वेदांचा वारसा जपण्याचे आयुष्यभराचे व्रत स्वीकारलेल्या श्रद्धा परशुराम परांजपे यांच्या प्रेरणादायी वाटचालीवर प्रकाश टाकणारा हा लेख...
पुण्याच्या सदाशिव पेठेतील अरुंद गल्ली, वाड्यांची संस्कृती, घरातील संतसाहित्यात रमलेले वातावरण आणि वडिलांचा दुग्धविक्रीचा व्यवसाय... या सर्व वातावरणात स्वतःच्या पायावर उभी राहिलेली एक मुलगी पुढे ऋग्वेदाच्या प्रसाराचे आयुष्यभराचे व्रत स्वीकारेल, असे कदाचित तेव्हा कुणालाही वाटले नसते. पण, श्रद्धा परशुराम परांजपे यांनी आपल्या आयुष्याने हे सिद्ध केले की, ज्ञानाची सेवा हीच खरी साधना असते. आज त्या न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांनी सुमारे दीडशे वर्षांपूर्वी स्थापन केलेल्या ‘वेदशास्त्रोत्तेजक सभे’च्या कार्यवाहिका म्हणून कार्यरत आहेत. ऋग्वेदाचा प्रसार हेच ध्येय मानून, त्या वेदांचे ज्ञान समाजाच्या प्रत्येक घटकापर्यंत, विशेषतः नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचा अखंड प्रयत्न करत आहेत.
श्रद्धा यांचे बालपण पुण्याच्या सदाशिव पेठेतील एका मध्यमवर्गीय कुटुंबात गेले. दुग्धव्यवसायाचे उपजीविकेचे साधन साधे असले, तरी घरातील वैचारिक संपत्ती मात्र अफाट होती. त्यांच्या आई गृहिणी होत्या; पण त्यांना संतसाहित्याची विलक्षण आवड होती. ‘साहित्य परिषदे’च्या मराठीच्या परीक्षा, ‘राष्ट्रभाषा सभे’च्या हिंदीच्या परीक्षा त्यांनी दिल्या होत्या. संतवाङ्मयाचे त्यांनी प्रचंड वाचन केले. श्रद्धा यांचा मराठीचा अभ्यास आईच घ्यायच्या. शब्दांवर प्रेम करण्याची आणि साहित्य समजून घेण्याची दृष्टी आईकडूनच मिळाल्याचे ते सांगतात.
वडील वेगळ्याच धाटणीचे होते. ते उत्कृष्ट व्यायामपटू होते. मल्लखांब, कुस्ती, दांडपट्टा, बोथाटी आणि लेझीम यांचे प्रशिक्षण देत. कष्ट, शिस्त आणि धैर्य हे गुण त्यांनी मुलांमध्ये रुजवले. एकीकडे आईने ज्ञानाचा वारसा दिला, तर वडिलांनी जिद्दीचा. श्रद्धा यांचे बालवाडी ते चौथीपर्यंत शिक्षण सोमण प्राथमिक शाळेत झाले. त्यानंतर प्रसिद्ध हुजूरपागा गर्ल्स हायस्कूलमध्ये दहावीपर्यंत शिक्षण झाले. अकरावीपासून त्या सर परशुरामभाऊ (एस. पी.) महाविद्यालयात दाखल झाल्या; पण त्यांचे मन एका वेगळ्याच दिशेने ओढ घेत होते. विज्ञान शाखेत प्रवेश मिळण्याची संधी असूनही त्यांनी संस्कृतची वाट निवडली. या निर्णयामागे एक विलक्षण व्यक्तिमत्त्व होते; पंडित यशवंतराव मराठे.
फाटक वाड्यात राहणार्या या विद्वानांना लहानपणीच अंधत्व आले होते. तरी त्यांनी संगीत, न्याय आणि ‘वेदांत’ यांचा सखोल अभ्यास केला आणि इतरांनाही शिकवले. आठवीच्या सुटीत श्रद्धा यांनी त्यांच्याकडे संस्कृत व्याकरण शिकायला सुरुवात केली. त्या काही दिवसांच्या शिक्षणाने आयुष्याची दिशा बदलली. दहावीत असतानाच त्यांनी ठरवले, ‘करिअर करायचे तर संस्कृतमध्येच.’ एस. पी. महाविद्यालयात शिक्षण घेत असतानाच त्यांनी टिळक महाराष्ट्र विद्यापीठातून ‘संस्कृत विशारद’ केले. यानंतर त्यांनी एकाच वेळी दोन विद्यापीठांतून संस्कृतमध्ये ‘एमए’ केले; टिळक महाराष्ट्र विद्यापीठ आणि पुणे विद्यापीठ. त्यानंतर ‘वेद’ विषयात ‘एमफिल’ करून त्यांनी ‘वैदिक’ अभ्यासाला शास्त्रीय अधिष्ठान दिले. पण, या शिक्षणाच्या प्रवासात जीवनाने कठोर परीक्षा घेतली.
