समर्पणाच्या समिधेतून प्रज्वललेला राष्ट्रदीप

    10-Sep-2026   
 
Jagannath Nanasaheb Bhave
 
व्यक्तीचा खरा गौरव पदात नसतो; तर समाजाच्या मनात निर्माण केलेल्या विश्वासात असतो. या विचाराचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ स्वयंसेवक, आदर्श शिक्षक, शिक्षणतज्ज्ञ आणि समाजजीवनात आपला अमिट ठसा उमटवणारे कै. जगन्नाथ तथा नानासाहेब भावे. संघसंस्कार, शिक्षणसेवा, राजकारणातील मूल्यनिष्ठ वाटचाल आणि कुटुंबवत्सल व्यक्तिमत्त्व या सर्वांचा सुंदर संगम त्यांच्या आयुष्यात दिसून येतो.
 
नानासाहेबांच्या आयुष्याची दिशा तरुणपणातच निश्चित झाली होती. विवाहापूर्वीच त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्याचा विडा उचलला. संघाच्या शाखेतून मिळालेली राष्ट्रभक्ती, शिस्त, समर्पण आणि समाजहिताची प्रेरणा त्यांनी आयुष्यभर जपली. त्यांचे वडील न्यायालयात नोकरी करत होते. १९२५ च्या सुमारास वेतोशी हे मूळ गाव सोडून संपूर्ण कुटुंब रत्नागिरीत स्थायिक झाले. आई सरस्वती या मालगुंडच्या केळकर घराण्यातील होत्या. अशा सुसंस्कारित वातावरणात नानांचे व्यक्तिमत्त्व घडत गेले आणि पुढे ते समाजासाठी जगणारे कार्यकर्ते बनले.
 
नानासाहेबांचे नाव रत्नागिरीतील शैक्षणिक क्षेत्राशी घट्ट जोडले गेले. त्यांनी केवळ शिक्षक म्हणून काम केले नाही, तर शिक्षणसंस्थांच्या उभारणीत आणि गुणवत्तावृद्धीत मोलाचे योगदान दिले. फाटक हायस्कूल ही त्यांच्यासाठी केवळ शाळा नव्हती; ते त्यांचे विस्तारित कुटुंब होते. शाळेच्या प्रगतीसाठी त्यांनी अथक परिश्रम घेतले. विद्यार्थीकेंद्रित, संस्कारक्षम आणि समाजाभिमुख शिक्षणव्यवस्था उभी करण्याचा त्यांचा ध्यास होता. त्यांच्या प्रयत्नांची दखल घेत भारत सरकारने १९७५ साली त्यांना राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित केले.
 
नानासाहेबांचा प्रवास रत्नागिरीपुरता मर्यादित राहिला नाही. कोल्हापुरातील वास्तव्यात शिवाजी विद्यापीठ हे त्यांच्या समाजकार्याचे महत्त्वाचे केंद्र बनले. ते विद्यापीठाच्या विधीसभेवर निवडून आले आणि कारभारात सक्रिय सहभाग घेत अनेक विधायक सुधारणा घडवून आणल्या. शिक्षणव्यवस्थेत पारदर्शकता, गुणवत्ता आणि समाजाभिमुख दृष्टिकोन रुजविण्यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले. कोल्हापुरात दादा पराडकर, तात्या तेंडुलकर, रामदासी, खाडेमामा, डॉ. प्रमोद पुरोहित, डॉ. अनिल पुरोहित, श्रीपादराव गोसावी, पंत कुलकर्णी यांसारख्या अनेक कुटुंबांशी त्यांनी आत्मीय संबंध जोडले. त्यांच्या सहज, स्नेहपूर्ण स्वभावामुळे ते अनेकांच्या घरातील सदस्यच बनून गेले.
 
नानासाहेबांचे कार्य केवळ त्यांच्यापुरते मर्यादित राहिले नाही; त्याचा प्रभाव संपूर्ण भावे कुटुंबावर पडला. त्यांचे बंधू विनायकराव (अण्णा) भावे यांनी कोल्हापुरात करसल्लागार म्हणून नाव कमावले. दुसरे बंधू विश्वनाथ भावे यांनी स्वतःचा व्यवसाय सांभाळतानाच रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्ह्यात भारतीय मजदूर संघाचे तब्बल पंधरा वर्षे कार्य केले. धाकटे बंधू डॉ. माधवराव भावे वैद्यकीय सेवेसोबतच सामाजिक प्रश्नांवर प्रभावी लेखन करत समाजप्रबोधन घडवत राहिले. घरातील संघसंस्कार आणि नानासाहेबांचे मार्गदर्शन या दोन्हींचा प्रत्येक भावाच्या कार्यावर ठसा उमटला.
 
१९६२ पासून नानासाहेबांचा सार्वजनिक जीवनातील नवा अध्याय सुरू झाला. आमदारकीच्या जबाबदाऱ्यांमुळे त्यांना घरासाठी कमी वेळ देता येत होता. त्या काळात त्यांच्या पत्नी मंगला भावे यांनी संपूर्ण कौटुंबिक जबाबदारी समर्थपणे सांभाळली. त्या स्वतःही जनसंघ, भगिनी मंडळ अशा विविध सामाजिक कार्यात सक्रिय राहिल्या. मात्र नियतीने मोठा आघात केला. गंभीर आजारामुळे वयाच्या अवघ्या चाळीसाव्या वर्षी त्यांचे निधन झाले. या कठीण काळात गंगाराम पटवर्धन, बापूसाहेब परुळेकर, सदुभाऊ दात्ये, वैद्य काका, वाळके काका, मुकुंदराव कुलकर्णी, बापूराव केतकर, शामराव पेजे आणि परशराम केळकर यांसारख्या अनेक स्नेहींनी भावे कुटुंबाला आधार दिला.
 
पत्नीचे अकाली निधन, आई-वडिलांची प्रकृती, स्वतःचे आजार आणि सार्वजनिक जबाबदाऱ्या अशा अनेक संकटांना सामोरे जात असतानाही नानासाहेबांनी कुटुंबप्रमुख म्हणून आपली जबाबदारी कधीच कमी पडू दिली नाही. स्नेहींच्या सल्ल्याने त्यांनी पुनर्विवाहाचा निर्णय घेतला. त्यांनी प्रत्येक कुटुंबीयाशी जिव्हाळ्याचे नाते निर्माण केले आणि दूरदृष्टीने सर्वांना स्थैर्य मिळवून दिले. आज त्यांच्या भावांची कार्यक्षेत्रातील प्रतिष्ठा ही त्यांच्या मार्गदर्शनाचीच साक्ष मानली जाते.
 
विधान परिषदेच्या कामकाजात असतानाही नानासाहेबांचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे माणसे जोडण्याची क्षमता. संघाच्या कार्यपद्धतीप्रमाणे त्यांनी व्यक्ती घडविण्यावर भर दिला. त्यांच्याकडे आलेली व्यक्ती केवळ परिचित राहत नसे; ती त्यांच्या स्नेहपरिवाराचा भाग बनत असे. दि. १ फेब्रुवारी १९८२ रोजी मालवण येथे या कर्तबगार, प्रेरणादायी व्यक्तिमत्त्वाची प्राणज्योत मालवली. परंतु त्यांनी रुजवलेले संघसंस्कार, शिक्षणसेवेची परंपरा आणि समाजाशी जोडलेली माणुसकी आजही अनेकांच्या स्मरणात जिवंत आहे.
 
नानासाहेब भावे यांनी संघाच्या स्वयंसेवकाचे जीवन कसे असावे याचा आदर्श घालून दिला—शाखेतील शिस्त, शिक्षकाची संवेदनशीलता, लोकप्रतिनिधीची उत्तरदायित्वाची भावना आणि कुटुंबप्रमुखाची जिव्हाळ्याची वृत्ती यांचा दुर्मिळ संगम त्यांच्या व्यक्तिमत्त्वात होता. म्हणूनच त्यांचे जीवन हे केवळ एका व्यक्तीचे चरित्र नाही; तर संघसंस्कारांनी घडलेल्या समाजपुरुषाचे प्रेरणादायी उदाहरण आहे.




ओंकार मुळ्ये

'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक
संबंधित मजकूर