डॉक्टर, मला खाण्याचं व्यसन लागलंय!

    01-Sep-2026

Food addiction
 
 
साधारणपणे व्यसन म्हटले की, आपल्याला अमली पदार्थच डोळ्यासमोर येतात. मात्र, खाण्याचेही व्यसन लागू शकते. अलीकडे सतत खायची इच्छा होते म्हणणारे अनेक जण दिसतात. त्यामागची कारणे काय, उपाययोजना यांचा आढावा घेणारा हा लेख...
 
ताण, सूज आणि खाण्याचं दुष्टचक्र आपल्याला समजून घ्यायला हवं. ‘डॉटर, मला खाण्याचं व्यसन लागलंय,’ अशी तक्रार घेऊन ४० वर्षांचा अमित माझ्यासमोर बसला होता. चेहर्‍यावर थकवा, डोळ्यांत निराशा. ’घरात ताण आहे, ऑफिसमध्ये ‘टार्गेट’चा ताण आहे. काहीतरी बिनसलं की पिझ्झा, बर्गर, चिप्स किंवा गोड खाल्ल्याशिवाय चैनच पडत नाही. खाल्ल्यावर दोन मिनिटं बरं वाटतं. मग शरीर जड होतं, पोट फुगतं, वजन वाढतं. वजन वाढलं की अपराधी वाटतं आणि पुन्हा तेच खावंसं वाटतं. हे चक्र कधी थांबणार?’ हा प्रश्न फक्त अमितचा नाही; आज लाखो लोकांचा आहे.
 
खाण्याचं व्यसन म्हणजे नेमकं काय? भूक लागल्यामुळे खाणं, ही शरीराची नैसर्गिक गरज. मात्र मानसिक अस्वस्थता, ताण किंवा भावनिक कारणांमुळे खाणं सुरू झालं, तर ते हळूहळू व्यसनाच्या दिशेने जातं. ताणामुळे शरीरात ‘कॉर्टिसॉल’ हे संप्रेरक वाढते. त्याचवेळी मेंदूला पटकन आनंद देणारे पदार्थ जसे की, साखर, मैदा, तळलेले पदार्थ खाण्याची यांची तीव्र इच्छा निर्माण होते. हे पदार्थ काही क्षणांसाठी ‘डोपामिन’ वाढवून, तात्पुरता आनंद देतात. मात्र, हा आनंद अल्पकाळ टिकतो आणि पुन्हा तीच ओढ निर्माण होते. यालाच आधुनिक विज्ञानात ’रिवर्ड लूप’ म्हणतात.
 
सूज आणि वजन वाढण्याचा संबंध : अनेकांना वाटतं की वजन वाढल्यामुळे सूज येते. प्रत्यक्षात अनेकदा शरीरातील सूज आधी वाढते आणि त्यानंतर वजन वाढण्याची प्रक्रिया सुरू होते.
 
शरीरातील दीर्घकालीन सूजेमुळे
  • इन्सुलिन रेझिस्टन्स वाढतो
  • चरबी साठू लागते
  • थकवा वाढतो
  • हार्मोन्सचा समतोल बिघडतो
  • गोड आणि जंक फूडची इच्छा अधिक तीव्र होते
  • म्हणूनच वजन कमी करण्यासाठी केवळ कॅलरी मोजणे पुरेसे नाही; सूज कमी करणेही तितकेच महत्त्वाचे आहे.
खाण्याचं व्यसन आणि व्हिटॅमिन कमतरतेचा संबंध : अनेक वेळा खाण्याची अनियंत्रित इच्छा ही केवळ सवयच नसते, तर शरीरातील पोषणतत्त्वांच्याही कमतरतेचे ते संकेत असतात.
व्हिटॅमिन कमतरतेचे शरीरावर होणारे परिणाम :
  • व्हिटॅमिन ‘ई१२’ कमी असल्यास थकवा, चक्कर येणे, स्मरणशक्ती कमी होणे, हाता-पायांत मुंग्या येणे
  • व्हिटॅमिन ‘सी’च्या कमतरतेमुळे हाडे दुखणे, नैराश्य, सतत थकवा
  • लोहाची कमी असल्यास अशक्तपणा, श्वास लागणे, केस गळणे, आंबट व थंड पदार्थ खाण्याची इच्छा होणे
  • मॅग्नेशियम कमी असल्यास चिडचिड, झोप न लागणे, स्नायू आखडणे
  • झिंक कमी असल्यास चव कमी लागणे, त्वचेचे विकार, जखमा उशिरा बर्‍या होणे
अशा कमतरतांमुळे मेंदू सतत काहीतरी खाण्याचा सिग्नल देतो. विशेषतः गोड, चॉकलेट आणि जंक फूडची ओढ वाढते. म्हणजेच कधीकधी खाण्याचं व्यसनही, प्रत्यक्षात शरीराचा ’डिफिशियन्सी सिग्नल’ असतो.
 
मला मधुमेह आहे; म्हणून गोड जास्त आठवतं!
 
अनेक मधुमेही रुग्णांची कायम तकार असते की, "डॉटर, गोड खाऊ नका, असं सांगितलं की, तेच जास्त आठवतं.” यामागे मानसशास्त्रीय कारण आहे. ज्या गोष्टीवर पूर्ण बंदी घातली जाते, त्याच गोष्टीकडे मन अधिक आकर्षित होतं. त्यामुळे हे खायचंच नाही असं म्हणण्यापेक्षा कधी, किती आणि कसं खायचं, हे शिकणंच अधिक उपयुक्त.
 
