मराठीचे ज्ञान अनिवार्य; नियम न पाळणाऱ्यांवर कायद्यानुसार कारवाई

    09-Aug-2026

Pratap Sarnaik
 
ठाणे : (Pratap Sarnaik) महाराष्ट्रात व्यवसाय आणि रोजगार करायचा असेल, तर मराठी भाषेचे जुजबी ज्ञान असणे आवश्यक आहे. अमराठी प्रवासी वाहनचालकांनी मराठी शिकून प्रवाशांशी संवाद साधणे गरजेचे असून, नियमांचे पालन न करणाऱ्यांवर कायद्यातील तरतुदींनुसार कारवाई केली जाईल, असा स्पष्ट इशारा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिला.
 
१ मेपासून राज्यभर राबविण्यात आलेल्या ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे मराठी शिकवणी अभियानाचा’ समारोप १७ ऑगस्ट रोजी ठाण्यातील राम गणेश गडकरी रंगायतन येथे होणार आहे. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार तसेच मराठी भाषा मंत्री उदय सामंत उपस्थित राहणार आहेत. या अभियानांतर्गत व्यवहारिक मराठीचे प्रशिक्षण पूर्ण केलेल्या हजारो अमराठी व्यावसायिक प्रवासी वाहनचालकांना यावेळी प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात येणार असल्याची माहिती सरनाईक यांनी पत्रकार परिषदेत दिली. (Pratap Sarnaik)
 
या पत्रकार परिषदेला मुंबई मराठी साहित्य संघ, राज्य मराठी विकास संस्था आणि कोकण मराठी साहित्य परिषदेचे पदाधिकारी व प्रतिनिधी उपस्थित होते. (Pratap Sarnaik)
 
एक लाखांहून अधिक चालकांनी घेतले प्रशिक्षण
 
राज्यभर राबविण्यात आलेल्या या अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून आतापर्यंत एक लाखांहून अधिक अमराठी रिक्षा व टॅक्सी चालकांनी व्यवहारिक मराठीचे प्रशिक्षण पूर्ण केले आहे. उर्वरित चालकांनीही १५ ऑगस्टपूर्वी प्रशिक्षण पूर्ण करून या अभियानाचा लाभ घ्यावा, असे आवाहन सरनाईक यांनी केले. (Pratap Sarnaik)
 
“महाराष्ट्रात व्यवसाय करायचा असेल, तर मराठीचे जुजबी ज्ञान असणे आवश्यक आहे. महाराष्ट्रात रोजगार करायचा असेल, तर मराठीशी नाळ जोडलीच पाहिजे. ही सक्तीची नव्हे, तर आपुलकीची भाषा आहे. प्रवाशांशी दोन प्रेमाचे शब्द मराठीत बोलणारा प्रत्येक चालक हा महाराष्ट्राच्या संस्कृतीचा सन्मान करणारा दूत ठरतो,” असे सरनाईक यांनी सांगितले. (Pratap Sarnaik)
 
मराठी महाराष्ट्राच्या अस्मितेचा आत्मा
 
मराठी ही केवळ संवादाची भाषा नसून महाराष्ट्राच्या अस्मितेचा आणि संस्कृतीचा आत्मा आहे. महाराष्ट्रात उपजीविका करणाऱ्या प्रत्येकाने मराठीचा सन्मान करावा. आम्ही कोणाच्याही विरोधात भूमिका घेतलेली नाही. महाराष्ट्रावर, मराठी मातीवर आणि मराठी भाषेवर प्रेम करणारा प्रत्येकजण आमच्यासाठी महत्त्वाचा आहे. मात्र महाराष्ट्रात काम करताना मराठी भाषेचा सन्मान राखणे आवश्यक आहे, असे सरनाईक यांनी स्पष्ट केले. (Pratap Sarnaik)
 
