‘राष्ट्रकूट’ पुन्हा वाचताना...

    08-Aug-2026

इतिहासाची पाने उलटताना काही राजवंश सहजपणे स्मरणात राहतात, तर काहींचे योगदान कालौघात झाकोळले जाते. पण, राष्ट्रकूटांचे स्थान या दोन्ही टोकांपलीकडचे. वेरूळच्या कैलास लेण्यासारख्या अद्वितीय स्थापत्याची निर्मिती करणारे, भारताच्या राजकारणावर प्रभाव टाकणारे आणि सांस्कृतिक, आर्थिक, तसेच प्रशासकीय परंपरेला नवी दिशा देणारे हे साम्राज्य भारतीय इतिहासातील एका वैभवशाली पर्वाची साक्ष देणारे. तरीही, सर्वसामान्यांच्या जाणिवेत राष्ट्रकूटांचा इतिहास अपेक्षेइतका दृढपणे पोहोचलेला दिसत नाही. याच पार्श्वभूमीवर इतिहास संशोधक आणि लेखक अमोघ वैद्य यांनी आगामी ‘राष्ट्रकूट’ या पुस्तकातून उपलब्ध संदर्भ, ताम्रपट, परकीय प्रवाशांच्या नोंदी आणि विविध संशोधनसाधनांच्या आधारे या साम्राज्याचा नव्याने वेध घेतला आहे. इतिहास हा केवळ भूतकाळाचा दस्तऐवज नसून, वर्तमानाला समजून घेण्याची दृष्टी आहे, याच भूमिकेतून त्यांच्या संशोधनप्रवासाविषयी आणि पुस्तकामागील विचारांविषयी त्यांच्याशी साधलेला संवाद...


राष्ट्रकूटांचा इतिहास हा केवळ एका राजवंशाचा इतिहास नाही; तो भारतीय सामर्थ्य, सांस्कृतिक वैभव आणि राजकीय दूरदृष्टीचा एक महत्त्वाचा टप्पा आहे. तेव्हा सर्वप्रथम या विषयाची निवड पुस्तकलेखनासाठी का करावीशी वाटली?
 

राष्ट्रकूटांविषयी बोलायचे झाले, तर आठव्या शतकातील भारतात हे साम्राज्य अत्यंत बलाढ्य मानले जात होते. जगातील प्रभावशाली साम्राज्यांमध्ये त्यांचा उल्लेख होत असे. त्यांच्या इतिहासाचा मागोवा घेतला की ‘लत्तलूरपूर’ अर्थात आजचे लातूर, वेरूळ आणि त्याच्या आसपासचा परिसर, त्यानंतरचा कर्नाटक असा त्यांचा प्रवास दिसतो. या सगळ्या काळात महाराष्ट्र ही त्यांच्या इतिहासाची महत्त्वाची भूमी राहिली. इथे राहून त्यांनी अनेक पराक्रम गाजवले. त्यामुळे राष्ट्रनिर्मितीच्या प्रक्रियेत आपल्या भूमीचे आणि येथील साम्राज्यांचे योगदान किती मोठे आहे, हे आजच्या पिढीपर्यंत पोहोचणे आवश्यक वाटले. आपण इतिहास म्हटले की, बहुतांश वेळा युद्धे आणि राजकारण यांचाच विचार करतो. पण, राष्ट्रकूटांचा इतिहास त्यापेक्षा खूप व्यापक आहे. वेरूळसारखी कलात्मक परंपरा, प्रशासनातील आर्थिक शिस्त आणि राज्यकारभारातील दूरदृष्टी हे त्यांचे तितकेच महत्त्वाचे पैलू. लष्करी पराक्रमांचा विचार केला, तर राष्ट्रकूट साम्राज्याचे संस्थापक राजा दंतिदुर्ग यांनी अवनीजनाश्रय पुलकेशी यांच्या समवेत नवसारी येथे अरबांना पराभवाची चव चाखवली होती. हा इतिहासही तितकाच महत्त्वाचा. हा सगळा इतिहास वाचताना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते; हा केवळ भूतकाळ नाही, तर आपला वारसा आहे. त्याचा अभिमान वाटणे जितके आवश्यक आहे, तितकेच त्याची जाणीव पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवणेही गरजेचे आहे. दुर्दैवाने, शालेय अभ्यासक्रमात राष्ट्रकूटांचा इतिहास आज एखाद-दुसर्‍या परिच्छेदापुरताच मर्यादित राहिला आहे. त्यामुळे महाराष्ट्रात असे एक वैभवशाली साम्राज्य होऊन गेले, ज्यांच्या पराक्रमाने आणि राज्यकारभाराने भारताच्या इतिहासावर महत्त्वपूर्ण परिणाम घडवून आणला, हे सांगण्यासाठी हे पुस्तक लिहावे, असे वाटले.

‘राष्ट्रकूट’च्या निर्मितीमागचा हा प्रवास कसा होता?
 

या पुस्तकाचा विचार मनात आला, तेव्हा सर्वप्रथम मी उपलब्ध संदर्भग्रंथांचा अभ्यास सुरू केला. महान इतिहाससंशोधक ए. एस. आळतेकर यांनी राष्ट्रकूटांवर इंग्रजीत लिहिलेला ग्रंथ हा त्याचा प्रारंभबिंदू ठरला. त्यानंतर, ‘राष्ट्रकुटाक ऑफ मालखेड’ म्हणून ‘कन्नड पब्लिकेशन’चे पुस्तक वाचनात आले. राष्ट्रकूटांवर आयोजित परिषदेतील संशोधनपर लेखांचा तो संग्रह आहे. मात्र, हे सारे संदर्भ जुन्या काळातील होते. राष्ट्रकूटांविषयी नव्या दृष्टीने काही मांडता येईल का, या विचारातूनच हा प्रकल्प हाती घेतला. त्यासाठी अनेक संदर्भ शोधावे लागले. ताम्रपटांचा अभ्यासही त्याचाच एक भाग होता. अभ्यास करताना अनेक रंजक गोष्टी समोर आल्या. उदाहरणार्थ, एका ताम्रपटात दिवाळी सणाचा उल्लेख आहे. त्या निमित्ताने राष्ट्रकूटांनी एका मठाला दिलेल्या दानाची नोंद त्यात आढळते. अशा नोंदींमधून त्या काळातील सामाजिक आणि सांस्कृतिक जीवनाचे अनेक पैलू उलगडत जातात. म्हणूनच या पुस्तकात परकीयांच्या नजरेतून राष्ट्रकूट आणि राष्ट्रकूटकालीन महाराष्ट्र अशा विषयांचाही स्वतंत्रपणे विचार केला आहे. माझ्या माहितीप्रमाणे, या अंगाने यापूर्वी फारसे लेखन झालेले नव्हते. संशोधनाच्या या प्रवासात अनेक आश्चर्यकारक संदर्भ समोर आले. अनेक परकीय लेखकांनी येथील राजांचे वर्णन पराक्रमी शासक म्हणून केले आहे. त्यामुळे प्राचीन राजे म्हणजे केवळ विलासी जीवन जगणारे, अशी सर्वसाधारण समजूत किती अपुरी आहे, हे लक्षात येते. परकीय प्रवाशांच्या नोंदींमध्ये आणखी एक महत्त्वाचा उल्लेख आढळतो. भारतीय राजे मद्यपान करत नसत, उलट त्यांना त्याचा तिटकारा होता, असे त्यांनी लिहून ठेवले आहे. इतकेच नव्हे, तर एखादा राजपुत्र मद्यपान करत असेल, तर त्याला राजेपदासाठी अपात्र मानले जात असे, अशी नोंदही काही परकीय इतिहासकारांनी केली आहे. अशा अनेक संदर्भांचा शोध घेताना जवळपास दोन वर्षांचा कालावधी गेला. मात्र, त्यातून राष्ट्रकूट राजवंश अधिक जवळून समजून घेता आला. या संपूर्ण संशोधनप्रवासात अनेक सहकार्‍यांची मोलाची साथ लाभली. संशोधक मित्र सचिन दीक्षित यांनी ब्रह्मानंद देशपांडे यांनी राष्ट्रकूटांच्या लिपीवर संशोधन करून त्यावर ‘पीएच.डी.’ पूर्ण केल्याची माहिती दिली. त्यांचे संशोधन शोधण्यासाठी जवळपास वर्षभर प्रयत्न करावे लागले. अखेर ते ‘भारत इतिहास संशोधक मंडळा’त उपलब्ध झाले आणि त्या अभ्यासाचाही या पुस्तकाच्या निर्मितीत मोठा उपयोग झाला.
 

इतिहासात काही राजवंशांची चर्चा मोठ्या प्रमाणावर झाली; तर काहींचे योगदान तुलनेने दुर्लक्षित राहिले. राष्ट्रकूटांच्या बाबतीत असे का झाले, असे तुम्हाला वाटते?
 

