‘कोरोना’ काळात चीनने पाकिस्तानला मदत म्हणून मास्क पाठवले. पाकिस्तान्यांनी मास्क असलेले बॉक्स उघडले, तेव्हा ते संतापले. कारण, ते काही ‘एन ९५’ मास्क नव्हते, तर ते अंतर्वस्त्राच्या कपड्यांची ठिगळे जोडून बनवलेले काहीतरी होते. हे आठवण्याचे कारण की, मास्कच्या बाबतीत अशी फसवणूक करणार्या चीनबाबत बांगलादेशमध्ये दि. ९ सप्टेंबर रोजी ती घटना घडली. चीनने बांगलादेशला दिलेल्या रणगाड्याचा स्फोट होऊन त्यात बांगलादेश सैनिक मारले गेले. हा स्फोट कसा झाला, तर बांगलादेशी सैनिक रणगाड्यातून हल्ला करत गोळा डागत होते. मात्र, तो गोळा बाहेर पडण्याऐवजी आतल्या दिशेकडे वळत आतच फुटल्यामुळे हा भीषण स्फोट झाला. चिनी शस्त्रास्त्रांची नाचक्की झाली. पण, चीनसाठी हे नवीन नाही. चीनचे सामान तकलादू असते, याबद्दल अख्ख्या जगाला अनुभव आहेच.
आपल्याकडे तर गल्लीबोळातील अशिक्षित व्यक्तीही चिनी वस्तूंबाबत सहज म्हणते की, ‘चले तो चाँद तक वरना शाम तक.’ अतिविस्तारवादी आणि त्यासाठी काहीही करण्यास तयार असणारा चीन, त्याच्या कोणत्याही वस्तूकडे जागतिक बाजारपेठेत अविश्वासाने पाहिले जाते. जगाचा हा दृष्टिकोन का झाला असेल? तर, संरक्षण असू दे की, आणखीन कोणते क्षेत्र; त्यामध्ये चीनचे तकलादू आणि ‘डुप्लिकेट’ सामान तयारच असते. आपल्याकडेही बाजारात चिनी खेळणी येतात. ती एकदा वापरली तरी नशीब, अशा समजुतीनेच लोक ती खेळणी घेत असतात. खेळण्यांचे ठीक आहे; पण देशाच्या सुरक्षिततेची मदार ज्याच्यावर असते, त्या शस्त्रास्त्रांचे काय?
अमेरिका किंवा रशियापेक्षा ३० ते ४० टक्के दरात स्वस्त शस्त्रास्त्रे पुरवतो म्हणत, चीनने अनेक अविकसित देशांना स्वस्त शस्त्रास्त्रे विकली. ही शस्त्रे वरून तरी अमेरिकन किंवा रशियन बनावटीसदृश होती. दिसायला अगदी भक्कम आणि चकाचक. मात्र, या शस्त्रास्त्रांच्या आत काय होते? तर, बनावटी सामान. एका ‘फायटर जेट’मध्ये विशिष्ट इंधनाची अंतर्गत व्यवस्था असताना चीनने त्या इंधनाच्या जागी चक्क पाणी भरून ते जेट विकले होेते. याचा चांगलाच अनुभव पाकिस्तानला आला. ‘ऑपरेशन सिंदूर’दरम्यान चिनी हवाई संरक्षण यंत्रणा भारतीय क्षेपणास्त्रांना रोखण्यात पूर्णपणे अपयशी ठरली, तर म्यानमारला चीनने ‘फायटर जेट’ विमान दिले होते. मात्र, एनवेळी या जेट्सच्या संरचनेला तडा गेला आणि रडार यंत्रणा निकामी झाली. या गंभीर त्रुटींमुळे म्यानमारला ही विमाने जमिनीवरच उभी करून ठेवावी लागली. नायजेरिया आणि व्हेनेझुएलालाही असाच कटू अनुभव.
असो. बांगलादेशवर सध्या चीनचे ६.२ अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त कर्ज आहे. बांगलादेश आपल्या लष्करासाठी ७० टक्क्यांपेक्षा जास्त प्रमुख शस्त्रे चीनकडून खरेदी करतो. शस्त्रास्त्रांवर भर देणार्या बांगलादेशमध्ये इतर स्तरावर सगळे आलबेल आहे का? तर, गेल्या चार महिन्यांत बांगलादेशमध्ये एक हजारांपेक्षा जास्त बालके मृत्युमुखी पडली. कशामुळे, तर ‘गोवर’ या साथीच्या आजाराचा उद्रेक झाल्यामुळे. जगभरात ‘गोवर’ आजारावर बर्यापैकी आळा घातला गेला. ‘गोवर’विरोधी लस बालकांना देण्यात आली. पण, बांगलादेशमध्ये ही लस बालकांना टोचण्यामध्ये अडथळे आले. ‘अल्लाने दिलेल्या शरीरात बाहेरचे काही नको,’ असे म्हणत धर्मांधांनी आपल्या बालकांना लस देण्यास मज्जाव केला. कट्टरतावादी अंधश्रद्धेचे बळी ती बालके झाली. लस घेतली तर बरा होऊ शकणारा ‘गोवर’ आजार बांगलादेशमध्ये बालकांचा जीव घेणारा महामारी ठरला आहे. बालकांसोबतच आता तरुण आणि वृद्धांकडेही ‘गोवर’च्या महामारीने मोर्चा वळवला आहे. बांगलादेशमध्ये सध्या ‘गोवर’च्या महामारीने उद्रेक केला आहे. मात्र, याकडे ना बांगलादेश सरकारचे गांभीर्याने लक्ष, ना तिथल्या जनतेचे. बहुसंख्य जनता मुस्लीम आहे आणि त्यांनी विकास आणि प्रगतीऐवजी अंधश्रद्धा आणि कट्टरतेचे स्तोम माजवले आहे. काही वर्षांपासून धर्मांध कट्टरतावाद्यांनी तिथल्या अल्पसंख्याकांवर हल्ले करणे, त्यांची धर्मस्थळे तोडणे, त्यांच्या घरांवर कब्जा करणे, हे सर्रास सुरू आहे. कालपरवाच एका हिंदू पुरुषावर आणि हिंदू महिलेवर तिथे हल्ला करण्यात आला, त्यांचा जीव घेण्यात आला. बांगलादेशात गैरमुस्लिमांना म्हणजे अर्थातच, हिंदू आणि ख्रिश्चनांना जगणे मुश्कील झाले आहे. धर्मांध कट्टरतेची पट्टी डोळ्यावर आणि अकलेवर बांधली गेल्याने बांगलादेश पाकिस्तानच्या पदपथावर चालला आहे. कट्टरपंथी देशाचे हे वास्तव!
९५९४९६९६३८