आजारपणातही ज्यांच्या ओठी संघकार्याची तळमळ...

    10-Sep-2026   
 
 Jayant Purohit
 
प्रचारक होण्याची प्रखर इच्छा मनात असूनही कौटुंबिक जबाबदाऱ्यांमुळे जयंत पुरोहित यांनी गृहस्थाश्रम स्वीकारला. मात्र त्याग, शिस्त, नियोजन आणि समाजसंघटन ही प्रचारकाचीच जीवनमूल्ये त्यांनी आयुष्यभर जपली. रत्नागिरी जिल्ह्यात विश्व हिंदू परिषदेच्या कार्याला नवी दिशा देताना त्यांनी असंख्य कार्यकर्ते घडवले, वारकरी संप्रदायाशी सशक्त संवाद उभा केला आणि रामजन्मभूमी आंदोलनाला जनआंदोलनाचे स्वरूप देण्यासाठी अविरत परिश्रम घेतले. कॅन्सरसारख्या दुर्धर आजारातही ज्यांच्या ओठांवर कुटुंबापेक्षा कार्यकर्त्यांची आणि संघटनेचीच चिंता होती....
 
कपाळावर अष्टगंध, चेहऱ्यावर प्रसन्न हास्य, मजबूत बांधा आणि मनात अखंड हिंदुत्वकार्याची तळमळ हीच कै. जयंत मधुसूदन पुरोहित यांची खरी ओळख. काही व्यक्ती आपल्या कार्यामुळे, त्यागामुळे आणि कार्यकर्त्यांच्या मनात निर्माण केलेल्या विश्वासामुळे मोठ्या होतात. रत्नागिरी जिल्ह्यातील विश्व हिंदू परिषदेच्या कार्याचा पाया अधिक भक्कम करणाऱ्या अशाच स्वयंसेवकांपैकी एक म्हणजे जयंतराव पुरोहित.
 
रत्नागिरीतल्या संगमेश्वर तालुक्यातील कडवई या छोट्याशा खेड्यात एका शिक्षकाच्या घरी जयंतरावांचा जन्म झाला. साधेपणा, संस्कार आणि समाजाभिमुखता यांचे बाळकडू त्यांना घरातूनच मिळाले. शालेय शिक्षण पूर्ण झाल्यानंतर पुढील शिक्षणासाठी ते देवरुख आणि नंतर चिपळूण येथे आले. याच काळात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी त्यांचा परिचय झाला आणि तो पुढे आयुष्यभराच्या नात्यात बदलला. शाखेतून मिळालेली शिस्त, राष्ट्रभक्ती आणि संघटित कार्याची प्रेरणा त्यांनी मनापासून स्वीकारली. चिपळूणमधील त्यांची खोली तर अनेक स्वयंसेवक, मित्र आणि कार्यकर्त्यांच्या बैठकीचे ठिकाणच होते. त्यांच्या मागोमाग भावंडेही शिक्षणासाठी चिपळूणला आली. घराची जबाबदारी वाढत गेली, पण त्यांच्या मनातील संघकार्याची ओढ कधीच कमी झाली नाही.
 
शिक्षणानंतर त्यांना बँक ऑफ इंडियामध्ये नोकरी मिळाली. दिवसाचा वेळ नोकरीत जात असे, पण उरलेला प्रत्येक क्षण संघकार्यासाठीच राखून ठेवलेला असे. मनातून त्यांची तीव्र इच्छा संघाचा प्रचारक म्हणून पूर्णवेळ बाहेर पडण्याची होती. मात्र घरची परिस्थिती, भावंडांच्या शिक्षणाची जबाबदारी आणि कुटुंबाची गरज यामुळे त्यांनी स्वतःचे स्वप्न बाजूला ठेवले. प्रचारकाचा पोशाख धारण करता आला नाही, पण प्रचारकाचे जीवनमूल्य त्यांनी आयुष्यभर जगले. दि. ७ डिसेंबर १९८६ रोजी त्यांचा विवाह शुभांगी गद्रे यांच्याशी झाला. शुभांगीताईंनी विद्यार्थी परिषदेच्या पूर्णवेळ कार्यकर्ती म्हणून पूर्वी काम केलेले असल्यामुळे संघ, विद्यार्थी परिषद आणि विश्व हिंदू परिषद यांच्या कार्याची त्यांना सखोल जाण होती. यामुळे त्यांच्या संसारात संघकार्य अडथळा ठरले नाही; उलट तो संसार कार्याचा आधार बनला. दोघांचे आयुष्य समाजकार्यासाठी समर्पित झाले.
 