राष्ट्रकूट हा राजवंश पूर्णपणे दुर्लक्षित राहिला, असे मला वाटत नाही. आजही छत्रपती संभाजीनगर येथील लेणी पाहताना किंवा कैलास लेण्यांचे दर्शन घेताना राष्ट्रकूटांची आठवण अपरिहार्यपणे होते. किंबहुना, त्या अद्वितीय स्थापत्यकृतीकडे पाहताना या राजवंशाच्या सांस्कृतिक वैभवाचा आणि त्या काळातील प्रगतीचा अभिमान वाटल्याशिवाय राहात नाही. मात्र, शालेय इतिहासाच्या पुस्तकांमध्ये या साम्राज्याच्या भव्यतेची आणि ऐतिहासिक योगदानाची ज्या प्रमाणात नोंद व्हायला हवी होती, ती झालेली दिसत नाही. त्यामुळे राष्ट्रकूटांविषयीची व्यापक ओळख समाजात निर्माण होऊ शकली नाही, हे वास्तव आहे. माझी इच्छा एवढीच आहे की, राष्ट्रकूटांचा इतिहास हा केवळ एका राजघराण्याचा इतिहास म्हणून न पाहता, भारतातील एका महान साम्राज्याचा इतिहास म्हणून समाजासमोर यावा.
 

राष्ट्रकूट राजांची वाटचाल पाहताना त्यांच्या नेतृत्वातील कोणते गुण ठळकपणे जाणवतात आणि त्यांच्या काळातील कला, स्थापत्य, साहित्य व ज्ञानपरंपरेतील कोणत्या पैलूंवर पुस्तकात चर्चा केली आहे?
 

राष्ट्रकूटांतील दंतिदुर्ग, कृष्ण पहिला आणि अमोघवर्ष यांसारख्या राजांचे नेतृत्व अभ्यासण्यासारखे आहे. त्यांचे युद्धकौशल्य, राजकीय दूरदृष्टी आणि मुत्सद्देगिरी या तिन्ही गोष्टींचा प्रभाव त्यांच्या राज्यकारभारात स्पष्टपणे दिसून येतो. युद्ध, राजकारण आणि प्रशासन या तिन्ही स्तरांवरील आव्हाने एकाचवेळी पेलताना त्यांनी दाखवलेला निर्णयक्षमतेचा वेग विशेष लक्षवेधी आहे. अंतर्गत बंडाळी मोडून काढतानाही त्यांनी आपल्या नेतृत्वाची अशी छाप निर्माण केली की, विरोधकांनाही त्यांचे राजेपण मान्य करावे लागले. नेतृत्वाचा हा पैलू विशेष अभ्यास करण्यासारखा आहे.
 

इतिहास लिहिताना एक धोका असतो, तो म्हणजे भूतकाळाचा अतिगौरव करणे किंवा त्याकडे दुर्लक्ष करणे. ‘राष्ट्रकूट’ लिहिताना वस्तुनिष्ठता राखण्यासाठी कोणती भूमिका घेतली?
 

इतिहासाचा अभ्यासक म्हणून माझा एक मूलभूत आग्रह आहे. इतिहासाची मांडणी ही तर्काच्या नव्हे, तर तथ्यांच्या आधारावर झाली पाहिजे. त्यामुळे उपलब्ध पुरावे, संदर्भ आणि ऐतिहासिक नोंदी यांनाच प्राधान्य दिले. जिथे गौरव आवश्यक आहे, तिथे तो केला आहे; पण तो अतिगौरव होणार नाही, याचीही तितकीच काळजी घेतली. त्याचप्रमाणे, ज्या ठिकाणी चुका किंवा मर्यादा दिसतात, त्या तितक्याच तटस्थपणे मांडण्याचा प्रयत्न केला आहे. इतिहासाचा अभ्यास करताना आणखी एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवावी लागते. आपण वर्तमानात उभे राहून भूतकाळाचा अर्थ लावत असतो. त्यामुळे त्या काळातील घटना, मूल्यव्यवस्था आणि सामाजिक परिस्थिती यांचा विचार त्या काळाच्या संदर्भातच करणे आवश्यक असते, अन्यथा इतिहासाचा अर्थ लावताना गफलत होण्याची शक्यता असते. उदाहरणार्थ, त्या काळातील सामाजिक रचना, दागदागिने, रूढी किंवा जीवनपद्धती यांचा विचार आजच्या निकषांवर न करता, त्या काळाच्या वास्तवातूनच करावा लागतो. विज्ञानात निरीक्षण नोंदवताना जशी तटस्थता अपेक्षित असते, तशीच तटस्थता इतिहासलेखनातही आवश्यक असते. या दृष्टिकोनाचा सराव असल्यामुळे ‘राष्ट्रकूट’ लिहिताना वस्तुनिष्ठता राखणे फारसे आव्हानात्मक वाटले नाही. मात्र, हे पुस्तक केवळ संशोधकांसाठी नसून सामान्य वाचकांसाठीही आहे. त्यामुळे भाषेची सहजता जपण्याचा प्रयत्न केला. विषयाचे गांभीर्य कायम ठेवत, आवश्यक तेथे मर्यादित अलंकारिक भाषेचा वापर केला आहे, जेणेकरून वाचन रंजकही होईल आणि अभ्यासपूर्णही राहील. त्याचवेळी कादंबरी, ललितलेखन आणि इतिहासग्रंथ या तिन्ही प्रकारांतील मूलभूत भेद लक्षात ठेवूनच संपूर्ण पुस्तकाची मांडणी केली आहे.
 

