भारताच्या दक्षिण टोकाकडे प्रवास करताना भूगोलाबरोबरच मंदिरांची भाषाही बदलत जाते. उत्तरेतील आकाशाला भिडणारी शिखरे मागे पडतात आणि केरळमच्या हिरव्यागार भूमीत उतरत्या छपरांच्या, पावसाशी संवाद साधणार्या वास्तूंचे एक वेगळे विश्व समोर येते. नारळाची बने, समुद्राकडून येणारे दमट वारे आणि वर्षानुवर्षे अखंड कोसळणारा पाऊस या सगळ्यांनी केरळम्च्या मंदिर स्थापत्याला स्वतःची स्वतंत्र ओळख दिली. याच भूमीच्या दक्षिण टोकाला वसलेले तिरुवनंतपुरम् म्हणजेच, ‘अनंताचे पवित्र नगर’ आणि या शहराच्या नावापासून त्याच्या इतिहासापर्यंत सर्वकाही ज्याच्याभोवती फिरते, तो आहे श्री पद्मनाभस्वामी... आजच्या लेखात अशा या धार्मिक, सांस्कृतिकदृष्ट्या महत्त्वाच्या मंदिराचे माहात्म्य जाणून घेऊया...
आज पद्मनाभस्वामी मंदिराचा उल्लेख झाला की, अनेकांच्या मनात सर्वप्रथम येतो तो मंदिराच्या तळघरात सापडलेल्या प्रचंड संपत्तीचा विषय. पण, या मंदिराला केवळ ‘श्रीमंत मंदिर’ म्हणून पाहणे म्हणजे, हजारो वर्षांच्या एका विलक्षण सांस्कृतिक प्रवासाकडे पाठ फिरवण्यासारखे आहे. वैष्णव भक्ती, दक्षिण भारतीय राजकारण, केरळी आणि द्राविड स्थापत्य, त्रावणकोरचे राजघराणे आणि राजा व देव यांच्यातील एक अद्वितीय नाते या सर्वांचा संगम म्हणजे पद्मनाभस्वामी मंदिर.
हे मंदिर नेमके कधी उभारले गेले, याचे निश्चित उत्तर आज उपलब्ध नाही. त्याचे मूळ इतिहासाच्या पलीकडे आख्यायिकांच्या प्रदेशात जाते. भागवत परंपरेत बलरामाने या तीर्थाला भेट देऊन पद्मतीर्थात स्नान केल्याचा उल्लेख सांगितला जातो. वैष्णव भक्तिपरंपरेतील १२ आळवार संतांपैकी नम्माळवारांनी पद्मनाभाची स्तुती करणारी दहा स्तोत्रे रचली. त्यामुळे हे मंदिर वैष्णव परंपरेतील पवित्र १०८ दिव्य देशांपैकी एक मानले जाते. स्थानिक परंपरेत दिवाकर मुनी आणि विल्वमंगलम् स्वामी यांच्याशीही मंदिराच्या उत्पत्तीच्या कथा जोडल्या गेल्या आहेत. इतिहास आणि आख्यायिका येथे इतया सहजपणे एकमेकांत मिसळतात की, त्यांची सीमा शोधण्यापेक्षा त्यामागील अखंड श्रद्धापरंपरा समजून घेणे अधिक महत्त्वाचे ठरते.
मंदिराच्या पूर्वेकडील प्रवेशद्वारासमोर उभे राहिल्यावर सर्वप्रथम लक्ष वेधून घेते ते भव्य गोपुरम्. केरळम्च्या पारंपरिक मंदिरांमध्ये आढळणार्या उतरत्या छपरांच्या स्थापत्यापेक्षा हे दृश्य वेगळे आहे. पद्मनाभस्वामी मंदिरात केरळी आणि द्राविड स्थापत्यपरंपरांचा सुंदर संगम घडलेला दिसतो. गोपुराची पायाभरणी १६व्या शतकात झाली आणि पुढे त्रावणकोरच्या राजांच्या काळात त्याला आजचे स्वरूप प्राप्त झाले. मंदिराभोवतीचे प्राकार, विशाल दगडी मार्ग, मंडप, लाकूड आणि दगडाचा संतुलित वापर, भित्तिचित्रे आणि समोरचे पद्मतीर्थम् या सर्वांमुळे संपूर्ण परिसर स्वतंत्र धार्मिक नगरासारखा भासतो.
मंदिरातील दगडी स्तंभमालिका विशेष उल्लेखनीय आहेत. उत्सवमूर्तींच्या प्रदक्षिणेसाठी बांधलेला विशाल श्रीबलिप्पुरा, एकसंध दगडातून तयार केलेला ओट्टक्कल मंडपम्, विविध देवतांची शिल्पे आणि भित्तिचित्रे यांमधून त्रावणकोरच्या कलाकारांचे कौशल्य दिसून येते. मंदिराच्या आज दिसणार्या स्वरूपावर १८व्या शतकातील पुनर्बांधणीचा मोठा प्रभाव आहे. १६८६ मध्ये मंदिराला भीषण आग लागल्याची नोंद आहे. पुढे १८व्या शतकात मंदिराच्या पुनर्रचनेला मोठी गती मिळाली. पण, या संपूर्ण वास्तूचा आत्मा दडलेला आहे, गर्भगृहात!
येथे भगवान विष्णू उभे नाहीत. ते युद्धाच्या तयारीतही नाहीत. ते अनंतशयनात आहेत- आदिशेषाच्या वेटोळ्यांवर विसावलेले, योगनिद्रेत मग्न असलेले श्री पद्मनाभ. विष्णूच्या नाभीतून कमळ उगवते आणि त्या कमळावर सृष्टिकर्ता ब्रह्मा विराजमान होतो. या एका प्रतिमेत भारतीय विश्वकल्पनेचा विलक्षण आशय सामावलेला आहे. विष्णू म्हणजे विश्वाला धारण करणारे ‘चैतन्य’, अनंत म्हणजे ज्याला आरंभ आणि अंत नाही असा ‘काल’ आणि विष्णूच्या नाभीतून जन्मणारा ब्रह्मा म्हणजे पुन्हापुन्हा घडणारी ‘सृष्टी’!
या मूर्तीचे दर्शनही विलक्षण आहे. देवतेचे विशाल स्वरूप एकाच दारातून पूर्णपणे पाहता येत नाही. गर्भगृहासमोरील तीन स्वतंत्र द्वारांतून अनुक्रमे मुख आणि वक्षस्थळ, नाभीतून प्रकटणारा कमल-ब्रह्मा आणि चरणांचे दर्शन घ्यावे लागते. जणू अनंताचे संपूर्ण स्वरूप एका मानवी दृष्टिक्षेपात सामावूच शकत नाही, हा तात्त्विक विचारच स्थापत्य आणि दर्शनपद्धतीतून व्यक्त झाला आहे.
पद्मनाभस्वामी मंदिराच्या इतिहासाला सर्वांत नाट्यमय वळण मिळते ते १८व्या शतकात. अनिझम् तिरुनाळ मार्तंड वर्मा यांनी छोट्या वेणाड राज्याचे रूपांतर शक्तिशाली त्रावणकोर राज्यात केले. डचांसारख्या युरोपीय सत्तेला ‘कोलाचेल’च्या युद्धात पराभूत करणार्या या राजाने आपले राज्य बळकट केले; पण त्यानंतर केलेली एक कृती भारतीय राजकीय इतिहासात जवळजवळ अद्वितीय ठरली.
इ.स. १७५० मध्ये मार्तंड वर्मांनी ‘त्रिप्पडिदानम्’ करून संपूर्ण त्रावणकोर राज्य श्री पद्मनाभाच्या चरणी अर्पण केले. राजा स्वतः राज्याचा मालक न राहता देवाचा सेवक - ‘श्री पद्मनाभदास’ झाला. पुढील त्रावणकोर राजांनीही हीच उपाधी धारण केली. प्रतीकात्मकदृष्ट्या ‘श्री पद्मनाभ’ हा राज्याचा सार्वभौम झाला आणि राजा त्याच्या वतीने राज्यकारभार करणारा सेवक! सत्ता आणि भक्ती यांचा असा संगम भारतीय इतिहासात क्वचितच पाहायला मिळतो.
याच राजाश्रयामुळे मंदिराला मोठ्या प्रमाणावर संपत्ती, जमीन, दागदागिने आणि विविध प्रकारची अर्पणे प्राप्त होत गेली. शतकानुशतके राजघराणे, सरदार, व्यापारी आणि भाविकांनी केलेल्या दानातून मंदिराच्या भांडारात प्रचंड संपत्ती जमा झाली. २०११ नंतर सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली काही भूमिगत कक्षांची सूची तयार करण्याची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर सोने, रत्ने, दागिने, नाणी आणि ऐतिहासिक वस्तूंच्या प्रचंड संग्रहामुळे हे मंदिर जगभर चर्चेत आले. परंतु, त्यानंतर निर्माण झालेल्या ‘शापित तिजोरी’, ‘नागबंधन’ आणि गूढ दरवाजांच्या अनेक कथा इतिहासापेक्षा कल्पनारंजनाच्या अधिक जवळ आहेत. या संपत्तीचे खरे महत्त्व तिच्या आर्थिक मूल्यापेक्षा ती शतकानुशतकांच्या धार्मिक आश्रयाची साक्ष आहे, यात आहे.
पद्मनाभस्वामी मंदिर समजून घ्यायचे असेल, तर तिजोरीकडून नजर हटवून गर्भगृहाकडे पाहावे लागते. येथे एकीकडे अनंतावर विसावलेला विष्णू सृष्टीच्या चिरंतन प्रवाहाची आठवण करून देतो, तर दुसरीकडे एका सामर्थ्यशाली राजाने आपली सत्ता त्याच देवाच्या चरणी ठेवलेली दिसते. स्थापत्य, राजकारण, तत्त्वज्ञान आणि भक्ती यांचे असे एकमेकांत मिसळलेले रूप फार थोड्या मंदिरांमध्ये अनुभवायला मिळते.
आज तिरुवनंतपुरमच्या गजबजलेल्या शहरात पद्मनाभस्वामीच्या गोपुरासमोर उभे राहिल्यावर या मंदिराची खरी श्रीमंती कदाचित नव्याने समजते. ती केवळ भूमिगत कक्षांतील सोन्यात नाही, ना रत्नजडित अलंकारांमध्ये; ती आहे नम्माळवारांच्या भक्तीत, अनंतशयनातील विष्णूच्या विश्वकल्पनेत, शतकानुशतके चालत आलेल्या पूजापरंपरेत आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे, राज्य जिंकूनही स्वतःला त्याचा मालक न मानता ते देवाच्या चरणी अर्पण करणार्या एका राजाच्या विलक्षण विचारात!
कदाचित, श्री पद्मनाभस्वामी मंदिराचा सर्वांत मोठा खजिना कोणत्याही बंद तिजोरीत नाही, तो याच विचारात दडलेला आहे.
इंद्रनील बंकापुरे