॥सौंदर्यलहरी भाष्य ॥

    10-Sep-2026
 
 Saundarya Lahari Bhashya
 
विरिञ्चिः पञ्चत्वं व्रजति हरिराप्नोति विरतिम्
विनाशं कीनाशो भजति धनदो याति निधनम्|
वितन्द्री माहेन्द्री-विततिरपि संमीलित-दृशा
महासंहारेस्मिन् विहरति सति त्वत्पति रसौ॥२६॥
 
अन्वय - हे सति! अस्मिन् महासंहारे विरिञ्चिः पञ्चत्वं व्रजति, हरिः विरतिम् आप्नोति, कीनाशः विनाशं भजति, धनदः निधनम् याति, वितन्द्री माहेन्द्री-विततिः अपि संमीलित-दृशा (भवति), (तदा) असौ त्वत्पतिः विहरति॥२६॥
 
शब्दार्थ - आचार्य म्हणतात, हे भगवती माते, महाप्रलयसमयी सृष्टीची निर्मिती करणारा ब्रह्मदेव पंचत्वाला प्राप्त होतो; अर्थात त्याचा अंत होतो. विश्वाचे पालन करणार्‍या भगवान विष्णूंचे कार्यही समाप्त होते, लय पावते. मृत्यूचा अधिपती असणारा यमदेखील विनाशाला प्राप्त होतो. संपत्तीचा स्वामी कुबेरही निधन पावतो. एरव्ही कधीही निद्रिस्त न होणारा देवांचा राजा इंद्र आणि त्याचा संपूर्ण देवलोक निद्रिस्त होतो, अर्थातच मरण पावतो. परंतु हे सती! अशा या महासंहाराच्या वेळीही तुझा पती सदाशिव मात्र तुझ्यासह विहार करीत राहतो!
 
आचार्य शंकरांचार्यांच्या या श्लोकातील प्रलयवर्णन हे रूपकात्मक आहे. त्यातूनच एक अत्यंत वेगळे आणि अनुपम विलक्षण तत्त्वज्ञान गुंफले आहे. सामान्यतः मानवाच्या दृष्टीने देव म्हणजे अमरत्वाचे प्रतीक. ब्रह्मा, विष्णू, इंद्र, यम, कुबेर यांसारख्या देवता, आपल्या कल्पनेत मानवी मृत्यूच्या पलीकडे आहेत. पण श्रीविद्येनुसार या जगतात प्रकट झालेले प्रत्येक तत्त्व, कालमर्यादेच्या अधीन आहे. ज्याला आरंभ आहे त्याला अंत आहे; ज्याची अभिव्यक्ती झाली आहे, त्याचा कधीतरी लय होणारच. म्हणूनच महासंहाराच्या वेळी केवळ पृथ्वी, पर्वत, समुद्र, सूर्य-चंद्र किंवा जीवसृष्टीच नष्ट होत नाही; सृष्टीच्या व्यवहारासाठी निर्माण झालेली देवतत्त्वे आणि त्यांची कार्येदेखील मूळ अव्यक्त तत्त्वात विलीन होतात.
 
ब्रह्मदेव म्हणजे सृजनशक्ती पण सृष्टीच उरलेली नसेल, तर सृजन करणाराही संदर्भहीनच होणार. विष्णू म्हणजेच पालनतत्त्व. परंतु ज्याचे पालन करावयाचे, ती सृष्टीच लयाला गेली, तर पालनाचे प्रयोजनही संपते. यम म्हणजे, मृत्यूचे नियमन करणारे तत्त्व; परंतु जेव्हा संपूर्ण दृश्य विश्वच काळाच्या उदरात विलीन होते, तेव्हा स्वतंत्रपणे मृत्यूची व्यवस्थाही उरत नाही. कुबेराची संपत्ती, इंद्राचे ऐश्वर्य, देवसत्तेचे वैभव हे सारेच विश्वाच्या अस्तित्वाशी निगडित आहे. विश्वच नाहीसे झाले की, त्या सर्वांचे स्वतंत्र अस्तित्व कसे टिकणार? त्या दृष्टिकोनातूनच आचार्य इथे त्यांचा मृत्यू कल्पत आहेत. जर संपूर्ण जगतच लयाला जात असेल, तर सदाशिव हे तत्त्वच कसे विद्यमान आहे? भगवतीचे पातिव्रत्य एवढे महान आहे की, महासंहारावेळी इतर सर्व देवतत्त्वांचा लय झाला, तरी तिचा पती सदाशिव लय पावत नाही, अशी काव्यमय मांडणी आचार्य करतात. पण याचा गूढार्थ केवळ लौकिक पती-पत्नीच्या संबंधात शोधता येणार नाही. येथे शिव आणि शक्ती हे विश्वाच्या अस्तित्वामागील, परम् द्वैताभासाचे प्रतीक आहेत.
 