आजची ‘जेन-झी’ डिजिटल जगात वाढलेली आहे. तिला हजार वर्षांपूर्वीच्या राष्ट्रकूटांच्या इतिहासाशी कसे जोडता येईल? अशा नव्या पिढीसाठी इतिहासाचे महत्त्व तुम्ही कसे मांडाल?
 

आजची ‘जेन-झी’ डिजिटल माध्यमातून जगाकडे पाहते. त्यामुळे इतिहास तिच्यापर्यंत पोहोचवायचा असेल, तर त्याच्याशी संवाद साधण्याची भाषाही बदलावी लागेल. इतिहास हा केवळ घटनांची यादी नसून एक प्रभावी कथा आहे, या पद्धतीने तो मांडला, तर नव्या पिढीपर्यंत तो अधिक सहज पोहोचू शकतो. हे पुस्तक लिहितानाही मी त्याचे भान ठेवले आहे. या पुस्तकात आजच्या पिढीला आकर्षित करतील, असे अनेक संदर्भ आहेत. त्या काळातील जागतिक व्यापार, इतर देशांशी असलेले संबंध, नेतृत्व, ज्ञानपरंपरा, प्रशासन आणि व्यवस्था यांसारख्या विषयांवर सविस्तर चर्चा केली आहे. आजच्या तरुणांना हे विषय केवळ ऐतिहासिक वाटणार नाहीत, तर समकालीन संदर्भातही विचार करायला भाग पाडतील, असा माझा विश्वास आहे. माझ्या दृष्टीने इतिहास म्हणजे भूतकाळात अडकून राहणे नव्हे. त्या काळातील लोकांनी संकटांचा सामना कसा केला, राष्ट्रनिर्मितीची प्रक्रिया कशी घडवली, ते कसे जगले आणि त्या सभ्यतेने कोणती मूल्ये जपली, याचे प्रतिबिंब म्हणजे इतिहास. तो आपल्या समाजाचा आणि संस्कृतीचा आरसा आहे. इतिहासाचा अभ्यास सांगतो की, ज्या पिढीला आपल्या वारशाची जाणीव असते, तीच पिढी भविष्य अधिक सक्षमपणे घडवू शकते. त्यामुळे ‘जेन-झी’ला आज ज्या गोष्टी महत्त्वाच्या वाटतात, नेतृत्व, व्यवस्थापन, जागतिक दृष्टी, ज्ञान आणि बदलत्या परिस्थितीशी जुळवून घेण्याची क्षमता, त्यांची अनेक उदाहरणे राष्ट्रकूटांच्या इतिहासात सापडतात. त्यामुळे या पिढीला या पुस्तकातून निश्चितच वेचून घेण्यासारखे बरेच काही मिळेल.

‘राष्ट्रकूट’ पुस्तकाविषयी...
लेखक : अमोघ वैद्य
(इतिहास अभ्यासक, संशोधक आणि डिजिटल क्रिएटर, एम.ए. इंडोलॉजी, एम.ए. संस्कृत, बी.ए. संस्कृत)
प्रकाशक : मर्वेन टेनोलॉजी
पृष्ठसंख्या : २०७
मूल्य : ३५० रु.
प्रस्तावना : डॉ. संजय तांबट
 
- कौस्तुभ वीरकर 




संबंधित मजकूर