आपल्या पोटातील जीवाणूही
आपल्याला खायला लावतात?
 
होय, आतड्यात अब्जावधी सूक्ष्मजीव राहतात, ज्यांना Gut Microbiome म्हणतात. सतत साखर आणि जंक फूड खाल्ल्यास, अशा पदार्थांवरच वाढणार्‍या जीवाणूंची संख्या वाढते. हे जीवाणू मेंदूशी संवाद साधणार्‍या रसायनांवर परिणाम करतात, त्याने पुन्हा त्याच प्रकारच्या अन्नाची मागणी वाढते. म्हणजे कधीकधी तुम्ही नाही, तर तुमच्या आतड्यातील जीवाणूही खाण्याची इच्छा निर्माण करत असतात.
 
शरीरातील विपरीत गुण आणि खाण्याची इच्छा
 
आयुर्वेदात ‘विपरीत गुण सिद्धांत’ सांगितला आहे. शरीरात ज्या घटकाची कमतरता असते, त्याविरुद्ध गुणधर्म असलेल्या अन्नाची इच्छा वाढते. उदाहरणार्थ-
 
  • उष्णता वाढली, तर थंड पदार्थांची इच्छा
  • कोरडेपणा वाढला, तर तेलकट पदार्थांची इच्छा
  • थकवा वाढला, तर गोड पदार्थांची इच्छा
  • लोह कमी असेल, तर विशिष्ट चवींची ओढ
  • सोडियम कमी असेल, तर खारट पदार्थांची इच्छा
  • सहा चवी आणि त्यांचा शरीरावर परिणाम
  • आयुर्वेदानुसार सहा मूलभूत चवी पुढीलप्रमाणे आहेत, गोड, आंबट, खारट, तिखट, कडू, तुरट. या चवी आवश्यक आहेत, मात्र त्यांचा अतिरेक झाल्यास आरोग्याच्या समस्या निर्माण होऊ शकतात.
ताणावर नियंत्रण कसे मिळवावे?
  • दररोज ३० मिनिटे चालणे
  • योगाभ्यास/सूर्य नमस्कार
  • प्राणायाम
  • ध्यान
  • पुरेशी झोप
  • मोबाईलमुक्त वेळ
  • कुटुंबासोबत जेवण
  • निसर्गात वेळ घालवणे
पादांशिक क्रम म्हणजे काय?
  • मोठा बदल एका दिवसात होत नाही. पादांशिक क्रम म्हणजे, सवयींमध्ये टप्प्याटप्प्याने बदल करणे. उदाहरणार्थ-
  • पहिला आठवडा - तीन बिस्किटांऐवजी दोन
  • दुसरा आठवडा - दोनऐवजी एक
  • तिसरा आठवडा - आठवड्यातून दोन दिवस टाळणे
  • चौथा आठवडा - फळे किंवा सुका मेवा
  • खाण्याचं व्यसन कमी करण्यासाठी दहा सोपे उपाय
  • भूक आणि इच्छा यांतील फरक ओळखा
  • जेवणापूर्वी थोडे कोमट पाणी प्या
  • हळूहळू चावा
  • मोबाईल पाहात जेवू नका
  • जंक फूड घरात ठेवू नका
  • झोप पूर्ण घ्या
  • प्रथिने वाढवा
  • नियमित व्यायाम करा
  • ताण आल्यावर श्वासावर लक्ष केंद्रित करा
  • स्वतःला दोष देऊ नका
शेवटी, मी अमितला एवढंच सांगितलं, "तुला अन्न सोडायचं नाही, अन्नाशी असलेलं चुकीचं नातं बदलायचं आहे. खाण्याचं व्यसन हा स्वभावदोष नाही; तो मेंदू, हार्मोन्स, आतडे आणि पोषणतत्त्वांच्या कमतरतेचा एकत्रित परिणाम आहे. योग्य आहार, व्यायाम, ताण-नियंत्रण आणि पादांशिक क्रमाने सवयी बदलल्या, तर या व्यसनातून मुक्ती शय आहे.” लक्षात ठेवा, जिभेवरचा क्षणिक आनंद आणि आयुष्यभराचं आरोग्य यांत निवड करण्याची शक्ती आपल्यातच आहे.
 
  • बिंदूपासून बिंदूपर्यंतचा प्रवास
  • आरोग्याचा रोज नवा ध्यास
  • संयमाचे असावे कवच खास
  • मनावर नियंत्रणाचा लगाम
  • जिभेचे चोचले म्हणजे प्रज्ञापराध.
  • उतारा हमखास, व्यसनमुक्तीचा बोध
कोणते पदार्थ सूज वाढवतात?
  • जास्त साखर
  • कोल्ड ड्रिंस
  • मैद्याचे पदार्थ
  • बिस्किटे, केक, पेस्ट्री
  • चिप्स, नमकीन
  • डीप फ्राईड पदार्थ
  • प्रक्रिया केलेले खाद्यपदार्थ
  • ट्रान्स फॅट्स
  • वारंवार बाहेरचे अन्न
  • जास्त मद्यपान
सूज कमी करणारे पदार्थ
 
  • ताज्या हंगामी भाज्या
  • विविध रंगांची फळे
  • आवळा
  • हळद
  • आले
  • लसूण
  • जवस, तीळ
  • ताक
  • मूग
  • तूप (योग्य प्रमाणात)
  • कडधान्ये
  • घरचे ताजे जेवण

डॉ. मधुरा कुलकर्णी
(लेख ‘आरोग्य भारती’ द्वारे प्रकाशित)




संबंधित मजकूर