राष्ट्रहित, सामाजिक बांधिलकी आणि संघटनात्मक कार्य यांची सांगड घालत विविध क्षेत्रांत सातत्याने कार्यरत असलेले सिद्धाराम उर्फ शंकर रामण्णा संगपाळ यांची ही वाटचाल...
राष्ट्रसेवा ही केवळ एखाद्या पदापुरती किंवा आंदोलनापुरती मर्यादित नसते. समाजातील प्रश्न समजून घेत त्यावर संघटनात्मक, लोकशाही आणि विधायक मार्गाने काम करणे, समाजात राष्ट्रीय विचार दृढ करणे आणि तरुणाईला सकारात्मक दिशेने जोडणे, यातूनही राष्ट्रकार्यात महत्त्वाचे योगदान देता येते. या भूमिकेवर विश्वास ठेवत सिद्धाराम उर्फ शंकर रामण्णा संगपाळ यांनी विद्यार्थी चळवळ, सामाजिक उपक्रम आणि हिंदुत्ववादी संघटनांच्या माध्यमातून सातत्यपूर्ण कार्य उभे केले आहे.
अक्कलकोट तालुक्यातील बासलेगाव हे सिद्धाराम यांचे मूळ गाव. १९७०च्या दुष्काळानंतर त्यांचे वडील रामण्णा संगपाळ उपजीविकेसाठी मुंबईत आले. माथाडी कामगार म्हणून कठोर परिश्रम करत त्यांनी प्रतिकूल परिस्थितीत कुटुंब उभे केले. या संघर्षमय प्रवासात आई जगदेवी संगपाळ यांनी भाजीविक्री करून संसाराचा गाडा सांभाळत मुलांच्या शिक्षणासाठी अथक परिश्रम घेतले. या दोघांच्या कष्टातूनच शंकर संगपाळ यांच्यावर श्रम, शिस्त, राष्ट्रप्रेम आणि समाजाप्रति कर्तव्यभावनेचे संस्कार झाले. कोपरखैरणे येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वातंत्र्यवीर सावरकर शाखेत त्यांचा नियमित सहभाग सुरू झाला. तत्कालीन नगर सहकार्यवाह अविनाश कारंडे यांच्या मार्गदर्शनातून संघकार्याची ओळख झाली आणि ‘राष्ट्र प्रथम’ ही भूमिका त्यांच्या विचारविश्वाचा अविभाज्य भाग बनली.
छत्रपती शिवाजी महाराज, स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर आणि महात्मा बसवेश्वर महाराज हे त्यांचे प्रमुख आदर्श. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांच्या विचारांमधून त्यांनी राष्ट्रसेवेची प्रेरणा घेतली. भारतीय सैन्यात जाऊन देशसेवा करण्याचे त्यांचे स्वप्न काही कारणांमुळे पूर्ण होऊ शकले नाही. मात्र, त्यानंतर त्यांनी संघकार्याच्या माध्यमातून समाजकारणाची दिशा स्वीकारली.
‘बीएस्सी’ (आयटी), ‘एमए’ (राज्यशास्त्र), ‘एमएसडब्ल्यू’, ‘सीएसआर’मधील पदव्युत्तर पदविका, पत्रकारिता व जनसंवाद विषयातील पदव्युत्तर पदविका आणि ‘एलएलबी’ असे बहुआयामी शिक्षण त्यांनी पूर्ण केले. ‘रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी’च्या ‘उडान फेलोशिप’अंतर्गत माथाडी कामगारांच्या सामाजिक-आर्थिक स्थितीवर त्यांनी संशोधन करून शोधप्रबंध प्रकाशित केला.
महाविद्यालयीन शिक्षणादरम्यान कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून त्यांची सक्रिय वाटचाल सुरू झाली. राष्ट्रीय सेवा योजना (एनएसएस) अंतर्गत शिवजयंती, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, संविधान पारायण, संविधान दिन आणि कारगिल विजय दिवस यांसारखे उपक्रम सेवावस्त्यांमध्ये सुरू करण्यामागे त्यांचा पुढाकार होता. शिक्षणाच्या व्यापारीकरणाविरोधात, विद्यार्थ्यांना दर्जेदार सुविधा मिळाव्यात यासाठी आणि विविध विद्यार्थी-प्रश्नांवर त्यांनी वेळोवेळी आंदोलनांचे नेतृत्व केले.
‘कोरोना’ काळात कुटुंबाची आर्थिक परिस्थिती प्रतिकूल असतानाही, जून २०२० पासून त्यांनी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे पूर्णवेळ कार्यकर्ता म्हणून जबाबदारी स्वीकारली. घरची परिस्थिती हलाखीची असताना मुलाला समाजकार्यासाठी पूर्णवेळ पाठविण्याचा निर्णय कुटुंबाने घेतला. विशेषतः आई जगदेवी संगपाळ यांनी भाजीविक्री करून संसार सांभाळत मुलाच्या राष्ट्रकार्याला खंबीर पाठबळ दिले, हा त्यांच्या जीवनप्रवासातील महत्त्वाचा टप्पा ठरला. मध्य मुंबई जिल्हा विद्यार्थी विस्तारक, उत्तर गोवा जिल्हा विद्यार्थी विस्तारक आणि कोंकण प्रदेश कार्यालय मंत्री अशा विविध जबाबदार्या त्यांनी यशस्वीपणे पार पाडल्या.
तामिळनाडूतील लावण्या प्रकरण, ‘म्हाडा’ पेपरफुटी, विद्यार्थ्यांवरील अन्याय, तत्कालीन मंत्री अब्दुल सत्तार यांच्याविरोधातील आंदोलन, तसेच विद्यापीठ कायद्यातील विद्यार्थीविरोधी बदलांच्या विरोधात त्यांनी संघटनात्मक भूमिका घेतली. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून नवी मुंबईच्या इतिहासातील १ हजार १११ फुटांच्या भव्य ‘तिरंगा’ यात्रेचे आयोजन हे त्यांच्या कार्यातील विशेष पर्व ठरले.
२०२५ पासून त्यांच्याकडे बजरंग दल नवी मुंबई जिल्हा संयोजक ही जबाबदारी आली. सध्या ते विश्व हिंदू परिषद कोंकण प्रांत प्रचार टोळी सदस्य म्हणूनही कार्यरत आहेत. नवी मुंबई महानगरपालिका रुग्णालयातील गोमांस प्रकरण, उघड्या जागेतील जनावरांच्या विक्रीसाठी दिलेल्या परवानग्यांविरोधातील पाठपुरावा, तसेच महिलांशी संबंधित विविध प्रकरणांत मदत अशा विषयांवर त्यांनी सातत्याने भूमिका घेतली आहे. ‘मी लिंगायत, मी हिंदूच’ या अभियानातून समाजात संवाद घडविण्याचा प्रयत्न केला. अखिल भारतीय लिंगायत महासंघाचे अध्यक्ष प्रा. नीळकंठ बिजलगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली महात्मा बसवेश्वर महाराज जयंतीचे वस्तीपातळीवर आयोजन करण्यात त्यांनी पुढाकार घेतला.
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या प्रेरणेने २०२४ मध्ये त्यांनी ‘मित्रमेळा’ सामाजिक संस्था स्थापन केली. वृक्षारोपण, महापुरुषांच्या संयुक्त जयंती, वंचित घटकांसाठी विविध सामाजिक उपक्रम आणि जनजागृती कार्यक्रम संस्थेमार्फत राबविले जात आहेत. नवी मुंबई परिसरात सांस्कृतिक आणि सामाजिक चळवळ अधिक व्यापक करण्याचा त्यांचा मानस आहे.
‘एनएसएस’च्या माध्यमातून सांगली-कोल्हापूर पूरग्रस्तांसाठी विद्यार्थ्यांकडून मदतनिधी संकलित करून एक लाख रुपयांचा धनादेश ‘मुख्यमंत्री साहाय्यता निधी’कडे सुपूर्द करण्यात त्यांनी पुढाकार घेतला. दोन ट्रक जीवनावश्यक साहित्य प्रत्यक्ष पूरग्रस्तांपर्यंत पोहोचविण्यातही त्यांनी सहभाग घेतला. त्यांच्या कार्याची दखल घेत कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयाने त्यांना ‘बेस्ट अचिव्हर ऑफ द इयर’ पुरस्काराने सन्मानित केले.
राष्ट्रहित, सामाजिक बांधिलकी आणि संघटनात्मक कार्य यांची सांगड घालत समाजातील विविध घटकांना सकारात्मक विचारांनी जोडण्याचा त्यांचा प्रयत्न आजही सुरू आहे. हिंदुत्व, राष्ट्रसेवा आणि माथाडी कामगार बांधवांच्या कल्याणासाठी सातत्याने कार्यरत राहण्याचा त्यांचा संकल्प असून, विधायक सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून समाजजीवनात सकारात्मक परिवर्तन घडविण्याचा त्यांचा प्रयत्न अविरत सुरू आहे.
दै. ