मुंबई : (NABARD) राष्ट्रीय हातमाग दिन २०२६ निमित्त नाबार्डतर्फे ५ ते ७ ऑगस्ट २०२६ या कालावधीत मुंबईतील वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स येथील नाबार्डच्या मुख्यालयात प्रदर्शन-सह-विक्री उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. भारताच्या समृद्ध हातमाग वारशाचे जतन व संवर्धन करणे, हातमाग कारागिरांना थेट विपणनाच्या संधी उपलब्ध करून देणे, बाजारपेठेतील वाढीव उपलब्धतेद्वारे ग्रामीण उपजीविकेला बळकटी देणे तसेच उत्पादक आणि खरेदीदार यांच्यात व्यावसायिक संबंध प्रस्थापित करण्यास सुलभता निर्माण करणे, हा या तीन दिवसीय उपक्रमाचा उद्देश होता.
या प्रदर्शनाला अभ्यागत तसेच विविध वित्तीय संस्थांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या उपक्रमात ₹६७ लाखांहून अधिक विक्रीची नोंद झाली असून, अस्सल हातमाग उत्पादनांबद्दल ग्राहकांची वाढती पसंती यावरून अधोरेखित झाली.
या प्रदर्शनात १४ राज्यांतील १५ वैशिष्ट्यपूर्ण विणकाम परंपरांचे प्रदर्शन करण्यात आले, ज्यामध्ये ९ भौगोलिक संकेतांक (GI) प्राप्त उत्पादनांचा समावेश होता. अभ्यागतांना भारतीय हातमाग उत्पादनांच्या समृद्ध वैविध्याचा अनुभव घेता आला तसेच ही उत्पादने खरेदी करण्याची संधीही मिळाली. यामध्ये पैठणी (महाराष्ट्र), पोचमपल्ली इकत (तेलंगणा), कोटा डोरिया (राजस्थान), संबळपुरी (ओडिशा), भागलपूर सिल्क (बिहार), कांथा स्टिच (पश्चिम बंगाल), कच्छ शॉल्स (गुजरात), वेंकटगिरी (आंध्र प्रदेश), अरनी सिल्क (तमिळनाडू), बलरामपुरम (केरळ), मुबारकपूर हँडलूम (उत्तर प्रदेश), अंबाला हँडलूम्स (हरियाणा), बाघ (मध्य प्रदेश), भगैया सिल्क (झारखंड) आणि उत्तरिया (कर्नाटक) यांचा समावेश होता. सर्व सहभागी कारागिरांना सहभाग प्रमाणपत्रे प्रदान करण्यात आली, तर उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या तीन स्टॉल्सना चषक देऊन गौरविण्यात आले. (NABARD)
५ ऑगस्ट २०२६ रोजी या कार्यक्रमाचे उद्घाटन करताना नाबार्डचे अध्यक्ष डॉ. शाजी कृष्णन व्ही. म्हणाले, “हे प्रदर्शन ग्रामीण उद्योजकता आणि संस्कृतीचा अनोखा संगम आहे. अशा उपक्रमांमुळे शहरी ग्राहकांमध्ये भारतातील ग्रामीण भागातील समृद्ध विणकाम परंपरांबाबत जागरूकता निर्माण होण्यास मदत होते आणि ग्रामीण-शहरी संबंध अधिक दृढ होतात. ग्रामीण उद्योगांना निर्यात बाजारपेठांपर्यंत पोहोचण्यासह बाजारपेठेतील महत्त्वाच्या संधी उपलब्ध करून देण्यात अशा उपक्रमांची महत्त्वाची भूमिका आहे.
हातमाग हे शाश्वत विकासाचे एक प्रभावी मॉडेल असून, हवामान बदलाच्या परिणामांना तोंड देण्यास तसेच पर्यावरणपूरक उपजीविकेला चालना देण्यास त्याचा हातभार लागतो. ग्रामीण विकासाचे संरक्षक म्हणून नाबार्ड प्राचीन आणि पारंपरिक कला-विणकाम परंपरांचे पुनरुज्जीवन करण्यासाठी तसेच ग्रामीण उद्योगांना पाठबळ देण्यासाठी कटिबद्ध आहे.”