दि. ७ ऑक्टोबर रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जनसेवेची २५ वर्षे पूर्ण होणार आहेत. नरेंद्र मोदी यांच्या या प्रेरणादायी प्रवासाच्या निमित्ताने त्यांच्या जन्मदिवसापासून म्हणजेच, दि. १७ सप्टेंबरपासून ते दि. १७ ऑक्टोबरपर्यंत भाजपतर्फे ‘सेवा संकल्प अभियान’ आयोजित करण्यात येणार आहे. त्यानिमित्ताने मोदी सरकारच्या विराट कामगिरीचा आढावा घेणारा हा लेख...
गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून सार्वजनिक जीवनाला सुरुवात करून, पंतप्रधान म्हणून जनसेवा करताना नरेंद्र मोदी यांच्या या प्रवासाला दि. ७ ऑक्टोबर रोजी २५ वर्षे पूर्ण होत आहेत. दि. ७ ऑक्टोबर २००१ रोजी त्यांनी गुजरातच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती. देशात अनेक नेत्यांनी दीर्घकाळ मुख्यमंत्री किंवा पंतप्रधान म्हणून सत्तेची जबाबदारी सांभाळली आहे. स्वातंत्र्यानंतर देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू १६ वर्षे २८६ दिवस या पदावर होते. सिक्कीमचे मुख्यमंत्री पवनकुमार चामलिंग यांनी २४ वर्षे १६५ दिवस सिक्कीमची सत्ता सांभाळली, तर नवीन पटनायक २४ वर्षे ९८ दिवस ओडिशाचे मुख्यमंत्री राहिले. मात्र, मुख्यमंत्री आणि पंतप्रधान या दोन्ही पदांवर राहून सर्वाधिक काळ देशसेवा करण्याचा मान नरेंद्र मोदी यांना मिळणार आहे. दि. ७ ऑक्टोबर रोजी जनसेवेची २५ वर्षे पूर्ण करणारे ते देशातील पहिलेच नेते ठरणार आहेत. गुजरातमधील वडनगरसारख्या छोट्या शहरातून आणि एका गरीब कुटुंबातून पुढे येत, देशाच्या आणि जगाच्या राजकारणावर प्रभाव निर्माण करणार्या नरेंद्र मोदी यांचा हा प्रवास जनसहभाग, सेवाव्रत, सांस्कृतिक पुनर्जागरण आणि जीवनातील उच्च आदर्शांनी प्रेरित करणारा आहे. प्रचंड जनसमर्थन मिळूनही, सर्वाधिक विरोधाचा सामना करणारे ते एकमेव नेते आहेत. समाजसंघटनेच्या कार्यासाठी घराचा त्याग, १९७४च्या गुजरातमधील विद्यार्थी आंदोलनातील सहभाग आणि आणीबाणीच्या विरोधात समाज-जागरणासाठी केलेले भूमिगत आंदोलन, अशा टप्प्यांतून नरेंद्र मोदी यांच्या या प्रवासाची सुरुवात झाली. भारतीय जनता पक्षाने नरेंद्र मोदी यांच्या या प्रेरणादायी प्रवासाच्या निमित्ताने त्यांच्या जन्मदिवसापासून म्हणजेच, दि. १७ सप्टेंबरपासून दि. १७ ऑक्टोबरपर्यंत ‘सेवा संकल्प अभियान’ आयोजित करण्याचा निर्णय घेतला असून, या अभियानाच्या माध्यमातून समाजसेवेचा संकल्प करण्यात येणार आहे.
जगातील सर्व विकसित देशांनी आपल्या जनतेसमोर देशाला महान बनविण्याचे ध्येय ठेवले आणि ते साध्य करण्यासाठी जनतेलाही या ध्येयपूर्तीसाठी आवाहनही केले. अमेरिकेने ‘ग्रेट सोसायटी’च्या माध्यमातून गरिबी निर्मूलन आणि वांशिक समानतेचे उद्दिष्ट ठेवले, तर चीनची ‘टू सेंच्युरी गोल्स’ ही द्विशताब्दी उद्दिष्टेही सर्वश्रुत आहेत. आपल्या देशात मात्र यापूर्वीच्या राजकीय नेतृत्वाने जनतेसमोर असे कोणतेही व्यापक ध्येय ठेवले नाही. त्यामुळे आपण एका निश्चित ध्येयाविना आणि अनेक संकुचित चौकटींमध्ये जीवन जगत राहिलो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मात्र देशवासीयांसमोर एक व्यापक आणि महत्त्वाकांक्षी ध्येय ठेवले. ते म्हणजे, स्वातंत्र्याच्या शताब्दीपर्यंत भारताला ‘विकसित भारत’ करण्याचे! गरिबी निर्मूलनापासून ‘आत्मनिर्भरते’पर्यंतच्या नऊ आयामांवर आधारलेले हे ध्येय, आता १४० कोटी देशवासीयांचे ध्येय झाले आहे.
आर्थिक साम्राज्यवादी शक्तींमधील संघर्षाची आज संपूर्ण जगाला जाणीव आहे. विविध प्रकारची युद्धेही आपण पाहात आहोत. अशा परिस्थितीत ‘विकसित भारत’ हे केवळ घोषवाय ठरू नये, तर ते प्रत्यक्षात साकार व्हावे, यासाठी भविष्याचा वेध घेणार्या पंतप्रधान मोदींनी प्रत्येक भारतीयाला ‘आत्मनिर्भरते’चा मंत्र दिला आहे. ‘विकसित भारता’चे ध्येय साध्य करण्यासाठी राबविल्या जात असलेल्या अनेक योजनांपैकी काही योजनांचा विशेष उल्लेख करावा लागेल. २०२५-२६ मध्ये ‘स्टार्टअप’चे एक सक्षम ‘नेटवर्क’ उभे राहिले आहे. सध्या देशात १४ हजार स्टार्टअप असून, त्यांपैकी १२० ‘युनिकॉर्न’ असणे, हा जागतिक विक्रमच आहे. या स्टार्टअपमुळे सुमारे २७ लाख तरुणांना रोजगार मिळत आहे. आर्थिक व्यवहारांसाठी भारताच्या डिजिटल पेमेंट प्रणाली ‘यूपीआय’चा वापर आता जगातील ११ देश करत आहेत. २०२५-२६ मध्ये या प्रणालीच्या माध्यमातून ३१४ लाख कोटी रुपयांचे व्यवहार झाले. त्याचप्रमाणे, संरक्षण क्षेत्रानेही संरक्षण साहित्याच्या निर्मितीत स्वदेशी तंत्रज्ञान आणि आत्मनिर्भरतेचा नवा विक्रम स्थापित केला आहे. भारताने सुमारे १०० देशांना ३८ हजार ४२४ कोटी रुपयांची संरक्षण सामग्री निर्यात केली आहे. म्हणजेच, आता संरक्षण क्षेत्रात भारत केवळ खरेदी करणारा देश राहिलेला नाही, तर इतर देशांना संरक्षण साहित्य निर्यात करणारा देश झाला आहे.
जगातील विकसित देशांच्या धर्तीवर भारताचाही पायाभूत विकास व्हावा, या संकल्पनेच्या दिशेने आपण ऐतिहासिक आणि धाडसी पावले उचलली आहेत. आज देशात ५ हजार ३६४ किलोमीटर लांबीचे ‘हायस्पीड कॉरिडोर’ आहेत. रेल्वेचे ९९ टक्के विद्युतीकरण पूर्ण झाले असून, रॅपिड रेल, हायड्रोजन रेल्वे आणि मेट्रोचे विस्तृत जाळे आज देशभर पसरले आहे. लवकरच ‘बुलेट ट्रेन’चे स्वप्नही साकार होताना आपण पाहणार आहोत. जगातील सर्वांत मोठा कमानीचा रेल्वेपूल म्हणून प्रसिद्ध असलेला ‘चिनाब रेल्वेपूल’ ही आज भारताच्या पायाभूत विकासाची ओळख आहे. भारताच्या सात बंदरांचा समावेश जगातील १०० उत्कृष्ट बंदरांमध्ये होतो. आज भारतातील रेल्वे, रेल्वे स्थानके, विमानतळ, बंदरे आणि महामार्ग यांची स्पर्धा जगातील पायाभूत सुविधांशी होताना दिसत आहे.
