नवी मुंबई विमानतळावरून आंतरराष्ट्रीय प्रवास स्वस्त होणार; लँडिंग शुल्कात १००% सूट

    11-Sep-2026

मुंबई : (AERA) भारतीय विमानतळ आर्थिक नियामक प्राधिकरणाने (AERA) नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी सुधारित व्हेरिएबल टॅरिफ प्लॅनला मंजुरी दिली आहे. या निर्णयामुळे नवी मुंबई विमानतळावरून आंतरराष्ट्रीय हवाई संपर्काला मोठी गती मिळण्याची शक्यता असून, भविष्यात प्रवाशांना अधिक पर्यायी मार्ग आणि किफायतशीर विमान तिकीट दर उपलब्ध होऊ शकतात.

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाने (NMIA) मागणी केलेल्या सुधारित आराखड्यानुसार, सवलतीसाठीची पात्रता ‘मुंबई महानगर प्रदेशातील नवीन मार्ग’ ऐवजी ‘नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून नवीन मार्ग’ अशी बदलण्यात आली आहे. त्यामुळे नवी मुंबई विमानतळावरून नवीन आंतरराष्ट्रीय उड्डाणे सुरू करणाऱ्या विमान कंपन्यांना लँडिंग शुल्कात मोठ्या सवलतींचा लाभ घेता येणार आहे. (AERA)

नवीन आंतरराष्ट्रीय मार्गांना मोठी सवलत

नवीन आंतरराष्ट्रीय प्रवासी मार्गांना पहिल्या वर्षी लँडिंग शुल्कात १०० टक्के पूर्ण सूट मिळणार आहे. ५,००० किलोमीटरपर्यंतच्या कमी अंतराच्या (Short-haul) मार्गांना दुसऱ्या वर्षी ५० टक्के सवलत मिळेल. (AERA) ५,००० किलोमीटरपेक्षा जास्त अंतराच्या लांब पल्ल्याच्या (Long-haul) मार्गांना दुसऱ्या वर्षी ५० टक्के, तर तिसऱ्या वर्षी २५ टक्के सवलत दिली जाणार आहे. (AERA)

अतिरिक्त फेऱ्यांनाही सवलत

आधीपासून अस्तित्वात असलेल्या आंतरराष्ट्रीय मार्गांवर अतिरिक्त फेऱ्या सुरू केल्यास विमान कंपन्यांना पहिल्या वर्षी सवलत मिळणार आहे. कमी अंतराच्या मार्गांवरील अतिरिक्त फेऱ्यांना ५० टक्के, तर लांब पल्ल्याच्या मार्गांवरील अतिरिक्त फेऱ्यांना ७५ टक्के सवलत दिली जाणार आहे. (AERA)

आंतरराष्ट्रीय कार्गो सेवांनाही प्रोत्साहन

आंतरराष्ट्रीय मालवाहू सेवांसाठी पहिल्या वर्षी लँडिंग शुल्कात ९० टक्के, तर दुसऱ्या वर्षी ५० टक्के सवलत मिळणार आहे. या सवलतींमुळे नवी मुंबई विमानतळावरील एअर कार्गो कनेक्टिव्हिटी वाढण्यास मदत होईल. तसेच या भागातील व्यापार, निर्यात आणि लॉजिस्टिक्स क्षेत्राला चालना मिळण्याची शक्यता आहे. (AERA)

प्रवाशांना अधिक मार्ग आणि किफायतशीर तिकीट दरांची शक्यता

सुधारित निकषांमुळे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ नवीन आंतरराष्ट्रीय प्रवासी आणि मालवाहू उड्डाणे सुरू करू इच्छिणाऱ्या विमान कंपन्यांसाठी अधिक आकर्षक ठरणार आहे. यामुळे नवीन हवाई मार्गांचा विकास वेगाने होण्यास मदत होईल. (AERA)

अधिक विमान कंपन्यांचा सहभाग आणि थेट आंतरराष्ट्रीय मार्ग सुरू झाल्यास प्रवाशांना अधिक गंतव्यस्थाने, सुधारित कनेक्टिव्हिटी आणि तुलनेने स्वस्त तिकीट दर उपलब्ध होऊ शकतात. मात्र तिकीट दरातील प्रत्यक्ष कपात विमान कंपन्यांच्या व्यावसायिक निर्णयांवर आणि मार्गांवरील स्पर्धेवर अवलंबून असेल. (AERA)

९ कोटी प्रवासी आणि ३२ लाख टन कार्गो हाताळणीची क्षमता

अदानी एअरपोर्ट होल्डिंग्स लिमिटेड आणि सिडको यांच्यातील सार्वजनिक-खाजगी भागीदारीतून विकसित करण्यात आलेले नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सुरुवातीला वार्षिक २ कोटी प्रवासी हाताळण्यासाठी डिझाइन करण्यात आले आहे. पूर्ण विकासानंतर विमानतळाची क्षमता ९ कोटी प्रवासी आणि ३.२ दशलक्ष टन, म्हणजेच सुमारे ३२ लाख टन कार्गो हाताळण्यापर्यंत वाढविण्याचे नियोजन आहे. (AERA)

या सवलतींमुळे नवी मुंबईचे आंतरराष्ट्रीय विमान वाहतूक आणि लॉजिस्टिक्स केंद्र म्हणून स्थान अधिक बळकट होण्याची अपेक्षा आहे.







संबंधित मजकूर