संघकार्याला जीवनध्येय मानणारा ध्येयनिष्ठ स्वयंसेवक

    10-Sep-2026   
 
Pandurang Shirgaonkar
 
शाखेतील संस्कारांचे समाजजीवनात रूपांतर करणाऱ्या स्वयंसेवकांची परंपरा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यात दिसून येते. या परंपरेतील एक ध्येयनिष्ठ नाव म्हणजे कै. पांडुरंग गोविंद शिरगांवकर. संघकार्य हेच जीवनध्येय मानून त्यांनी केलेली अखंड भ्रमंती, कार्यकर्त्यांशी जोडलेले जिव्हाळ्याचे नाते आणि गुहागरच्या ७८ गावांपर्यंत पोहोचवलेला संघसंपर्क त्यांच्या समर्पित जीवनाची साक्ष देतो.
 
गुहागर तालुक्यातील विसापूर या गावी २३ ऑगस्ट १९१८ रोजी कै. पांडुरंग गोविंद शिरगांवकर, म्हणजेच प्रेमाने ओळखले जाणारे दादा, यांचा जन्म झाला. दादा दीड वर्षांचे असताना त्यांचे वडील निवर्तले आणि आई विसापूर सोडून पालशेतला आपल्या माहेरी आली. त्यामुळे दादांचे लहानपण पालशेतमध्ये गेले. घरची परिस्थिती प्रतिकूल असतानाही शिक्षणाची जिद्द त्यांनी सोडली नाही. सातवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर मुंबईत डॉक्टरांकडे कंपाऊंडर म्हणून काम करत त्यांनी मॅट्रिकचे शिक्षण पूर्ण केले. याच मुंबई वास्तव्यात गिरगावातील संघकार्यकर्ते वाकणकर यांच्या परिचयातून दादांचा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंध आला आणि त्यांच्या आयुष्याला नवी दिशा मिळाली.
 
मुंबईत सुरुवातीला त्यांनी भागीदारीत गॅरेज घेऊन वाहन व्यवसाय सुरू केला. त्यानंतर क्रॉफर्ड मार्केटमध्ये मटण आणि माशांचे टिन पॅकिंग करण्याचा कॅनिंग व्यवसाय सुरू केला. हा व्यवसाय सुरळीत सुरू राहिला असता तर त्यांचे आयुष्य आर्थिकदृष्ट्या संपन्न झाले असते. मात्र नियतीने त्यांच्या आयुष्याची दिशा वेगळीच ठरवली. महात्मा गांधी यांच्या हत्येनंतर निर्माण झालेल्या जनक्षोभात संघकार्यकर्त्याचे दुकान म्हणून क्रॉफर्ड मार्केटमधील त्यांच्या दुकानाची तोडफोड करण्यात आली. त्यामुळे त्यांनी मुंबई सोडून पालशेतची वाट धरली. पालशेतमध्ये त्यांनी आपल्या मामाच्या पेढीवर काम करण्यास सुरुवात केली. मात्र व्यवसाय कोणताही असो, संघाशी असलेले त्यांचे नाते कधीही तुटले नाही.
 
दादांचे संघकार्य वाढत गेले. संघाचे कार्यकर्तेही सातत्याने त्यांच्या घरी येत असत. त्यामुळे घराला नियमित आर्थिक उत्पन्न मिळावे, यासाठी त्यांच्या पत्नी जयश्री वहिनींनी दुकानाची जबाबदारी स्वीकारली. काटकसरीने, शिस्तीने आणि कोणतीही तक्रार न करता त्यांनी संसाराचा गाडा समर्थपणे चालवला. पुढे पालशेत बाजारपेठेत दादांचे स्वतःचे दुकान उभे राहिले. मात्र दादांनी आपला बहुतांश वेळ संघकार्यासाठी दिल्याने कुटुंबाची आर्थिक आणि सांसारिक जबाबदारी जयश्री वहिनींनी समर्थपणे सांभाळली. म्हणूनच दादा केवळ संघाचे झाले नाहीत, तर त्यांचे घरही संघाचे झाले. दादांना रंजना, रोशन, दीपक, ज्योती आणि प्रशांत अशी पाच मुले झाली. पुढे दीपक आणि प्रशांत यांनी संघकार्याची परंपरा पुढे नेली. नातवंडे प्रणव आणि अथर्व यांनीही संघकार्य स्वीकारले. एका स्वयंसेवकाच्या घराला संघपरिवाराचे स्वरूप देण्यात जयश्री वहिनींचा सिंहाचा वाटा होता.
 
पालशेतमध्ये दादा नित्य संघकार्य करीत होते. प्रेमजी आसर यांच्या संपर्कामुळे काही काळ त्यांनी जनसंघाचेही काम केले. मात्र राजकारणात रमण्याचा त्यांचा स्वभाव नव्हता. संघकार्य हेच आपल्या आयुष्याचे ध्येय आहे, अशी त्यांची स्पष्ट भूमिका होती. पालशेतमध्ये त्या काळात तीन शाखा लागत असत. प्रत्येक शाखेत सुमारे ५० ते ६० तरुण सहभागी होत. संघाच्या उत्सवांच्या वेळी तर २५० हून अधिक तरुणांची उपस्थिती असायची. दादा, केशवकाका भावे, प्रमोदकाका सैतवडेकर, शशिनाना बिर्जे आणि अन्य कार्यकर्त्यांनी पालशेतमध्ये संघकार्याची अशी भक्कम पायाभरणी केली की गावातील जवळपास प्रत्येक घरापर्यंत संघाचा संपर्क पोहोचला.
 
