‘जेन-झी’ आंदोलनादरम्यान मुंबईत पोलिसांची गाडी अडवून प्रसिद्ध झालेल्या रिया अहिरला ‘बिग बॉस’मध्ये प्रवेश करण्याची संधी मिळाल्यावर तिच्यासारख्याच एका महिलेने म्हटले की, ‘यातूनच तुला संसदेत जाण्याचा मार्ग मोकळा झाला.’ यावर रिया म्हणाली, "बिग बॉस’च्या घरात मी संसदेसाठी तयारी करणार.” मात्र, तिला ‘बिग बॉस’मध्ये प्रवेश करण्यापूर्वीच डच्चू मिळाला. तिच्या या अपयशाचा विचार रियासोबतच राहुल गांधी आणि राज ठाकरे या दोघांनीही केला पाहिजे. कारण, त्यांचे समर्थन असतानाही रिया ‘गेटआऊट’ झाली. अर्थात, हे दोघे यावर काय करणार म्हणा? कारण, आधीच एक देशाच्या आणि एक राज्याच्या सत्ताकारणातून ‘गेटआऊट’ आहेत.
आज असे चित्र आहे की, भाजपविरोधी-हिंदूविरोधी बडबड केली, कारस्थाने केली की, समाजविघातक शक्ती त्यांना डोक्यावर घेतात. या अशा सवंग प्रसिद्धीसाठी हे लोक काहीही करायला तयार होतात. पण, अशा वागण्याचे पडसाद समाजावर उमटतात, हे असे लोक विसरतात. या आयामात हिच ती रिया जी ‘झुरळ’ आंदोलन सुरू असताना पोलिसांच्या व्हॅनसमोर उभी राहिली होती. जणूकाही पोलीस त्यांची व्हॅन गर्दीत घुसवणार होते. ती शक्यता १००१ टक्केही नव्हती. नव्हे, ती शक्यता असूच शकत नव्हती. पण, आपण उपस्थित काही झुरळ आंदोलकांना वाचवले, अशा प्रकारचे आविर्भाव रियाने केले आणि तो फोटो प्रसिद्ध झाला. मग काय, विरोधकांना वाटले की, त्यांना भाजप आणि हिंदूविरोधात मोठे ब्रह्मास्त्रच सापडले की काय? त्यांनी लगेच तिचे गुणगान करायला सुरुवात केली. तसेही रिया ही व्यक्ती नाही, तर प्रवृत्ती आहे. या वृत्तीला खतपाणी घालणारेही आहेतच. हिचे कर्तृत्व काय? तर, सत्ताधार्यांच्या विरोधात काहीबाही बरळायचे, गरळ ओकायचे? दुसरीकडे, ‘बिग बॉससारख्या शोमध्ये आपली निवड होणार, लोक आपल्यालाच आवडून घेणार; इतके प्रसिद्ध झालो की, आपल्याला सत्तेची दारे खुली होतील. आपण सत्ताधारी होऊ,’ असे मनाचे मांडे ती खात होती. पण, ‘ये जो पब्लिक हैं, वो सब जानती हैं’ बरे! त्यामुळेच काही लोकांनी केवळ आणि केवळ स्वार्थासाठी रियासारख्यांना डोक्यावर घेतले असले, तरी जनतेने तिला स्वीकारले नसल्याचे चित्र आहे. यावर ‘रागां’ म्हणजे रागा आणि राठा यांचे काय म्हणणे आहे बरे?
प्रवृत्ती नव्हे, ही विषवल्लीच!
जंतरमंतरच्या ‘झुरळ’ आंदोलनापासून या निशू आझादचे नाव सतत चर्चेत. तिच्या त्या पित्याला वाटले नाही की, मुलीसाठी शिक्षण गरजेचे आहे? त्या आंदोलनात अल्पवयीन मुलीला पाठवताना त्याला जराही काळजी-चिंता वाटली नाही? का? तर, निशू आझादला पुढे करून तिच्या पित्याला आणि काही विघातक वृत्तीच्या नेत्यांना त्यांचा स्वार्थ साधायचा आहे. निशू अल्पवयीन, त्यात ती मुलगी आहे. त्यामुळे तिला पुढे करून त्यांना स्वतःचा हिंदूविरोधात विद्वेषी घाणेरडा अजेंडा पुढे करायचा आहे. त्यामुळे अल्पवयीन मुलांचा विघातकतेसाठी वापर केला, तर प्रशासन कारवाई करते; तशीच कारवाई निशू आणि तिला ते करण्यास भाग पाडणार्यांवर होणे गरजेचे आहे.
चांगले पालक आणि चांगले संस्कार नसतील, तर अपत्यांच्या मानसिकतेत आणि भविष्यावर काय दुष्परिणाम होतो, हे दाखवायचे असेल; तर निशू आणि तिच्या पालकांना दाखवता येईल. पंतप्रधानांच्या विरोधात, अगदी हिंदू सण-उत्सव आणि देव-देवतांच्या विरोधात अत्यंत आक्षेपार्ह विधान करणारी ही निशू. शब्दाशब्दांत विषपेरणी आणि अत्यंत कुटिल डावपेच रचावेत, असे आविर्भाव तिचे आहेत. तर, तिच्या या विधानाचा फायदा हिंदूविरोधी आणि विघातक शक्तींनी घेतला नाही, तर नवलच! ‘झुरळ आंदोलक’ असू दे की, कायमच जातिवादी भूमिका घेत समाज अस्थिर करणारा ‘चंद्रशेखर रावण’ असू दे आणि राहुल गांधी यांनीही तिचे समर्थन केले आहे. मात्र, समाज या मुलीचे विचार पाहून अत्यंत अस्वस्थ झाला आहे. अल्पवयीन मुलीच्या डोक्यात इतके विष कसे काय आहे? यासाठी तिच्यासह तिचे पालक आणि तिला समर्थन करणारे आणि तिला प्रसिद्धीचे व्यासपीठ मिळवून देणारे लोकही तितकेच जबाबदार. देशात अनेक लोक चांगल्या विचारांनी चांगले काम करत, लोककल्याणाचा इतिहास रचत आहेत. मात्र, त्यांना सोडून काही लोक विकृत विचारांच्या लोकांची प्रसिद्धी करतात. खरेतर समाजासमोर विकृत विचारांचा हैदोस घालणार्या निशू आणि तिच्या पालकांसह समर्थकांवर कारवाई व्हायला हवी. कारण, ही प्रवृत्ती नाही; तर विकृत विचारांची विषवल्ली आहे.
९५९४९६९६३८