‘केशवसृष्टी’च्या माध्यमातून ग्रामीण स्तरावर निरंतर कार्य करणार्या वाड्याच्या आशा खुडे. महादेव कोळी समाजाच्या आशा समाजाच्या उन्नतीच्याही आशा आहेत. त्यांच्या कार्याचा मागोवा...
काही वर्षांपूर्वीची घटना. सामाजिक कार्यकर्ता म्हणून आशा त्या गावात गेल्या. गावातल्या त्या घरातून महिलेच्या रडण्याचा-विव्हळण्याचा आवाज येत होता. आशा सरळ घरात गेल्या. तिथले दृश्य पाहून संताप, दुःख आणि वेदना या भावना एकत्रितरीत्या त्यांच्या मनात निर्माण झाल्या. कारण, बाळंतकळा आलेली महिला जमिनीवर रडत-विव्हळत होती आणि तिच्या पोटावर एक बाई पाय देऊन दाब देत होती. का, तर म्हणे, कळा देऊनही त्या महिलेचे बाळ पोटातून बाहेर येत नव्हते. आशा यांनी त्या तथाकथित सुईण बाईला बाजूला केले. वेदनेने रडणार्या महिलेला धीर दिला आणि तिच्या पतीला समाजावले की, "काही अंतरावरच रुग्णालय आहे. बाळ बाहेर येत नाही, म्हणून पोटावर पायाने दाब दिला, तर आई आणि बाळ दोघांच्याही जीवाला धोका होऊ शकतो.” शेवटी त्याला खूप समजावल्यावर तो पत्नीला घेऊन दवाखान्यात गेला. बाळ आणि आई सुखरूपणे वाचले. हा प्रसंग आशा यांच्या मनावर खोलवर आघात करून केला. त्यांनी ठरवले की, समाजातील या समस्यांवर जागरण करायलाच हवे; त्यासाठी काम करायलाच हवे. याच आशा आज ‘केशवसृष्टी’च्या ग्रामविकास प्रकल्पाच्या समनव्यक (सीईओ) आहेत.
तसेच वाडा तालुक्यातील ‘केशवसृष्टी’प्रणित पिशवीनिर्मिती उद्योगामध्ये त्या खजिनदार असून १८९ गावांतील ग्रामसभेच्या त्या समन्वयक आहेत. आरोग्य, शिक्षण, कृषी आणि उद्योग या चार क्षेत्रांत ‘केशवसृष्टी’चे पालघरच्या पाच तालुक्यांमध्ये काम चालते. यामध्ये १८९ गावे सहभागी आहेत. त्यांपैकी १४४ गावांमध्ये ‘माधव शिक्षण केंद्र’, तर ५१ गावांत स्वास्थ्य आयाम, ५७ गावांमध्ये कृषीविषयक यशस्वीपणे काम सुरू आहे. या सर्व कामांचे समन्वयन आशा करतात. आशा यांनी ‘केशवसृष्टी’च्या या सर्व कामामध्ये स्वतःला झोकून दिले.
अर्थात, त्यालाही कारण आहे. वाडा तालुक्यातील वस्तीमध्ये राहात असताना त्यांनी समाजाच्या समस्या जवळून पाहिल्या होत्या. आई आणि नवजात बालकासंदर्भातील अनेक समस्या, बालविवाह. त्यामुळे नकळत्या वयात आई होण्याचे प्रमाणही मोठे आहे. बालमातांच्या मृत्यूचे प्रमाणही त्यामानाने जास्त. या सगळ्याचा एकत्रित परिणाम म्हणून बालिकांना होणारी अपत्येही कुपोषित असतात. हे दुष्टचक्र सुरूच असते. आशा यांनी पाहिले होते की बाळ जर वजनाने कमी असेल, तर गावातले लोक बाळाला अंगारे-धुपारे करत, त्याला वाईट नजर आहे, असे त्यांना वाटे. पण, या सगळ्यामुळे अनेकदा बाळ दगावत असे. या समस्यांची तीव्रता आशा यांनी अनुभवली होती. त्यांचाही विवाह अल्पवयातच झाला होता. वयाच्या १७व्या वर्षी त्याही आई झाल्या होत्या. दुसरीकडे, त्यांनी अनेक बालमातांना होणारा त्रासही पाहिला होता. अचानक रक्तदाब वाढणे, अस्वस्थ वाटून जिवावर बेतणे, या घटना तर बालमातांसोबत नेहमी होत असत. त्यामुळे बालमातांची होणारी ससेहोलपट थांबलीच पाहिजे, यासाठी आशा यांनी काम करायचे ठरवले. त्या दिशेने त्यांनी काम करायला सुरुवात केली आणि समाजकारणाच्या अवघड वाटा सोप्या होत गेल्या.
मूळचे अहिल्यानगरचे, पण कामानिमित्त वाडा तालुक्यात स्थायिक झालेले लहु उगले आणि सखुबाई उगले हे दाम्पत्य. महादेव कोळी समाजाचे हे जोडपे अत्यंत समाजशील आणि कष्टकरी. लहु हे वनविभागात नोकरीला होते, तर सखुबाई गृहिणी. उभयंताना चार अपत्यं. त्यांपैकी एक आशा. आशा या बालपणापासूनच अभ्यासात हुशार होत्या. त्यांना खूप शिकायचे होते; पण वयाच्या १६-१७व्या वर्षीच त्यांचा विवाह संतोष खुडे यांच्याशी झाला. पुढे वयाच्या १७व्या वर्षीच आशा यांना पहिले अपत्य झाले. घरदार शेतीभाती सांभाळत त्यांनी आजूबाजूच्या महिलांसाठीही काम सुरू केले.
बालविवाह, अंधश्रद्धा, कुपोषण अनेक समस्या होत्या. आशा याबाबत महिलांचे समुपदेशन करत. याच काळात त्या ‘आशा सेविका’ म्हणूनही काम करू लागल्या. समाजात आणि मुख्यतः महिलांमध्ये आरोग्याबाबत किती अनास्था आहे, हे त्यांना लक्षात आले. नियमित कामाच्या बाहेर जाऊन संवेदनशीलतेने त्यांनी महिलांच्या प्रश्नावर काम करायला सुरुवात केली. याच काळात त्यांचा एका स्वयंसेवी संस्थेशी संपर्क आला. त्या माध्यमातून त्यांनी आदिवासी पाड्यांमध्ये विविध विषयांवर काम केले. काम करता करता त्यांना ‘केशवसृष्टी’मध्ये काम करण्याची संधी मिळाली. त्यांनी या संधीचे सोने केले. ‘केशवसृष्टी’चे विमल केडिया यांच्या विचारकार्याची प्रेरणा घेऊन त्यांनी आदिवासी समाजाच्या सर्वांगीण उत्थानासाठी विविध स्तरांवर काम सुरू केले. हे करत असतानाच, जवळजवळ १५ वर्षांपूर्वी सुटलेले शिक्षण त्यांनी पुन्हा सुरू केले. पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले आणि आता त्या ‘एलएलबी’च्या तृतीय वर्षाचे शिक्षण घेत आहेत. आपल्या समाजकार्याच्या अनुभवाचा उपयोग समाजाच्या प्रगतीसाठी करत राहणार, असे आशा खुडे म्हणतात. म्हणूनच आदिवासी समाजाला प्रगतीची दिशा देणार्या आशा खुडे यांचे कार्य समाजासाठी प्रेरणादायी आहे.