स्वतःच्या सुख-दुःखापेक्षा राष्ट्रकार्याला आणि संघकार्यास अग्रक्रम देत, संकटांवर धैर्याने मात करत, साधेपणा, कर्तव्यनिष्ठा आणि सेवाभाव यांचा आदर्श जगणारे असे अनेक स्वयंसेवक राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने घडविले. वसंतराव कोल्हटकर हे त्यांपैकीच एक तेजस्वी व्यक्तिमत्त्व. त्यांचा जीवनप्रवास म्हणजे एका समर्पित स्वयंसेवकाचा, प्रेमळ कुटुंबवत्सलाचा आणि शांतपणे समाजकार्य करणाऱ्या कर्मयोग्याचा प्रेरणादायी इतिहास होय.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुंबई महानगरात माहीम येथे राहणारे वसंतराव आणि हेरंबराव कोल्हटकर हे दोघे भाऊ म्हणजे जणू राम – लक्ष्मणाची जोडीच! त्यातील वसंतराव हे ज्येष्ठ बंधू! संघाच्या कामास प्राधान्य, अन्य सर्व कामे नंतर, अशाप्रकारे त्या दोघाही भावांनी आपल्या जीवनाची घडी बसविली होती. ते मूळचे नागपूरचे स्वयंसेवक. वडिलांच्या रेल्वेतील नोकरीमुळे काही वर्षे भुसावळ येथेही त्यांचे वास्तव्य होते. कोठेही असले तरी त्यांचा संघाशी जोडला गेलेला संबंध शेवटपर्यंत तुटला नाही. दोघे भाऊ पूर्वी अंधेरीत राहायचे. त्यांतर १९५३ पासून माहीम येथील बेडेकर सदनमध्ये ते राहायला आले. काही झाले तरी आपण वेगळे राहायचे नाही, असा निश्चय या दोघा भावांनी केल्याने बेडेकर सदनच्या दोन खोल्यांमध्ये आनंदाने त्यांनी संसार थाटला होता.
वसंतराव कोल्हटकर यांचा जन्म ५ सप्टेंबर १९२४ चा. वसंतराव हे पूर्वीच्या दादर भागातील माहीम नगराचे कार्यकर्ते. माहीमला येण्यापूर्वी वसंतराव अंधेरी येथे राहत असत. १९४८ च्या संघबंदीच्या वेळी वसंतराव यांनी सत्याग्रह केला. त्यामुळे त्यांची रेल्वेमध्ये असलेली नोकरी गेली. घरी पत्नी आणि लहान मुलगी कुंदा. धाकटा भाऊ हेरंब गुजरातमध्ये प्रचारक म्हणून गेलेला. पण त्याही परिस्थितीला त्यांनी धैर्याने तोंड दिले. नवीन नोकऱ्यांचा शोध घेत ते हिंदुस्तान कन्स्ट्रक्शन कंपनीत ड्राफ्टमन म्हणून नोकरीस लागले. नोकरीचा वेळ सोडला की बाकी सर्व वेळ संघकार्यासाठी अशी त्यांनी आपल्या जीवनाची रचना केली होती. रोजची प्रभात शाखा झाली की स्वयंसेवकांच्या भेटीगाठी घ्यायच्या. दुटांगी धोतर नेसून फोर्टमधील एचसीसी कार्यालयात कामाला जायचे. त्यानंतर घरी येऊन लगेच संघकामाला ते बाहेर पडायचे. वसंतराव वंशी उत्तम वाजवायचे. फोर्ट भागात दुपारच्या सुटीच्या वेळेत त्या परिसरात नोकरीसाठी येणाऱ्या स्वयंसेवकांना ते वंशी शिकवत असत. माहीम नगराचे कार्यकर्ते असताना ते सायकलवरून प्रवास करीत स्वयंसेवकांशी संपर्क साधत असत. बैठकांमध्ये सहभागी होत असत.
संघाचे कार्य करण्यात सदैव तत्पर आणि अग्रेसर असलेल्या वसंतरावांची नित्य शाखा कधी चुकली नाही. पुढे प्रकृतीने साथ न दिल्याने त्यामध्ये खंड पडला असला तरी त्यांच्या मनात सदैव संघाचा विचार असायचा. संघाने कोणतीही जबाबदारी दिली की ती निष्ठापूर्वक पूर्ण करायचीच, असे वळण कोल्हटकर बंधूंनी स्वत:स लावल्याने ते कार्य अधिकाधिक चांगले कसे होईल, असा वसंतराव यांचा ध्यास असे. असंख्य संघ कार्यकर्त्यांप्रमाणे या दोघा भावांनीही संघकार्यास वाहून घेतले होते. या कार्यात घरातील सर्वांची साथ मिळाल्याने सर्व घरच या कार्यात समरसून गेले होते.
वसंतराव याना तीन मुली. त्यांच्या पत्नी सुधा या डिसेंबर १९५७ मध्ये धाकटी मुलगी लताच्या वेळी बाळंतपणात निवर्तल्या. वसंतराव त्यावेळी अवघे ३२ वर्षांचे होते. तीन मुली. धाकटी तर अवघी एक दिवसाची. अशा स्थितीत भाऊ हेरंब आणि सुमनवहिनी यांनी वसंतराव आणि त्यांच्या तीन मुलींना आधार दिला. जे संकट कोसळले त्याचा सामना तिघांनी धैर्याने केला.
कोल्हटकर कुटुंबीयांकडे दीड दिवसांचा गणपती बसविला जात असे. त्यावेळी गणपतीसाठी मखर बनविण्याचे काम प्रामुख्याने वसंतराव करीत असत. देशात सहलीसाठी गेल्यावर तेथील एखाद्या प्रसिद्ध मंदिराची प्रतिकृती मखरासाठी त्यांच्याकडून तयार केली जाई. ते काम अत्यंत निगुतीने ते करीत. दीड दिवसांच्या गणपतीच्या दर्शनासाठी स्वयंसेवक, त्यांचे कुटुंबीय आणि अन्य नातेवाईक यायचे! येणाऱ्या सर्वांकडून वसंतराव यांनी केलेल्या मखरांचे कौतुक व्हायचे. संघ कामाबरोबरच अन्य सार्वजनिक कामात वसंतराव रस घेत. माहीमच्या बेडेकर सदन गणेशोत्सवाचे ते संस्थापक होते. या गणेशोत्सवातील विविध कार्यक्रमात सर्व कोल्हटकर उत्साहाने सहभागी होत असत. घरामध्ये तबला, संवादिनी आणि व्हायोलीन ही वाद्ये होती. त्या वाद्यांचे सूर बेडेकर सदनच्या तळमजल्यावर गुंजायचे.
वनवासींसाठी ज्येष्ठ संघ कार्यकर्ते केशवराव केळकर यांच्या पुढाकाराने भाऊबीज योजना सुरु करण्यात आली होती. वसंतराव आणि सुमनवहिनी त्या योजनेचे काम अनेक वर्षे करीत होते. त्याचा सर्व हिशोब ते दोघे चोख ठेवत असत. प.पू. डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांच्या जन्मशताब्दीनिमित्त देशभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये निधी संकलन हाही एक भाग होता. आपल्याकडून अधिकाधिक निधी संकलित झाला पाहिजे या जिद्दीने वसंतराव माहीम भागातील विविध लोकांशी संपर्क साधायचे. ते काम करताना वेळेचे, प्रकृतीचे भानही त्यांना नसायचे. निधी संकलनाच्या कामात माहीम नगरात वसंतराव यांनी सर्वात जास्त निधी संकलित केला होता! पण पुढे त्यांना प्रकृतीने साथ दिली नाही. हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांना दोन वेळा इस्पितळात दाखल करण्यात आले होते.
कोल्हटकर परिवाराकडे संघाच्या केंद्रीय अधिकाऱ्यांपासून अन्य स्वयंसेवकांचे येणे – जाणे असायचे. घरी येणाऱ्यास भरपूर खायला घालणे हा कोल्हटकर कुटुंबाचा स्वभावधर्म! वसंतराव येणाऱ्या प्रत्येकाकडे आवर्जून लक्ष द्यायचे. आग्रह करायचे. वसंतराव उत्तम चित्रकार होते. वडिलांचा हा वारसा त्यांच्याकडे आला होता. त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज, स्वामी रामदास, रामकृष्ण परमहंस अशांची अत्यंत उत्तम चित्रे काढली होती. फिरण्यावर निर्बंध आल्यानंतर ते घरात बसून रोज एखाद्या प्रसिद्ध व्यक्तीचे पेन्सिलने रेखाचित्र काढत असत. अशी असंख्य चित्रे त्यांनी काढली होती. २००४ साली वसंतराव पुण्यामध्ये मोठी कन्या कुंदाकडे असताना त्यांची तब्येत खूपच बिघडली. त्यांना जोशी इस्पितळात दाखल करण्यात आले. त्या आजारपणातच २३ नोव्हेंबर २००४, कार्तिक शुद्ध द्वादशीच्या दिवशी रात्री त्यांची प्राणज्योत मालवली. एक कुटुंबवत्सल आणि संघ समर्पित व्यक्तिमत्व काळाच्या पडद्याआड गेले!