अमेरिकेनंतर काल कॅनडातील भाषणातूनही सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी भारताच्या जागतिक भूमिकेचा वेगळा दृष्टिकोन मांडला. भारताने ‘महासत्ता’ होण्यापेक्षा ‘विश्वगुरू’ होण्याचा विचार करावा, असे सांगताना त्यांनी शक्तीपेक्षा विश्वास, ओळखीपेक्षा समरसता आणि प्रभुत्वापेक्षा मानवकल्याणाला महत्त्व दिले. त्यांच्या या भूमिकेचा वैचारिक अन्वयार्थ म्हणूनच महत्त्वाचा...
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांची अमेरिका आणि कॅनडातील भाषणे एकत्रितपणे पाहिली, तर त्यामागे एक सलग वैचारिक सूत्र दिसते. मात्र, कॅनडातील भाषणाने या सूत्राला वेगळा आयाम दिला. भारताकडे आर्थिक किंवा लष्करी सामर्थ्याच्या निकषावर महासत्ता म्हणून पाहण्यापेक्षा, जगाला सभ्यता देणारा म्हणून ‘विश्वगुरू’ या संकल्पनेकडे पाहिले पाहिजे, असे भागवत यांनी सांगितले. त्यामुळे ‘महासत्ता’ आणि ‘विश्वगुरू’ या दोन संकल्पनांचा अर्थ समजून घेणे आवश्यक असेच. ‘महासत्ता’ ही मूलतः शक्तीची संकल्पना. अर्थव्यवस्थेचा आकार, लष्करी सामर्थ्य, अत्याधुनिक तंत्रज्ञान, जागतिक व्यापारातील वाटा आणि आंतरराष्ट्रीय निर्णयप्रक्रियेवरील प्रभाव यांच्या आधारे एखाद्या देशाची ‘महासत्ता’ म्हणून ओळख निर्माण होते. भारताने या सर्व क्षेत्रांत सामर्थ्यवान व्हावे, याबाबत दुमत असण्याचे कारण नाही. मात्र, शक्तिशाली होणे आणि शक्तीच्या जोरावर जगावर वर्चस्व गाजवणे, यात मूलभूत फरक आहे. सरसंघचालकांच्या ‘विश्वगुरू’ संकल्पनेचा गाभा यातच दडलेला आहे.
भारताने सामर्थ्य मिळवायचे, पण त्या सामर्थ्याचा अंतिम उद्देश वर्चस्व नसून व्यापक कल्याण असावे, असे त्यांना अभिप्रेत आहे. ‘विश्वगुरू’ ही जगाने भारताला बहाल करावयाची प्रतिष्ठा आहे. ती घोषणा करून मिळणार नाही, तर भारताच्या आचरणातून निर्माण होईल. ज्ञान, विज्ञान-तंत्रज्ञान, अर्थव्यवस्था, सामाजिक जीवन आणि जागतिक प्रश्नांवरील भूमिकेत भारताने जगासाठी उपयुक्त योगदान दिले, तरच ही संकल्पना अर्थपूर्ण ठरेल. प्राचीन वैभवाच्या आठवणी सांगून वर्तमानातील श्रेष्ठत्व सिद्ध होत नाही. वर्तमानातील कामगिरी आणि भविष्याची दिशा यांवरच सभ्यतेचा प्रभाव टिकतो. डॉ. मोहनजी भागवत यांनी हिंदू समाजाच्या जागृतीचा अर्थ केवळ स्वतःच्या समुदायाच्या हितापुरता मर्यादित ठेवला नाही. हिंदू जगाच्या विविध भागांत गेला, तेथील समाजात मिसळला, स्थानिक कार्यसंस्कृती स्वीकारली आणि स्वतःची सांस्कृतिक ओळखही जपली, असा त्यांच्या भाषणाचा एकंदरीतच आशय.
आज भारतीय वंशाचे अनेक नागरिक जागतिक कंपन्यांचे नेतृत्व करतात. तंत्रज्ञान, उद्योग, विज्ञान, वैद्यकीय क्षेत्र, शिक्षण आणि सार्वजनिक जीवनात त्यांनी स्थान निर्माण केले आहे. त्यांनी ज्या समाजात काम केले, तेथील गुणवत्ता, शिस्त आणि कार्यसंस्कृती स्वीकारली; त्याचवेळी स्वतःची सांस्कृतिक ओळखही टिकवली. सुंदर पिचाई किंवा सत्या नडेला यांच्यासारख्या व्यक्तींचे उदाहरण याच अर्थाने महत्त्वाचे. स्वतःची मुळे घट्ट असणे आणि जगाचे विचार स्वीकारण्यासाठीही खुले असणे, या दोन गोष्टींचा संघर्ष असण्याचे कारण नाही. स्वतःची सांस्कृतिक ओळख टिकवूनही जागतिक संस्थेचे नेतृत्व करता येते. मात्र, या सर्वसमावेशकतेच्या भाषेकडेही विरोधकांकडून संशयाने पाहिले जाते. सरसंघचालकांनी परदेशात जाऊन सर्वसमावेशकता, बंधुभाव आणि साहचर्याची भाषा केली की त्यामागे राजकीय हेतू किंवा प्रतिमानिर्मिती आहे, अशी बाष्कळ टीका विरोधकांनी केली. एखाद्या विचारसरणीशी मूलभूत मतभेद असणे, हा लोकशाहीचा भाग. पण, सर्वसमावेशकतेचे विधान ऐकले की त्यामागेही खुसपटं काढून कपट शोधणे, ही वैचारिक चिकित्सा ठरते का, हाच खरा प्रश्न.
डोनाल्ड ट्रम्प यांच्या नेतृत्वाखाली अमेरिकेने स्थलांतर आणि प्रवेश धोरणाबाबत कठोर भूमिका घेतली आहे. मुस्लीमबहुल देशांतील नागरिकांवरील प्रवेश निर्बंध आणि बेकायदा स्थलांतराविरोधातील आक्रमक भूमिका यामुळे अमेरिकन राजकारणात कोणाला देशात प्रवेश मिळावा, हा प्रश्न राजकीय संघर्षाचा विषय झाला. पण, हिंदू राष्ट्रवादाशी जोडले गेलेले डॉ. मोहनजी विदेशात उभे राहून विविध समुदायांच्या सहअस्तित्वाची भाषा करतात. हा विरोधाभास इथे मुद्दाम लक्षात घेण्यासारखा आहे. मग पुराणमतवादी आणि प्रगतिशील नेमके कोण? एखादी व्यक्ती उजव्या विचारांची आहे, म्हणून ती प्रत्येक बाबतीत पुराणमतवादी असेलच असे नाही; तसेच स्वतःला प्रगतिशील म्हणवणारी प्रत्येक भूमिका मानवी स्वातंत्र्य आणि विविधतेशी सुसंगत असेलच असेही नाही. विचारांचे मूल्यमापन त्यातून व्यक्त होणार्या मानवदृष्टीवर व्हायला हवे. या कसोटीवर पाहिले, तर डॉ. मोहनजी भागवत यांच्या कॅनडातील भाषणाने एक वैचारिक प्रश्न उपस्थित केला आहे.
कॅनडाचा संदर्भ या प्रश्नाला आणखी धार देतो. भारतीय वंशाचे नागरिक शिक्षण, उद्योग, तंत्रज्ञान आणि व्यवसायाच्या माध्यमातून कॅनडाच्या अर्थव्यवस्थेत योगदान देतात. अनेकांनी तेथील समाजजीवनाचा भाग बनून स्थानिक संस्कृतीशी संवाद साधला आहे. तरीही हिंदू मंदिरांवरील हल्ले, धमया आणि भारतविरोधी फुटीरतावादी प्रचाराच्या घटना घडत असतील, तर कॅनडाच्या बहुसांस्कृतिकतेच्या दाव्याचीही परीक्षा होते. प्रत्येक समुदायाला सुरक्षिततेने आणि सन्मानाने जगण्याचा समान अधिकार असला पाहिजे. खलिस्तानी फुटीरतावादाचा प्रश्नही कॅनडामध्ये गंभीर. भारतविरोधी राजकीय मत व्यक्त करण्याचा अधिकार आणि हिंसा किंवा धमकीची भाषा यांत स्पष्ट फरक आहे. कॅनडाने हा फरक अधिक ठामपणे ओळखण्याची आवश्यकता आहे. बहुसांस्कृतिकता म्हणजे परस्पर सन्मानाची सामाजिक शिस्त आहे, हे लक्षात घ्यायला हवे.
