आज, दि. ९ ऑगस्ट ‘पद्मश्री’ रमेश पतंगे यांचा जन्मदिवस. त्यानिमित्ताने लेखक, विचारवंत, पत्रकार, समाजचिंतक अशा विविध भूमिका पार पाडताना संघाचा विचार प्रकट करणार्या रमेश पतंगे यांचे शब्दचित्र रेखाटणारे ‘संघ जगणारा माणूस’ हे पुस्तक आज ‘विवेक प्रकाशन’च्या माध्यमातून प्रकाशित होत आहे. त्यानिमित्ताने पुस्तकातील एक प्रकरण ‘वैश्विक शोधयात्रा’ देत आहोत.
आपल्या समाजाचे स्वभाववैशिष्ट्य असे आहे की, समाज आजच्या समस्यांची आणि प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी इतिहासाचा आधार घेतो. आज ज्या सामाजिक समस्यांमुळे आपण त्रस्त झालो आहोत, त्या समस्यांचे स्वरूप इतिहासात कसे होते, आपल्या पूर्वजांनी त्या समस्यांचे निराकरण कसे केले इत्यादी गोष्टींवर सातत्याने चर्चा आणि संशोधन सुरू असते. हिंदू समाजाच्या अनेक समस्या आहेत. जातिभेद, अस्पृश्यता या गोष्टी तर हिंदू समाजाला ‘गोचिडी’सारख्या चिकटलेल्या आहेत. संविधानाच्या कायद्याने त्या निरस्त झाल्या असल्या, तरी आजही जातिभेद, अस्पृश्यता नव्या-नव्या स्वरूपात समोर येत असते आणि समाजचिंतकासमोर आव्हान उभे करते. हिंदू समाजात जातिभेद, अस्पृश्यता यांची शिकार झालेल्या समाजाला ‘दलित’ म्हणून ओळखले जाते. या समाजाच्या पलीकडे आणखी एक समूह आहे, त्याला ‘भटक्या-विमुक्त जाती व जमाती’ असे म्हटले जाते. या समाजाची स्थिती दलितांपेक्षाही वाईट. कारण, सांगायला गाव नाही, राहायला घर नाही; ‘चोर’, ‘भामटा’, ‘दरोडेखोर’ हीच सामाजिक ओळख असलेल्या भटया-विमुक्त समूहाला सक्षम बनवण्यासाठी संघाचे प्रयत्न सुरू झाले आणि एक जाज्ज्वल्य इतिहास असलेल्या आपल्या समाजबांधवांना अनास्थेच्या अंध:कारमय जगात ढकलून आपण किती मोठे सामाजिक पाप केले आहे, हे लक्षात येऊ लागले.
आपण केलेल्या चुका सुधारून समाजाला पुन्हा सुसंघटित करण्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे काम चालते. भटके-विमुक्तांचे काम याला अपवाद नव्हते. १९९३ पासून प्रत्यक्ष प्रकल्प सुरू झाला. गिरीश प्रभुणे, दादा इदाते, चंद्रकांत गडेकर, मधुसूदन व्हटकर ही मंडळी पालापालावर जाऊन काम करत होती. सातत्याने बैठका होत असत आणि दोन सत्रांच्या मधल्या वेळात चर्चा होत राही. आपण जे काम करतो आहे, तसेच काम जगाच्या पाठीवर कुणी केले आहे का? त्याचे परिणाम काय झाले? अशा अनेक प्रश्नांची खदखद सुरू असे. या सर्वांचे समाधान करण्यासाठी रमेशजींनी एकदा कार्यकर्त्यासमोर बुकर टी. वॉशिंग्टन यांचे चरित्र सांगितले आणि तेथूनच लेखनाचा आणि चिंतनाचा एक नवा प्रवाह सुरू झाला.
