मुंबई : समाजासमोरील समस्या सोडविण्यासाठी वैज्ञानिक संशोधन आणि नवोन्मेष उपयोगी ठरले पाहिजे. केवळ प्रयोगशाळा आणि धनिबंधांपुरते ते मर्यादित राहता कामा नये.”असे प्रतिपादन राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी केले. रसायन तंत्रज्ञान संस्था (आयसीटी), माटुंगा, मुंबई येथे आयोजित हरित रसायनशास्त्र आणि शाश्वत अभियांत्रिकी विषयावरील आंतरराष्ट्रीय परिषदेला ते संबोधित करीत होते. ज्येष्ठ वैज्ञानिक प्रा. एम. लक्ष्मी कांतम यांच्या सन्मानार्थ रसायन तंत्रज्ञान संस्था, मुंबई आणि इंडियन केमिकल सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने या परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. “भारताच्या वेगाने विस्तारत असलेल्या उत्पादन आणि रसायन उद्योगांच्या पार्श्वभूमीवर, रसायन तंत्रज्ञान संस्था आणि इंडियन केमिकल सोसायटी यांसारख्या संस्थांनी भारताला हरित रसायनशास्त्र, उत्प्रेरण आणि शाश्वत रासायनिक अभियांत्रिकीचे जागतिक केंद्र बनविण्यासाठी योगदान द्यावे.” असे राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी सांगितले.
‘विज्ञान आणि समाज सप्ताह’ आयोजित करावा रसायन तंत्रज्ञान संस्थेने दरवर्षी ‘विज्ञान आणि समाज सप्ताह’ आयोजित करावा, अशी विशेष सूचना राज्यपालांनी केली. या सप्ताहादरम्यान संस्थेने नागरिक, महाविद्यालये आणि शाळांसाठी आपली दालने खुली करावीत आणि संस्थेत सुरू असलेले संशोधन व नवोन्मेष सोप्या भाषेत सर्वसामान्यांना समजावून सांगावेत, असे त्यांनी सांगितले.
विज्ञान क्षेत्रातील महिलांना नेतृत्वाच्या अधिक संधी द्याव्यात.
विज्ञान क्षेत्रात महिलांना अधिक संधी उपलब्ध करून देण्याची गरजही राज्यपालांनी अधोरेखित केली. परिषदेत १२ कर्तृत्ववान महिला वैज्ञानिकांचा गौरव करण्यात आल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. महिला वैज्ञानिकांना संशोधनातील नेतृत्व, विद्यापीठ प्रशासन, उद्योजकता तसेच उद्योग क्षेत्रातील सर्वोच्च स्तरापर्यंत पोहोचण्यासाठी संस्थांनी पोषक वातावरण निर्माण करावे, असे आवाहन राज्यपालांनी केले. रसायन अभियांत्रिकी क्षेत्राची प्रदूषणकारी उद्योग म्हणून बदनामी झाली असली, तरी प्रदूषणाच्या समस्येवर तोडगा देखील याच क्षेत्रातून निघणार आहे, असे संस्थेचे कुलगुरू प्रा. अनिरुद्ध पंडित यांनी सांगितले.
रसायन तंत्रज्ञान संस्थेने देशाला १८ पद्म पुरस्कार विजेते वैज्ञानिक आणि सुमारे ७००० प्रथम पिढीतील उद्योजक दिले असल्याचे संस्थेचे माजी कुलगुरू आणि इंडियन केमिकल सोसायटीचे अध्यक्ष डॉ. गणपती यादव यांनी सांगितले. राज्यातील विद्यापीठांनी सध्याच्या तुलनेत मोठ्या प्रमाणावर संशोधक आणि पीएचडी धारक निर्माण करणे आवश्यक असल्याचे संस्थेचे माजी कुलगुरू प्रा. एम. एम. शर्मा यांनी सांगितले.
हरित रसायनशास्त्र आणि शाश्वत अभियांत्रिकी क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल ज्येष्ठ महिला वैज्ञानिक प्रा. एम. लक्ष्मी कांतम यांचा राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.यावेळी ज्येष्ठ वैज्ञानिक पद्मविभूषण प्रा. एम. एम. शर्मा यांचाही राज्यपालांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. परिषदेत महिला वैज्ञानिकांच्या योगदानाची विशेष दखल घेत त्यांचाही गौरव करण्यात आला.यावेळी विज्ञान व तंत्रज्ञान विभागाचे माजी सचिव पद्मभूषण डॉ. टी. रामासामी, राज्यपालांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे तसेच मोठ्या संख्येने वैज्ञानिक, संशोधक, उद्योजक आणि विद्यार्थी उपस्थित होते.