ठाणे : (Thane) पाठ्यपुस्तकाच्या पलीकडे जाऊन विद्यार्थ्यांना ‘निसर्ग-शिक्षण' देण्याचे काम काही शिक्षक करत असतात. भिवंडी तालुक्यायातील जिल्हा परिषद शाळा बालखडी शाळेतील शिक्षक त्याला अपवाद नाहीत. या शाळेच्या शिक्षकांनी विद्यार्थ्यांना अभ्यासाव्यतिरिवत पर्यावरण, शेतीचे धडे देण्यासाठी लहान मुलांना शेतीत उतरवले आणि भातलावणीचा अनुभव विद्यार्थ्यांनी घेतला.
जिल्हा परिषद शाळा, बालखडी मध्ये ७० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. विद्यार्थ्यांमध्ये मूल्यशिक्षण बिंबवण्याचा प्रयत्न शिक्षक करत असतात. या शाळेच्या मुख्याध्यापिका चित्रकला नवसार आणि सावित्रा थोरात यांनी इयत्ता चौथी व पाचवीमध्ये शिकत असलेल्या विद्यार्थ्यांना ७ ऑगस्ट रोजी सोबत घेऊन शाळेच्या जवळच असलेल्या भातलावणी चालू असलेल्या शेतात विद्यार्थ्यांना नेऊन प्रत्यक्ष भात लावणीचा अनुभव दिला. मुलांना यावेळी प्रत्यक्ष शेतात उतरवून कशा पद्धतीने भात लावला जातो याविषयी तेथील शेतकऱ्यांनी माहिती दिली. यावेळेस विद्यार्थ्यांनी आणि शिक्षकांनी त्याचा खूप मनमुराद आनंद घेतला. (Thane)
प्रत्यक्ष कृतीतून शिक्षण महत्वाचे
"अशा पद्धतीने प्रत्यक्ष कृतीतून घेतलेले शिक्षण हे विद्यार्थ्यांना चिरकाल स्मरणात राहते. आम्हा शिक्षकांसाठी देखील हा खूप सुखद असा अनुभव होता'. - चित्रकला नवसार, मुख्याध्यापिका