निःस्वार्थ समर्पणातून मुंबई महानगरातील संघकार्याला आकार देणाऱ्या ज्येष्ठ कार्यकर्त्यांमध्ये कै. हेरंबराव कोल्हटकर यांचे स्थान अत्यंत आदराचे आहे. स्वतःच्या कार्याचा कधीही गवगवा न करणाऱ्या या कर्मयोग्याने आपल्या कृतीतूनच संघकार्याची खरी व्याख्या जगून दाखविली.
मुंबई महानगरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्य वाढविण्यात ज्या ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा वाटा आहे त्यातील एक म्हणजे कै. हेरंबराव कोल्हटकर. हेरंबराव यांचे पूर्ण नाव गंगाधर श्रीधर कोल्हटकर असे होते. त्यांचा जन्म ४ मे १९२७ , अक्षय्य तृतीयेच्या दिवशी झाला. संघामध्ये सर्वत्र हेरंबराव या नावाने ते परिचित होते. संघाच्या कामास सर्वप्रथम प्राधान्य, अन्य काही नंतर अशाप्रकारे हेरंबराव आणि त्यांचे ज्येष्ठ बंधू वसंतराव यांनी आपल्या जीवनाची घडी बसविली होती. हेरंबराव हे मूळचे नागपूरचे स्वयंसेवक.
वडील रेल्वेमध्ये नोकरीस असल्याने त्यांच्या बदल्या होत असत. त्या त्या ठिकाणी दोन्ही भाऊ संघकार्यात सहभागी होत असत. आई–वडिलांचे छत्र हरपल्यानंतर रेल्वेत नोकरी करीत असलेल्या वसंतराव यांनी हेरंबराव यांचे शिक्षण पूर्ण केले. अभियांत्रिकी पदविका घेतल्यानंतर हेरंबराव यांनी एक वर्ष नोकरी केली. त्यांतर ते प्रचारक म्हणून बाहेर पडले. त्याच दरम्यान संघावर बंदी आली. वसंतराव यांनी सत्याग्रह केल्याने त्यांची नोकरी गेलेली.
संसार उघड्यावर पडलेला. ती परिस्थिती लक्षात घेऊन हेरंबराव यांनी थांबण्याचा निर्णय घेतला. मुंबई महानगरपालिकेत ते अभियंता म्हणून नोकरीस लागले. ठाणे, अंधेरी अशा ठिकाणी राहून कोल्हटकर बंधू अखेर माहीम येथील बेडेकर सदनमध्ये १९५३ साली स्थिरावले. दोन्ही भावांचे संघकार्य सुरूच होते. काही झाले तरी आपण एकत्रच राहायचे, असा निश्चय केल्याने दोन्ही भावांनी बेडेकर सदनच्या दोन खोल्यांमध्ये आनंदाने संसार केला. मुंबईत अंधेरीत राहत असताना हेरंबराव यांच्याकडे भागाची जबाबदारी होती. ते त्या भागाचे भागकार्यवाह होते. त्यानंतर मुंबई महानगरस्तरावरील विविध जबाबदाऱ्या त्यांच्यावर सोपविण्यात आल्या आणि त्या त्यांनी उत्तमप्रकारे पार पडल्या.
हेरंबराव यांच्याकडे मुंबई महानगरात येणाऱ्या केंद्रीय अधिकाऱ्यांची व्यवस्था करण्याचे काम सोपविण्यात आले होते. या केंद्रीय अधिकाऱ्यांचा प्रवास कसा आहे, ते कोठून, कसे, कधी येणार, जाणार, त्यांना आणण्यास कधी गेले पाहिजे, वाहनाची व्यवस्था कोण करणार असा सर्व बारीक सारीक तपशील लक्षात घेऊन ती व्यवस्था उत्तम ठेवण्याचा हेरंबराव आणि प्रचारक दत्ता वझे यांचा कटाक्ष असे. द्वितीय सरसंघचालक प. पू. गोळवलकर गुरुजी यांच्यापासून बाळासाहेब देवरस, भाऊराव देवरस, मोरोपंत पिंगळे, रज्जूभैया, सुदर्शनजी, लक्ष्मणराव भिडे, शेषाद्रीजी, सुरेशराव केतकर आदी अनेक केंद्रीय अधिकाऱ्यांच्या व्यवस्थेत हेरंबराव होते. त्यामुळे या सर्वांशी त्यांचा चांगला ऋणानुबंध जुळला होता. त्या ऋणानुबंधातूनच सरसंघचालकांपासून विविध केंद्रीय पदाधिकाऱ्यांनी हेरंबराव यांच्या निमंत्रणाचा स्वीकार करून त्यांच्या घरचा पाहुणचार घेतला आहे. आणीबाणीत वेषांतरकरून त्यांच्या घरी आलेल्या मोरोपंत यांना क्षणभर कोणी ओळखलेच नाही!
