श्रावण सरुन भाद्रपद आला की, वेध लागतात श्री गणरायांच्या आगमनाचे. घरामध्ये गणरायाची आरास करण्याची तयारी युद्धपातळीवर सुरु असताना, घरातील सुहासिनींची हरतालिका पूजनाची वेगळीच लगबग सुरु असल्याचे चित्र महाराष्ट्रभर दिसते. हे हरतालिका पूजन नेमके का करावे, त्या मागची कथा, गुढार्थ याचा मागोवा घेणारा हा लेख...
भाद्रपद शुल तृतीयेला केले जाणारे हरितालिका व्रत, स्त्रीजीवनाचा अत्यंत परिचित भाग. हरितालिका म्हटली की उपवास, शिव-पार्वतीची पूजा, कुमारिकेला इच्छित पती मिळण्याची कामना आणि विवाहित स्त्रीला अखंड सौभाग्य लाभण्याची प्रार्थना, एवढीच त्याची ओळख आपल्याला प्रामुख्याने करून दिली जाते. परंतु, धर्मशास्त्रीय व्रतपरंपरेतील कथा काळजीपूर्वक वाचली असता, तिच्यामध्ये केवळ ‘पतीसाठीच केलेले व्रत’ असे स्वरुप दिसत नाही. आपला जीवनसाथी कोण असावा याबद्दल स्वतः निर्णय घेत असलेली पार्वती, तिच्या निर्णयासाठी घर सोडण्यास मदत करणारी सखी, तिच्या संकल्पाला प्रतिसाद देणारे शिव आणि अखेरीस मुलीची निवड स्वीकारणारा पिता. थोडक्यात, प्राचीन काळात स्त्रीला स्वयंनिर्णयाचा अधिकार होता आणि तो समाजात खोलवर रुजलेलाही होता.
पर्वतराज हिमवानची कन्या पार्वती, बालवयापासूनच शिवाला पती म्हणून प्राप्त करण्याच्या संकल्पाने तप करीत होती. व्रतकथेतील तपाचे वर्णन अतिशय कठोर असेच आहे. आहारसंयम, पर्णाहार, उपवास, जल आणि अग्नी यांच्या सान्निध्यात केलेली तपश्चर्या या सर्वांचा उद्देश एकच, शिवप्राप्ती! हे तप दुसर्या कुणाच्या आज्ञेने नव्हे, तर पार्वतीच्या स्वतःच्या संकल्पातून सुरू झालेले आहे. त्यामुळे कथानकाच्या आरंभीपासूनच तिच्या व्यक्तिमत्त्वाचा मुख्य गुण ‘आज्ञाधारक कन्या’ नसून, ‘स्वतःच्या ध्येयाबद्दल निश्चयी तपस्विनी’ असाच दिसतो. दरम्यान, नारद हिमवानाकडे येतात आणि विष्णूंकडून पार्वतीसाठी विवाहप्रस्ताव असल्याचे सांगतात. हिमवान आनंदित होतो. यात त्याचा हेतू दुष्ट नाही. उलट, आपल्या मुलीसाठी सर्वोत्तम वर मिळाल्याचीच त्याची भावना असते. विष्णू हे कथेत कुठल्याही अर्थाने कनिष्ठ किंवा अयोग्य वर नाहीत. नेमका हा मुद्दाच हरितालिकेच्या कथेला असामान्य करतो. कारण, पार्वतीचा नकार हा वाईट वर नाकारण्याचा नाही; तो स्वतः निवडला नसलेला वर नाकारण्याचा नकार आहे. विष्णूंशी आपला विवाह निश्चित केला जात असल्याचे कळताच पार्वती व्यथित होते. तिची सखी तिच्या दुःखाचे कारण विचारते. पार्वती स्पष्टपणे सांगते की, तिने मनाने शिवालाच पती म्हणून स्वीकारले आहे. पित्याने दुसरा विवाह निश्चित केल्यामुळे, आपला संकल्प मोडणार ही तिची व्यथा आहे.
इथे हरितालिका कथेतील सर्वांत दुर्लक्षित पात्र प्रवेश करते ते म्हणजे ‘सखी!’ पार्वतीची सखी तिला ‘पित्याची आज्ञा मान’, ‘विष्णूंपेक्षा श्रेष्ठ वर कोण मिळणार?’ किंवा ‘कुटुंबाच्या प्रतिष्ठेचा विचार कर’ असे सांगत नाही. ती पार्वतीच्या स्वनिर्णयाच्या बाजूने उभी राहते आणि तिला निर्जन वनात घेऊन जाते. या घटनेवरूनच ‘हरितालिका’ या नावाची व्युत्पत्ती व्रतकथेत सांगितली आहे,
व्रतराजस्य नामेदं शृणु देवि यथा भवेत्|
आलिभिर्हरिता यस्मात्तस्मात्सा हरितालिका॥
अर्थात, हे देवी, या व्रतराजाचे नाव कसे पडले ते ऐक. ‘आलि’ म्हणजे सखी; सख्यांनी तुला ‘हरिता’ - हरण करून नेले, म्हणून हे व्रत ‘हरितालिका’ म्हणून प्रसिद्ध झाले. विविध उपलब्ध पाठांमध्ये श्लोकक्रम बदलतो; परंतु ही व्युत्पत्ती सातत्यानेच आढळते. या व्रताचे नाव शिवासाठी तप केले किंवा विवाहासाठी व्रत केले किंवा पित्याच्या संमतीसाठी व्रत केले, यांपैकी एकही संदर्भ येत नाही. पार्वतीच्या स्वनिर्णयाच्या रक्षणासाठी, तिच्या सखीने केलेल्या कृतीवर व्रताचे नाव पडले आहे. स्त्रीच्या आयुष्यातील ‘सखी’ या नात्याला, भारतीय व्रतपरंपरेने दिलेली ही विलक्षण प्रतिष्ठा आहे. वनात पार्वती शिवाची आराधना करते. उपलब्ध व्रतकथांमध्ये मृत्तिका किंवा वालुकामय शिवप्रतिमा तयार करून पूजन, उपवास आणि रात्रजागरणाचे वर्णन येते. पार्वतीची ही तपश्चर्या सफल होते. शिव प्रसन्न होऊन तिच्यासमोर प्रकट होतात आणि वर मागण्यास सांगतात. पार्वती आपल्या मूळ संकल्पाचीच पुनरावृत्ती करते, "तुम्ही माझे पती व्हावे.” शिव तिची ही इच्छा स्वीकारतात. पार्वतीची इच्छा प्रथम आहे; शिवाचा स्वीकार त्यानंतर आहे. हे नाते परस्पर संमतीतून उभे राहते.
पित्याला मात्र आपली मुलगी दिसत नसल्याने, प्रचंड चिंता होते. हिमवान तिचा शोध घेत वनात पोहोचतो, तेव्हा पार्वती आपली भूमिका त्याच्यासमोर स्पष्ट करते. वर्षकृत्यपरंपरेत जतन झालेल्या कथापाठात, तिचे शब्द अत्यंत बोलके आहेत,
तेन मां त्वं शिवायैव दातुमर्हसि नान्यथा|
अर्थात, म्हणून तुम्ही मला शिवालाच द्यावे, अन्यथा नाही. यानंतर,
तथेत्युत्वा हिमवता त्वमानीता गृहं प्रति|
हिमवान तिची अट मान्य करतो आणि तिला घरी घेऊन येतो. पुढे पित्याने शिवाशी तिचा विवाह लावून दिल्याचे कथेत स्पष्ट सांगितले आहे. येथे पिता मुलीवर आपले मत न लादता, तिची इच्छा समजून आपला पूर्वीचा निर्णय बदलतो.
व्रताच्या विधीकडे पाहिले, तरी त्याची एक व्यवस्थित धर्मशास्त्रीय रचनाही दिसते. काणे यांनी नोंदवलेल्या उत्तरकालीन निबंधपरंपरेनुसार, व्रतकर्तीने स्नान करून संकल्प करावा, उमा-महेश्वराला नमस्कार करावा आणि उमादेवीची षोडशोपचार पूजा करावी. आवाहन, आसन, पाद्य, अर्घ्य, गंध, पुष्प, धूप, दीप, नैवेद्य, तांबूल, दक्षिणा आणि निरांजन अशा उपचारांनी पूजा करण्याचे विधान आहे. उमादेवीच्या चरणांपासून मस्तकापर्यंत अंगपूजाही वर्णिली आहे. हरितालिका मूळतः केवळ ‘उपाशी राहण्याचा दिवस’ नाही. संकल्प, देवतापूजन, आत्मसंयम, कथा-श्रवण आणि शिव-पार्वतीच्या दाम्पत्य तत्त्वाचे चिंतन, असा त्याचा मोठाच धार्मिक पट आहे. आज अनेक ठिकाणी निर्जल उपवासाला इतके महत्त्व आले आहे की, जणू पाण्याचा थेंब घेतल्यास संपूर्ण व्रतच निष्फळ होते, अशी भीती निर्माण केली जाते! परंतु, धर्मशास्त्रीय व्रतपरंपरांमध्ये, आहारनियमांत भिन्नता आढळते.
