साधकाच्या साधना काळातील उत्तर काळात साधकात अधिक प्रमाणात शक्ती येत असल्यामुळे, तीच शक्ती साधकाच्या मन-इंद्रियात अधिक प्रमाणात संचरते. आणि अशा वेळेस बाहेरील घटनांचा हल्ला झाल्यास, मोठमोठे साधकसुद्धा प्रमाद करतात. अशा वेळेस साधक दुनियादारीच्या आकर्षणाने म्हणजेच कामिनी, कांचन आणि कीर्तीच्या मोहाला बळी न पडल्यास, म्हणजेच साधकरूप अर्जुनासारखा षंढ बृहन्नडा असल्यास आपल्या आध्यात्मिक वीरत्व पुरुषार्थाने, कौरवरूप दुष्टप्रवृत्तींना समर्थपणे तोंड देऊ शकतो. तसेच उत्तर गोग्रहणाचा कुटिल डाव हाणून पाडून, उलट त्या कौरव सैन्यालाच आपल्या उत्तम वृत्तीद्वारे संमोहित करून त्यांचा वृत्तीयुद्धात पराजयही करतो.
धर्मराजाचे म्हणजे वृत्तीश्रेष्ठ कंकाचे काम ब्राह्मणत्वाद्वारे भविष्य कथन करण्याचे होते. असल्या उच्च आध्यात्मिक अवस्थेत, साधकाला कोणाचेही भविष्य सहजगत्या आकलन होते. परंतु, असले श्रेष्ठ साधक आपल्या भविष्यज्ञानाचा बाजार न मांडता, ते पांडवांप्रमाणेच अज्ञात राहणे पसंत करतात. भीमरूप वृत्तींचा वल्लभ उत्तम रुचकर आध्यात्मिक अन्न तयार करीत असे, पण अज्ञातच राहून! अर्जुनरूप बृहन्नडा विराटाच्या पुत्र-पुत्रीला संगीत व नृत्य शिकवीत असे. साधनेच्या असल्या उच्च अवस्थेत (वृत्तीत) असलेल्या साधकाचे ओजस तत्त्व आपोआप प्रकट होऊन तो गायन, कवित्व आणि कलेत परिपूर्ण बनतो. म्हणूनच ज्ञानेश्वर, तुकाराम, कबीरांसारखे समाजाच्या दृष्टीने अशिक्षित, पण खरे संत व योगी उत्तम काव्य करू शकत होते. मीराबाई आणि सूरदासांनी तर नवनवीन रागही उत्पन्न केले आहेत. ते गायन कलेत आपल्या साधनामार्गामुळेच प्रवीण झाले. संत मीराबाई तर त्या अवस्थेत उत्तम नृत्य करून, गीत गात आपल्या भगवंताला आळवीत असत. मीराबाई म्हणतात, ‘पग घुंगरू बांध मीरा नाची रे.’ असलीच ती गायनकला आणि नृत्य बृहन्नडा, विराटाच्या उत्तर-उत्तरा पुत्र-पुत्रीला शिकवीत असे. विराटाचे हे उत्तर-उत्तरा पुत्र-पुत्री कोण? साधकाची उत्तर साधनावस्था, म्हणजेच उत्तर आणि उत्तरा होत!
उत्तर गोग्रहण करताना दुर्योधनाने, विराट राजाच्या नगरीवर दक्षिणेकडून हल्ला करण्यास त्रिवर्ग राजास पाठविले. इतर सर्व वीरांना घेऊन, त्याने विराट नगरीच्या उत्तर दिशेने हल्ला केला. प्रथम दक्षिण दिशेने त्रिवर्गाने हल्ला केला; म्हणूनच त्याला तोंड देण्याकरिता स्वतः राजा विराट आपली सर्व सेना घेऊन नगराच्या दक्षिण दिशेला गेला. विराट राजा दक्षिण दिशेला युद्ध करण्यात गुंतला आहे, असे पाहून स्वतः दुर्योधन इतर वीरांना घेऊन विराट नगरीच्या उत्तर दिशेने हल्ला करण्यास आला. आता काय करावे? विराट राजा कंक, वल्लभ आदी पांडवांना घेऊन दक्षिणेला सर्व सैन्यानिशी युद्धात गुंतला असताना, उत्तर दिशेवरून आलेल्या कौरव अतिरथी, महारथींना कोण तोंड देणार? परंतु स्वामिभक्त बृहन्नडा समोर आली. ‘मी एकटीच सर्व कौरव सैन्याचा पाडाव करते,’ अशी बृहन्नडा म्हणाली; परंतु रथाचे सारथ्य कोण करणार? विराटपुत्र उत्तर सारथ्य करण्यास तयार झाला. आता आपणास माहीत झाले आहे की, साधनाकालातील साधकाची उत्तर अवस्थाच म्हणजे विराटपुत्र उत्तर होय! आणि सारथी कोण? तर उपनिषदे सांगतात,
आत्मानं रथिनं विद्धि शरीरं रथमेव तु|
बुद्धिं तु सारथिं विद्धि मनः प्रग्रहमेवच॥
आत्मा हा रथाचा मालक असून, शरीर हेच रथ होय. त्या शरीररूप रथाचा सारथी बुद्धी असून, मन हा घोड्यांना आवरणारे लगाम होत. अर्जुनाच्या रथाला चार घोडे असत. चतुर्विध पुरुषार्थाचे ते चार घोडे होते. असा हा साधकाच्या साधना काळातील उत्तर अवस्थारूप उत्तर राजपुत्र, बृहन्नडेचा शरीररूप रथ चालविण्यास तयार झाला. पण, युद्ध करण्याकरिता अर्जुनाला त्याची खास शस्त्रे हवी होती आणि सर्व शस्त्रे तर अर्जुनाने विराट नगरीत येण्यापूर्वीच गावाबाहेरील एका शमी वृक्षावर शस्त्रास्त्रांवर शव बांधून ठेवली होती. ती शस्त्रास्त्रे आणण्याकरिता बृहन्नडेने आपला रथ प्रथम गावाबाहेरील शमी वृक्षाकडे नेला. शमी वृक्षावर चढून त्यावरील शव बाजूला सारून, त्या खालील आपली अस्त्रे काढली. आपली शस्त्रास्त्रे कुणी नेऊ नयेत, म्हणून अर्जुनाने शस्त्रास्त्रांवर एक शव बांधले होते, असे लिहिले आहे. योग्य विचार केल्यास असे दिसून येईल की, शव बांधल्यास अधिक कुतूहल जागृत होऊन त्या वृक्षावर कोणीही चढून जाईल आणि शव काढून त्याखाली असलेली शस्त्रास्त्रे हटकून नेईल. शिवाय, शवासारखा पदार्थ कुजू लागल्यावर त्याची दुर्गंधी सर्वत्र पसरून त्यावर घार, गरुड, गिधाडे, कोल्हे, तरस, चित्ते यांसारखे प्राणी तुटून पडतील आणि ते शव केव्हाच खाऊन फस्त करतील. त्या पक्षी-प्राण्यांचा कोलाहल ऐकूनही कोणीही झाडावर शव कसे काय बांधले? याबद्दल कुतूहल वाटून, ते शव सद्गती करण्याकरिता झाडाखाली आणेल. तसे करताना, इतरांनाही त्याखालील शस्त्रास्त्रे आपण-होऊन गवसतील. इतका व्यवस्थित विचार करणारा अर्जुन नसेल, असे कोणीही म्हणणार नाही. मग विशालबुद्धी व्यासांनी अशी कथा का बरे लिहावी? शिवाय, शस्त्रास्त्रे काढताना अर्जुन त्या शमी वृक्षावर चढला असता, त्याने एक वर्षापूर्वी ठेवलेले शव जसेच्या तसेच ताजे होते, असेही लिहिले आहे. असे शक्य आहे काय? दोन-तीन दिवसानंतर सडणारे, कुजणारे शव एका वर्षानंतर कसे काय जसेच्या तसेच राहणार? याचा अर्थ असा की, शमी वृक्षावरील शवाखाली दडविलेली अर्जुनाची शस्त्रास्त्रे याचा व्यास आशय अन्य आध्यात्मिक असला पाहिजे. तो काय ते आपण पाहू.
शमी वृक्षावरील शस्त्रास्त्रे
‘शं’ म्हणजे कल्याणकारक आणि ‘शमी’ म्हणजे कल्याणकारक अवस्था होय. साधकाची उत्तर साधना कालातील अज्ञातवासातील उत्तर अवस्था कल्याणकारकच राहणार आणि तसल्या कल्याणकारक अवस्थेवर साधक आपल्या साधनाशक्तीरूप शस्त्रांना, आपल्या अज्ञातवासाकरिता लपवून ठेवणारच! परंतु, इतर पदार्थांखाली न लपविता, शवाखालीच आपली शस्त्रास्त्रे का लपवावीत? त्याचे उत्तर साधनाशास्त्रात आहे. साधकातील सर्व इच्छा, वृत्ती आणि त्याचे स्वतःचे सर्व अस्तित्वच नष्ट झाल्याशिवाय, तो साधक आपली शक्तीरूप, सिद्धिरूप शस्त्रास्त्रे कशी लपविणार? म्हणूनच असल्या स्वतःच्या शवावस्थेखाली बृहन्नडारूप अर्जुन, अज्ञातवासात जाण्याकरिता आपली शस्त्रास्त्रे शमीच्या झाडावर ठेवतो. म्हणूनच, अज्ञातवासातील निरिच्छ अशा एका वर्षानंतरसुद्धाही, अर्जुनाची ती सिद्धिशस्त्रास्त्रे त्याच शववृत्तीखाली सुरक्षित राहिली. शिवाय, ते शव एक वर्षानंतरही ताजेच राहिले. मेलेल्या वृत्ती म्हणजेच शव असल्याने, अर्जुनाने ठेवलेले ते शव अज्ञातवासातील एका वर्षाच्या कालावधीनंतरही अगदी ताजेच राहिले.
योगिराज हरकरे
(शब्दांकन : राजेश कोल्हापुरे)
९७०२९३७३५७