सरसंघचालकांच्या कॅनडामधील भाषणातील आश्रयाचा संदर्भही याच चौकटीत पाहता येतो. भारताने इतिहासात विविध समुदायांना आश्रय दिला. आज भारतातील तरुण शिक्षण, रोजगार आणि व्यवसायासाठी जगाच्या अगदी कानाकोपर्यात पोहोचले आहेत. कॅनडा त्यातील एक प्रमुख केंद्र. त्यामुळे भारतीय समाजाने जगाला काही दिले आणि जगाकडून काही घेतले, ही प्रक्रिया परस्परावलंबी आहे. अशा परिस्थितीत स्थलांतरित भारतीयांकडून स्थानिक समाजाशी समरसतेची अपेक्षा असते, तर त्याचवेळी त्या समाजानेही त्यांच्या सांस्कृतिक आणि धार्मिक अस्तित्वाचा सन्मान करणे आवश्यक आहे. तसेच ‘हिंदू जागा झाला, तर जग जागेल’ या विधानाकडेही या व्यापक संदर्भात पाहावे लागेल. जागृतीचा अर्थ स्वतःची ओळख, कर्तव्य, ज्ञान आणि समाजाप्रति जबाबदारी यांची जाणीव असेल, तर त्यातून जागतिक योगदानाची शक्यता नक्की निर्माण होते.
भारत जगात कोणती भूमिका निभावणार, हा त्यामागचा व्यापक प्रश्न आहे. एकीकडे चीनसारख्या शक्ती आर्थिक आणि सामरिक विस्तारातून आपला प्रभाव वाढवत आहेत, तर दुसरीकडे अमेरिकासुद्धा आपल्या आर्थिक आणि लष्करी सामर्थ्याच्या बळावर जागतिक नेतृत्वाचा दावा करते.
अशा सत्तासंघर्षाच्या ध्रुवीय जगात भारताने आपली स्वतंत्र ओळख आणखी एक महासत्ता, म्हणून निर्माण करायची की सभ्यतागत भूमिका घेऊन पुढे जायचे, हा विचार करण्याचा क्षण आहे. भारताला आर्थिक महासत्ता व्हावे लागेल, यात शंका नाहीच.
एकूणच ‘विश्वगुरू’ होणे म्हणजे जगाला आदेश देणे असा नव्हे; तर जगाला काही देण्याइतके सक्षम होणे हा होय. ‘महासत्ता’ शक्तीने निर्माण होते; ‘विश्वगुरू’ विश्वासाने! भारताने पहिली शक्ती मिळवायलाच हवी, पण दुसर्यासाठी स्वतःच्या सभ्यतागत मूल्यांचे आधुनिक जगाशी नाते जोडावे लागेल. भारताने जगावर राज्य करावे, ही भारतीय सभ्यतेची आकांक्षा नाही; भारत इतका सक्षम आणि विश्वासार्ह व्हावा की त्याने जगाला दिशा दाखवावी, ही ‘विश्वगुरू’ संकल्पनेची खरी व्याख्या! त्यामुळे आमच्या सोमवारच्या संपादकीयात म्हटल्यानुसार, अमेरिकेत सरसंघचालकांनी ‘वसुधैव कुटुम्बकम्’चा विश्वमंचावर हुंकार’ केला, तर कालच्या कॅनडातील संबोधनात भारताची ‘विश्वगुरु’ म्हणून भूमिका अधोरेखित करताना, विश्वमांगल्याचा मूलमंत्र दिला!