परंतु हरितालिकेची कथा अंतःकरणातून वाचली, तर आपल्याला वेगळाच क्रम दिसतो. संकल्प पार्वतीचा, निवड पार्वतीची, तिच्या निवडीसाठी मदत सखीची, तप पार्वतीचे, तिच्या इच्छेला संमती शिवाची आणि अखेरीस त्या इच्छेचा स्वीकार पित्याचा. एखादा पुरुष जगाच्या दृष्टीने कितीही श्रेष्ठ असला, तरी जिच्याशी त्याचा विवाह होणार आहे, तिच्या मनाने तो स्वीकारलेला नसेल, तर तिच्यासाठी त्याचे श्रेष्ठत्व निर्णायक कसे ठरेल? हरितालिकेतील सखीचे स्थानदेखील, पुन्हा अधोरेखित करण्याची गरज आहे. आजच्या भाषेत तिला स्त्रियांच्या परस्पर आधारव्यवस्थेचे प्रतीक म्हणता येईल. पार्वतीचा आवाज दाबला जाऊ नये, म्हणून तिच्या बाजूने दुसरी स्त्री उभी राहते. आणि भारतीय परंपरेने त्या कृतीला इतके महत्त्व दिले की, त्याच घटनेवर संपूर्ण व्रताचे नाव ठेवले, ‘आलिभिर्हरिता यस्मात्तस्मात्सा हरितालिका|’
‘हरितालिका’ ही केवळ, ‘पतीसाठी पत्नीने केलेला उपवास’ म्हणून सांगणे अपुरे आहे. तिच्यामध्ये पातिव्रत्य आहेच; पण त्याआधी पतीची स्वेच्छेने केलेली निवडही आहे. तिच्यामध्ये सौभाग्याची कामना आहे; पण त्याआधी स्वतःच्या संकल्पासाठी केलेले तपही आहे. त्यात पित्याचा आशीर्वाद आहे; पण तो कन्येची इच्छा स्वीकारल्यानंतरच येतो. त्यात शिव-पार्वतीचे दाम्पत्य आहे; पण ते जबरदस्तीवर नव्हे, तर परस्पर स्वीकारावर उभे आहे.
म्हणूनच हरितालिकेच्या दिवशी पार्वतीसमोर बसताना, तिच्याकडे केवळ ‘पतीच्या दीर्घायुष्यासाठी व्रत करणार्या स्त्रीची देवता’ म्हणून पाहू नका. स्वतःचा पती स्वतः निवडणारी कन्या, आपल्या संकल्पासाठी कठोर तप करणारी साधिका, पित्यापुढे स्वतःची इच्छा स्पष्टपणे मांडणारी स्त्री आणि आपल्या निर्णयावर शेवटपर्यंत ठाम राहणारी शक्ती म्हणूनही तिच्याकडे पाहा. त्याचबरोबर तिच्या शेजारी असलेल्या सखीलाही विसरू नका. कारण, ‘हरितालिका’ या नावातच, या संपूर्ण व्रताचा विस्मृतीत गेलेला संदेश दडलेला आहे. स्त्रीच्या आयुष्यातील निर्णायक क्षणी, तिच्या इच्छेविरुद्ध उभे राहणारे समाजात अनेक असू शकतात; पण तिच्या योग्य संकल्पाच्या पाठीशी उभी राहणारी एक सखीही इतिहास घडवू शकते. हरितालिकेची कथा म्हणूनच संकल्पाची, सखीभावाची, संमतीची आणि स्वेच्छेने स्वीकारलेल्या दाम्पत्य जीवनााची कथा आहे.
- आसावरी पाटणकर