देशविरोधी घोषणांविरोधात शुभेंदू अधिकारी यांचा एल्गार!भव्य 'गेरूआ सन्मान यात्रा' काढत दिला स्पष्ट इशारा

    10-Sep-2026   
Shubhendu Adhikari
 
 
मुंबई (Shubhendu Adhikari) : पश्चिम बंगालातील जादवपूर विद्यापीठ परिसरात लागलेल्या कथित देशविरोधी घोषणांच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री शुभेंदू अधिकारी यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. 'काश्मीर मांगे आजादी', 'लाल सलाम' यांसारख्या घोषणांविरोधात त्यांनी मोर्चा काढत भगव्या रंगाचा अपमान कोणत्याही परिस्थितीत सहन केला जाणार नसल्याचा इशारा दिला. ९ सप्टेंबर रोजी दक्षिण कोलकात्यातील गोलपार्क ते जादवपूर विद्यापीठाजवळील आठव्या बसस्थानकापर्यंत सुमारे तीन किलोमीटरची 'गेरूआ सन्मान यात्रा' काढण्यात आली. या यात्रेत मोठ्या संख्येने नागा साधू, संत आणि समर्थक सहभागी झाले. 'जय श्रीराम' च्या घोषणा, शंखनाद आणि उलूध्वनीने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला.(Shubhendu Adhikari)
 
याप्रसंगी बोलताना शुभेंदु अधिकारी म्हणाले, भगवा रंग, भारतीय संस्कृती आणि देशाचा अपमान करणाऱ्यांना धडा शिकवला जाईल. जादवपूर विद्यापीठात अलीकडे लागलेल्या 'काश्मीर मांगे आजादी' आणि डाव्या विचारसरणीच्या गटांकडून दिल्या जाणाऱ्या 'रेड सॅल्युट (लाल सलाम)' घोषणांवर त्यांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली. त्यांनी दावा केला की, अशा कथित देशविरोधी प्रवृत्तींचे बंगालमधून उच्चाटन केले जाईल.(Shubhendu Adhikari)
 
जादवपूर विद्यापीठाचा उल्लेख करताना त्यांनी ते श्री अरविंद यांच्या कार्यभूमीशी जोडलेले आणि ऐतिहासिक परंपरेचे केंद्र असल्याचे सांगितले. अशा संस्थेत अशा प्रकारच्या कथित देशविरोधी उपक्रमांना स्थान नसल्याचे त्यांनी म्हटले. येत्या काही दिवसांत पुन्हा जादवपूर येथे येऊन श्रीमद्भगवद्गीतेचे आणि हनुमान चालीसेचे सामूहिक पठण आयोजित करण्यात येईल, अशी घोषणा त्यांनी केली. तसेच विद्यापीठात तीन दिवसीय वैदिक पठण कार्यक्रम घेण्याचाही मानस व्यक्त केला.(Shubhendu Adhikari)
 
गेल्या महिन्यात जादवपूर विद्यापीठ परिसरात अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आणि डाव्या विचारसरणीच्या विद्यार्थी संघटनांमध्ये हिंसक झटापट आणि घोषणाबाजी झाली होती. विद्यापीठाच्या भिंतींवर 'फ्री पॅलेस्टाईन', 'आझाद काश्मीर' आणि इतर राजकीय घोषणांची भित्तिचित्रे (ग्राफिटी) रंगविण्यात आली होती. या प्रकरणावरून राजकीय वर्तुळात वाद निर्माण झाला होता. शुभेंदू अधिकारी यांच्या प्रतिक्रियेनंतर कोलकाता महापालिका आणि विद्यापीठ प्रशासनाने पोलिसांच्या उपस्थितीत संबंधित वादग्रस्त ग्राफिटी भिंतींवरून हटवली होती. मात्र, डाव्या विद्यार्थी संघटनांनी याला अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर हल्ला असल्याचे म्हणत 'रीक्लेम द वॉल' मोहिमेअंतर्गत पुन्हा भिंतींवर घोषणा आणि चित्रे रंगवण्यास सुरुवात केली. त्यामुळे विद्यापीठ परिसरात वैचारिक आणि राजकीय तणाव कायम असल्याचे चित्र आहे.(Shubhendu Adhikari)
 
 
 
 
 




ओंकार मुळ्ये

'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक
संबंधित मजकूर