‘९/११’च्या दहशतवादी हल्ल्याची पंचविशी!

    11-Sep-2026
 
 9/11 Attacks 25 Years
 
अमेरिकेवरील दि. ११ सप्टेंबर २००१च्या हल्ल्याला (९/११) आज २५ वर्षे पूर्ण झाली. योगायोगाने कालच भारताच्या राष्ट्रीय तपास यंत्रणेने दिल्लीतील लाल किल्ला स्फोट प्रकरणी आरोपींवर चार्जशीटही दाखल केली. भारतीय उपखंडातील ‘अल कायदा’ - (Al-Qaeda in the Indian subcontinent (AQIS) AGuH) ‘अन्सार गजवत-उल-हिंद’ ही संघटना या हल्ल्यामागे असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्याच ‘अल कायदा’ची ही उपशाखा आहे, ज्यांनी दि. ११ सप्टेंबर २००१ रोजी अमेरिकेवर मोठा आत्मघातकी हल्ला चढवला होता. तेव्हा, ९/११ हल्ल्याच्या पंचवीशीनिमित्त दहशतवादी संघटनांची जागतिक व्याप्ती आणि अजूनही जगावर असलेले दहशतवादाचे सावट यांचा आढावा घेणारा हा लेख...
 
नवी दिल्लीतील लाल किल्ला स्फोट प्रकरणी ‘अन्सार गजवत-उल-हिंद’ या दहशतवादी संघटनेच्या उमर ऊन नबीवर नुकतेच आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. याच नबीने नवी दिल्ली येथे दि. १० नोव्हेंबर २०२५ रोजी आत्मघातकी दहशतवादी हल्ला घडवून आणला होता. तो भारतीय उपखंडातील ‘अन्सार गजवत-उल-हिंद’चा मास्टरमाईंड. याचाच अर्थ, ‘९/११’च्या हल्ल्यानंतर तब्बल २५ वर्षांनंतरसुद्धा दहशतवादी हल्ल्यांना पूर्णविराम लागलेला नाही. याचाच अर्थ दहशतवादी संघटना कधीही संपत नाहीत, त्या फक्त आपले रूप बदलतात, हेच यावरुन सिद्ध होते.
 
२५ वर्षांपूर्वी कुणी स्वप्नातही अशी कल्पना केली नसेल की, ‘९/११’ सारखे चार आत्मघातकी दहशतवादी हल्ले अमेरिकेसारख्या स्वत:ला महासत्ता म्हणून मिरवणार्‍या देशावर होऊ शकतात. ‘वर्ल्ड ट्रेड सेंटर’च्या ११० मजल्यांच्या जुळ्या इमारतींवर दोन प्रवासी विमाने धडकवून हा भीषण दहशतवादी हल्ला केला गेला. ‘अमेरिकन एअरलाईन्स फ्लाईट-११’ यात २० हजार गॅलन जेट इंधन होते आणि ‘युनायटेड एअरलाईन्स फ्लाईट-१७५’ हे अनुक्रमे उत्तर आणि दक्षिणेच्या इमारतीवर दहशतवाद्यांनी धडकवले. तसेच ‘अमेरिकन एअरलाईन्स फ्लाईट-७७’ हे विमान लष्कराचे मुख्यालय असणार्‍या ‘पेंटागॉन’च्या पश्चिम भागावर धडकवण्यात आले आणि चौथे विमान असलेल्या ‘एअरलाईन फ्लाईट-९३’ मधील प्रवासी आणि दहशतवाद्यांमध्ये झटापट झाल्याने ते एका शेतात कोसळले. हे विमान नक्की कोणाला लक्ष्य करणार होते, त्याचा केवळ अंदाजच बांधता आला. ‘व्हाईट हाऊस’ किंवा ‘कॅपिटॉल बिल्डिंग’ हे त्यांचे लक्ष्य असावे, असे म्हटले जाते. हा दहशतवादी हल्ला कट्टर इस्लामिक मूलतत्त्ववादी संघटना ‘अल कायदा’नेच केला होता, ज्यामध्ये तब्बल तीन हजार जणांचा बळी गेला. २००२ साली ओसामा बिन लादेनने या हल्ल्याचे समर्थन करत जी कारणे सांगितली होती, ती खरं तर आजही धोक्याचे इशारे आहेत. कोणती होती ही कारणे, त्यावर एक नजर टाकूया.
 
१) इस्रायलची निर्मिती, ज्यूंना अमेरिकेचा मिळणारा पाठिंबा, जेरुसलेममध्ये इस्रायलचे वाढते वर्चस्व आणि पॅलेस्टाईनमध्ये सैन्याचे कायम असलेले अस्तित्व.
२) सोमालियामध्ये इस्लामी जनतेच्या विरोधात अमेरिकेचे धोरण
३) चेचन्यामध्ये इस्लामी जनतेच्या विरोधात रशियाच्या धोरणाला पाठिंबा.
४) जम्मू-काश्मीरविषयी भारताच्या धोरणाला अमेरिकेचा पाठिंबा.
५) लेबेनॉनमध्ये इस्लामी जनतेच्या विरोधात ज्यू लोकांना अमेरिकेचा पाठिंबा.
 
तसेच लादेनच्या इशार्‍यात एक वाक्य असेही होते की, "इराकवरच्या अमेरिकेच्या निर्बंधांमुळे दीड दशलक्ष मुले अन्नावाचून मृत्युमुखी पडली आहेत. त्याविषयी कुणाला कळवळा नाही. पण, तुमचे केवळ तीन हजार नागरिक मेले, तर सगळे जग तुमच्यासाठी उभे राहिले.” तसेच "सामान्य नागरिकांवर आम्ही हल्ला केला. कारण, याच स्वातंत्र्यप्रेमी नागरिकांनी अमेरिकेच्या सरकारला निवडून दिले आहे. त्यांच्याच करांच्या पैशाने लष्करी विमाने अफगाणिस्तान, पॅलेस्टाईन, इराक यांवर हल्ले करतात.”
 
अमेरिकेवरील ‘९/११’च्या दहशतवादी हल्ल्यावेळी ‘तालिबान’चा पाठिंबा ‘अल कायदा’ला आणि ‘तालिबान’च्या मुल्ला ओमरचा पाठिंबा ओसामा बिन लादेनला होता. लादेनला अमेरिकेच्या हवाली करायला मुल्ला ओमरने नकार दिला होता. मग अमेरिकेने अफगाणिस्तानवर हल्ले चढवले. ‘वॉर ऑन टेररिझम’ या धोरणाला प्रकर्षाने राबविले गेले. ओसामा बिन लादेन आणि ‘अल कायदा’चे संपूर्ण दहशतवादी जाळे उद्ध्वस्त करणे, हाच हेतू त्यामागे होता. अखेरीस पाकिस्तानातील अबोटाबाद येथे दि. २ मे २०११ रोजी ओसामा बिन लादेनला ठार मारण्यात अमेरिकेला यश मिळाले. पण, तरीही ‘अल कायदा’ ही दहशतवादी संघटना पूर्णपणे संपलेली नाहीच. उलट, ‘अल कायदा’ला येऊन मिळणारे जिहादी कट्टरवादी संघटनांचे समर्थक वाढत गेले आणि दहशतवाद फोफावत गेला.
 
‘९/११’ नंतर डोके वर काढलेल्या दहशतवादी संघटना
 
अमेरिकेचे ‘ऑपरेशन एंड्युरिंग फ्रीडम’ म्हणजेच, ‘वॉर ऑन टेररिझम’ हे जरी वरकरणी यशस्वी झालेले वाटत असले, तरीही वास्तविक जगात दहशतवादी संघटनांमध्ये लक्षणीय वाढ ‘९/११’नंतर झालेली दिसून येते. जगभरात ‘९/११’नंतरे ‘जैश-ए-मोहम्मद’, ‘लष्कर-ए-तोयबा’, ‘अल असा मार्तीर ब्रिगेड’, ‘अल कायदा माघेरब’, ‘अल शबाब’, ‘तेहरिक-ए-तालिबान’, ‘जैश-ए-आदल’, ‘इंडियन मुजाहिद्दीन’, ‘जेमाह अंशौरत तौहिद’, ‘हक्कानी नेटवर्क’, ‘बोको हराम’, ‘इसिस’, ‘हिजबुल मुजाहिद्दीन’ यांसारख्या अनेक दहशतवादी संघटनांनी जगभरात जिहादी हैदोस माजवला.
 
२००१ नंतर कोणताही मोठा दहशतवादी हल्ला अमेरिकेवर झालेला नसला, तरी भारत, फ्रान्स, स्पेन, इंग्लंड, तसेच श्रीलंका यांसारख्या कित्येक देशांमधील हजारो निष्पाप नागरिकांना दहशतवादी हल्ल्यांतून लक्ष्य केले गेले. यांपैकी सगळ्यात भयंकर असणारी संघटना म्हणजे, ‘इसिस - इस्लामिक स्टेट ऑफ इराक अ‍ॅण्ड सीरिया’ यालाच ‘इस्लामिक स्टेट ऑफ इराक अ‍ॅण्ड लेवांत’सुद्धा म्हणतात. ‘अल कायदा’ नंतर जगातील अनेक जणांना ‘इस्लामिक खिलाफत’चे आदर्श स्वप्न दाखवून आपल्याकडे आकर्षित करण्यात ही संघटना यशस्वी ठरली. आजही जगभरातून अनेक धर्मांध जिहादी या संघटनेत मोठ्या संख्येने सामील होताना दिसतात. एवढेच नाही, तर ‘इसिस’चा उदय अनेक देशांमध्ये होत आहे. अगदी मार्च २०२१ मध्ये मोझांबिक आणि ‘डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ कॉन्गो’ या देशांमध्येही ‘इसिस’च्या जिहादी राक्षसाने डोके वर काढले. ‘इसिस मोझांबिक’ म्हणजेच, ‘अन्सार-अल-सुन्ना’ किंवा ‘अल शबाब’ या दहशतवादी संघटना होय.
 
‘तालिबान’चे पुनरागमन
 
अफगाणिस्तानातून २०२१च्या ऑगस्टपर्यंत अमेरिकेच्या जो बायडन प्रशासनाने आपले सैन्य पूर्णपणे माघारी घेण्याची प्रक्रिया चालू केली. त्यानंतर ‘तालिबान’ने अनेक शहरांवर ताबा मिळवत आपली सर्वोच्च सत्ता प्रस्थापित केली. त्यामुळे आता जरी ‘अल कायदा’वर नियंत्रण ठेवण्याची भाषा केली जात असली, तरीही ‘तालिबान’बरोबरच ‘अल कायदा’चे सुद्धा पुनरुज्जीवन झाले. पाकिस्तानच्या मदतीने १९९६ ते २००१ पर्यंत ‘शरिया कायदा’ लागू करून इस्लामिक मूलतत्त्ववाद ‘तालिबान’ने अगदी जोरकसपणे जोपासला होता. दरम्यान, ओसामा बिन लादेन आणि अयामान अल जवाहिरी यांनी फेब्रुवारी १९९८ला फतवा काढून अमेरिकेविरोधात युद्ध घोषित केले होते. तसेच ‘९/११’च्या हल्ल्याला जबाबदार असणारे दहशतवादी विशेषतः ‘हॅम्बुर्ग सेल’चे सदस्य मोहम्मद अत्ता- गटाचा प्रमुख, रामझी बिन अल शिभ, मार्वान अल-शेही आणि झियद जर्राह जर्मनीहून कंदाहारला येऊन गेले होते. ओसामा बिन लादेनला ते भेटले होते आणि त्याच्या धार्मिक विचारांनी हे प्रभावित झालेले होते. ‘अल कायदा’, ‘तालिबान’, पाकिस्तान-इस्लामिक दहशतवादी हल्ले हे समीकरण दि. ११ सप्टेंबर २००१ रोजी जगाने अनुभवले होते. यामुळे ‘९/११’नंतर ‘अल-कायदा’द्वारे होणारे एककेंद्रीकरण संपून विकेंद्रित दहशतवादी घातक रचना तयार झाली. ‘९/११’ हा ‘अल कायदा’च्या दहशतवादाचा शेवट नव्हता; तर उलट तो दहशतवादाच्या नव्या, विकेंद्रित पर्वाची सुरुवात ठरला. अफगाणिस्तानातील प्रशिक्षण शिबिरांपासून सुरू झालेली दहशतवादाची पेरणी आफ्रिका, मध्य-पूर्व, दक्षिण आशिया आणि युरोपपर्यंत विचारसरणीच्या माध्यमातून विस्तारत गेली.
 
तसेच यातूनच मध्य-पूर्वेतील राजकीय अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवर ‘इसिस’चा झपाट्याने उदय झाला, तोच मुळात इस्लामिक कट्टरतेच्या पायावर. पण, ‘अल-कायदा’ आणि ‘इसिस’ या दोन्ही दहशतवादी संघटनांमध्ये वैचारिक व संघटनात्मक मतभेदही आहेत. आज जरी वरकरणी दहशतवादी हल्ल्यांची आकडेवारी कमी झालेली दिसली, तरीही धोका कमी झालेला नाही. गेल्या वर्षी दिल्लीत झालेला आत्मघातकी दहशतवाद याचेच उदाहरण.

