राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी प्रवासात अनेक स्वयंसेवकांनी आपल्या गावासाठी, समाजासाठी आणि संघकार्यासाठी आयुष्य अर्पण केले. त्यांपैकी सावंतवाडीतील डॉ. गणेश सदाशिव लेले, सर्वांच्या परिचयाचे 'डॉ. बाबा लेले', हे एक असे व्यक्तिमत्त्व होते की, सावंतवाडीतील संघकार्याचा इतिहास त्यांच्या नावाशिवाय पूर्ण होऊच शकत नाही. वैद्यकीय व्यवसाय करताना त्यांनी रुग्णसेवा हीच राष्ट्रसेवा मानली आणि संघकार्यासाठी स्वतःचे घर, वेळ, श्रम आणि संपूर्ण आयुष्य खुले ठेवले.
दि. २३ ऑगस्ट १९०६ रोजी गणेश चतुर्थीच्या शुभदिनी धारवाड येथे डॉ. गणेश सदाशिव लेले यांचा जन्म झाला. शालेय शिक्षण सांगलीत झाल्यानंतर त्यांनी पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयात शिक्षण घेतले आणि पुढे मुंबईत एम.बी.बी.एस.ची पदवी संपादन केली. सन १९३३-३४ मध्ये ते कायमचे सावंतवाडीत स्थायिक झाले आणि तेथे स्वतःचा दवाखाना सुरू केला. परंतु त्यांच्या दृष्टीने डॉक्टरकी हा केवळ उदरनिर्वाहाचा व्यवसाय नव्हता. रात्री-अपरात्री कोणत्याही वेळी रुग्णाच्या घरी धाव घेणे, प्रकृती सुधारत नाही तोपर्यंत तासन्तास थांबणे आणि मोबदल्यापेक्षा सेवेला महत्त्व देणे, हा त्यांच्या आयुष्याचा अविभाज्य स्वभाव बनला.
सन १९३६-३७ मध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक माधवराव मुळ्ये सावंतवाडीत आले. शहरात संघकार्य सुरू करण्यासाठी योग्य व्यक्ती कोण, अशी चौकशी केली असता सर्वांनी त्यांना एकच नाव सांगितले डॉ. लेले. त्या भेटीत माधवराव मुळ्ये यांनी संघाची भूमिका, शाखेची संकल्पना आणि राष्ट्रजीवनाविषयीची संघाची दृष्टी त्यांच्यासमोर मांडली. हा संवाद एका व्यक्तीच्या आयुष्याचा आणि सावंतवाडीच्या संघकार्याचा निर्णायक क्षण ठरला. डॉ. लेले यांनी संघकार्य स्वीकारले आणि त्यांच्यावर संघचालक म्हणून दायित्व सोपविण्यात आले. याच काळात १९३६ मध्ये सावंतवाडीची शाखा सुरू झाली आणि पुढील जवळपास अर्धशतक त्या शाखेचा आत्मा म्हणून बाबा लेले कार्यरत राहिले.
डॉ. बाबा लेले यांचे घर हे केवळ त्यांचे निवासस्थान राहिले नाही; ते संघाचे केंद्र बनले. १९३६ पासून त्यांच्या घराच्या माडीवर संघाचे कार्यालय सुरू झाले. देशभरातून येणारे प्रचारक तेथेच राहत असत. प्रवास करणारे स्वयंसेवक, गोव्याकडे जाणारे कार्यकर्ते, सायकलयात्री स्वयंसेवक ही एकच ओळख त्यांच्यासाठी पुरेशी असे. भोजन, निवास, आर्थिक मदत आणि आवश्यक ती प्रत्येक व्यवस्था बाबा स्वतः पाहत असत. अनेकांसाठी त्यांचे घर हे सावंतवाडीतील पहिल्या संपर्काचे आणि आत्मीयतेचे ठिकाण बनले.
