ठाणे : (SRA Projects Thane) चिखलवाडी येथील तब्बल १४ वर्षांपासून रखडलेला एसआरए प्रकल्प महिन्याभरात सुरू करण्याची ग्वाही विकासकाने दिली आहे. तसेच प्रशांतनगर येथील गेल्या १० वर्षांपासून रखडलेल्या प्रकल्पातील रहिवाशांना दिवाळीपर्यंत हक्काची घरे मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे संबंधित रहिवाशांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.
भाजपच्या वतीने खोपट येथे आयोजित करण्यात आलेल्या ‘जनसेवकाचा जनसंवाद’ कार्यक्रमात आमदार संजय केळकर यांनी ही माहिती दिली. चिखलवाडी येथील १४ वर्षांपासून प्रलंबित असलेल्या एसआरए प्रकल्पाबाबत विकासक आणि रहिवाशांची संयुक्त बैठक घेण्यात आली. या बैठकीत प्रकल्पातील अडचणी तसेच त्या सोडविण्यासाठी आवश्यक उपाययोजनांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.(SRA Projects Thane)
येत्या १५ दिवसांत आवश्यक त्या सर्व परवानग्या घेऊन प्रकल्पाचे काम सुरू करण्यात येईल. तसेच रहिवाशांना देय असलेले प्रलंबित भाडेही अदा करण्यात येईल, अशी ग्वाही विकासकाने दिल्याचे आमदार केळकर यांनी सांगितले.(SRA Projects Thane)
प्रशांतनगर येथील सुमारे १० वर्षांपासून रखडलेल्या प्रकल्पाबाबतही रहिवाशांचे प्रतिनिधी, विकासक, अर्थसाह्य करणाऱ्या कंपनीचे प्रतिनिधी आणि एसआरए अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक घेण्यात आली. या प्रकल्पातील अडचणी दूर करून येत्या दिवाळीपर्यंत रहिवाशांना त्यांच्या हक्काच्या घरांचा ताबा मिळेल, असा विश्वास आमदार केळकर यांनी व्यक्त केला. याशिवाय शुभारंभ इमारतीचे मालक, रहिवासी आणि विकासक यांचीही बैठक घेऊन विविध प्रश्नांवर चर्चा करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.(SRA Projects Thane)
रखडलेल्या प्रकल्पांवर कठोर भूमिका
ठाणे शहरातील सुमारे २० एसआरए प्रकल्पांतील रहिवासी आपल्या संपर्कात असून, रखडलेले प्रकल्प मार्गी लावण्यासाठी प्रथम समन्वयातून तोडगा काढण्याचा प्रयत्न केला जातो. मात्र, त्यातून मार्ग न निघाल्यास कठोर भूमिका घेऊन प्रकल्प पूर्ण करण्यासाठी पाठपुरावा केला जातो, असे आमदार केळकर यांनी स्पष्ट केले.(SRA Projects Thane)
काही प्रकल्प सुरू करण्यात यश आले असून, इतर प्रकल्पांसाठीही पाठपुरावा सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. आर्थिकदृष्ट्या सक्षम नसलेले काही विकासक एक प्रकल्प अर्धवट सोडून दुसरा प्रकल्प सुरू करतात. त्यामुळे रहिवाशांची मोठ्या प्रमाणावर फसवणूक होते. अशा विकासकांना काळ्या यादीत टाकण्याबरोबरच एमपीआयडी कायद्यांतर्गत कारवाई करणे हा यावरील प्रभावी उपाय असल्याचेही आमदार केळकर यांनी स्पष्ट केले.(SRA Projects Thane)
स्थावर मालमत्ता विभागाची श्वेतपत्रिका काढण्याची मागणी
स्थावर मालमत्ता विभागाच्या कामकाजात सावळा गोंधळ असल्याचा आरोप करत आमदार केळकर यांनी या विभागाची श्वेतपत्रिका काढण्याची मागणी केली. अनेक विस्थापितांचे गेल्या १० ते २० वर्षांपासून पुनर्वसन झालेले नाही. पुनर्वसन प्रक्रियेत सापत्न वागणूक दिली जात असल्याच्या तक्रारी रहिवाशांकडून करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.(SRA Projects Thane)
कंत्राटी कामगारांच्या किमान वेतनाच्या प्रश्नावरही काही कंत्राटदारांकडून धूळफेक केली जात असल्याचा आरोप त्यांनी केला. अशा वशिल्याच्या कंत्राटदारांना काळ्या यादीत टाकल्याशिवाय स्वस्थ बसणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या प्रश्नावर सोमवारी ठाणे महापालिकेत बैठक आयोजित करण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली.(SRA Projects Thane)
यावेळी नगरसेवक सुनेश जोशी, नगरसेविका प्रतिभा मढवी, मृणाल पेंडसे, उषा वाघ, सुरेश कांबळे तसेच निलेश पाटील उपस्थित होते.(SRA Projects Thane)