भारतासाठी धडा
 
दहशतवादाच्या या बदलत्या स्वरूपाचा भारतावरही मोठा परिणाम झाला. दक्षिण आशिया हा ‘अल-कायदा’, ‘तालिबान’, ‘लष्कर-ए-तोयबा’, ‘जैश-ए-मोहम्मद’ आणि नंतर ‘इसिस’ यांसारख्या विविध दहशतवादी संघटनांच्या हालचालींच्या दृष्टीने संवेदनशील प्रदेश राहिला आहे. भारतासाठी आव्हान केवळ सीमापार दहशतवादाचे नाही, तर त्याचे स्वरूप व्यापक आहे. इंटरनेट, सोशल मीडिया, ऑनलाईन प्रचार, कट्टरतावादी विचारसरणी आणि स्थानिक पातळीवरील भरती यांमुळे दहशतवादाचे स्वरूप अधिक गुंतागुंतीचे झाले आहे. इस्लामिक दहशतवादी संघटना आता आशियाई देशांमध्येही वरचेवर हल्ले चढवत आहेत. त्यांचे लक्ष्य आता दक्षिण आशिया क्षेत्राकडेही आहे. हजारो किमी लांब असणार्‍या इराक-सीरियातील घडामोडींचा प्रभाव थेट आपल्या देशावरही पडतो, ही दाहक वस्तुस्थिती कदापि नाकारुन चालणार नाही. भारतातील अनेक धर्मांध तरुण तर ‘इसिस’ला जाऊन सामील झाल्याचेही उघडकीस आले आहे. त्यांपैकी काही जणांना परत मायदेशी आणण्यात यशही मिळाले. तसेच जम्मू-काश्मीरमध्ये ‘कलम ३७०’ रद्द करणे, श्रीराम मंदिराचे भूमिपूजन, ‘नागरिकत्व दुरुस्ती कायदा’ हे जरी देशांतर्गत निर्णय असले, तरीही काही गट असंतुष्ट आहेत. त्यातच ‘तालिबान’ने पुन्हा अफगाणिस्तानमध्ये सत्ता हस्तगत केली आहे. गेल्या वर्षी दिल्लीत घडवून आणला गेलेला आत्मघातकी दहशतवादी हल्ला हासुद्धा ‘अल कायदा’च्या विचारांनी प्रेरित झालेला होता, याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. २५ वर्षांपूर्वी ‘९/११’च्या दहशतवादी हल्ल्यामागील ही कारणे पाहता, आजसुद्धा परिस्थितीत फारसा फरक पडलेला नाही, हे मान्य करावेच लागेल.
 
२५ वर्षांनंतरचा अनुत्तरित प्रश्न
 
इस्लामिक दहशतवादाचे आव्हान मुळात कट्टर इस्लामिक मूलतत्त्ववादी विचारसरणीचे आव्हान आहे. या विचारधारेतून अनेक गट हिंसक कारवाया करत आले आहेत आणि भविष्यातसुद्धा करतील.
 
वास्तविक, ‘९/११’ नंतर केवळ अमेरिकाच नव्हे तर संपूर्ण जग हादरले. त्यामुळे दहशतवादाचे दाहक रूप समोर आले. आजही जगात सुरक्षाव्यवस्था वाढविली आहे. विमानतळांवरील तपासणी कडक केली गेली. गुप्तचर यंत्रणांमध्ये आंतरराष्ट्रीय सहकार्यही वाढवले. तसेच दहशतवाद्यांच्या आर्थिक स्रोतांवर नियंत्रण आणण्याचा कठोर प्रयत्न केला गेला. पण, दहशतवादानेसुद्धा आपले रूप बदलले आहे. मूळ प्रश्न आहे, तो जहाल विचारसरणीला पराभूत करण्याचा. इस्लामी दहशतवाद्यांना सगळे जग इस्लाममध्ये धर्मांतरित करायचे आहे. त्यासाठी झपाटून जाऊन स्वत:ला स्फोटकांनी उडवून देणारे आत्मघातकी मनुष्यबळसुद्धा इस्लामकडे मुबलक आहे. ही आव्हानात्मक वस्तुस्थिती स्वीकारणे आणि त्याअनुषंगाने जागतिक स्तरावर प्रत्यक्ष जमिनीवरील, आर्थिक रसदीवर पोसल्या जाणार्‍या दहशतवादावर प्रहार करणे, ही काळाची गरज!
 
रूपाली कुळकर्णी-भुसारी
(लेखिका ‘एकता’ मासिकाच्या संपादक आहेत.)
९९२२४२७५९६




संबंधित मजकूर