संघाच्या केंद्रीय अधिकाऱ्यांच्या व्यवस्थेचे काम जसे हेरंबराव यांनी केले तसेच त्यांनी मुंबई महानगराचे तत्कालीन संघचालक भासाहेब खोना यांचे नीजी कार्यवाह म्हणून अनेक वर्षे जबाबदारी सांभाळली. संघचालकांचा महानगरात प्रवास ठरविणे, बैठकांचे आयोजन करणे, त्याप्रमाणे संघचालकाना तेथे नेण्याची – आणण्याची व्यवस्था करणे अशी सर्व कामे हेरंबराव अत्यंत मनापासून चोख करीत. भासाहेब खोना यांच्या परिवाराशी हेरंबराव यांचे इतके निकटचे संबध जुळले की ते आणि सर्व कोल्हटकर कुटुंबीय भासाहेबांच्या परिवाराचा भाग कधी झाले ते कळलेच नाही!
मुंबई महानगरपालिकेच्या हायड्रॉलिक विभागात अभियंता म्हणून हेरंबराव नोकरीस होते. नोकरीचा वेळ सोडल्यास अन्य सर्व वेळ ते संघकामासाठी देत असत. आणीबाणीत हेरंबराव यांना अन्य अनेक कार्यकर्त्यांप्रमाणे ‘मिसा’खाली पकडण्यात आले. त्यांना पुण्याच्या येरवडा कारागृहात ठेवण्यात आले. १७ महिन्यांच्या कारावासात तेथील विविध उपक्रमात ते सहभागी होत. कारागृहात असताना त्यानी आयुर्वेदाचा अभ्यासही केला होता. कारागृहात असताना त्यांनी आपले स्वत:चे आणि घरच्यांचे मनोधैर्य खचू दिले नाही. ते कारागृहात असताना त्यांचे घर भूमिगत संघ कार्यकर्त्यांसाठी सुरक्षित ठिकाण होते. त्यांच्या बैठका तेथे होत असत. हेरंबराव यांच्या पत्नी सुमनताई सर्वांचे उत्तम आदरतिथ्य करीत असत. आणीबाणी उठल्यानंतर कारागृहातून बाहेर आल्यानंतर हेरंबराव यांनी आपली महानगरपालिकेतील नोकरी सोडून दिली आणि सर्व वेळ संघकामासाठी दिला!
दैनंदिन संघशाखा , संघाच्या अन्य जबाबदाऱ्या सांभाळत देवबांध येथील सुंदर नारायण गणेश संस्कार केंद्र,भारतीय इतिहास संकलन समिती यांच्याशी त्यांचा निकटचा संबंध होता. संघ परिवारातील अनेक संस्थाना, तसेच गरजू स्वयंसेवकाना सढळ हस्ते मदत करण्यात ते पुढे असत. पण त्याचा गाजावाजा त्यांनी कधी केला नाही. संघाच्या अधिकाऱ्यांनी सांगायचे आणि हेरंबराव यांनी तो शब्द खाली पडू द्यायचा नाही इतकी त्यांची संघनिष्ठ जाज्वल्य होती.
संघाचे काम करीत असताना हेरंबराव यांनी आपल्या कुटुंबाकडे कधीच दुर्लक्ष केले नाही. हेरंबराव यांचे ज्येष्ठ बंधू वसंतराव यांच्या पत्नी तरुणपणीच निवर्तल्या. वसंतराव यांना तीन मुली. या तीनही मुलींचा सांभाळ हेरंबराव आणि त्यांच्या पत्नी सुमनताई यांनी केला. सुमनताई यांचे मूल बाळंतपणात दगावल्यानंतर वसंतराव यांच्या कुंदा, आशा आणि लता या तीन मुली त्यांनी आपल्याच मानल्या.
संघकार्य करताना हेरंबराव यांचा व्यापक जनसंपर्क राहिला. विविध कार्यकर्त्यांना आवर्जून भेटून त्यांची चौकशी ते करीत असत. भारतीय जनता पार्टीचे दिवंगत उपाध्यक्ष बाळासाहेब आपटे यांनी एक किस्सा सांगितला होता. ‘हेरंबराव हे नियमाने सकाळी घरी येत. सकाळी कोणी घरी न येणे चांगले अशा मताचा मी आहे. पण डॉ. आबाजी थत्ते आणि हेरंबराव याना कोण काय म्हणणार?’ असे सांगून त्यानी हेरंबराव यांच्या चिकाटीचे कौतुक केले.
हेरंबराव यांना पुढे प्रकृतीने साथ न दिल्याने ते घराबाहेर पडू शकत नव्हते. जून २०१० मध्ये आजारपण बळावल्याने त्यांना इस्पितळात दाखल करण्यात आले. शरीर विकलांग झालेले,डोळ्यांना काही दिसत नव्हते. ३० जून २०१० या दिवशी सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी इस्पितळात गेले. जणू सरसंघचालकांची भेट घेण्यासाठी त्यांनी मृत्यूला थोपवून ठेवले होते! अखेर ३ जुलै २०१० या दिवशी हेरंबराव नावाच्या या संघशरण कार्यकर्त्याने या जगाचा निरोप घेतला!एकीकडे संघाचे जन्मशताब्दी सांगतेकडे जात आहे आणि त्याच वर्षात हेरंबराव यांनी जन्मशताब्दी वर्षात पदार्पण केले हा योगायोग म्हणावा लागेल!