१९७५ च्या आणीबाणीच्या काळात दादांनी संघनिष्ठेचा आणखी एक अध्याय लिहिला. आणीबाणीविरोधातील पहिल्या टप्प्यातील सत्याग्रहात त्यांना अटक झाली आणि तीन महिने रत्नागिरीच्या तुरुंगात राहावे लागले. तुरुंगातून सुटका करून भूमिगत होण्याची योजना दादा आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी आखली होती. मात्र त्याच काळात चिपळूणमधून सत्याग्रहासाठी अटक झालेल्या क्षमाताई थत्ते याही अशाच पद्धतीने भूमिगत झाल्याने पोलिसांना या योजनेची माहिती मिळाली आणि दादांचा प्रयत्न फसला. दादा आणि पद्माकर अप्पा निमकर यांची सुटका होताच पोलिसांनी त्यांना मिसा अंतर्गत पुन्हा अटक केली आणि नाशिकला रवाना केले. आणीबाणी संपल्यानंतर निवडणुका झाल्या आणि तब्बल १८ महिन्यांनी तुरुंगातून सुटून दादा गुहागरला परतले. या काळात त्यांच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती पूर्णपणे कोलमडली होती. मात्र संकटांनी त्यांच्या संघनिष्ठेला कधीही तडा जाऊ दिला नाही.
 
अण्णा दामले यांच्या निधनानंतर दादांवर गुहागर तालुका संघचालक म्हणून जबाबदारी आली. त्या काळातील परिस्थिती आजच्या तुलनेत अत्यंत वेगळी होती. संध्याकाळी दुकान बंद केल्यानंतर कंदील किंवा बत्ती घेऊन ते गावाबाहेर पडत. नियोजित ठिकाणी मुक्काम करीत आणि दुसऱ्या दिवशी पहाटे पुन्हा गावाची वाट धरत. त्या वेळी तालुक्यात केवळ तीन-चार गावांमध्ये शाखा लागत होत्या. तरीही तालुक्यातील जवळपास प्रत्येक गावातील दोन-चार घरांशी त्यांचा वैयक्तिक संपर्क होता. कार्यकर्त्यांशी केवळ संपर्क नव्हे, तर घरातील चुलीपर्यंत पोहोचलेले आपलेपण हे त्यांच्या कार्याचे वैशिष्ट्य होते.
 
तळजाईच्या शिबिराच्या वेळी दादांनी एक ध्येय निश्चित केले; गुहागर तालुक्यातून विविध समाजघटकांतील १०० जण शिबिराला गेलेच पाहिजेत. “जास्तीत जास्त लोकांना संघदर्शन झाले तरच तालुक्यातील संघकार्य वाढेल,” हा त्यांचा ठाम विश्वास होता. हे ध्येय पूर्ण करण्यासाठी त्यांनी संपूर्ण तालुका अक्षरशः पिंजून काढला. पायाला भिंगरी लावल्यासारखे ते गावोगावी फिरले आणि अखेर १०० स्वयंसेवकांना शिबिरासाठी घेऊन जाण्याचे उद्दिष्ट साध्य केले.
 
गुहागर तालुक्यातील सर्व ७८ गावांमध्ये रक्षाबंधन आणि मकरसंक्रांतीचे उत्सव घेण्याचे अभियान ही दादांची कल्पना होती. कार्यकर्त्यांनी त्यानुसार नियोजन केले आणि तालुक्यातील प्रत्येक गाव संघसंपर्कात आणण्याचे काम केले. शाखांची संख्या मर्यादित असतानाही गावोगावी संपर्क, उत्सव आणि सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून संघाचा विचार समाजाच्या विविध घटकांपर्यंत पोहोचवण्याचे कार्य दादांनी केले. आयुष्यभर संघर्ष, प्रतिकूल परिस्थिती आणि जबाबदाऱ्या असूनही दादांनी संघकार्याची वाट सोडली नाही. स्वतःच्या सुखसोयींपेक्षा संघकार्याला आणि समाजकार्यास प्राधान्य देणे, कार्यकर्त्यांशी जिव्हाळ्याचे संबंध निर्माण करणे आणि गावोगावी प्रत्यक्ष संपर्कातून संघकार्य वाढवणे ही त्यांच्या कार्यपद्धतीची वैशिष्ट्ये होती.
 
दि. २७ ऑक्टोबर २००७ रोजी दादांचे निधन झाले. त्यांच्या निधनानंतरही त्यांच्या कार्याची आठवण गुहागर तालुक्यातील स्वयंसेवकांच्या मनात कायम राहिली. दहाव्या दिवशी त्यांच्या पिंडाला कावळा शिवत नव्हता, अशी आठवण त्यांच्या सहकाऱ्यांनी सांगितली आहे. त्या वेळी तत्कालीन जिल्हा संघचालक राजनभाई दळी यांनी संकल्प व्यक्त केला—“दादा, आम्ही पुन्हा तालुक्यातील संघकार्याला वैभव प्राप्त करून देऊ. तालुक्यात किमान दहा शाखा उभ्या करू.” त्यानंतर कावळा पिंडाला शिवल्याची ही आठवण आजही कार्यकर्त्यांच्या मनात दादांच्या संघनिष्ठेचे प्रतीक म्हणून जिवंत आहे. कै. पांडुरंग गोविंद शिरगांवकर यांचे जीवन म्हणजे परिस्थितीशी संघर्ष करत संघसंस्कार स्वीकारलेल्या एका स्वयंसेवकाने आपले संपूर्ण जीवन संघकार्याला समर्पित करण्याची प्रेरणादायी गाथा आहे. त्यांनी उभारलेले कार्य, घडवलेले कार्यकर्ते आणि निर्माण केलेला संघपरिवार हाच त्यांच्या जीवनाचा खरा वारसा आहे.
 




ओंकार मुळ्ये

'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक
संबंधित मजकूर