त्यामुळेच हे लोक विरोध करतात.
एक बरे झाले की, वरील विषयासंदर्भात भारतात जी मंडळी चळवळ करतात, त्यांचे अमेरिकेतील भाऊबंद यामुळे उघड झाले. राष्ट्रवादी एक आरोप सतत करीत असतात की, भारताच्या अंतर्गत विषयात विदेशी शक्ती खूप हस्तक्षेप करतात. या शक्ती कोण आहेत, हे त्यांनीच उघड केले आणि त्यामुळे आपल्याला त्यांची नावे समजली.
डॉ. मोहनजी भागवत न्यूयॉर्कच्या कार्यक्रमात बोलताना म्हणाले की, "मानवजात एक आहे, मानवजातीत विविधता आहे, भारत हा विविधतेने नटलेला देश आहे. परंतु, सर्वांत एक चैतन्य आहे. या चैतन्याच्या धाग्याने सर्वजण बांधलो गेलो आहोत. विविधता हे आपले सौंदर्य आहे, ती जपली पाहिजे. आपले म्हणणे दुसर्यावर लादता कामा नये. दुसर्याच्या मनातील दुष्टभावना नष्ट करण्याचा प्रयत्न करावा, माणूस मारणे हा आपला स्वभाव नव्हे.” हे सर्व विचार उच्च मानवी मूल्यांचे प्रतिपादन करणारे आहेत. या विचारांवर कुणाचीही चर्चा करण्याची हिंमत नाही. ही चर्चा ते करू शकत नाहीत. कारण, ती त्यांच्या सोयीची नाही.
विदेशातील या संघटना ‘नॅरेटिव्ह’ म्हणजे, ‘कथानक’ निर्माण करण्याच्या कामात अत्यंत तरबेज आहेत. डॉ. मोहनजींच्या भाषणातून ‘श्लेष’ काढणे कठीण आहे. पण, तो जर काढला नाही, तर आमच्या अस्तित्वाचे कारण काय, असा प्रश्न त्यांच्यापुढे उभा राहतो. म्हणून ‘मानव एक आहे’ हा उपदेश डॉ. मोहनजी भागवत भाजपला का करीत नाहीत? योगी आदित्यनाथ यांना का करीत नाहीत? ते मशिदींवर (अनधिकृत) बुलडोझर फिरवितात. अल्पसंख्याकांना अडचणीत आणणारे कायदे शासन करीत आहे, त्यांना मोहनजींनी उपदेश करावा, हे कथानक सुरू झाले आहे आणि त्यांची उष्टावळ चाटणारी जी राजकीय मंडळी आहेत, ती याच भाषेत आता बोलू लागली आहेत.
जग सध्या असहिष्णुतेच्या शिखरावर बसलेले आहे. अमेरिकेची दादागिरी सर्व जगभर चालू आहे. अमेरिकेने इराणची राजवट उलथून पाडण्यासाठी युद्ध केले. इराणमध्ये कोणती राजवट असावी, हे इराणी जनतेने ठरवायचे आहे. अमेरिकेला तो अधिकार नाही. याला ‘असहिष्णुता’ म्हणतात. ती अमेरिकेच्या ‘डीएनए’मध्ये आहे. रशियाने कारण नसताना युक्रेनवर आक्रमण केले. कारण, रशियाला युक्रेनमध्ये मॉस्कोचे समर्थन करणारे शासन हवे आहे. "आम्ही सांगू तसेच तुम्ही वागले पाहिजे,” अशी दादगिरी करणारे हे सर्व देश आहेत. ब्रिटन, फ्रान्स आणि अन्य युरोपियन देश यांची कमी-अधिक प्रमाणात याहून वेगळी मानसिकता नसते.
अशा विपरीत मानसिकता असलेल्या देशांत जाऊन भारताच्या मानवी मूल्यांचा ‘सिंहनाद’ करणे, हे आताच्या काळात करणे आवश्यक होते. असा ‘सिंहनाद’ स्वामी विवेकानंदांनी १८९३ला केला. १३३ वर्षांनी मोहनजींनी त्याचा पुनरुच्चार केला. यावेळची सिंह डरकाळी शक्तिपीठावरून झाली असल्यामुळे तिने प्रचंड कंपन निर्माण केले. त्याचे चांगले परिणाम हळूहळू जगभर दिसू लागतील. कारण, सत्याच्या अधिष्ठानावरून मानवकल्याणाचा विचार जेव्हा शक्तिरूप घेऊन येतो, तेव्हा त्याच्या स्वीकृतीचा मार्ग सुरू होतो. ती स्थिती आता आली आहे, असे समजायला हरकत नाही.
रमेश पतंगे
९८६९२०६१०१