काही व्यक्ती अशी असतात जी आपल्या नावापेक्षा आपल्या कार्यामुळे ओळखली जातात. त्यांचे घर हे केवळ चार भिंतींचे घर नसते; ते विचारांचे केंद्र, कार्यकर्त्यांचे आश्रयस्थान आणि समाजाला दिशा देणारे संस्कारपीठ बनते. मालवण मधील असेच एक व्यक्तिमत्त्व म्हणजे कै. प्रताप केनवडेकर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यात आयुष्य झोकून देणाऱ्या या कार्यकर्त्याने संघटन, समरसता, सेवाभाव आणि लोकसंग्रह यांचे सुंदर दर्शन आपल्या जीवनातून घडवले.
केनवडेकर घराणे सावंतवाडीतील कट्टर काँग्रेस विचारांचे म्हणून परिचित होते. मात्र घरातील बाप्पा केनवडेकर यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघात प्रवेश केल्यानंतर या घराची वाटचाल नव्या दिशेने सुरू झाली. पुढे हे घर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील संघ परिवाराचे केंद्र बनले. याच वातावरणात प्रतापराव घडले. संघाच्या शाखेतील संस्कार त्यांच्या व्यक्तिमत्त्वात बालपणापासून रुजले. घरात येणारे प्रचारक, कार्यकर्ते, बैठका, चर्चा यांतून संघकार्य त्यांच्यासाठी वेगळे नव्हते; तेच त्यांचे जीवन बनले.
१९७५ ते १९७७ च्या आणीबाणीच्या काळात संघावर बंदी आली. अनेक प्रचारक आणि कार्यकर्ते भूमिगत झाले. अशा वेळी कोलगाव येथील केनवडेकरांच्या शेतमाळावर अनेक कार्यकर्त्यांना गुप्तपणे आश्रय देण्यात आला त्या काळात प्रतापरावांच्या मातोश्रींनी दाखवलेला त्याग विशेष स्मरणीय आहे. सावंतवाडीहून कोलगावपर्यंत चार-पाच किलोमीटर पायी चालत त्या सहा-सात कार्यकर्त्यांचे जेवण डोक्यावरून पोहोचवत असत. त्या माऊलीचा हा निःशब्द त्याग प्रतापरावांच्या आयुष्यभराच्या सेवाभावाचा पाया ठरला.
पाच बहिणी आणि सहा भाऊ अशा मोठ्या कुटुंबातील प्रतापराव तिसरे. मेहनत, शिस्त आणि कष्ट हे त्यांचे जन्मजात गुण होते. १९४४ मध्ये जन्मलेल्या प्रतापरावांनी मॅट्रिकनंतर १९६० च्या सुमारास मालवण गाठले. मोठ्या भावाच्या चप्पल दुकानात काम सुरू झाले. आर्थिक परिस्थिती अत्यंत कठीण होती. सावंतवाडीतून आणलेल्या चपात्या आठ-आठ दिवस गरम करून खाण्याची वेळ येत असे. परंतु या संघर्षातही संघकार्य कधी थांबले नाही. मालवणात त्यांचे नातेवाईक नव्हते; पण संघ परिवार त्यांचे खरे कुटुंब बनत होता. कै. राजाभाऊ भोसले, कै. ॲड. तात्यासाहेब पाटकर आणि कै. अॅड. भाईसाहेब खांडाळेकर यांसारख्या ज्येष्ठ कार्यकर्त्यांचे मार्गदर्शन त्यांना लाभले.
प्रतापरावांचे व्यक्तिमत्त्व समरसतेच्या विचाराचे जिवंत प्रतीक होते. जात लपवण्याचा प्रश्नच नव्हता. उलट ते अभिमानाने म्हणत, 'मी चर्मकार आहे.' १९८४ मध्ये शृंगेरीच्या श्री शंकराचार्यांच्या सिंधुदुर्ग दौऱ्यात स्वागत समितीत प्रतापराव सहभागी होते. पाद्यपूजा करण्यापूर्वी त्यांनी स्वतःची जात स्पष्ट सांगितली. त्यावर आचार्यांनी प्रेमाने पूजा स्वीकारली आणि त्यांना यज्ञोपवीत प्रदान केले. प्रतापरावांनी ते आयुष्यभर अभिमानाने धारण केले. ही घटना सामाजिक समरसतेच्या त्यांच्या विचारांची जणू साक्षच ठरली.
प्रतापरावांची शाखा म्हणजे आनंदाचा उत्सव असे. लहान मुलांमध्ये मिसळताना ते स्वतःच मूल बनून जात. गाणी गात, उड्या मारत, खेळत मुलांशी संवाद साधत. त्यामुळे शाखेत येणाऱ्या बाल आणि शिशु स्वयंसेवकांना त्यांच्याशी विशेष आपलेपणा वाटत असे. त्यांचा विनोदही आगळा होता. गप्पांच्या मैफलीत ते हसत म्हणत, 'हे गजानन मालंडकर जसे दैवज्ञ ब्राह्मण, तसे आम्ही चर्मज्ञ ब्राह्मण.' त्यांच्या या सहज विनोदातूनही समरसतेचा संदेश प्रकट होत असे.
