मुंबई (Khade Hanuman Temple Ujjain) : उज्जैनमधील खडे हनुमान मंदिराच्या वादात अखेर प्रशासनाला जनभावनांपुढे नमते घ्यावे लागले आहे. संबंधित सर्व पक्षांची सहमती झाल्याशिवाय मूर्ती हटवण्यात येणार नाही, तसेच भाविकांच्या भावना आणि श्रद्धेचा पूर्ण आदर केला जाईल, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. यासंदर्भात प्रशासनाच्या वतीने नुकतेच अधिकृत निवेदनही जारी करण्यात आले. भाविक आणि विविध हिंदू संघटनांनी केलेल्या तीव्र विरोधानंतर प्रशासनाने मंदिर किंवा मूर्ती अन्य ठिकाणी स्थलांतरित करण्याचा कोणताही निर्णय संबंधित पक्षांच्या संमतीशिवाय घेतला जाणार नसल्याचे स्पष्ट केले.(Khade Hanuman Temple Ujjain)
उज्जैनमधील कंठाल चौक ते छत्री चौक मार्गाच्या रुंदीकरणाच्या कक्षेत खडे हनुमान मंदिर येत असल्याने मूर्ती हटवण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. मात्र, प्रशासनाला त्यात यश आले नाही. मागील आठवड्यात गुरुवारी रात्री ११ वाजल्यापासून महापालिका पथकाने मूर्ती स्थलांतरित करण्याची प्रक्रिया सुरू केली होती. मात्र, मूर्ती आपल्या जागेवरून हलवण्यात यश आले नाही. त्यानंतर पुरातत्त्व विभागाचे पथकही पाहणीसाठी दाखल झाले; परंतु त्यातूनही कोणताही तोडगा निघाला नाही. या पार्श्वभूमीवर भाविकांचा वाढता विरोध आणि जनभावना लक्षात घेऊन प्रशासनाने आता सहमतीशिवाय मूर्ती हटवली जाणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.(Khade Hanuman Temple Ujjain)
बुधवारी सकाळपासूनच खडे हनुमान मंदिरात भाविकांची मोठी गर्दी झाली होती. मंदिर परिसरात दर्शनासाठी लांबच लांब रांगा लागल्या होत्या. बजरंग दल, विश्व हिंदू परिषद यांसह विविध संघटनांच्या कार्यकर्त्यांनी मंदिरात हनुमान चालीसाचे पठण केले आणि मूर्ती याच ठिकाणी कायम ठेवण्याची मागणी केली. यावेळी सातत्याने 'हनुमानजींचा जयघोष' करण्यात आला. भाविकांनी प्रशासनाने त्यांच्या श्रद्धेशी खेळ करू नये आणि आस्थेचा आदर करावा, अशी मागणी केली. हनुमानजींची मूर्ती आपल्या जागेवरून हलत नसेल, तर प्रशासनाने हट्ट सोडून मंदिर याच ठिकाणी कायम ठेवावे, अशी भूमिका त्यांनी घेतली. त्यानंतर प्रशासनाने निवेदन जारी करून भाविकांच्या भावनांचा पूर्ण आदर केला जाईल, असे स्पष्ट केले.(Khade Hanuman Temple Ujjain)
आवाहन आखाड्याचे महामंडलेश्वर अतुलेजानंद महाराज आपल्या समर्थकांसह आणि गुरुकुलच्या विद्यार्थ्यांसह मंदिरात पोहोचले. गुरुकुलच्या विद्यार्थ्यांनी मूर्तीसमोर सामूहिक हनुमान चालीसाचे पठण केले. महामंडलेश्वर म्हणाले की, खडे हनुमान गेल्या २०० वर्षांपासून याच ठिकाणी आहेत आणि यापुढेही याच ठिकाणी राहतील. ज्यांना आपल्या कुटिल बुद्धीने प्रयत्न करायचे होते, त्यांनी ते करून पाहिले; मात्र हनुमानजींनीच त्याला उत्तर दिले आहे. सर्व यंत्रणा अपयशी ठरल्या असून इंजिनीअरिंगही अपयशी ठरले आहे. हनुमानजींनी आपले सामर्थ्य दाखवून दिले आहे. त्यामुळे मूर्तीला हात लावू नये आणि ती याच ठिकाणी ठेवावी, अशी आमची मागणी असल्याचे त्यांनी सांगितले.(Khade Hanuman Temple Ujjain)
काँग्रेसच्या दोन आमदारांकडूनही हनुमान चालीसा
