कोकणाच्या कातळावर कोरलेली संघनिष्ठा

    10-Sep-2026   
 
Gangadhar Patwardhan
 
काही व्यक्ती अशा असतात ज्यांचे समाजाच्या पायाभरणीत योगदान चिरंतन असते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या प्रारंभीच्या काळात कोकणात संघकार्याची बीजे रोवणाऱ्या अशाच एका निष्ठावान स्वयंसेवकाचे नाव म्हणजे कै. गंगाधर (भाऊराव) पटवर्धन. संकटांशी दोन हात करत जगलेला हा माणूस, तुरुंगवास सहन करणारा सत्याग्रही, उद्यमशील उद्योगपती, शिक्षणप्रेमी आणि संघविचाराने प्रेरित समाजसेवक होता. “अडचण कितीही मोठी असो, ती जिद्दीने पार करायची,” हे त्यांच्या संपूर्ण आयुष्याचे सूत्र होते.
 
सन १९१८ साली जन्मलेल्या गंगाधर पटवर्धन यांच्या आयुष्याची सुरुवातच संघर्षाने झाली. ते अवघे दीड वर्षांचे असतानाच त्यांच्या वडिलांचे निधन झाले. सात भावंडांचे मोठे कुटुंब, आर्थिक संकटे आणि समाजातील दबाव या सर्वांचा सामना कुटुंबाने परस्परांच्या एकीच्या बळावर केला. गावातील काही लोकांनी त्यांना त्रास देण्याचा प्रयत्न केला; मात्र सात भावंडांची अभेद्य एकजूट पाहून विरोधकांनाही माघार घ्यावी लागली. पुढील शिक्षणासाठी संपूर्ण कुटुंब रत्नागिरीला आले आणि तेथूनच गंगाधर भाऊंच्या आयुष्याला नवी दिशा मिळाली. घराचा उदरनिर्वाह करण्यासाठी त्यांनी दहा-बारा दुभती जनावरे घेऊन दुधाचा व्यवसाय सुरू केला. कष्ट, प्रामाणिकपणा आणि चिकाटी यांच्या बळावर त्यांनी १९३४ मध्ये दूध आणि दुग्धजन्य पदार्थांचे दुकान सुरू केले. पुढे हे दुकान त्यांच्या जीवनातील एका ऐतिहासिक वळणाचे कारण ठरले.
 
१९३७ मध्ये त्यांच्या दुकानात संघप्रचारक माधवराव मुळ्ये आले. त्यांनी सरळ सांगितले—“उद्यापासून शाखेत या. रत्नागिरीत संघकार्य सुरू करायचे आहे.” डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांनी स्थापन केलेल्या संघाविषयी भाऊंनी यापूर्वी केसरी आणि बलवंत या वर्तमानपत्रांतून वाचले होते. त्यामुळे त्यांची उत्सुकता वाढली. रत्नागिरीतील संघस्थापनेची पहिली बैठक चिपळूणकर वकील यांच्या घरी झाली. त्या बैठकीत शाखेचे स्वरूप, वर्षभराचे कार्यक्रम, राष्ट्रकार्याची संकल्पना, मातृभूमीची प्रार्थना, खेळ, व्यायाम, सूर्यनमस्कार आणि निरपेक्ष भावनेने समाजासाठी कार्य करण्याचा विचार ऐकून गंगाधर भाऊ आणि त्यांचे बंधू बापूकाका यांच्या मनावर खोल ठसा उमटला. त्या दिवसापासून संघ त्यांच्या आयुष्याचा अविभाज्य भाग बनला.
 
१९४७ मध्ये देश स्वतंत्र झाला; पण फाळणीच्या जखमांनी संपूर्ण देश पेटला होता. त्यानंतर ३० जानेवारी १९४८ रोजी महात्मा गांधी यांच्या हत्येनंतर देशातील वातावरण अधिकच तणावपूर्ण झाले. त्या काळात पटवर्धन यांच्या घरी संघाची जिल्हा बैठक सुरू होती. रात्री गॅसबत्त्यांच्या प्रकाशामुळे घर उजळून निघाले होते. याच वेळी अफवा पसरविण्यात आली की, “पटवर्धन गांधीहत्येचा आनंद साजरा करत आहेत.” क्षणात संतप्त जमाव घरासमोर जमा झाला. घोषणा, शिवीगाळ, दगडफेक आणि चपला फेकण्यास सुरुवात झाली. काही स्वयंसेवक जखमी झाले. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याने आत्मरक्षणासाठी प्रतिकार करण्यात आला आणि जमाव मागे हटला. यानंतर पोलिसांनी अचानक कारवाई करत चौसष्ट जणांना अटक केली.
 