‘एमफिल’ करत असताना वडिलांची प्रकृती बिघडली. मग श्रद्धा यांनी अभ्यासाबरोबर घराची जबाबदारी उचलली. आई आणि भावाच्या मदतीने व्यवसाय सांभाळत. त्यानंतर अभ्यास, संशोधन आणि अध्यापन, हा दिनक्रम त्यांनी दोन वर्षे अखंड सुरू ठेवला. ज्ञानासाठी केलेला संघर्ष असा असतो, जो कधी तक्रार करत नाही. ‘एमफिल’ पूर्ण झाल्यानंतर त्यांनी एका संशोधन संस्थेत नोकरी केली. १९९१ मध्ये त्या ‘वेदशास्त्रोत्तेजक सभे’त सेवेसाठी रुजू झाल्या. त्याच काळात टिळक महाराष्ट्र विद्यापीठात त्या ‘व्हिजिटिंग लेचरर’ म्हणून विद्यार्थ्यांना संस्कृत शिकवत होत्या.
‘वेदशास्त्रोत्तेजक सभे’च्या वतीने ‘युट्यूब’ चॅनेल सुरू करण्याचा विचार पुढे नेत आहेत. संस्थेच्या वतीने चैत्र नवरात्रीतील व्रतांची व्याख्यानमाला, अध्यात्म, ‘रामायण’ परिचय, ‘योगवासिष्ठ’ अभ्यास, नक्षत्रदर्शन कार्यक्रम, वेदांतील खगोलशास्त्रीय संदर्भ, पितृपक्षातील श्राद्धाचे शास्त्रीय महत्त्व, पुराण आणि वैदिक परंपरेवरील संवाद, असे विविध कार्यक्रम राबविले जातात.
‘मनुस्मृती’बाबतही त्यांची भूमिका विचारपूर्वक आहे. ‘न स्त्री स्वातंत्र्यमर्हति’ या एका वायावरून संपूर्ण ‘मनुस्मृती’चा न्याय करणे योग्य नाही, असे त्या सांगतात. त्यांच्या मते, संपूर्ण ग्रंथ वाचल्यास त्यातील अनेक सकारात्मक आणि अभ्यासनीय बाबीही लक्षात येतात. कोणत्याही प्राचीन ग्रंथाचे मूल्यमापन संदर्भासहित आणि पूर्ण वाचनातून व्हायला हवे. श्रद्धा परशुराम परांजपे यांचा प्रवास हा प्रसिद्धीच्या झोतातला नाही. घरच्या जबाबदार्या सांभाळत शिक्षण पूर्ण करणारी मुलगी, संस्कृतची साधक विद्यार्थिनी, संशोधक, अध्यापिका आणि आज दीडशे वर्षांच्या संस्थेची कार्यवाहिका या सर्व भूमिका त्यांनी एकाच धाग्याने जोडल्या आहेत. त्या करत असलेल्या कार्याला त्यांच्या कुटुंबीयांचाही भक्कम पाठिंबा आहे. त्यांचे यजमानही वेदाचे अभ्यासक होते. २०२१ साली त्याचे आकस्मिक निधन झाले.
काळ बदलतो, साधने बदलतात, माध्यमे बदलतात; पण ज्ञानाची ज्योत तेवत ठेवण्यासाठी काही माणसे स्वतःच दीपस्तंभ बनतात. श्रद्धा परशुराम परांजपे या अशाच एका ‘वेदप्रेमी’ साधिका आहेत, ज्यांनी ‘ऋग्वेदा’चा दीप काळाच्या पलीकडे नेण्याचा निर्धार केला आहे. दै. ‘मुंबई तरुण भारत’च्या वतीने त्यांच्या पुढील वाटचालीसाठी अनेक शुभेच्छा!
(अधिक माहितीसाठी संपर्क : ७५८८२७७६८५)