देशातील युवापिढी ‘विकसित भारत’च्या निर्मितीसाठी विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करणारी व्हावी, यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या भाषणांतून आणि निर्णयांतून सातत्याने आवाहन केले आहे. दि. २३ ऑगस्ट २०२३ रोजी ‘चांद्रयाना’ने चंद्राच्या दक्षिण ध्रुवाची मोहीम यशस्वी केल्यावर, भारत असा पराक्रम करणारा जगातील पहिलाच देश ठरला. सूर्याच्या अभ्यासासाठी स्वदेशी तंत्रज्ञानाच्या आधारे ‘आदित्य एल-१’ ही मोहीमही आपण पूर्ण केली. ‘गगनयान’च्या माध्यमातून मानवाला अंतराळात पाठविण्यासाठी स्वदेशी क्षमता ‘इस्रो’द्वारे विकसित करणेही उल्लेखनीयच. ‘आकाशातील डोळा’ म्हणून ओळखल्या जाणार्या ‘जीएसएलव्ही-एफ१७-ईओएस-०५’ या उपग्रहाच्या माध्यमातून आता नैसर्गिक आपत्तींची माहिती मिळवणे, विकासकामांना चालना देणे आणि सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजना करणेही शक्य झाले आहे. सध्या देशात ४४० अंतराळ स्टार्टअप कार्यरत आहेत. ‘क्वांटम मिशन’साठी ६ हजार ३.६५ कोटी रुपयांची तरतूदही करण्यात आली असून, आता आपण स्वदेशी ‘सेमीकंडटर’चीही निर्मिती करत आहोत. पंतप्रधान मोदी यांनी म्हटल्याप्रमाणे, भारत आता ‘चिप’पासून ‘शिप’पर्यंत उत्पादन देशात करत आहे. पूर्वी संशोधनाच्या क्षेत्रात आपण पुरेसे प्रयत्न न केल्यामुळे जगावर अवलंबून होतो. आज मात्र, संशोधनासाठी २ लाख ४४ हजार ७९८ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेचा म्हणजेच, ‘एआय’चा शिस्तबद्ध आणि योग्य वापर करण्याचाही संकल्प भारताने केला आहे. ‘भारत मंडपम’ येथे झालेल्या शिखर परिषदेत, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वांसाठी ‘एआय’ हा संदेश जगाला दिला होता.
गेल्या २५ वर्षांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रशासकीय क्षमता संपूर्ण देशाने अनुभवली. १९६१ मध्ये सुरू झालेल्या ‘सरदार सरोवर’ धरणाचे काम अनेक प्रकारच्या विरोधानंतरही त्यांनी पूर्णत्वास नेले. वस्तू आणि सेवा कर म्हणजेच, ‘जीएसटी’बाबत घेतलेला निर्णय त्यांच्या कुशल नेतृत्व क्षमतेचेच उदाहरण. २०१४ मध्ये ३.८ कोटी असलेली आयकरदात्यांची संख्या २०२३-२४ मध्ये वाढून, १२.१३ कोटी झाली. यामुळे २०१३-१४ मध्ये १०६.५७ लाख कोटी रुपये असलेली देशाची अर्थव्यवस्थाही, २०२५-२६ मध्ये ३३१ लाख कोटी रुपयांवर पोहोचली. थेट लाभ हस्तांतरणाच्या माध्यमातूनच देशाने ५.१४ लाख कोटी रुपयांची बचत केली. जगातील चौथ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था असलेला भारत, आता वेगाने तिसर्या क्रमांकाच्या दिशेने वाटचाल करत आहे.
जनसहभागातून उभारलेली जगातील सर्वांत उंच ‘भारतरत्न’ सरदार पटेल यांची प्रतिमा, हुतात्मा सैनिकांना समर्पित ‘वॉर मेमोरियल’ आणि नव्याने उभारलेली संसदेची नवी इमारत ही नरेंद्र मोदी यांच्या दृढ इच्छाशक्तीची प्रतीके आहेत.
आपल्या परराष्ट्र धोरणाच्या माध्यमातूनही आपला जगात गौरव वाढला आहे. आज जगभरातील लोक भारताकडे प्रभावशाली देशांच्या श्रेणीतील राष्ट्र म्हणूनच पाहतात. ‘राष्ट्रहित सर्वोपरी’ या आधारावरच आता आपण अमेरिकेबरोबर, तसेच रशियाबरोबर व्यापारविषयक चर्चा, जपानच्या सहकार्याने उत्पादन क्षेत्रात पुढे जात आहोत. चीनशी स्पर्धा करतानाच, ‘ग्लोबल साऊथ’चाही आवाज होत, त्याचे नेतृत्व करत आहोत. याचाच परिणाम म्हणून जगातील ३६ देशांनी त्यांच्या सर्वोच्च पुरस्कारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सन्मान केला. ‘जी-२०’च्या माध्यमातूनही आपण जगाच्या व्यासपीठावर भारताचा गौरव वाढवला आहे.
कठोर आणि अचूक निर्णय घेणे, ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यशैलीची विशेषतः! ‘तिहेरी तलाक’, ‘नोटबंदी’, ‘कलम ३७०’ रद्द करणे, ‘एअर स्ट्राईक’, ‘सर्जिकल स्ट्राईक’, ‘ऑपरेशन सिंदूर’, भारतीय न्याय संहिता लागू करणे आणि नक्षलवादापासून देशाला मुक्त करण्यासारखे देशहिताचे घेतलेले सर्व निर्णय, त्यांच्या दृढ संकल्पाची आठवण करून देतात.
देशातील जनता आणि संघटनेप्रति असलेली समर्पणाची भावना, हा नरेंद्र मोदी यांचा अतुलनीय गुण. आपले विचार समाजापर्यंत प्रभावीपणे पोहोचवणारे ते कुशल वक्ते आहेत; तसेच समोरच्या व्यक्तीचे म्हणणेही संयमाने ऐकून घेणे, हा त्यांच्यातील विलक्षण गुणही आहे. त्यांच्याविषयी असे म्हटले जाते की, गेल्या २५ वर्षांत त्यांनी एकही दिवस विश्रांती घेतलेली नाही. ही बाब त्यांच्यात दडलेल्या योद्ध्याचेच दर्शन घडवणारी ठरते. यासाठी त्यांनी आपल्या शरीर आणि मनालाही शिस्त लावण्याचे काम केले आहे. अर्थव्यवस्थेत महिलांचा सहभाग वाढविणे आणि त्यांना प्रतिष्ठा मिळवून देणे, अपंगांना ‘दिव्यांग’ ही सन्मानाची ओळख देणे, किन्नरांना समाजात प्रतिष्ठा मिळवून देणे, ‘सिकल सेल अॅनिमिया’पासून मुक्ती आणि ‘क्षयरोगमुक्त भारता’चा संकल्प, ही त्यांच्या संवेदनशीलतेची प्रमुख काही उदाहरणे. अमेरिकन विचारवंत जेम्स फ्रीमॅन लार्क यांनी म्हटले आहे की, "एक राजकारणी पुढील निवडणुकीचा विचार करतो; तर एक राजनेता पुढील पिढीचा विचार करतो.” याच सिद्धान्तानुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी समाजाला सक्रियपणे सहभागी करून घेण्यासाठी घेतलेले निर्णय आणि त्यांचे प्रेरणादायी आचरण भविष्यातील भारत घडविण्याचे कार्य करतील. ‘स्वच्छता अभियान’, ‘परीक्षा पे चर्चा’, ‘बेटी बचाओ-बेटी पढाओ’, ‘वेडिंग डेस्टिनेशन’च्या माध्यमातून भारतातच विवाह संस्कार करण्याचे आवाहन, खेळाडूंशी संवाद अशा त्यांच्या विविध उपक्रमांमुळेही, पुढील पिढीचा दृष्टिकोन बदलण्यास मदतच होईल. युवकांना व्यसनमुक्त आणि निरोगी ठेवण्यासाठी राबवण्यात आलेले ‘नशामुक्ती अभियान’, तसेच ‘एक पेड़ माँ के नाम’ हे पर्यावरणाच्या क्षेत्रातील उल्लेखनीय उपक्रम आहेत.
भारतीय संस्कृतीवर अगाध श्रद्धा ठेवत, तिचा सांस्कृतिक गौरव जगभरात प्रस्थापित करण्यात त्यांनी यश मिळवले आहे. याचाच उल्लेख त्यांनी ‘विकास भी, विरासत भी’ असा केला. परदेशांतून भारताच्या गौरवाचे प्रतीक असलेल्या ६५६ कलाकृती भारतात परत आणणे, बुद्ध सर्किट, श्रीराम मंदिराच्या निर्मितीतील अडथळे दूर करणे, शीख गुरूंच्या प्रकटोत्सवानिमित्त गुरुद्वारांना भेट देऊन लंगरमध्ये सहभागी होणे, शास्त्रीय भाषांना मान्यता देणे, तसेच ऐतिहासिक मंदिरे आणि धार्मिक परंपरांमध्ये उपस्थित राहण्यातूनच त्यांची श्रद्धा दिसून येते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संवेदनशील वर्तनामुळे, देशहितासाठी घेतलेल्या कठोर निर्णयांमुळे, भारताचा जागतिक गौरव वाढविण्याच्या प्रयत्नांमुळे, जनसहभागाच्या आधारावर विकास घडवून आणण्याच्या प्रयत्नातून, भविष्यातील भारत घडविण्यासाठी केलेल्या प्रयत्नांमुळे, देशवासीयांना त्यांच्या माध्यमातून आपल्या आकांक्षांची पूर्तता होताना दिसते आहे. ते १४० कोटी देशवासीयांच्या आशेचा किरण आहेत. ‘नरसेवेपासून नारायणसेवे’पर्यंतचा त्यांचा हा प्रवास म्हणजेच, ‘बिंदूपासून विराट’ असाच आहे. त्यांनी दिलेले ‘विकसित भारत’ हे लक्ष्य पूर्ण करण्यासाठी आपणही या प्रवासाचे सहभागी होण्याचा संकल्प केला पाहिजे.
शिवप्रकाश
(लेखक भाजपचे राष्ट्रीय सहसंघटन महामंत्री आहेत.)