यासंबंधी बोलताना रमेशजींनी सांगितले होते, "भटके-विमुक्तांचे काम सुरू होण्याआधी ‘समरसता मंचा’चे काम सुरू झाले होते. सुमारे ३५ वर्षांपूर्वीची गोष्ट असेल. फोर्टच्या फुटपाथवर मी 'Up from Slavery - Booker T. Washington' हे पुस्तक तीन रुपयांना खरेदी केले होते. त्यावेळी वॉशिंग्टन कोण, हेदेखील माहीत नव्हते. ते पुस्तक माझ्याकडे दहा वर्षं असेच पडून होते. भटके-विमुक्तांचे काम सुरू झाल्यावर त्यांच्या बैठकांत मी जाऊ लागलो. पारधी, गोंधळी, टकारी, वडार वगैरे वगैरे. त्यांची जीवनशैली, विचारपद्धती, रीतिरिवाज, त्यांच्या जातपंचायती, स्त्री-पुरुष संबंध, आपापसातील हेवेदावे, मारामार्या आणि एवढे सगळे करूनसुद्धा ते लोक एक वेगळ्या प्रकारचे नैतिक जीवन जगत असतात. त्यांची ही जीवनशैली एवढी कुतूहलजनक वाटू लागली. हे सगळेजण हिंदू समाजाचे अंग आहेत. मात्र, यांची आम्हाला किती माहिती आहे? तर शून्य, हे जाणवले. तुम्हाला शहरी हिंदू समाज, सुशिक्षित हिंदू समाज, हेच समजते; पण या परिघाबाहेरच्या हिंदू समाजाचे ज्ञान शून्य असते. त्यावेळी माझ्या मनात अनेक प्रश्न निर्माण व्हायला लागले. हे विचारमंथन मनात चालू असताना मला का कोण जाणे, दहा वर्षांपूर्वी घेतलेल्या त्या पुस्तकाची आठवण झाली. ते वाचायला हवे असे वाटले. ते पुस्तक म्हणजे,"Up from Slavery - Booker T. Washington.' त्यानंतर ते पुस्तक मी वाचून काढले आणि माझे ज्ञानचक्षू विस्तारायला मदत झाली.
बुकर टी. वॉशिंग्टन हे ‘निग्रो’ समाजातील आहेत. निग्रोंना गुलामीतून मुक्त केल्यानंतर पहिल्या पिढीतील ज्या गुलामाने शिक्षण घेतले, त्याच्या शिक्षणाचा तो प्रवास आहे. त्यानंतर ‘एक होता कार्व्हर’ हे वीणा गवाणकरांचे पुस्तक आहे. बुकर टी. वॉशिंग्टन याने टस्केगी (Tuskegee) येथे निग्रोंच्या मुलांसाठी जी शिक्षणसंस्था सुरू केली, त्या संस्थेत हे ‘कार्व्हर’ होते. त्यांच्या अगोदरचे काम हे बुकर टी. वॉशिंग्टन यांचे आहे. ज्या टस्केगी गावात त्यांनी शाळा सुरू केली, त्या शाळेसाठी त्यांना लोकांनी एक पडके चर्च आणि झोपडी दिली होती आणि ते जेव्हा वारले, तेव्हा त्या ठिकाणी साठ इमारती उभ्या राहिल्या होत्या. त्या इमारतींमध्ये ‘एरोनॉटिस’पासून चटई बनवण्यापर्यंत सर्व प्रकारचे शिक्षण दिले जाते. शिक्षण क्षेत्रात त्यांनी अफाट काम केले. यमगरवाडीला त्याच प्रकारचे काम आम्ही करायला घेतले. त्यांना एक चर्च आणि झोपडी तरी मिळाली होती. आम्हाला तर एक उंबराचे झाड आणि एक पडकी विहीर मिळाली. त्या बैठकीतून आम्ही वॉशिंग्टनच्या कथा सांगायला लागलो. तेव्हा गिरीश प्रभुणे म्हणाले की, "पतंगे, वॉशिंग्टन यांचं जीवनचरित्र तुम्ही लिहून काढा.” त्यातून ‘जेव्हा गुलाम माणूस होतो’ या पुस्तकाची निर्मिती झाली. पुस्तक लिहीत असताना यमगरवाडी, भटके लोक यांच्याविषयीचे विचार माझ्या मनात पक्के असल्यामुळे त्यांचा विचार करून पुस्तकाची मांडणी केली.
ज्याने गुलामाला मुक्त केले, ते म्हणजे अब्राहम लिंकन. त्यांचे चरित्र तर मी फार आधी वाचलेले होते आणि आजही ‘राजनेता म्हणून तुमचा आदर्श कोण आहे?’ असे विचारले, तर, "माझा आदर्श अब्राहम लिंकन आहे,” असे मी सांगेन. काही व्यक्ती अशा असतात की, त्या मानवजातीच्या असतात. देश, काल इत्यादी सीमांनी त्यांना बांधून ठेवता येत नाही, तसे अब्राहम लिंकन यांचे आयुष्य आहे. राजकीय अंग हे समाजाचे एक महत्त्वाचे अंग असते आणि ते समाजाला स्थिरता देते; सौख्य, समृद्धी देते. एका अर्थाने राष्ट्रउभारणी करणारे हे समाजाचे अभिन्न अंग आहे. हे असे काम अब्राहम लिंकन यांनी केले. त्यांची बरोबरी करणारा राजनेता कुणी झाला नाही. आपल्या प्राचीन इतिहासात विक्रमादित्य, चंद्रगुप्त वगैरे आहेत; पण त्यांचा तपशिलातला इतिहास उपलब्ध होत नाही. आधुनिक काळातले सगळे प्रश्न, मग ते राज्यघटनेचे असतील, लोकशाहीच्या संवर्धनाचा विषय असेल, कायद्याच्या राज्याचा विषय असेल, देश अखंड ठेवण्याचा विषय असेल, हे जे सगळे प्रश्न आहेत, याला अत्यंत समर्थपणे उत्तरे देण्याचे काम अब्राहम लिंकन यांनी केले आहे. म्हणून त्यांचे चरित्र मी माझ्या भाषेत लिहून काढले.”
रमेशजींनी बुकर टी. वॉशिंग्टन, अब्राहम लिंकन आणि मार्टिन ल्युथर किंग या तीन महापुरुषांच्या जीवनकथा लिहिलेल्या आहेत. मराठी साहित्यातील ही पहिलीच चरित्रे आहेत असे नाही. अनेक साहित्यिकांनी आपापल्या आकलनाच्या आधारे बुकर टी. वॉशिंग्टन, अब्राहम लिंकन व मार्टिन ल्युथर किंग यांची चरित्रे लिहिलेली आहेत. तरीसुद्धा रमेशजींनी केलेल्या लेखनाचे वेगळेपण आणि औचित्य काय आहे, या प्रश्नाचे उत्तर गिरीश प्रभुणे यांनी दिले आहे. ते म्हणतात, "या नायकांच्या चरित्राचा शोध हिंदू समाजाचे ऐय आणि वंचितांच्या उत्कर्षाचा मार्ग या एकाच ध्यासातून उतरला आहे. ही चरित्रे वाचताना हिंदू समाजातील वंचितांच्या शतकभरातील चळवळी, विशेषत: स्वातंत्र्योत्तर काळातील सामाजिक समतेची चळवळ डोळ्यांसमोर उभी राहते. समाजाचे आत्मभान जागृत करणे, हे या पुस्तकाचे उद्दिष्ट आहे. याचा अर्थ असा होतो की, स्वातंत्र्यानंतर सामाजिक समतेसाठी चालू असलेल्या चळवळींना योग्य दिशा आणि मूलभूत स्वरूपाचे सामाजिक उद्दिष्ट अधोरेखित करण्याची गरज होती आणि ती रमेशजींनी आपल्या लेखणीतून पूर्ण केली.”
आपल्या महाराष्ट्रातील स्वातंत्र्योत्तर चळवळीचा आढावा घेतला, तर असे लक्षात येईल की, १९६०च्या दशकात सामाजिक क्षेत्रात नव्या-नव्या संकल्पना रूढ व्हायला लागल्या. अमेरिकेतील ‘ब्लॅक पँथर’च्या धर्तीवर इकडे ‘दलित पँथर’ सुरू झाली. लढाऊ तरुण नकार-विद्रोहाची भाषा बोलू लागले. सुरुवातीचा आवेश ओसरला आणि या चळवळी आणि त्याचे नेते प्रचलित राजकारणाचा भाग झाले. राजकीय शक्तीतून परिवर्तन घडवून आणण्याची भाषा बोलू लागले. भटक्या-विमुक्त जाती व जमाती याला अपवाद नाहीत. १९६०च्या दशकात सामाजिक चळवळ करणारे नेतृत्व १९९०च्या दशकात राजकीय वळचणीला जाऊन उभे राहिले. विधान परिषद, आयोगाचे अध्यक्ष, महामंडळाच्या नियुक्त्या अशा माध्यमांतून सामाजिक परिवर्तन घडवून आणण्यासाठी प्रयत्न होऊ लागले. नेते मोठे झाले. पालातून महालात गेले. पण, समाज होता तिथेच राहिला. या पार्श्वभूमीवर रमेशजींनी भटया-विमुक्त जाती व जमातींमध्ये बदल घडवून आणण्यासाठी जे चिंतन केले, लेखन केले, ते इतरांपेक्षा वेगळे आहे.
रमेशजींनी केलेल्या वैश्विक शोधयात्रेचा उद्देश असंघटित, वंचित, अविकसित हिंदू समाजाला योग्य दिशा देण्याचा होता. रमेशजींनी लिहिलेले ‘अब्राहम लिंकन’ हे पुस्तक प्रकाशित झाले, तेव्हा ‘तुम्हाला विदेशी अब्राहम लिंकनच सापडला का?’ असा टीकात्मक प्रश्न विचारला गेला होता. पण, रमेशजींनी अशा प्रश्नांची उत्तरे देण्यात वेळ दवडला नाही. ते आपले काम करत राहिले. या तीन पुस्तकांतून त्यांनी एक समान सूत्र मांडले आहे, ते आहे समाजाचे संघटन, समाजातील भेदभाव दूर करणे आणि सामाजिक समतेच्या माध्यमातून समाजाचा उत्कर्ष करणे!
मला आजही आठवते, ‘विवेक’मध्ये रुजू होऊन दोन-तीन महिने झाले होते. गणपती आले होते. आमचा गणपती गावी. उषा आणि मुले चार दिवस आधीच गावी गेली होती. मी एकटाच मुंबईत होतो. गणेश आगमनानिमित्त ऑफिसला सुटी होती. त्या दिवशी आराम करायचा असे ठरवले होते. पण, आदल्या दिवशी रमेशजींनी विचारले, "उद्या काय करणार आहेस? काही ठरवले नसशील, तर घरी ये.” दुसर्या दिवशी सकाळी रमेशजींच्या घरी गेलो आणि त्या दिवशी रमेशजींनी ‘जेव्हा गुलाम माणूस होतो’ या पुस्तकाच्या लिखाणास सुरुवात केली. तसे कार्यालयात त्यांच्या समोर बसून संपादकीय लेख लिहून घेतले होते; पण हा अनुभव वेगळा होता. बुकर टी. वॉशिंग्टनच्या जीवनावरील हे पुस्तक लिहायला सुरुवात केली. सलग चार तास रमेशजी सांगत होते आणि मी लिहीत होतो. एका जागी इतका वेळ बसण्याचा माझा स्वभाव नाही; पण पर्याय नव्हता. एका बैठकीत पहिली दोन प्रकरणे लिहून झाली. त्यावरून लक्षात आले की, हे पुस्तक वेगळे आहे, अशाप्रकारे काम करणारे आपल्या भारतीय इतिहासात कोणीही नाही. रमेशजींनी या पुस्तकासाठी खूप अभ्यास केला होता. त्यांची लेखन दिशा स्पष्ट होती. त्यामुळे काही महिन्यांतच पुस्तक लिहून पूर्ण झाले. हळूहळू मीही अशा प्रकारच्या लिखाणासाठी लेखनिक म्हणून तयार झालो. ‘बुकर टी. वॉशिंग्टन’नंतर ‘अब्राहम लिंकन’ व ‘मार्टिन ल्युथर किंग’ ही दोन पुस्तके लिहून झाली.