शासनाने मानवतावादी दृष्टिकोनातून पुढाकार घेत अमराठी चालकांना मराठी शिकण्याची संधी उपलब्ध करून दिली. या अभियानाच्या माध्यमातून हजारो चालकांनी मराठी भाषा शिकण्याचा प्रयत्न केला असून, त्याला राज्यभरातून सकारात्मक प्रतिसाद मिळाला असल्याचेही त्यांनी सांगितले. (Pratap Sarnaik)
 
केवळ प्रमाणपत्र दाखवून कारवाई टळणार नाही
 
प्रशिक्षण पूर्ण केलेल्या चालकांना देण्यात येणाऱ्या प्रमाणपत्राबाबतही सरनाईक यांनी महत्त्वाचे स्पष्टीकरण दिले. कोकण मराठी साहित्य परिषदेच्या माध्यमातून देण्यात येणारे प्रमाणपत्र हे अभियानात सहभाग घेतल्याचे प्रमाणपत्र आहे. केवळ प्रमाणपत्र दाखविल्यामुळे कारवाई टळणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. (Pratap Sarnaik)
 
आरटीओ अधिकारी चालकांशी मराठीत संवाद साधतील. त्या संवादादरम्यान चालकाला मराठीत उत्तर देता आले, तरच त्याने नियमांचे पालन केल्याचे मानले जाईल, असे सरनाईक यांनी सांगितले. (Pratap Sarnaik)
 
कायद्याच्या चौकटीतच कारवाई
 
नियमांचे पालन न करणाऱ्या चालकांवर काय कारवाई केली जाणार, याबाबत बोलताना सरनाईक यांनी स्पष्ट भूमिका मांडली. “कायद्यामध्ये जे नमूद आहे, त्यानुसारच कारवाई होईल. आरटीओ अधिकारी तपासणी करतील आणि आवश्यक ती कार्यवाही करतील. कायद्याच्या कक्षेत राहूनच पुढील निर्णय घेतले जातील,” असे त्यांनी स्पष्ट केले. (Pratap Sarnaik)
 
त्यामुळे मराठी शिकवणी अभियान हे केवळ प्रमाणपत्र वाटपापुरते मर्यादित राहणार नसून, प्रत्यक्ष चालकाला मराठीत संवाद साधता येतो की नाही, याचीही तपासणी होणार असल्याचे संकेत परिवहन मंत्र्यांनी दिले आहेत. (Pratap Sarnaik)
 
‘चालक हिंदी भाषिक आहे’ असे गृहीत धरू नका
 
दरम्यान, सरनाईक यांनी मराठी प्रवाशांनाही आवाहन केले. समोरचा चालक हिंदी भाषिक आहे, असे गृहीत धरून मराठी प्रवाशांनी त्याच्याशी हिंदीत संवाद साधू नये. मराठी भाषिकांनी मराठीतच संवाद साधल्यास दैनंदिन व्यवहारात मराठीचा वापर अधिक वाढेल. मराठीचा सन्मान राखण्याची जबाबदारी केवळ चालकांची नसून प्रत्येक मराठी नागरिकाची आहे, असे त्यांनी सांगितले.(Pratap Sarnaik)
 
लोकचळवळीचे स्वरूप प्राप्त
 
"मराठीला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झाल्यानंतर तिच्या गौरवासाठी राबविण्यात आलेल्या या अभियानाला लाखो अमराठी बांधवांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. राज्य शासनाच्या मराठी भाषा विभागासह मुंबई मराठी साहित्य संघ, राज्य मराठी विकास संस्था आणि कोकण मराठी साहित्य परिषदेच्या संयुक्त सहकार्याने राबविण्यात आलेल्या या अभियानाने राज्यभर लोकचळवळीचे स्वरूप धारण केले आहे.उर्वरित अमराठी चालकांनी १५ ऑगस्टपूर्वी व्यवहारिक मराठीचे प्रशिक्षण पूर्ण करून मराठी आत्मसात करावी,” - परिवहन मंत्री प्रताप सरनाईक
 
 




संबंधित मजकूर