श्रीरामजन्मभूमी आंदोलनाच्या प्रारंभीच्या काळात जयंतरावांवर विश्व हिंदू परिषदेच्या रत्नागिरी जिल्हामंत्रिपदाची जबाबदारी आली. या जबाबदारीने त्यांच्या कार्याला नवी दिशा मिळाली. त्यांच्या कल्पकतेमुळे रामजन्मभूमी आंदोलनातील प्रत्येक कार्यक्रम जिल्हाभर उत्साहाने आणि मोठ्या सहभागाने पार पडला. केंद्र आणि प्रांतातून येणाऱ्या कार्यक्रमांबरोबरच ज्ञानेश्वर संजीवन सप्तशताब्दी वर्ष आणि तुकाराम महाराजांच्या ३०० व्या सदेह वैकुंठगमन वर्षानिमित्त त्यांनी जिल्हाभर व्यापक उपक्रम उभारले. त्यांच्यासाठी कार्यक्रम म्हणजे केवळ सभा नव्हती; प्रत्येक कार्यक्रम हा समाजाशी संपर्क साधण्याचा, नवीन कार्यकर्ते घडवण्याचा आणि हिंदू समाजाला एकत्र आणण्याचा प्रभावी माध्यम होता.
 
जयंतरावांकडून कार्यक्रम नियोजन शिकणे ही अनेक कार्यकर्त्यांसाठी एक शाळाच होती. एखादा उपक्रम आयोजित करताना अगदी छोट्या तपशीलापासून मोठ्या उद्दिष्टापर्यंत ते विचार करत असत. कोणत्या कार्यकर्त्याला कोणती जबाबदारी द्यावी, त्याची क्षमता काय आहे, त्यातून त्याचे व्यक्तिमत्त्व कसे फुलेल—याची त्यांना विलक्षण जाण होती. त्यांच्या नेतृत्वात अनेक कार्यकर्ते पुढे आले आणि जिल्ह्यात संघटन विस्ताराचे मजबूत जाळे निर्माण झाले. त्यांच्या कार्यकाळातील एक मोठी देणगी म्हणजे वारकरी संप्रदायात विश्व हिंदू परिषदेचे कार्य रुजवणे. कीर्तनकार, प्रवचनकारांचे मेळावे, कीर्तन कुलाचे उपक्रम, वारकरी बांधवांसाठी अल्प खर्चात हरिद्वार, ऋषिकेश आणि दिल्ली दर्शनाच्या यात्रा—या सर्व उपक्रमांमधून त्यांनी श्रद्धेला संघटनाशी जोडले. प्रत्येक यात्रेतून नवीन संपर्क, नवीन कार्यकर्ते आणि समाजजागरण घडावे, अशी त्यांची कार्यपद्धती होती.
 
कालांतराने कॅन्सरसारख्या दुर्धर आजाराने त्यांना ग्रासले. उपचार सुरू होते, शरीर साथ सोडत होते, पण मन अजूनही कार्यातच धावत होते. औषधांच्या गुंगीमध्येही त्यांच्या ओठांवर कुटुंबाची चिंता नव्हती. पत्नी, मुले यांच्यापेक्षा त्यांना आठवत होते ते विश्व हिंदू परिषदेचे कार्य, कार्यकर्त्यांचे संसार आणि संघटनाची वाटचाल. ही अवस्था त्यांच्या आयुष्याचे खरे सार सांगून जाते—स्वतःसाठी नव्हे, तर कार्यासाठी जगलेला स्वयंसेवक.
 
दि. २८ जानेवारी २०११ रोजी जयंतरावांनी अखेरचा श्वास घेतला. परंतु अशा स्वयंसेवकांचे निधन म्हणजे केवळ एका व्यक्तीचा अंत नसतो; ती एका संस्कारपरंपरेची प्रेरणा बनते. जयंतराव पुरोहित यांनी शिकवले की, संघकार्य हे पदावर अवलंबून नसते, तर वृत्तीवर अवलंबून असते. प्रचारक होण्याची इच्छा अपूर्ण राहिली, पण त्यांनी गृहस्थाश्रम स्विकारून जे कार्य उभे केले, ते अनेक पूर्णवेळ कार्यकर्त्यांनाही प्रेरणा देणारे आहे. त्यांचे कार्य सदैव स्मरणात राहील.




ओंकार मुळ्ये

'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक
संबंधित मजकूर