प्रतापरावांच्या लोकसंग्रहाची मोठी ताकद म्हणजे विश्वास. संघाच्या कामासाठी त्यांनी कोणाकडून एखादी वस्तू मागितली, तर ती मिळणारच. कारण ती वस्तू पुन्हा व्यवस्थित परत येईल याची सर्वांना खात्री असायची. त्यांचे घर हे जणू संघाचे कार्यालयच होते. प्रचारकांचे निवासस्थान, कार्यकर्त्यांचा निवारा आणि सतत सुरू असलेल्या बैठकींचे केंद्र. त्यांच्या पत्नीही राष्ट्र सेविका समितिच्या कार्यकर्त्या होत्या. त्यामुळे संपूर्ण कुटुंबच सेवाभावात सहभागी झाले होते.
पुण्यातील तळजाई येथे झालेल्या ३५ हजार स्वयंसेवकांच्या भव्य शिबिरात मालवणची ५६ जणांची तुकडी सहभागी झाली होती. ते शिबिर पाहून प्रतापरावांनी निर्धार केला; मालवण मध्येही असे भव्य शिबिर घडवायचे. दोन महिने अथक पायपीट, नवतरुणांशी संपर्क आणि सूक्ष्म नियोजन यांच्या जोरावर वायरीच्या रेकोबा पटांगणावर तीन दिवसांचे जिल्हास्तरीय 'एकहजारी' शिबिर यशस्वी झाले. हे त्यांच्या संघटनकौशल्याचे उत्तम उदाहरण ठरले.
'सघोष पथसंचलन' हा त्यांचा विशेष आवडीचा विषय होता. किशन पेडणेकर, मानसिंग लाटकर, पद्मनाभ झांठ्ये, शरद शेवडे, सुधाकर वंजारी, चकोर पाटील, प्रकाश कुडाळकर, संजू देसाई, श्रीकृष्ण जाधव, महेश वायंगणकर अशा विविध वयोगटांतील तरुणांना एकत्र करून त्यांनी प्रभावी घोषपथक उभे केले. संघाचा गणवेश, लाल उपवितक, हातात चमकणारा घोषदंड आणि तेजस्वी चेहरा; असे त्यांचे व्यक्तिमत्त्व आजही अनेकांच्या स्मरणात तितकेच जिवंत आहे. प्रतापरावांचे कार्य संघापुरते मर्यादित नव्हते. मालवण नागरी सहकारी पतपेढी, ग्राहक पंचायत, जिल्हा व्यापारी संघटना, सामाजिक समरसता मंच, विश्व हिंदू परिषद, शिवाजी वाचन मंदिर आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषद अशा अनेक संस्थांमध्ये त्यांनी विविध जबाबदाऱ्या समर्थपणे पार पाडल्या. त्यांच्या पायाला जणू चाक लागले होते. शहर, गाव आणि तालुकाभर ते सतत फिरत असत.
ज्यांनी संघाचे काम नेटके केले, त्यांनी स्वतःचा संसारही तितक्याच नेटकेपणाने उभा केला. थोरला मुलगा विजय याच्याकडे त्यांनी फूटवेअर व्यवसाय सोपवला. "ग्राहकांचे समाधान आणि विश्वास हेच आमचे समाधान" हे ब्रीद आजही त्या व्यवसायाची ओळख आहे. धाकटा मुलगा विद्याधर (बंटी) याच्यासाठी 'अंबिका कॉम्प्युटर ट्रेनिंग सेंटर' उभे केले. तो पुढे पत्रकारितेतही सक्रिय झाला. मोठी मुलगी डॉक्टर झाली, तर धाकट्या मुलीने बी.ए.-बी.एड. पूर्ण केले. समाजकार्याची परंपरा संपूर्ण कुटुंबाने पुढे नेली.
दि. २८ ऑगस्ट २००३ रोजी प्रतापरावांनी या जगाचा निरोप घेतला. मात्र त्यांनी मागे ठेवलेले कार्य आजही अनेकांच्या मनात जिवंत आहे. संघटन उभारणे, माणसे जोडणे, समरसतेने जगणे आणि सेवेला जीवनाचे ध्येय मानणे या मूल्यांचा वारसा त्यांनी पुढील पिढ्यांना दिला. कै. प्रताप केनवडेकर यांचे संपूर्ण आयुष्य हे राष्ट्रकार्य, समाजसेवा आणि संघसंस्कार यांची अविस्मरणीय गाथा आहे. म्हणूनच सिंधुदुर्गच्या संघकार्याच्या इतिहासात त्यांचे नाव सदैव आदराने आणि कृतज्ञतेने स्मरणात राहील.