शक्ती ही शिवापासून स्वतंत्र नाही आणि शिव शक्तीविना व्यक्त होऊ शकत नाही. ‘सौन्दर्यलहरी’च्या आरंभीच आचार्यांनी ‘शिवः शक्त्या युक्तो यदि भवति शक्तः प्रभवितुम्’ असे सांगून, हे सूत्र निश्चित केले आहे. शक्तीने युक्त असलेला शिवच सृजनासाठी समर्थ होतो. ‘शक्तीविना शिव’ म्हणजे निष्क्रिय शुद्ध चैतन्य. म्हणूनच महासंहारात सर्व नामरूपे विलीन झाली, तरी ज्यातून नामरूपे पुन्हा प्रकट होणार आहेत, ते शिवशक्तीचे बीजरूप परम् तत्त्व नष्ट होत नाही. द्विदल वनस्पतीच्या बीजाचे बाह्य रूप नष्ट झाले, तरी त्यातील अंकुरण्याची मूलशक्ती शिल्लक असेल, तर योग्य परिस्थितीत त्यातूनही पुन्हा वृक्ष जन्म घेऊ शकतो. पण बीजातील ती मूलभूत शक्तीच नष्ट झाली, तर पुनर्निर्मिती अशयच. त्याचप्रमाणे प्रलय म्हणजे, परम् अस्तित्वाचा संपूर्ण विनाश नव्हे; प्रलय म्हणजे व्यक्त सृष्टीचे अव्यक्त बीजावस्थेत परत जाणे. वेदातील प्रसिद्ध वचन हाच सिद्धान्त मांडते. यथा धाता पूर्वमकल्पयत्|
 
अर्थातच, विधाता पूर्वी जशी सृष्टी रचत होता, तशीच पुन्हा रचना करतो. याचा अर्थ प्रत्येक कल्पाच्या शेवटी सृष्टीची दृश्य रचना लय पावते; परंतु तिचे मूलकारण नष्ट होत नाही. रात्रीच्या अंधारात जग दिसेनासे झाले, म्हणून जगाचे अस्तित्व संपत नाही. सूर्योदय झाल्यावर तेच जग पुन्हा प्रकाशमान होते. त्याचप्रमाणे महासंहाराच्या अंधारात नामरूपांचा लय होतो आणि नव्या सृष्टिचक्रात, तीच बीजशक्ती पुन्हा विश्वरूपाने प्रकट होते. भगवद्गीतेतील वचनही येथे स्मरणीय आहे,
 
भूतग्रामः स एवायं भूत्वा भूत्वा प्रलीयते|
रात्र्यागमेऽवशः पार्थ प्रभवत्यहरागमे॥(गीता ८.१९)
 
अर्थात हे पार्थ! हा जीवसमुदाय वारंवार उत्पन्न होतो आणि ब्रह्मरात्रीच्या आगमनाने लय पावतो; पुन्हा ब्रह्मदिनाच्या आगमनाने प्रकट होतो. म्हणूनच या श्लोकातील महासंहार भय निर्माण करणारा विषय नाही. उलट, तो सृष्टीच्या शाश्वत स्पंदनाचा एक टप्पा ठरतो. उत्पत्ती, स्थिती आणि लय या तीनही अवस्था, एका परम् सत्याच्याच विविध अभिव्यक्ती आहेत. आपण ज्याला मृत्यू म्हणतो, तो एका रूपाचा अंत आहे; परंतु तत्त्वाचा नाही. आपण ज्याला प्रलय म्हणतो, तो विश्वाचा पूर्णविराम नसून पुढील सृजनापूर्वीची विराट शांतता आहे. या दृष्टीने विचार केल्यावर, भगवतीचे सतीत्व हे लौकिक व्याख्येच्या पलीकडील असल्याचे आपल्या ध्यानात येते. आदि शंकराचार्य भगवतीला ‘सति’ म्हणून संबोधतात. शिव आणि शक्तीचे हे नाते, दैहिक किंवा भिन्न अस्तित्वरूप नाही. ते चैतन्य आणि त्याची शक्ती, अग्नी आणि त्याची दाहकता, सूर्य आणि त्याचा प्रकाश यांच्यासारखे अभिन्न आहे. प्रकाशाला सूर्यापासून वेगळे करता येत नाही; दाहकतेला अग्नीपासून विलग करता येत नाही; त्याचप्रमाणे शक्तीला शिवापासून आणि शिवाला शक्तीपासून वास्तविक अर्थाने विभक्त करता येत नाही.
 
भावार्थ : विश्वाचे स्थूल स्वरूप, विश्वाचे सूक्ष्म स्वरूप आणि विश्वाचे सूक्ष्मातीसूक्ष्म स्वरूप हे जाणून घेता यावे, या हेतूनेच आचार्यांनी या श्लोकाची रचना केली आहे. साधक-उपासक ज्यावेळी जगन्नियंत्याच्या स्वरूपाचे चिंतन करू लागतो, त्यावेळी त्याच्या अधिकारभेदानुसार त्याच्या उपासनेचा स्तर बदलतो.
 
अपरा पूजा, परापरा पूजा आणि परा पूजा, हे ते तीन स्तर आहेत. प्रारंभी साधकाला मूर्ती, यंत्र, मंत्र, उपचार आणि बाह्य कर्मकांड आवश्यक असते, ही अपरा पूजा. येथे देव आणि भक्त वेगळे आहेत; मी उपासक आणि ती माझी उपास्य भगवती असाच द्वैतभाव असतो. साधना अधिक अंतर्मुख झाली की, बाह्य उपचारांचे रूपांतर अंतःकरणातील ध्यानात होते. भगवती बाहेरील मंदिरातच नसून, आपल्या चित्तात प्रतिष्ठित आहे, अशी अनुभूती दृढ होऊ लागते. ही परापरा अवस्थेकडे जाणारी वाट आहे. यात द्वैत अजून पूर्णतः संपलेले नसते; परंतु त्याची भिंत पातळ होते आणि अखेरीस साधकाच्या अंतःकरणातून भेदाची कल्पनाच विरघळते. उपासक, उपासना आणि उपास्य ही त्रिपुटी लय पावू लागते. मी भगवतीची पूजा करतो, या भावाच्या पलीकडे जाऊन सर्वत्र तेच एक चैतन्य आहे, अशी अनुभूती उदयास येते. ही परा पूजेची स्थिती आहे. सूर्य उगवण्यापूर्वी अंधारात विविध आकृत्या वेगवेगळ्या भासतात; प्रकाश वाढू लागला की भ्रम कमी होतो आणि पूर्ण सूर्योदय झाल्यावर अंधारातून निर्माण झालेले सारे भेदाभास नाहीसे होतात.
 
हा श्लोक केवळ भगवतीच्या पातिव्रत्यामुळे शिव अमर राहतो, हे सांगत नाही; तर ब्रह्मा लय पावतो, विष्णू विराम पावतो, यम नष्ट होतो, कुबेराचे ऐश्वर्य संपते आणि इंद्राचे साम्राज्यही मिटते; कारण ही सारी कार्यरूप तत्त्वे आहेत. पण कार्याच्या पाठीमागे असलेले कारणरूप शिवशक्तीतत्त्व शिल्लक राहते. आपण आयुष्यभर ज्या गोष्टींना शाश्वत समजतो, पद, पैसा, सत्ता, सौंदर्य, शरीर, प्रतिष्ठा त्या सर्वांचा एक दिवस लय होणार आहे. महासंहाराची वाट पाहण्याचीही आवश्यकता नाही; प्रत्येक मनुष्याच्या जीवनात छोटे छोटे प्रलय सतत घडतच असतात. बालपण संपते, तारुण्य संपते, नाती बदलतात, वैभव येते-जाते, शरीर क्षीण होते. पण या सर्व बदलांकडे पाहणारे अंतःस्थ चैतन्य कोणते? त्या चैतन्याचा शोध घेणे, हीच साधना आहे. बाह्य विश्वाच्या लयाचे वर्णन करता करता, आचार्य आपल्याला आपल्या अंतर्मनातील लयाकडे घेऊन जातात. अहंकाराचा लय, भेदबुद्धीचा लय, नामरूपांच्या आसक्तीचा लय आणि शेवटी साधक-साध्य या द्वैताचाही लय, हा साधकाचा व्यक्तिगत महासंहार आहे. आणि जेव्हा हे सर्व विलीन होते, त्यावेळी चिरंतन असे शिवशक्तीचे अखंड, अविनाशी, आनंदमय परम् तत्त्व चित्तात प्रकट होते. म्हणूनच, या श्लोकातील सर्वांत मोठा आश्वासक संदेश असा आहे की, प्रलय हा शेवट नाही. रूपांचा अंत होतो; परम् तत्त्वाचा नाही. विश्व मिटते; परंतु विश्वाला पुन्हा जन्म देणारी शक्ती मिटत नाही आणि जिथे शक्ती आहे, तिथे शिव आहे; जिथे शिव आहे, तिथे पुन्हा सृष्टीच्या उदयाची अनंत शयताही आहे.
 
सुजीत भोगले
९३७००४३९०१




संबंधित मजकूर