गोवामुक्ती आंदोलनाच्या काळात सावंतवाडी हे महत्त्वाचे संपर्ककेंद्र होते. त्या काळात सत्याग्रहींच्या निवासापासून त्यांच्या इतर सर्व गरजांपर्यंत डॉ. बाबा लेले स्वतः लक्ष देत असत. अनेक कार्यकर्त्यांसाठी त्यांचे घरच नियोजन, संपर्क आणि सेवाकार्याचे केंद्र बनले होते. १९४८ मध्ये महात्मा गांधी यांच्या हत्येनंतर संघावर बंदी आली. त्या काळात डॉ. बाबा लेले यांना अटक झाली आणि त्यांना हिंडलगा कारागृहात ठेवण्यात आले. तुरुंगातून सुटल्यावर त्यांनी प्रथम संघबांधवांना भेटणे पसंत केले आणि त्यानंतरच घरी परतले. १९७५ च्या आणीबाणीच्या काळातही त्यांना जवळपास वर्षभर कारावास भोगावा लागला. त्यावेळी पू. सरसंघचालक बाळासाहेब देवरसही कारागृहात होते. दोन वेगवेगळ्या काळातील हे कारावास त्यांच्या संघनिष्ठेची साक्ष देऊन गेले.
डॉ. बाबा लेले यांच्याविषयी एक गोष्ट विशेष सांगितली जाते; संघशाखा सुरू झाल्यापासून बंदीचा कालावधी वगळता त्यांनी शाखा कधीच चुकवली नाही. सकाळी स्वतः शाखेत जाणे, प्रत्येक कार्यक्रमात उपस्थित राहणे आणि कार्यकर्त्यांशी सातत्याने संपर्क ठेवणे हा त्यांचा दिनक्रम होता. गोवामुक्तीपर्यंत ते सावंतवाडीचे संघचालक राहिले. नंतर संघरचनेत गोवा समाविष्ट झाल्यावर ते जिल्हा संघचालक झाले. १९८१ मध्ये सिंधुदुर्ग जिल्हा अस्तित्वात आल्यानंतर ते सिंधुदुर्गचे जिल्हा संघचालक म्हणून अखेरपर्यंत कार्यरत राहिले.
संघविचाराला विरोध करणारे अनेक लोक त्यांच्या परिचयात होते. पण बाबा त्यांच्याशी वाद न घालता शांतपणे सर्वांचे म्हणणे ऐकून घ्यायचे. मतभेद असूनही मनभेद निर्माण होऊ नयेत, हा त्यांच्या व्यवहाराचा गाभा होता. हिंदू, मुसलमान आणि ख्रिश्चन समाजातील सर्व स्तरांमध्ये त्यांनी कमावलेला विश्वास यामुळेच संघकार्यालाही व्यापक सामाजिक स्वीकार मिळाला.
सन १९६८ मध्ये त्यांच्या पत्नींचे निधन झाले. त्या वेळी डॉ. बाबा लेले संघ शिक्षा वर्गाचे सर्वाधिकारी होते. निधनाची बातमी समजल्यानंतर ते घरी आले, आवश्यक विधी पूर्ण केले आणि त्यानंतर संघ शिक्षा वर्गाच्या समारोप कार्यक्रमासाठी पुन्हा उपस्थित राहिले. व्यक्तिगत दुःखापेक्षा कर्तव्याला प्राधान्य देण्याचा हा प्रसंग त्यांच्या जीवनातील अत्यंत भावस्पर्शी अध्याय ठरतो.
उत्तम प्रकृती, स्वावलंबी स्वभाव आणि अखंड कार्यशीलता हे त्यांचे वैशिष्ट्य होते. डोळ्यांच्या उपचारासाठी ते सांगलीला गेले असताना, १९८५ मध्ये नवरात्रीच्या पहिल्या दिवशी आपल्या आराध्य गजाननाचे स्मरण करत बाबांनी अखेरचा श्वास घेतला. सावंतवाडीत त्यांच्या अंत्ययात्रेचे नियोजन संपूर्ण समाजाने केले. ती केवळ एका डॉक्टरची अंत्ययात्रा नव्हती; ती सावंतवाडीच्या सेवाभावी संस्कारांना आकार देणाऱ्या एका संघसमर्पित जीवनाला वाहिलेली सामूहिक आदरांजली होती.