वेळ पाहण्यासाठी घड्याळ पुरेसे असते; मात्र वेळेचा सांस्कृतिक, नैसर्गिक आणि आध्यात्मिक अर्थ समजून घेण्यासाठी व्यापक कालदृष्टी आवश्यक. भारतीय परंपरेतील तिथी, नक्षत्र, ऋतू, मुहूर्त आणि खगोलीय चक्रांची हीच समृद्ध संकल्पना आता आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून नव्या स्वरूपात समोर येत आहे. त्याविषयी...
भारतीय संस्कृतीचा विचार केला, तर ‘काल’ ही संकल्पना केवळ घड्याळाच्या काट्यांमध्ये मावणारी नाही. ‘काल’ म्हणजे सृष्टीची गती, निसर्गाचे चक्र, मानवी जीवनाची लय आणि आध्यात्मिक जाणिवेचा आधार अशी त्याची व्यापक मांडणी भारतीय ज्ञानपरंपरेत आढळते. दिवस-रात्र, ऋतू, तिथी, नक्षत्र, योग, करण, अयन, संक्रांती आणि मुहूर्त अशा असंख्य संकल्पनांमधून भारतीय जीवनपद्धतीने वेळेला केवळ मोजण्याची गोष्ट न मानता, त्याला सांस्कृतिक आणि आध्यात्मिक अर्थ दिला.
याच व्यापक कालदृष्टीला आधुनिक विज्ञान आणि तंत्रज्ञानाची जोड देण्याचा प्रयत्न पुण्यातील विनायक बेडेकर यांनी साकारलेल्या ‘कालायन’ या अभिनव प्रकल्पातून करण्यात आला आहे. प्राचीन भारतीय वैदिक कालगणनेतील संकल्पना आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून सामान्य नागरिकांपर्यंत पोहोचवणे, हा या प्रकल्पाचा उद्देश. भारतीय कालसंकल्पना, कालतत्त्वबोध आणि काळाच्या पलीकडील आध्यात्मिक अवस्थेचा विचार समजून घेण्यासाठी आधुनिक माध्यम उपलब्ध करून देण्याची संकल्पना त्यामागे आहे.
या संकल्पनेला आता केवळ वैचारिक किंवा तांत्रिक उपक्रम म्हणून पाहणे पुरेसे ठरणार नाही. महाराष्ट्र शासनाच्या दि. ४ सप्टेंबरच्या शासननिर्णयामुळे ‘कालायन’ला सार्वजनिक पातळीवर नवी ओळख मिळाली आहे. मंत्रालय परिसर आणि महाराष्ट्र विधान भवन, मुंबई येथे प्रत्येकी एक ‘कालायन’ समयदर्शक उपकरण बसविण्यास शासनाने नुकतीच प्रशासकीय मान्यता दिली आहे. हे घड्याळ बनविणारी पुण्यातील विनायक बेडेकर यांची ‘आर्ष विद्या प्रायव्हेट’ ही भारतातच नव्हे, तर जगभरात एकमेव कंपनी आहे. ही बाब केवळ दोन समयदर्शक उपकरणे बसवण्यापुरती मर्यादित नाही, तर त्यामुळे भारतीय कालगणनेच्या संकल्पनेला सार्वजनिक संस्थांच्या परिसरात दृश्यमान करण्याचा हा वेगळा प्रयोग ठरू शकतो.
‘कालायन’चे वेगळेपण काय?
भारतीय परंपरेत दिवसाची सुरुवातही एका विशिष्ट कालभानातून होते. ब्रह्ममुहूर्त, सूर्योदय, संध्याकाळ, प्रदोष, तिथी आणि विविध धार्मिक विधींचे मुहूर्त या संकल्पनांमागे वेळ केवळ मोजण्याऐवजी योग्य कृतीसाठी योग्य कालखंड ओळखण्याची परंपरा आहे. याच पार्श्वभूमीवर ‘कालायन’मध्ये ब्रह्ममुहूर्त, संध्याकाळची वेळ, राहुकाळ यांसारख्या कालखंडांची माहिती देण्याबरोबरच तिथी, वार, नक्षत्र, करण आणि योग यांची माहिती उपलब्ध करून देण्याची संकल्पना महत्त्वाची ठरते. आज मोबाईल फोनच्या स्क्रीनवर तारीख आणि वेळ क्षणार्धात पाहता येते. मात्र, त्या दिवसाची तिथी कोणती, कोणता ऋतू सुरू आहे, कोणते नक्षत्र आहे किंवा भारतीय कालगणनेनुसार त्या दिवसाचे सांस्कृतिक महत्त्व काय, याची जाणीव कितीजणांना असते? आधुनिक जीवनशैलीत दूर होत चाललेल्या या सांस्कृतिक संदर्भांना पुन्हा दैनंदिन जीवनाशी जोडण्याची संधी ‘कालायन’ देऊ शकते.
पंचांगापासून आधुनिक खगोलमाहितीपर्यंत
भारतीय संस्कृतीतील पंचांग ही केवळ धार्मिक दिनदर्शिका नाही. ती भारतीय कालगणना, ऋतुचक्र आणि आकाशनिरीक्षणाच्या प्रदीर्घ परंपरेचा एक महत्त्वाचा भाग आहे. ‘कालायन’मध्ये पंचांगाबरोबरच ‘जीपीएस’ आधारित सूर्योदय-सूर्यास्ताची माहिती, सूर्य-चंद्राची स्थिती, नक्षत्रमंडळातील हालचाली आणि ग्रहस्थिती दर्शविण्याची संकल्पना आहे. यामुळे भारतीय परंपरेतील आकाशनिरीक्षण आणि आधुनिक डिजिटल खगोलविषयक माहिती यांच्यात संवाद निर्माण होऊ शकतो. भारतीय कालदृष्टीचा मूलभूत विचार असा आहे की आकाश, निसर्ग आणि मानवी जीवन यांना पूर्णपणे वेगळे करून पाहता येत नाही. ‘कालायन’ या विचाराला आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून नवे रूप देण्याचा प्रयत्न करत आहे.
सण-उत्सवांच्या मुळाशीही ‘काल’
भारतीय सण-उत्सवांची परंपराही कालगणनेशी घट्ट जोडलेली आहे. तिथी, ऋतू आणि विविध खगोलीय घटनांच्या आधारे अनेक धार्मिक आणि सांस्कृतिक दिवस निश्चित केले जातात. त्यामुळे कालगणना ही भारतीय संस्कृतीच्या दैनंदिन आचरणाचा अविभाज्य भाग बनली आहे.
‘कालायन’मध्ये धार्मिक, सांस्कृतिक, सामाजिक आणि राष्ट्रीय दिनविशेष दाखविण्याची सुविधा असल्याने त्याला विशेष महत्त्व प्राप्त होते. डिजिटल युगातील पुढील पिढीला सण केवळ साजरे करण्यापुरते मर्यादित न ठेवता, त्या सणामागील कालगणना, परंपरा आणि सांस्कृतिक संदर्भ समजून घेण्याची संधी या माध्यमातून मिळू शकते.
भारतीय ज्ञानपरंपरेचा आधुनिक संदर्भ
आज जगभरात भारतीय ज्ञानपरंपरेकडे नव्याने पाहिले जात आहे. योग, आयुर्वेद, भारतीय गणित, खगोलशास्त्र, वास्तुशास्त्र, संगीत आणि प्राचीन साहित्याचा अभ्यास वाढत असताना भारतीय कालगणना आणि ‘"Time Consciousness’ या विषयांकडेही संशोधनाच्या दृष्टीने पाहण्याची संधी निर्माण झाली आहे. ‘कालायन’ची संकल्पना केवळ धार्मिक किंवा सांस्कृतिक चौकटीत न ठेवता योग, मानसशास्त्र, संगीत, कृषी, इतिहास, वास्तुशास्त्र, हवामानशास्त्र आणि जीवशास्त्र अशा विविध क्षेत्रांशी जोडून अभ्यासता येऊ शकते. काल, निसर्ग आणि मानवी जीवन यांच्यातील संबंध समजून घेण्यासाठी हा आंतरशाखीय अभ्यासाचा विषय ठरू शकतो.
मात्र, या प्रयत्नातील महत्त्वाची बाब म्हणजे, परंपरेचा गौरव आणि वैज्ञानिक चिकित्सकता यांचा साधलेला समतोल ठरते. भारतीय संस्कृतीतील प्रत्येक संकल्पना वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध झालेली आहे, असा दावा करण्यापेक्षा त्या संकल्पनांचा ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि वैज्ञानिक आधार तपासणे अधिक आवश्यक आहे. परंपरेतील ज्ञानाचा चिकित्सक आणि संशोधनाधारित अभ्यास झाला, तर ‘कालायन’ केवळ सांस्कृतिक प्रतीक न राहता, भारतीय कालविचाराच्या अभ्यासाचे आधुनिक व्यासपीठ बनू शकते. आधुनिक विज्ञानाच्या आधारे वसंत बिंदूवर (संपात् बिंदू) आधारित राशी/नक्षत्र विभाग यांचाही विचार करून ऋतूशास्त्रातील संशोधनासाठी विशेष उपयोग होऊ शकतो.
घड्याळापलीकडचा ‘काल’
मंत्रालय आणि विधान भवन परिसरात बसविण्यात येणारी दोन ‘कालायन’ उपकरणे ही या संकल्पनेची सुरुवात मानता येईल. भविष्यात संग्रहालये, शैक्षणिक संस्था, सांस्कृतिक केंद्रे आणि अन्य सार्वजनिक ठिकाणी अशा प्रणालींचा वापर वाढला, तर भारतीय कालगणना आणि कालविचार सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी ते प्रभावी शैक्षणिक माध्यम ठरू शकते.
विद्यार्थ्यांना तिथी-नक्षत्रांची माहिती देण्यापासून संशोधकांना भारतीय खगोलपरंपरेचा अभ्यास करण्यापर्यंत आणि सामान्य नागरिकांना आपल्या सण-उत्सवांच्या कालसंदर्भाची ओळख करून देण्यापर्यंत ‘कालायन’ची व्याप्ती वाढू शकते. भारतीय ज्ञानपरंपरेतील वेद, उपनिषदे, दर्शन, ज्योतिष, खगोलशास्त्र, गणित, आयुर्वेद, संगीत आणि वास्तुशास्त्र अशा विविध क्षेत्रांशी काल आणि कालगणनेचा संबंध असल्याचे प्रकल्पाच्या दस्तऐवजात अधोरेखित करण्यात आले आहे.
म्हणूनच ‘कालायन’चा प्रश्न केवळ ‘नवे घड्याळ कोणते’, ‘ते इतके महागडे का’ असा नाही. वेळ पाहण्यासाठी घड्याळ पुरेसे आहे; पण वेळ समजून घेण्यासाठी कालदृष्टी आवश्यक असते. आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून भारतीय संस्कृतीची ही व्यापक कालदृष्टी पुन्हा समाजासमोर ठेवण्याचा प्रयत्न म्हणजे ‘कालायन’ आणि मंत्रालय व विधान भवनातील त्याची सुरुवात या मोठ्या प्रयोगाची नांदी ठरू शकते.
‘कालायन’ घड्याळाची मूलभूत आवृत्ती
- प्रमाण वेळ आणि ‘जीपीएस’ वेळ दोन्ही.
- सूर्योदय-सूर्यास्त, स्थानिक वेळ ‘जीपीएस’संबंधित.
- सूर्य, चंद्र आणि अन्य ग्रहांचे नक्षत्रमंडळातील स्थान आणि त्यांची गती हालचाल
- पंचांग स्तंभ : अयन, ऋतू, तिथी, वार, नक्षत्र, करण, योग.
- दिनविशेष
- वर्तमान सूचना : ब्रह्ममुहूर्त, संध्याकाळची वेळ, राहुकाळ इत्यादी.
- भारतीय सौर दिनपद्धतीनुसार १२ महिन्यांचे एकत्रित दिनदर्शिका स्वरूप.
- ‘क्यूआर’ कालायन माहिती
घड्याळापलीकडे भारतीय ज्ञानाचा वारसा जपण्याचा प्रयत्न : विनायक बेडेकर
"मी भारतीय शास्त्र, विद्या आणि कलांचा एक उपासक-अभ्यासक आहे. कौटुंबिक वातावरण सांस्कृतिक असल्यामुळे लहानपणापासूनच या विषयांची आवड निर्माण झाली. माझ्या १७व्या-१८व्या वर्षापासून मी या विषयांचा अभ्यास करतोय. म्हणजे, जवळपास ३०-३५ वर्षे झाली. ‘कालायन’ची घड्याळाची कल्पना सुचूनही १५-१६ वर्षे झाली. सुरुवातीची दोन-चार वर्षे त्याची रचना कशी असावी, त्यात काय-काय समाविष्ट करावे, याचा विचार करण्यात गेली. त्यानंतर साधारण १२-१३ वर्षांपूर्वी प्रत्यक्ष यांत्रिक घड्याळ बनवण्याचा प्रयत्न सुरू केला.
तंत्रज्ञानात जसजशी प्रगती होत गेली, तसतसे साधारण पाच वर्षांपूर्वी हा निर्णय घेतला की, आता पूर्णपणे डिजिटल स्वरूपात जाण्याची वेळ आली आहे. त्यानंतर गेल्या पाच वर्षांपासून ते डिजिटल स्वरूपात विकसित करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्याच्या प्रमाणीकरणासाठी अनेक ठिकाणी भेट दिली. आधुनिक विज्ञान क्षेत्रातील शास्त्रज्ञ, संशोधक, राष्ट्रीय भौतिक प्रयोगशाळा, ‘इस्रो’, ‘डीआरडीओ’, ‘आयआयटी’मधील प्राध्यापक आणि तज्ज्ञांनी या संकल्पनेचे कौतुक केले. दुसर्या बाजूला पारंपरिक ज्ञानाच्या क्षेत्रातून शंकराचार्यांचे आशीर्वाद मिळाले. ‘काशी विद्वत परिषदे’ने प्रशस्ती दिली. ‘अखिल भारतीय पंचांगकर्ते परिषद’ आणि ‘अखिल भारतीय ज्योतिषाचार्य परिषद’ यांनीही या संकल्पनेचे कौतुक केले.
पुढच्या तीन वर्षांत हे घड्याळ फक्त घड्याळ न राहता, भारतीय ज्ञानप्रणालीचा ज्ञानसाठा म्हणून घरोघरी पोहोचावे, असा आमचा प्रयत्न आहे. पुढे घरगुती आवृत्ती आणि मनगटी घड्याळही आणण्याचा विचार आहे. या माध्यमातून भारतीय शास्त्र, विद्या आणि कलांची कालसुसंगत माहिती लोकांपर्यंत पोहोचवून भारतीय ज्ञानपरंपरेची माहिती सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवणारा एक जबाबदार ज्ञानसाठा निर्माण करणे, हा आमचा उद्देश आहे.”