मन मोकळे करण्याच्या वाटेवर’जेन झी’

Gen Z
 
 
१९९५ ते २०१२ दरम्यान जन्मलेल्या आणि दोन अब्जांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या ‘जेन-झी’ची लोकसंख्या, जगाच्या सुमारे ३० टक्के आहे. समाजावरील त्यांचा प्रभाव जसजसा वाढतो आहे, तसतशी त्यांच्या मानसिक आरोग्य आणि स्वास्थ्याची आव्हानेही वाढत आहेत. "मी खूप थकलो आहे, मला हे सगळं पेलवत नाही. मला सतत चिंता वाटते, मला मदतीची गरज आहे. मी ‘ब्लॅकआऊट’ झालो आहे,” ही वाये अलीकडे तरुणांच्या बोलण्यात सहज ऐकू येतात. पूर्वी मानसिक त्रासाबद्दल अनेकदा एवढेच म्हटले जाई की, ‘काहीतरी बरे वाटत नाही, मन लागत नाही’ किंवा ‘खूप ताण आला आहे.’ आज मात्र चिंता, नैराश्य, भावनिक थकवा आणि वैयक्तिक मर्यादा अशा संज्ञा तरुणांच्या संवादाचा भाग झाल्या आहेत.
 
हा बदल नेमका काय सांगतो?
 
‘जेन-झी’मध्ये मानसिक आरोग्याचा प्रश्न दिवसेंदिवस अधिकच गंभीर होत आहे. पूर्वीच्या पिढ्यांच्या तुलनेत, या पिढीत चिंता आणि नैराश्याचे प्रमाण अधिक दिसते. पूर्वीच्या पिढ्यांपेक्षा वेगळ्या परिस्थितीत वाढलेल्या ‘जेन-झी’ने, समाजमाध्यमांवरील आभासी जगाचा अनुभव घेतला.
 
‘कोविड-१९’मुळेही त्यांच्या दैनंदिन जीवनात व्यत्यय आल्याने सामाजिक, तसेच शैक्षणिक अपेक्षांचाही दबाव वाढला. या मानसिक आव्हानांमागील कारणे आणि परिणाम समजून घेणे, तरुणांच्या वाढत्या मानसिक आरोग्य समस्यांना प्रभावीपणे सामोरे जाण्यासाठी महत्त्वाचे ठरते
.
२०२३च्या ‘फोर्ब्स’ सर्वेक्षणानुसार, १६ ते २४ वयोगटातील तरुणांना, इतर कोणत्याही वयोगटापेक्षा अधिक एकटेपणा जाणवतो. या सर्वेक्षणात ७३ टक्के ‘जेन-झी’ने कधीकधी किंवा नेहमीच एकटे वाटत असल्याचे सांगितले. आपले जीवन अधिकाधिक सोयीचे होताना, माणसांमधील प्रत्यक्ष संवाद संपतो आहे. त्यामुळेच वाढत्या सोयीच्या बदल्यात, नकळतच एकटेपणाचा अनुभव अधिक येत असल्याचा अंदाज ‘फोर्ब्स’ने व्यक्त केला. अमेरिकेच्या सर्जन जनरलनुसारही, दीर्घकाळ जाणवणारा एकटेपणा आरोग्यासाठी दिवसाला १५ सिगारेट ओढण्याइतकाच घातक ठरू शकतो.
 
मानसिक आरोग्याची भाषा : जाणीव आणि निदान यांच्यातील फरक
 
आज ‘एन्झायटी’, ‘हताशा’, ‘बर्नआऊट’, ‘ट्रॉमा’, ‘टॉसिक’ यांसारख्या मानसिक आरोग्याच्या संज्ञा समाज माध्यम, रील्स, पॉडकास्ट्स आणि ऑनलाईन चर्चांतून तरुणांपर्यंत पोहोचतात. यामुळे मानसिक आरोग्याविषयीची जागरूकता वाढते. मात्र, त्याचवेळी प्रत्येक भावनिक अनुभवाला, मानसिक आजार समजण्याचीही शयता वाढते. परीक्षेपूर्वीची चिंता म्हणजे चिंतेचा आजार नव्हे. अपयशानंतरची निराशा, म्हणजे हताशा नव्हे. काही दिवसांचा थकवा म्हणजे ‘बर्नआऊट’ असेलच, असे नाही. तर, एकटेपणाचा अनुभव म्हणजे, मानसिक आजार नाही.
 
भीती, दुःख, राग, निराशा, असुरक्षितता आणि संभ्रम, या मानवी जीवनातील स्वाभाविक भावनिक अवस्था आहेत. म्हणूनच मानसिक आरोग्याची साक्षरता म्हणजे प्रत्येक भावनेचे वैद्यकीय निदान करणे नसून, होत असलेला त्रास सामान्य भावनिक प्रतिक्रिया आहे की नाही, असल्यास त्यासाठीच्या उपचारांची ओळखण्याची समज विकसित करणे होय. कदाचित मानसिक आरोग्याच्या नव्या भाषेची खरी ताकद इथेच आहे.
 
पूर्वी मानसिक आरोग्याच्या समस्या, अनेकदा कमजोरीचे लक्षण मानल्या जात. समाज माध्यमांचे तोटे स्पष्ट असले, तरी ते मानसिक आरोग्याबाबत चिंता व्यक्त करण्यासाठीचे ते एक प्रभावी व्यासपीठ आहे. आज मानसिक अडचणी, भावना आणि अनुभव इतरांपर्यंत पोहोचवणे, पूर्वीपेक्षा कितीतरी सोपे झाले आहे.
 
‘जेन-झी’च्या मानसिक समस्यांमागील एक महत्त्वाचा घटक म्हणजे, डिजिटल जगातील तिची जडणघडण! याचा प्रभाव त्यांची संवाद पद्धती, जगाकडेे पाहण्याचा दृष्टिकोन, तसेच आत्ममूल्याच्या भावनेवरही आहे. विविध अभ्यासांनुसार, समाज माध्यमांवरील वाढता संपर्क अनेकदा, अस्वस्थ करणार्‍या तुलनेलाच जन्म देतो. इतरांचे यश, रूप किंवा जीवनशैलीमुळे, स्वतःबद्दल न्यूनगंड, असमाधान आणि चिंता वाढू शकते.
 
प्रत्यक्ष मानवी संवादातून मिळणारी भावनिक जवळीक आणि मानसिक समाधान, डिजिटल संवादातून तेवढेच मिळेल असे नाही. यामुळे काही तरुणांमध्ये सामाजिक अलिप्ततेची भावना वाढू शकते. ‘कोविड-१९’ महामारीने ही परिस्थिती आणखी तीव्र केली. प्रत्यक्ष भेटीगाठी, शाळा-महाविद्यालयातील अनुभव आणि सामाजिक संवाद अचानक थांबल्याने, तरुणांचे ऑनलाईन जगावरील अवलंबित्त्व वाढले. प्रत्यक्ष जीवनातील काही अनुभव जगताच न आल्याने, नाती निर्माण करणे आणि मानसिक स्वास्थ्य टिकवणे, ही आव्हाने अधिकच ठळक झाली.
 
पूर्वीच्या पिढ्यांसमोर शिक्षण, नोकरी आणि जीवनातील अनेक टप्प्यांचे तुलनेने निश्चित मार्ग उपलब्ध होते. आजची ‘जेन-झी’ मात्र वेगाने बदलणार्‍या जगात वाढते आहे. अस्थिर रोजगार, बदलती कार्यसंस्कृती आणि वाढती आर्थिक अनिश्चिततेमुळे, भविष्यासंबंधी संभ्रम, चिंता आणि स्वतःबद्दलच्या शंकेला खतपाणी मिळू शकते. त्यातच शैक्षणिक आणि सामाजिक अपेक्षांचा दबावही वाढला आहे. चांगले गुण, उच्च उत्पन्नाची नोकरी आणि समाजाच्या अपेक्षांनुसार यशस्वी ठरणे, या अपेक्षा तरुणांच्या मनावर ओझे निर्माण करू शकतात.
 
मदत मागण्याची मानसिकता बदलते आहे
 
‘जेन-झी’बद्दल दिसणारा एक सकारात्मक बदल म्हणजे, मानसिक त्रासाबद्दल मोकळेपणाने बोलण्याची त्यांनी दाखवलेली तयारी. मानसिक आरोग्य हा लाज वाटण्याचा विषय नसून, तो शारीरिक आरोग्याइतकाच जीवनाचा महत्त्वाचा भाग आहे, ही जाणीव दृढ होत आहे.
 
मात्र, मदत मागण्याची संस्कृती ही केवळ तरुणांची जबाबदारी नाही; आजूबाजूच्या लोकांची प्रतिक्रियाही तितकीच महत्त्वाची असते. एखादा तरुण धैर्य एकवटून म्हणतो, "मला मानसिकदृष्ट्या खूप त्रास होत आहे” आणि त्याला उत्तर मिळते, "तुझ्या वयात आम्हीही खूप काही सहन केले,”
 
तर, त्याच्या मनातील संवादाची दारे तिथेच बंद होऊ शकतात. पण त्याऐवजी "काय होतंय? मला सांग,” असे उत्तर मिळाल्यास परिस्थिती बदलू शकते. कधीकधी समस्या लगेच सोडवण्यापेक्षा, समोरच्याचे शांतपणे ऐकून घेणे हीच मदतीची पहिली पायरी ठरते. पूर्वीच्या पिढ्यांच्या तुलनेत ‘जेन-झी’ आपल्या मानसिक आरोग्याच्या अडचणींबद्दल अधिक मोकळेपणाने बोलतात.
 
आपल्या भावना ओळखणे, त्याबद्दल व्यक्त होणे, गरज भासल्यास मदत घेणे आणि मानसिक आरोग्याविषयी जागरूकता वाढवणे, यासाठी ही पिढी अधिक पुढाकार घेत आहे.




प्रो. डॉ. शुभांगी रघुनाथ पारकर

प्रोफेसर डॉ शुभांगी रघुनाथ पारकर, या एमबीबीएस, एमडी, पीएचडी, ज्येष्ठ मनोचिकीत्सक आणि आंतरराष्ट्रीय संशोधक असून. केईएम हॉस्पिटल, मुंबई येथे माजी अधिष्ठाता होत्या. जागतिक पातळीवर संशोधन लेखनासाठी त्याना अनेक पुरस्कार मिळाले आहेत. मनोविकार, मानसिक आरोग्य आणि सकारात्मक मानसशास्त्र या विषयांवर विविध वृत्तपत्रांत आणि दिवाळी अंकात विपुल लेखन करत जनजागृती करत असतात.
संबंधित मजकूर