संघावरील बंदीच्या काळात रत्नागिरीत ९ डिसेंबर रोजी झालेल्या सत्याग्रहात गंगाधर भाऊ, बापूकाका, रामभाऊ आठवले, लखुनाना गोगटे यांच्यासह अनेक स्वयंसेवकांनी सहभाग घेतला आणि त्यांनाही अटक झाली. विशेष म्हणजे, ज्या कोठडीत स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना पूर्वी ठेवण्यात आले होते, त्याच कोठडीत गंगाधर भाऊ आणि काही सत्याग्रहींना ठेवण्यात आले. त्यानंतर त्यांची सावंतवाडी कारागृहात रवानगी झाली. सहा महिन्यांचा तुरुंगवास आणि पाचशे रुपयांचा दंड—अशी शिक्षा प्रत्येकाला झाली. परंतु तुरुंगातही भाऊंनी परिस्थिती बदलण्याचा प्रयत्न केला. जेवणाच्या कंत्राटदाराला मदत करत त्यांनी स्वयंपाकाची जबाबदारी स्वीकारली. काही स्वयंसेवकांच्या सहकार्याने घरच्यासारखे अन्न कैद्यांना मिळू लागले. संध्याकाळी खेळण्याची परवानगी मिळाल्यावर त्यांनी खो-खो, हुतुतू, आट्यापाट्या यांसारखे खेळ सुरू केले. तुरुंग त्यांच्या दृष्टीने निराशेचे ठिकाण नव्हते; ते संघटन, सेवा आणि आत्मचिंतनाची नवी शाळा बनले. या काळात त्यांनी नियमित दैनंदिनी लिहिली आणि कोकणभूमीच्या विकासाचा संकल्प मनाशी पक्का केला.
 
गुढीपाडव्यानंतर तुरुंगातून मुक्त झाल्यावर त्यांनी समाजकार्यासोबत उद्योगाचीही नवी वाट धरली. १८ मे १९५० रोजी विहार उद्योग समूहाची स्थापना झाली. देवरूख येथे ‘सप्तलिंगी फलोद्यान’ उभारले. त्या काळात नाविन्यपूर्ण मानला जाणारा सिट्रोनेला गवतापासून तेल काढण्याचा कारखाना सुरू केला. उद्योग त्यांच्या दृष्टीने केवळ व्यवसाय नव्हता; तो कोकणातील रोजगार, शेती आणि स्वावलंबनाचा मार्ग होता.
 
उद्योग वाढत असतानाही संघकार्य अखंड सुरू होते. त्यांनी शहर कार्यवाह म्हणून जबाबदारी स्वीकारली आणि संघाच्या विस्तारासाठी सातत्याने कार्य केले. स्वतंत्र भारतात हिंदू समाजाच्या प्रश्नांना राजकीय स्तरावर मांडण्यासाठी भारतीय जनसंघाची स्थापना झाल्यानंतर त्यांनी त्या कार्यातही स्वतःला पूर्णपणे झोकून दिले. उत्तमराव पाटील आणि रामभाऊ गोडबोले यांसारख्या वरिष्ठ कार्यकर्त्यांचे मार्गदर्शन त्यांना लाभले. त्यांच्यासाठी संघ आणि समाजकार्य हे दोन वेगळे विषय नव्हते; ते राष्ट्रसेवेचेच दोन परस्परपूरक आयाम होते.
 
गंगाधर भाऊंचा दूरदृष्टीचा विचार शिक्षण क्षेत्रातही दिसून येतो. कोकणातील मुलांना आधुनिक शिक्षण मिळावे, इंग्रजी भाषेचे ज्ञान मिळावे आणि त्याचवेळी हिंदू संस्कृतीची मुळेही घट्ट राहावीत, या उद्देशाने त्यांनी कोकणातील पहिल्यापैकी इंग्रजी माध्यमाची शाळा सुरू करण्याचा पुढाकार घेतला. त्यांच्या मते, संस्कार आणि आधुनिकता यांचा समतोल साधणारे शिक्षणच समाजाला सक्षम बनवू शकते. गंगाधर भाऊंचा प्रभाव केवळ त्यांच्या समकालीन कार्यकर्त्यांपुरता मर्यादित राहिला नाही. त्यांच्या कुटुंबातील पुढील पिढ्यांनाही त्यांनी राष्ट्रकार्याची प्रेरणा दिली. आजही भारतीय जनता पक्षाच्या कार्यात सहभागी असलेल्या त्यांच्या कुटुंबीयांना कोकणातील जुने कार्यकर्ते भेटले की, “तुम्ही गंगाधर भाऊ पटवर्धन यांच्या घरातील आहात का?” असा आपुलकीने प्रश्न विचारतात. हीच त्यांच्या कार्याची खरी ओळख आहे. ६ डिसेंबर १९९९ रोजी त्यांचे निधन झाले; परंतु त्यांची जिद्द, संघनिष्ठा आणि समाजसेवेचा आदर्श आजही अनेक कार्यकर्त्यांना प्रेरणा देत आहे.
 
कै. गंगाधर पटवर्धन यांचे जीवन हे एका सामान्य माणसाने असामान्य ध्येयासाठी स्वतःला कसे समर्पित करावे, याचे प्रेरणादायी उदाहरण आहे. दुधाच्या व्यवसायातून स्वावलंबन, संघाच्या शाखेतून राष्ट्रभाव, तुरुंगातून सेवा, उद्योगातून विकास आणि शिक्षणातून समाजनिर्मिती—या प्रत्येक टप्प्यावर त्यांनी “राष्ट्र प्रथम” ही भूमिका जपली. त्यांचा प्रवास सांगतो की, संघाचा स्वयंसेवक हा केवळ शाखेपुरता मर्यादित नसतो; तो समाजाच्या प्रत्येक क्षेत्रात राष्ट्रकार्यासाठी उभा राहणारा कर्मयोगी असतो.




ओंकार मुळ्ये

'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक
संबंधित मजकूर