‘फिनटेक’ अर्थात ‘फायनान्शियल टॅक्नोलॉजी’. पण, ‘फिनटेक’ केवळ ‘यूपीआय’ अथवा डिजिटल पेमेंट्सपुरते मर्यादित नसून, त्यापलीकडेही या क्षेत्रात अमर्याद संधींचा सागर आणि आव्हानांचा डोंगरही उभा आहे. तेव्हा, सध्या भारतात सुरु असलेल्या ‘ग्लोबल फिनटेक फेस्ट २०२६’च्या निमित्ताने या क्षेत्राची एकूणच व्याप्ती आणि भविष्यवेध घेणारा हा लेख...
मुंबईत ‘ग्लोबल फिनटेक फेस्ट २०२६’चे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते उद्घाटन नुकतेच संपन्न झाले. या परिषदेत जगभरातील महत्त्वाचे अर्थतंत्रविश्वातील विविध मान्यवर उपस्थित राहणार आहेत. दि. ८ ते ११ सप्टेंबरपर्यंत सुरू असणार्या या महत्त्वाच्या परिषदेला आर्थिक क्षेत्रात जागतिक स्तरावरही तितकेच महत्त्व. कारण, या परिषदेत एकूण ८० देशांचा सहभाग आहे. धोरणकर्ते, नियामक, केंद्रीय बँकांचे प्रमुख, वित्तीय संस्था, तंत्रज्ञान क्षेत्रातील नेते, ‘फिनटेक’ उद्योजकांचा मेळा यानिमित्ताने उपस्थित आहे. तेव्हा एकूणच या सर्व भागदारकांना एकत्रित आणून ‘फिनटेक’ क्षेत्रातील नव्या संधींची उकल करण्याचा मानस यानिमित्ताने असणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात ‘ग्लोबल फिनटेक फेस्ट’चे तिसर्यांदा उद्घाटन झाले. भारतात ‘डिजिटल इंडिया’ची दहा वर्षे पूर्ण झाली, ‘यूपीआय’नेही आपली ११ वर्षे पूर्ण केली. या दहा वर्षांत देशाने डिजिटल व्यवहारात झालेले आमूलाग्र बदल प्रत्यक्ष अनुभवले. ‘ग्लोबल फिनटेक फेस्ट’सारख्या कार्यक्रमामुळे ही उपलब्धी जागतिक स्तरावर पोहोचते. मुळात युद्धसंघर्षामुळे जगात अस्थिरतेचे वातावरण असताना, एकूण ८० देशांना भारताने यानिमित्ताने एका व्यासपीठावर आणले, हे देखील कौतुकास्पद. जागतिक संघर्ष आणि आव्हानांच्या परिस्थितीतही भारताने आपला आर्थिक वर्षातील पहिल्या तिमाहीचा ‘जीडीपी’ ७.८ टक्के इतका नोंदविला. त्यामुळे निश्चितच भारताने आर्थिक आघाडीवर दाखविलेली ही लवचीकता देशीविदेशी गुंतवणूकदारांचा आत्मविश्वास वाढवणारी ठरली आहे, ही बाब देखील ‘फिनटेक’च्या परिषदेच्या पार्श्वभूमीवर तितकीच महत्त्वाची ठरावी.
‘यूपीआय’ हा भारतातील ‘फिनटेक’चा कणा मानायला हरकत नाही. गावाखेड्यांपासून ते पार देश-विदेशापर्यंत ‘यूपीआय’ एक लोकचळवळ बनली. केवळ ऑगस्ट महिन्यात २४ अब्ज ‘यूपीआय’ व्यवहार पूर्ण झाले. यावरून ‘डिजिटल’ व्यवहारांची व्याप्ती दिसून येईल. आजघडीला ११ देशांत ‘यूपीआय’ वापरला जातो. आता भारताने पुढील लक्ष्य हे इतर देशांच्या ‘पेमेंट सिस्टम’शी जोडण्याचे ठेवल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सांगितले. परदेशात राहणारे भारतीय आपल्या कुटुंबीयांना पैसे पाठविण्यासाठी भारतीय ‘रेमिटन्स’चा (पैसे पाठवणे) वापर करतात. ‘डिजिटल पेमेंट’चे एकत्रीकरण झाल्यास व्यवहारांचा खर्चही कमी होऊ शकतो. बँकांच्या शाखांचा विस्तार जितया गतीने झाला नाही; मात्र, तितका ग्रामीण भागात ‘यूपीआय’मुळे सेवाविस्तार शक्य झाला.
आता भारतीय ‘फिनटेक’ क्षेत्राने पेमेंटच्या पलीकडे कर्ज, विमा, बचत, गुंतवणूक, पेन्शन आदी महत्त्वाच्या सेवांवर लक्ष्य केंद्रित करायला हवे, असे मंथन या परिषदेत झाले. छोट्या व्यवसायांसाठी ‘डेटा’आधारित कर्जव्यवस्था म्हणून उभे राहू शकते. एखाद्या छोट्या किरकोळ उद्योगांचा व्यवहार त्यांची क्षमता दाखवू शकतो. पारंपरिक बँकांमध्ये छोट्या व्यवसायांना कर्ज मिळताना अडचणी येतात. ‘फिनटेक’ कंपन्या ‘डिजिटल’ व्यवहारांच्या आधारे आणि परतफेडींच्या आधारे क्षमता समजून घेऊन कर्जपुरवठा करू शकतात.
