इस्रायलचे अंतरंग...

    09-Aug-2026   

Inside Israel

भारत, हिंदू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी इस्रायली लोकांना खूप आदर, प्रेम असल्याचे प्रकर्षाने जाणवले. धर्म, आस्था-श्रद्धेसाठीचा संघर्ष समन्वय हा ‘ज्यू विरुद्ध मुस्लीम’ जसा आहे, तसाच ‘भारत विरुद्ध इस्लामिक आक्रांतां’विरुद्धही होताच! भारतानेही हजारो वर्षांचा लढा दिलाच. याअनुषंगाने भारताने इस्रायलकडून प्रगती आणि इतरही काही शिकण्यासारखे जरुर आहे. मात्र, इस्रायलनेही भारताकडून घेण्यासारखे आणि शिकण्यासारखे खूप आहे. या पार्श्वभूमीवर ज्यू, इस्लाम, ख्रिश्चन आणि भारताचे हिंदू यांचा मागोवा घेणारा या विशेष लेखमालिकेतील शेवटचा लेख...
 
इस्रायलमध्ये रात्रीच्या ८ वाजताही आपल्या इथे दुपारी ३ वाजता जसे ऊन असते, तसे ऊन तेव्हा होते. (यावरून कल्पना करू शकता की, तिथे किती ऊन असेल.) तर, त्या दिवशीही सकाळपासून इस्रायलच्या विविध महत्त्वाच्या ठिकाणी भेटीगाठी घेऊन आम्ही एका अतिमहत्त्वाच्या प्रशासकीय कार्यालयात गेलो. तिथल्या सर्वांत वरिष्ठ अधिकार्‍यासोबत भेट होती. स्वच्छ, प्रशस्त आणि बाहेरच्या उन्हाचा मागमूसही नसलेल्या त्या हॉलमध्ये आम्ही गेलो. तेव्हा मिलिंद सोमण नावाचा मॉडल जर युरोपियन असता, तर कसा दिसला असता; तसे दिसणार्‍या त्या सर्वोच्च अधिकार्‍याने म्हटले, "ओह! तुम्ही भाग्यवान लोक आहात. आजच्या घडीला जगभरातील बहुतेक सगळ्याच देशांत युद्धसदृश स्थिती किंवा थेट युद्ध सुरू आहेत. पण, तुमच्या देशात तशी परिस्थिती नाही. इंडियन लोक लकी आहात. तुमच्या देशाला खंबीर आणि देशप्रेमी पंतप्रधान लाभला आहे, अगदी आमच्या पंतप्रधानांसारखा! ज्याप्रमाणे आम्ही ज्यू देशाला सर्वतोपरी समजतो, तसे तुम्ही भारतीयसुद्धा देशाचा विचार करता. ग्रेट! म्हणूनच, आपल्यात चांगला संवाद होईल, असे मला वाटते.” स्वागतच देशाच्या स्तुतीने झाले. त्यामुळे आमच्या चेहर्‍यावर अक्षरशः वसंत फुलला. इस्रायलमध्ये भारत, हिंदू, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची अक्षरशः ‘क्रेझ’ आहे, असेच दिसले. ज्यांना-ज्यांना भेटले, त्यांचे मत होते की, बहुसंख्य असलेल्या हिंदूंचा आवाज दबलेला होता. मात्र, आता गेल्या १०-१२ वर्षांत त्या हिंदूंना खरा सामाजिक न्याय आणि आवाज मिळाला आहे. त्यामुळेच जंटलमन मोदींच्या काळात भारताने चांगली प्रगती केली आहे (हे बोलणारे भारतीय नव्हते, तर इस्रायली-ज्यू होते) हे अनुभव लिहिले. कारण, जे अनुभवले, ते लिहायलाच हवे. तसेच हे आज लिहिताना मला ‘कॉकरोच जनता पार्टी’च्या नंग्यानाचात मोदी आणि देशविरोधी नारे आणि शिवीगाळ करणार्‍या लोकांचे खुजेपण, अज्ञान आणि मूर्खपणा प्रकर्षाने जाणवत आहे. हं, ज्याचे त्याचे असंस्कार!
 
असो. या दौर्‍यामध्ये जेरुसलेममधील धार्मिक स्थळांना भेट देण्याची संधी मिळाली. जेरुसलेम हे शहर अत्यंत देखणे आणि धार्मिक. प्राचीन धार्मिकतेच्या खुणा-पायवाटा इथे आजही शाबूत राखल्या गेल्या आहेत. जेरुसलेममधली ‘वेस्टर्न वॉल’. या भिंतीच्या समोर ज्यू महिलांसाठीचे प्रार्थनास्थळ होते. तिथे एका बाजूला धार्मिक ग्रंथ ठेवले होते. अनेक किशोरवयीन युवती आणि वृद्ध ज्यू महिला त्यांतील धार्मिक ग्रंथ घेऊन वाचत होत्या. प्रार्थना करून झाली की, त्या एका कागदावर काहीतरी लिहीत होत्या. मग कागदाची व्यवस्थित घडी घालून त्या भिंतीकडे जात होत्या. भिंतीला खाचा होत्या. त्या खाचांमध्ये त्या चिठ्ठ्या ठेवत होत्या. हे काय आहे? या चिठ्ठ्यांमध्ये काय लिहिले जाते? तर कळले की, आपली इच्छा त्या चिठ्ठीवर लिहायची आणि त्या खाचेत ठेवायची. इच्छा पूर्ण होते. वर्षातून दोनदा या चिठ्ठ्या सन्मानाने काढून पवित्र मानल्या जाणार्‍या ‘ऑलिव्ह’ पर्वतावर जमिनीत पुरल्या जातात. तिथे प्रत्येक धर्माच्या महिलेला पूजा-प्रार्थना करण्याचा अधिकार होता. त्यामुळे आम्ही ज्यू नसूनही आम्हाला तिथे कुणीही अडवले नाही. सर्व धर्मीयांचे तिथे स्वागत होते, तरीसुद्धा तिथे पूजा-प्रार्थना करायला मुस्लीम महिला नव्हत्या. कारण, अर्थातच अल्लाशिवाय कुणाला मानणे म्हणजे ‘कयामत’च्या रात्री ‘दोजख’ म्हणजे नरक मिळणार किंवा सध्याच्या परिस्थितीत अल्लाशिवाय इतरांकडे प्रार्थना केली म्हणून ‘सर तन से जुदा’ही व्हायची भीती त्यांना वाटत असणार. या ‘वेस्टर्न वॉल’ला लागून असलेली अल अक्सा मशीद दिसत होती. अल अक्सा मशीद म्हणजे मुस्लिमांसाठी अत्यंत पवित्र स्थळ. जगभरातले मुसलमान तिथे येत असतात. ज्यू आणि मुस्लिमांचे विळा-भोपळ्याचे सख्य सुपरिचित. त्यामुळे तिथे उपस्थित असलेल्या काही लोकांशी संवाद साधला की, "भिंतीच्या वरच्या बाजूला लागून अल अक्सा मशीद आहे. इथे खाली शेकडो ज्यू महिला प्रार्थना करतात. कधी धार्मिक तणाव निर्माण होत नाही का?” तर त्यातला एक युवक म्हणाला, "होतो ना, कधीकधी ते वरून दगड फेकण्याचा, मारण्याचा प्रयत्न करतात. पण, मशिदीच्या चारी बाजूंच्या भिंती, सर्व ११ प्रवेशद्वारे आणि जेरुसलेमचे जुने शहर पूर्णपणे इस्रायली पोलिसांच्या आणि इस्रायली बॉर्डर पोलिसांच्या सशस्त्र नियंत्रणाखाली आहे ना! त्यामुळे त्यांनी वरून दगडफेक केली किंवा काहीही धार्मिक उन्माद करून खाली प्रार्थना करणार्‍या ज्यू लोकांना त्रास देण्याचा प्रयत्न केला, तर इस्रायली पोलीस ‘वक्फ बोर्डा’च्या परवानगीशिवाय थेट मशिदीच्या आवारात आणि मुख्य इमारतीत घुसतात. त्यांच्यासोबत शस्त्रे, अश्रुधूर व रबरी गोळ्या असतात आणि ते त्याचा वापर करतात. त्यामुळे आपण वर आहोत म्हणून खाली प्रार्थना करणार्‍या ज्यूंना त्रास देऊ शकतो, असे आता सहसा तिथे कुणालाही वाटेल याची शक्यता कमी झाली आहे.” तर एकजण म्हणाला की, "पोलीस तर आहेतच; पण तुम्ही पाहिले का? महिला ‘वेर्स्टन वॉल’च्या समोर प्रार्थना करतात आणि ज्यू पुरुष वरच्या मजल्यावर प्रार्थना करतात. वरच्या मजल्यावर प्रार्थना करणार्‍या ज्यू पुरुषांना जरासुद्धा संशय आला की, वरून खाली काही फेकले जात आहे किंवा काही त्रास देण्याचा प्रयत्न होत आहे; तर ज्यू पुरुषांनाही भिंतीपलीकडच्या त्या त्रास देणार्‍या लोकांकडे जाता येतेच ना?” त्याचे म्हणणे बरोबर होते. या दगडफेकीवरून आठवले की, आपल्या इथेही काही धर्मांध रामनवमीच्या यात्रेवर किंवा कावड यात्रेवर दगडफेक करतात, कारवाई करण्यासाठी पोलीस आले; तर पोलिसांवरही दगडफेक करतात. तर, हा दगडफेकीचा पॅटर्न इथेही अस्तित्वात आहे.
 
ही ‘वेस्टर्न वॉल’ ज्यूंसाठी अतिशय महत्त्वाची. त्यांची श्रद्धा आहे की, ही भिंत ज्यूंच्या प्राचीन मंदिरांचे रक्षण करण्यासाठी बांधलेली होती. पण, नंतर रोमन साम्राज्यात आणि पुढे मुस्लिमांच्या काळात या मंदिरांवर आघात झाला आणि इथे मशीद बांधली गेली. मंदिरे तोडली गेली. मात्र, त्यांची संरक्षक असलेल्या भिंतीचा एक भाग आजही आहे, तोच भाग म्हणजे ‘वेस्टर्न वॉल’ होय. तर, या वॉलच्या पलीकडे ‘डोम ऑफ द रॉक’ आहे. याच रॉकच्या आत अगदी मध्यभागी एक मोठा खडक आहे. हा खडक ज्यूंच्या श्रद्धेचा परमोच्च बिंदू. त्यांच्या मते, देवाने संपूर्ण विश्वाची, या पृथ्वीची निर्मिती या दगडापासून केली. त्यामुळे ते या दगडाला ‘इव्हन हा-शेतिया’ म्हणजेच ‘पायाचा खडक’ मानतात. नव्हे, हा खडक म्हणजे संपूर्ण पृथ्वीचा केंद्रबिंदू आहे, अशी ज्यूंची गाढ श्रद्धा. तसेच ज्यूंच्या मते, देवाचा पवित्र ‘नियमकोष’ याच खडकावर ठेवलेला होता. नियमकोष म्हणजे काय? तर, वाळवंटात फिरत असताना इस्रायली लोकांनी देवाच्या आज्ञेवरून सोन्याचा मुलामा असलेला लाकडी महाकरंडक (पेटी) बनवला होता. ज्यू मान्यतेनुसार, यामध्ये प्रेषित मोझेस यांनी देवाकडून आणलेल्या दहा आज्ञांच्या दोन दगडी पाट्या आणि ‘तोराह’ ग्रंथ सुरक्षित ठेवलेला होता. त्यांच्या मते, हा कोष म्हणजे देवाच्या उपस्थितीचे सर्वोच्च प्रतीक होते. मात्र, इसवी सन पूर्व ५८६ मध्ये जेव्हा बॅबिलोनियन साम्राज्याने जेरुसलेमवर आक्रमण केले, तेव्हापासून हा पवित्र ‘नियमकोष’ रहस्यमयरीत्या गायब झाला. (या नियमकोषाचीही एक रंजक आणि रहस्यमय कथा आहे, जी इस्रायल ते इजिप्तच्या धार्मिक-सामाजिक इतिहासाशी संबंधित आहे (त्याबद्दल पुढे कधीतरी). इतकेच नाही, तर ज्यूंच्या मान्यतेनुसार, देवाने ज्यूंच्या प्रेषित ‘अवराहाम’ची (अब्राहम) परीक्षा घेतली. देवाने अवराहामच्या स्वप्नात येत त्यांच्या मुलाचा म्हणजे, ‘इसहाक’चा बळी देण्याची आज्ञा केली. इसहाकनेही ही आज्ञा मान्य केली. अवराहाम यांनी बळी देण्यासाठी इसहाकला याच पवित्र खडकावर नेले. बळी देणार इतक्यात प्रसन्न होत याच खडकापाशी देवाने अवराहाम यांना थांबवले. त्याच वेळी एक मेंढा प्रकट झाला. इसहाकच्या बदली मेंढ्याचा बळी दिला गेला. हे सगळे त्या पवित्र खडकावर आणि आजूबाजूला घडले होते. त्यामुळेच ज्यूंच्या मते, हा पवित्र खडक म्हणजे देव अवतीर्ण होऊन आशीर्वाद देण्याचे स्थळ. मात्र, हा खडक ‘डोम ऑफ रॉक’ इथे असल्याने तिथे ज्यूंना जायला बंदी आहे. कारण, ही जागा आता ‘जॉर्डन वक्फ बोर्ड’च्या म्हणजे, मुस्लिमांच्या ताब्यात आहे. आंतरराष्ट्रीय करारानुसार, ज्यू तिथे जाऊन प्रार्थना करू शकत नाहीत. दुसरीकडे ज्यूंच्या धर्मगुरूंचा आदेशच आहे की, या खडकाला स्पर्श तोच करू शकतो, जो पूर्णतः अंतर्बाह्य शुद्ध आहे. त्यामुळेही ज्यू खडकाला थेट स्पर्श करण्याचा प्रयत्न करत नाहीत. पण, या खडकाच्या दिशेने तोंड करत ‘वेस्टर्न वॉल’च्या अलीकडून ज्यू या खडकाची पूजा करतात.
 
तर, याच पवित्र खडकाबद्दल मुस्लिमांचेही म्हणणे आहेच. मुस्लीम धर्मीय या खडकाला अरबी भाषेत ‘अस्-सखरा’ म्हणतात. त्यांच्या मते, प्रेषित मोहम्मद यांनी मक्केच्या काबा मशिदीपासून जेरुसलेमपर्यंतचा प्रवास बुराकवर स्वार होऊन काही क्षणात केला होता. (बुराक म्हणजे घोड्यासारखा दिसणारा; पण पंख असलेला प्राणी) जेरुसलेममध्ये पोहोचल्यावर त्यांनी बुराकला अल अक्सा मशिदीच्या पश्चिमेकडील भिंतीला एका कड्याने बांधले होते. यानंतर प्रेषित मोहम्मद यांनी पवित्र खडकावरून सात स्वर्गांचा प्रवास सुरू केला. तसेच जगाच्या शेवटी म्हणजेच, ‘कयामत’च्या दिवशी देवदूत ‘इस्राफिल’ हा याच पवित्र खडकावर उभा राहून ‘सूर’ (तुतारी) फुंकणार आहे. त्यानंतर ‘कयामत’ची सुरुवात होईल, अशीही इस्लामिक मान्यता आहे. तसेच या दगडाच्या पुढे आत्म्याची गुहा आहे. मुस्लिमांच्या मते, ‘कयामत’च्या रात्री इथे जगभरातले चांगले आत्मे गोळा होणार आहेत म्हणे! त्यामुळे मुस्लिमांसाठी हा खडक त्यांच्या इस्लामचा मानबिंदू. यामुळेच ज्यू आणि मुस्लीम या पवित्र खडकाच्या अनुषंगाने सदैव एकमेकांशी संघर्ष करत असतात. याच पार्श्वभूमीवर ख्रिश्चनांसाठीही ‘वेस्टर्न वॉल’चा परिसर अत्यंत महत्त्वाचा आहे. कारण, ‘वेस्टर्न वॉल’च्या जवळच येशूला क्रुसावर चढवले गेले आणि तिथेच त्याची कबर होती आणि तिथूनच येशू पुन्हा जिवंत झाले, अशी ख्रिश्चनांची श्रद्धा. पुढे जिथे येशूला क्रुसावर चढवले होते, तिथेच ‘चर्च ऑफ द होली सेपल्कर’ नावाचे भव्य चर्च उभारले गेले. त्यामुळे जगभरातील ख्रिश्चनांसाठी हे जगातील सर्वांत पवित्र चर्च.
 
आम्ही या चर्चमध्ये गेलो. वास्तुशास्त्राच्या दृष्टीने अत्यंत देखणे चर्च. ख्रिश्चनांचीं जी प्रार्थना असते, ती मंद सुरात एकू येत होती. युरोपियन, आफ्रिकन आणि आशिया खंडातूनही अनेक ख्रिश्चन इथे आवर्जून भेट देतात. येशूला जिथे क्रुसावर चढवले, त्या जागेवर-त्या जागेसमोर डोक टेकवून, डोळ्यांत पाणी आणून अनेकजण प्रार्थना करत होते. जगभरात ख्रिश्चन लोक असल्याने नेमका या चर्चवर ताबा कुणाचा, हा प्रश्न उपस्थित होत होता, तर सध्या या चर्चवर नियंत्रण कोणत्याही एका चर्च किंवा पोपचे नाही. ग्रीक ऑर्थोडॉक्स, रोमन कॅथलिक, आर्मेनियन, कॉप्टिक, सीरियन आणि इथिओपियन ऑर्थोडॉक्स अशा ख्रिश्चन धर्मातील सहा वेगवेगळ्या प्रमुख पंथांमध्ये या चर्चची जागा आणि वेगवेगळ्या भागांची जबाबदारी वाटून देण्यात आली आहे. या सहाजणांमध्ये कधी वाद होत नसतील का? असा प्रश्न उपस्थित केल्यावर कळले की, या ख्रिश्चन पंथांमध्ये आपापसात वाद होऊ नयेत, यासाठी चर्चची कुलूप-चावी या सहा पंथांकडे दिली गेली नाही, तर ११व्या शतकापासून या चर्चच्या मुख्य दरवाजाची कुलूप-चावी दोन स्थानिक मुस्लीम कुटुंबांकडे सोपवण्यात आली आहे. ‘जौदा’ कुटुंब या चावीचे रक्षक आहेत, तर ‘नुसेइबेह’ कुटुंब दररोज सकाळी या चावीने चर्चचा मुख्य दरवाजा उघडतात आणि रात्री बंद करतात. ही परंपरा गेल्या ८०० वर्षांपेक्षा जास्त काळापासून आजही अखंडितपणे सुरू आहे. ख्रिश्चनांसाठी अत्यंत महत्त्वाच्या आणि पवित्र असलेल्या चर्चची ही कहाणी! मात्र, या परिप्रेक्ष्यात ख्रिश्चन आणि ज्यू या समाजाचे सख्य पटकन जाणवले. याचे कारण काय बरे असावे? तर, त्याचेही उत्तर तिथल्या एका इथियोपियन ख्रिश्चन व्यक्तीने सांगितले की, "बायबल’मध्ये वचन आहे की, जगाच्या शेवटी येशू ख्रिस्त पुन्हा पृथ्वीवर येतील, तेव्हा इस्रायल देशावर संपूर्ण नियंत्रण ज्यूंचे असणे अनिवार्य आहे.” त्याचे म्हणणे खरे होते की, खोटे माहिती नाही; पण एकंदर ख्रिस्ती देश आणि इस्रायलचे सख्य या म्हणण्याची पुष्टी करत आहे, असे वाटते.
 
‘वेस्टर्न वॉल’ असू दे की, अल अक्सा मशीद, ‘डोम ऑफ द रॉक’ असू दे की, येशू ख्रिस्ताने जिथे लास्ट सफर केले, ती जागा असू दे की, येशूला जिथे वेदीवर चढवले ते स्थळ असू दे, ही सर्व स्थळे ज्यू, इस्लाम आणि ख्रिश्चन धर्मीयांच्या श्रद्धेचा आणि तितक्याच अतीव संवेदनशीलतेचा विषय आहे. जेरुसलेममध्ये या तीनही ठिकाणी गेल्यावर पहिल्यांदाच मनावर ठसली होती, ती या तीनही स्थळांच्या ऐतिहासिकतेतली गूढता; माणूस चंद्रावर, मंगळावर आणि सूर्यावरही गेला; तरी ज्यू, मुस्लीम आणि ख्रिश्चनांनी आपल्या प्राचीन परंपरा आणि मान्यता यांचे जाणीवपूर्वक केलेले संवर्धन! अर्थात, ज्याच्या त्याच्या श्रद्धा .
 
विषयांतर झाले, पुन्हा मूळ मुद्द्याकडे जाऊ. तर, याठिकाणी अत्यंत आधुनिक पोशाखातल्या; पण अर्थातच पोट दिसणारे आणि गुडघ्यापर्यंतचे पोशाख घातलेल्या किशोरवयीन मुली घोळक्याने त्यांची धार्मिक गीते म्हणत होत्या. किशोरवयीन युवकांचा गटही होता. सगळे देवाची करुणा भाकण्यात तल्लीन. हे पाहून वाटले की, श्रद्धा हे एक असे मूल्य, अशी भावना आहे; जी माणसाला निर्भय बनवते, हेच खरे. त्यामुळेच तर वर अल अक्सा मशिदीमध्ये काहीही घडले, तरी खाली ज्यूंची प्रार्थना सुरूच राहते आणि इस्रायली पोलिसांचा पहारा असला, तरी अल अक्सामध्ये जगभरातले मुस्लीम जातात. ‘अल्लाशिवाय कुणीच नाही’ या भावनेने खाली प्रार्थना करणार्‍या ज्यूंवर यातले काहीजण हल्ला करण्याचा प्रयत्न करतात, तर काहीवेळा ज्यू अल अक्सा मशीदमध्ये जातात आणि तिथे प्रार्थना करायला बंदी असतानाही चोरून प्रार्थना करतात (असा आरोप मुस्लिमांचा आहे). त्यातून अनेकदा दोघांमध्ये संघर्ष होत असतो. संघर्षाचा केंद्रबिंदू आहे, देवाने आशीर्वाद दिलेला आणि जिथून सृष्टी निर्माण केली, तो जेरुसलेमचा पवित्र खडक ‘इव्हन हा-शेतिया’. ज्यूंच्या मते, ‘मोझेस’च्या दहा आज्ञा पाट्या असलेला तो मूळ पवित्र कोष आजही याच खडकाच्या खाली ठेवलेला आहे. त्यामुळे अल अक्सा मशिदीच्या पूर्वी इथे ज्यूंचे मंदिर होते, हे सिद्ध करायचे असेल; तर या खडकाच्या खाली खोदकाम करणे गरजेचे आहे. काही इतिहासकारांच्या मते, प्राचीन ज्यू राजांच्या काळातील मौल्यवान दस्तऐवज, सोन्या-चांदीची भांडी आणि धार्मिक विधींसाठी वापरले जाणारे साहित्य या खडकाच्या खाली बनवलेल्या गुप्त खोल्यांमध्ये ठेवले असावे. या सर्व गोष्टींचा शोध घेण्यासाठी आणि अल अक्सा मशीद, तसेच सर्व परिसर हा पुरातन काळापासून ज्यूंचाच आहे हे सिद्ध व्हावे, यासाठी ज्यू संघटना या खडकाच्या खाली वैज्ञानिक उत्खनन करण्याची मागणी करत असतात. मात्र, या खडकाच्या वर मुस्लिमांची पवित्र वास्तू असल्यामुळे आणि तिथे थोडेही खोदकाम केल्यास तिसरे महायुद्ध पेटू शकते, या भीतीने इस्रायल सरकारने या खडकाच्या खाली कोणत्याही प्रकारच्या शोधावर पूर्णपणे कायदेशीर बंदी घातली आहे. दुसरीकडे खोदकाम केले, तर त्यातून काहीही सत्य निघाले, तरी त्यातून मुस्लीम किंवा ज्यू या दोघांपैकी एकाची निराशा होईल आणि त्यातून आणखीन संघर्ष पेटेल, या शंकेनेही या खोदकामाला इस्रायल सरकार, प्रशासन परवानगी देत नाही, असे म्हटले जाते. या सगळ्या पार्श्वभूमीवर भारताच्या सज्जनशक्तीने ‘मंदिर वही बनायेंगे’ म्हणत, हजारो वर्षे अयोध्येतल्या श्रीराम जन्मभूमीसाठी संघर्ष केला. सत्य न्यायाचा विजय होत रामलला मूळ जन्मस्थळी विराजमान झाले. यावर असे वाटते की, इस्रायलकडून भारताने काही शिकावे आणि इस्रायलनेही भारताकडून शिकावेच! कारण, शेवटी धर्मश्रद्धा आणि त्यातून निर्माण झालेली मानवीमूल्येच माणसाच्या माणूसपणाचा आधार असतात.
 
९५९४९६९६३८




योगिता साळवी

एम.ए. समाजशास्त्र. सध्या मुंबई तरुण भारत  येथे वार्ताहर-उपसंपादक पदावर कार्यरत. राजकीय कार्यकर्ता म्हणून प्रदीर्घ अनुभव. विविध सामाजिक प्रश्‍नांच्या अभ्यासाची आवड व लिखाण. वस्त्यांचे वास्तव हे मुंबई तरुण भारतमधील लोकप्रिय सदराच्या लेखिका.
संबंधित मजकूर