या तीन पुस्तकांचे आशयसूत्र सांगायचे, तर असे म्हणता येईल- बुकर टी. वॉशिंग्टनने ‘निग्रो’ समाजात शिक्षण आणि आत्मभान यांची पेरणी केली. ‘टस्केगी स्कूल’चा प्रयोग करून निग्रो समूहात त्यांनी गुलामांना आत्मसन्मानाने जगण्याचा मार्ग खुला केला. अब्राहम लिंकन यांनी ‘गोरे विरुद्ध काळे’ ही भेदरेषा संपवण्यासाठी ऐतिहासिक कामगिरी करून देशाची फाळणी टाळण्याचे काम केले. निग्रोंना गुलामीतून मुक्त करण्यासाठी केवळ प्रबोधनच नाही, तर कायदे करून अब्राहम लिंकनने सामाजिक परिवर्तन घडवून आणले. डॉ. मार्टिन ल्युथर किंग यांनी गुलामीतून मुक्त झालेल्या निग्रोंसाठी सनदशीर मार्गाने संघर्ष केला. वांशिक संघर्ष आणि मानवी हक्क यासाठी त्यांनी काम केले. त्यांचे ‘माझे एक स्वप्न आहे’ हे भाषण प्रसिद्ध आहे.
या तीन पुस्तकांच्या लिखाणाच्या माध्यमातून रमेशजींनी भटक्या-विमुक्त जाती व जमातींचे उत्थान करण्यासाठी आवश्यक असणारे मानस तयार केले. त्याचप्रमाणे कोणतेही सामाजिक प्रश्न हे केवळ त्या जातीचे नसून संपूर्ण समाजाचे प्रश्न असतात, ही जाणीव निर्माण केले. भटक्या-विमुक्त विकास परिषदेच्या सुरुवातीपासून विविध समाजगटांतील कार्यकर्ते सहभागी झाले आहेत. एकमेकांच्या सुख-दुःखात सहभागी होऊ लागले आणि समाजाच्या विकासासाठी एकत्रित विचार करू लागले आणि ‘टेस्केगी स्कूल’सारखेच अनेक छोटे-छोटे प्रयोग सुरू झाले. अनसरवाड्यात रजई उत्पादन सुरू झाले. गोपाळ समाजाने भिक्षेकरी वृत्ती सोडली आणि बॅण्ड पथक सुरू केले. सन्मानाने जगू लागले. परिवर्तनाच्या पावलाचा आवाज ऐकू येत नसला, तरी ते होत असते. मात्र, रमेशजींसारख्या समाजचिंतकांना तो ऐकता येतो आणि तो ऐकलेला आवाज ते आपल्या शब्दातून मांडतात.
रमेशजींनी भटक्या-विमुक्त समाजात संघविचाराचे काम उभे करण्यासाठी आवश्यक असणारे चिंतन आणि तात्त्विक बैठक तयार केली. यामागील भूमिका होती की, आपल्याला भटक्या-विमुक्त समाजातील चळवळ प्रश्न सोडवण्यासाठी चालवायची आहे. चळवळ जिवंत ठेवण्यासाठी प्रश्न कायम अभ्यासायचे आहेत. हिंदू समाजातील दुरावा, भेद दूर करण्यासाठी आपली चळवळ असली, तरी अनेक प्रश्नांचे स्वरूप आर्थिक आहे आणि ते ज्यांचे त्यांनी सोडवायला हवेत. मदत, निधी, अनुदान यावर अवलंबून न राहता मनगटाच्या जोरावर आपला पुरुषार्थ सिद्ध करणारी नवी पिढी घडवणे, हे आपले काम आहे आणि त्यासाठीच आपण सदैव तत्पर असेल पाहिजे, हे रमेशजींचे कार्यसूत्र आहे. ते प्रत्यक्षात आणण्यासाठी रमेशजींनी वैश्विक शोधयात्रा केली. त्यातून हिंदू समाज, भारतीय मानस घडवण्यासाठी आवश्यक असणारे चिरंतन पाथेय निर्माण झाले.
पुस्तकाचे नाव : संघ जगणारा माणूस
लेखक : रवींद्र गोळे
प्रकाशक : विवेक पुस्तक प्रकाशन
मूल्य : २२५/- रु.
सवलत मूल्य : २००/- रु.
नोंदणीसाठी संपर्क : ७५०६७३२९०५ / ९५९४९६१८५८
- रवींद्र गोळे