पुढील टप्प्यात सुक्ष्म, लघू व मध्यम उद्योगांना पतपुरवठ्याची तूट भरून काढण्याचे आव्हान पेलण्याची देखील संधी आहे. अशा व्यवसायांसाठी खेळते भांडवल उभे करणे, बाजारातील आव्हानांना सामोरे जाण्याची संधी निर्माण करणे आदी गोष्टींची गरज ‘फिनटेक’ समोर उभी आहे. त्यापुढे जाऊन ‘गीग’ कर्मचार्यांसाठी काम करण्याची संधीही आहे. छोट्या-मोठ्या व्यवसायांत काम करणार्यांना बचत, विमा आणि पेन्शन उपलब्ध करून देण्यावर भर दिला जाऊ शकतो. या सेवा किमान व सोप्या प्रक्रियेद्वारे म्हणजेच, ‘यूआर पेमेंट’ करण्याइतया सोप्या आणि सहज उपलब्ध करण्याचे उद्दिष्ट समोर ठेवणे गरजेचे असल्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या भाषणात केलेच आहे.
पुढील टप्पा म्हणून ‘एजंटिक एआय’, ‘टोकनायझेशन’, ‘क्वांटम कम्प्युटिंग’ आदी तंत्रज्ञानाचा वापर हा ‘फिनटेक’ कंपन्यांनी प्रामुख्याने करणे आवश्यक आहे. ‘एआय’च्या वापराद्वारे ‘फिनटेक’ कंपन्यांनी ग्राहककेंद्रित धोरण अवलंबणे गरजेचे असून, त्याद्वारे ‘प्रॉडट एसपिरियन्स’ सोपा होईल आणि तो सर्वसामान्य ‘युझर्स’पर्यंत कसा पोहोचेल, याची खबरदारी कंपन्यांनी घेण्याची गरज आता प्रकर्षाने अधोरेखित होऊ लागली आहे.
‘सायबर सुरक्षितता’ हे पुढील काळात ‘फिनटेक’ कंपन्यांपुढे एक महत्त्वाचे आव्हान असणार आहे, हे वेगळे सांगायला नको. ‘यूपीआय’च्या प्रारंभीही सायबर सुरक्षिततेबद्दल चिंता व्यक्त केली गेली होती. ‘जमतारा’सारख्या पॅटर्नद्वारे अनेकांची फसवणूकही झाली. या फसवणुकीच्या प्रकारांना पूर्णपणे आळा घालता आलेलानाही. भविष्यात हे प्रकार टाळण्यासाठी ‘सायबर सुरक्षितते’चे आव्हानही भारतीय ‘फिनटेक’ विश्वापुढे असणार आहे. ग्राहकांच्या डेटाचे संरक्षण, सक्षम यंत्रणा आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे, ग्राहकांच्या विश्वासावर उतरण्याची गरज आता भासू लागली आहे. ‘ब्रॅण्ड म्हणजेच विश्वास’ हे सूत्र मागे पडताना दिसत असून, ‘सुरक्षितता म्हणजेच विश्वास’ असे हल्ली गणित बदललेले दिसते.
भारत हा देशातील सर्वांत स्वस्त इंटरनेट सेवा पुरवठा करणार्या देशांपैकी एक. भारताचे एकूण १.०६ अब्ज मोबाईल ग्राहक हे आपले बलस्थानच म्हणावे लागेल. दुर्गम भाग आणि खेडोपाड्यातही इंटरनेट पोहोचले आणि डिजिटल साक्षरतेत झालेली वाढ ही यानिमित्ताने महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. अशा या ‘ग्लोबल फिनटेक फेस्ट’चे हे सलग सहावे वर्ष. भारतासारखा देश या क्षेत्रासाठी पुढाकार घेऊन जगभरातील तब्बल ८० देशांना एक व्यासपीठ देतो, हे भारताचे या क्षेत्रातील नेतृत्व आणि कर्तृत्वावरच शिक्कामोर्तब करणारे. ‘ग्लोबल फिनटेक समीट’मध्ये विशेष अहवाल प्रकाशन, नेटवर्किंग, मान्यवर संस्थांचा सन्मान, स्टार्टअप्स, नव्या उत्पादनांची घोषणा, ‘हॅकेथॉन’ आणि नवोन्मेष, ‘इनव्हेस्टमेंट पिच’ आदींचा अंतर्भाव यानिमित्ताने केला जाणार आहे. यानिमित्ताने ‘बी-टू-बी पेमेंट्स प्लॅटफॉर्म्स’, सर्वोत्तम डिजिटल इन्फ्रास्ट्रटर, विमा संरक्षण आदी क्षेत्रांतील कंपन्यांना व्यासपीठ देण्याचे काम होणार आहे. त्यामुळे याचा परिणाम म्हणून भारताच्या ‘फिनटेक’ प्रवासाचा पुढील अध्याय केवळ तंत्रज्ञान किती वेगाने विकसित होते यावर नव्हे; तर ते तंत्रज्ञान किती व्यापक, सुरक्षित आणि सर्वसमावेशक वित्तीय व्यवस्था उभी करते, यावर अवलंबून असणार आहे.