काँग्रेसचे आमदार महेश परमार आणि दिनेश जैन बॉस हे शेकडो समर्थकांसह रॅलीच्या स्वरूपात खडे हनुमान मंदिरात पोहोचले. काँग्रेस कार्यकर्त्यांच्या हातात भगवे ध्वज होते. ढोल-ताशांच्या गजरात 'जय श्रीराम'च्या घोषणा देण्यात आल्या. दोन्ही आमदारांच्या नेतृत्वाखाली मंदिरात हनुमान चालीसाचे पठण करण्यात आले. काँग्रेस आमदार महेश परमार म्हणाले की, आम्ही खडे हनुमानाचे दर्शन घेतले असून हनुमान चालीसाचे पठण केले आहे. जनतेच्या धार्मिक भावनांचा आदर केला जावा आणि कोणाच्याही भावनांना ठेच पोहोचू नये, हीच आमची मागणी आहे. जनतेला मूर्ती हटवलेली नको आहे. विभागीय आयुक्त, पोलीस अधीक्षक, जिल्हाधिकारी आणि महापालिका आयुक्त हे सर्व अननुभवी अधिकारी असल्याची टीकाही त्यांनी केली. भावनांना ठेच पोहोचल्यास त्याचे अनिष्ट परिणाम होतात, असा दावा करत त्यांनी 'हनुमान अंश' चित्रपटाचा संदर्भ दिला.(Khade Hanuman Temple Ujjain)
जिल्हा प्रशासनाचे अधिकृत निवेदन
उज्जैनचे एसडीएम एल. एन. गर्ग यांनी प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, खडे हनुमानजींशी संबंधित विषयात प्रशासन सर्व भाविक आणि नागरिकांच्या भावना व श्रद्धेचा पूर्ण आदर करते. सर्व संबंधित पक्षांच्या भावना विचारात घेतल्याशिवाय कोणताही निर्णय किंवा पाऊल उचलले जाणार नाही. सिंहस्थ २०२८च्या विकासकामांना महत्त्व आहे; मात्र त्याचबरोबर उज्जैनची श्रद्धा आणि ऐतिहासिक वारसा जपणेही तितकेच महत्त्वाचे आहे. भाविक आणि तज्ज्ञांशी संवाद साधून सर्वसंमतीने तोडगा काढला जाईल, असे प्रशासनाने स्पष्ट केले.(Khade Hanuman Temple Ujjain)
जेसीबी-क्रेनच्या मदतीने हटवण्याचा प्रयत्न भ्रामक
जेसीबी आणि क्रेनच्या मदतीने हनुमानाची मूर्ती हटवण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा दावा सोशल मीडियावर प्रसारित होत असून, तो पूर्णपणे भ्रामक असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. तसेच हा दावा दिशाभूल करणारा असल्याचेही म्हटले आहे. तज्ज्ञांकडून वैज्ञानिक आणि तांत्रिक अहवाल प्राप्त होईपर्यंत मूर्ती हटवण्यासाठी कोणतेही खोदकाम अथवा अन्य प्रकारची कार्यवाही केली जाणार नसल्याचेही प्रशासनाने स्पष्ट केले. दरम्यान, मूर्तीची संरचनात्मक स्थिती तसेच जमिनीखाली ती किती खोलीपर्यंत आहे, याचा अभ्यास करण्यासाठी आयआयटी इंदूरच्या तज्ज्ञ पथकाने घटनास्थळी पाहणी केली. आधुनिक उपकरणांच्या साहाय्याने तज्ज्ञांनी मूर्ती आणि तिच्या आसपासच्या जमिनीची स्थिती तपासली. आता या पाहणीच्या अहवालाची प्रशासनाला प्रतीक्षा आहे. तज्ज्ञांचा अहवाल प्राप्त झाल्यानंतरच पुढील कार्यवाही करण्यात येणार असून, मूर्तीबाबत कोणताही निर्णय त्यानंतरच घेतला जाईल, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.(Khade Hanuman Temple Ujjain)
जेसीबी आणि क्रेनच्या मदतीने हनुमानाची मूर्ती हटवण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा दावा सोशल मीडियावर प्रसारित होत असून, तो पूर्णपणे भ्रामक असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. तसेच हा दावा दिशाभूल करणारा असल्याचेही म्हटले आहे. तज्ज्ञांकडून वैज्ञानिक आणि तांत्रिक अहवाल प्राप्त होईपर्यंत मूर्ती हटवण्यासाठी कोणतेही खोदकाम अथवा अन्य प्रकारची कार्यवाही केली जाणार नसल्याचेही प्रशासनाने स्पष्ट केले. दरम्यान, मूर्तीची संरचनात्मक स्थिती तसेच जमिनीखाली ती किती खोलीपर्यंत आहे, याचा अभ्यास करण्यासाठी आयआयटी इंदूरच्या तज्ज्ञ पथकाने घटनास्थळी पाहणी केली. आधुनिक उपकरणांच्या साहाय्याने तज्ज्ञांनी मूर्खी आणि तिच्या आसपासच्या जमिनीची स्थिती तपासली. आता या पाहणीच्या अहवालाची प्रशासनाला प्रतीक्षा आहे. तज्ज्ञांचा अहवाल प्राप्त झाल्यानंतरच पुढील कार्यवाही करण्यात येणार असून, मूर्तीबाबत कोणताही निर्णय त्यानंतरच घेतला जाईल, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.(Khade Hanuman Temple Ujjain)
'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक