मुंबई (JNU Sexual Harassment Case) : अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठ शाखेने विद्यापीठ परिसरात आंदोलन करत विद्यापीठाच्या अंतर्गत समितीच्या तसेच लैंगिक छळाचे आरोप असलेल्या एका प्राध्यापकाच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन केले. या प्रकरणातील कारवाईला राजकीय प्रभावामुळे विलंब होत असल्याचा आरोप विद्यार्थी संघटनेने केला. तसेच अनेक विद्यार्थिनींनी दाखल केल्याचे सांगितल्या जाणाऱ्या तक्रारींच्या हाताळणीवरही एबीव्हीपीने विद्यापीठ प्रशासनाला सवाल केले.(JNU Sexual Harassment Case)
अभाविपच्या म्हणण्यानुसार, जेएनयूतील एका प्राध्यापकावर अनेक विद्यार्थिनींनी लैंगिक छळाचे गंभीर आरोप केले आहेत. प्रसारमाध्यमे आणि सोशल मीडिया अहवालांच्या आधारे अभाविपने या प्राध्यापकाचे नाव प्रा. बिमोल अकोइजाम असे सांगितले असून, ते काँग्रेसचे खासदारही आहेत. या तक्रारी विद्यापीठाच्या अंतर्गत समितीसमोर ठेवण्यात आल्या असून त्यावर कार्यवाही सुरू असल्याचे एबीव्हीपीने म्हटले आहे. मात्र, आरोपांचे गांभीर्य लक्षात घेता अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही, असा दावा संघटनेने केला. तक्रारींबाबत विद्यापीठ प्रशासन आणि अंतर्गत समिती असंवेदनशील असल्याचा आरोप करत एबीव्हीपीने या प्रकरणाची जलद, पारदर्शक आणि निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी केली.(JNU Sexual Harassment Case)
आंदोलनादरम्यान अभाविपच्या कार्यकर्त्यांनी संबंधित प्राध्यापकाच्या राजकीय पदाचा या प्रकरणातील कार्यवाहीवर प्रभाव पडत आहे का, असा प्रश्न उपस्थित केला. आरोपी प्राध्यापक काँग्रेसचे खासदार असल्यामुळे कारवाईला विलंब होत आहे का? तसेच आपल्या राजकीय पदाचा वापर करून ते कारवाई रोखण्याचा प्रयत्न करत आहेत का, असा आरोपही संघटनेने केला. जेएनयूच्या अंतर्गत समितीवर असलेल्या डाव्या विचारसरणीच्या विद्यार्थी संघटनांच्या प्रतिनिधींच्या भूमिकेवरही अभाविपने प्रश्नचिन्ह उपस्थित केले. महिला हक्क आणि सुरक्षिततेसाठी सार्वजनिकरित्या आवाज उठविणाऱ्या या प्रतिनिधींनी संबंधित प्रकरणात वेळेत कारवाई सुनिश्चित का केली नाही, असा सवाल संघटनेने केला. राजकीय दबावामुळे चौकशीच्या प्रक्रियेवर परिणाम होत असल्यास किंवा तक्रारींच्या सुनावणीत अनावश्यक विलंब होत असल्यास ते अत्यंत गंभीर असल्याचे अभाविपने म्हटले आहे.(JNU Sexual Harassment Case)
अंतर्गत समितीच्या प्रतिनिधींच्या उत्तरदायित्वाची मागणी
अभाविप जेएनयूचे अध्यक्ष मयंक पांचाळ यांनी गंभीर आरोप असलेल्या प्रकरणात तातडीने कारवाई न होणे हे विद्यापीठाच्या अंतर्गत समितीवर कथित राजकीय प्रभावाचे निदर्शक असल्याचा आरोप केला. पांचाळ यांनी डाव्या विचारसरणीच्या संघटनांशी संबंधित असल्याचा दावा केलेल्या अन्य काही व्यक्तींचाही उल्लेख केला. त्यांच्यावर लैंगिक छळाशी संबंधित आरोप असल्याचेही त्यांनी म्हटले. हे सर्व दावे अभाविपने आपल्या प्रसिद्धीपत्रकात केले आहेत. आरोपी प्राध्यापकाला मिळत असलेले कथित ‘राजकीय संरक्षण’ हे विद्यापीठाच्या अंतर्गत समितीचे आणि डाव्या विचारसरणीच्या संघटनांचे ‘वास्तविक स्वरूप’ दाखवते, असा आरोप पांचाळ यांनी केला.(JNU Sexual Harassment Case)
निष्पक्ष आणि वेळबद्ध चौकशीची मागणी
लैंगिक छळाच्या तक्रारींची हाताळणी संबंधित व्यक्तीचे राजकीय किंवा संघटनात्मक स्थान काहीही असले तरी निष्पक्ष, पारदर्शक आणि वेळबद्ध पद्धतीने झाली पाहिजे, अशी भूमिका अभाविपने मांडली. राजकीय प्रभाव, संबंधित व्यक्तीचे पद किंवा अन्य कोणत्याही बाह्य घटकामुळे चौकशीवर परिणाम होत असल्यास जेएनयूच्या तक्रार निवारण यंत्रणेवरील विश्वासाला धक्का बसेल, असा इशारा संघटनेने दिला. विद्यापीठ परिसरातील लैंगिक छळाच्या तक्रारींच्या निवारणासाठी असलेल्या संस्थात्मक यंत्रणेच्या प्रभावीतेवर देशभरात चर्चा सुरू असतानाच हे आंदोलन झाले. संबंधित आरोपांची तातडीने चौकशी करून त्यावर जलदगतीने कार्यवाही करावी आणि अंतर्गत समितीने कोणत्याही राजकीय हस्तक्षेपाशिवाय काम करावे, अशी मागणी अभाविपने जेएनयू प्रशासनाकडे केली.(JNU Sexual Harassment Case)
'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक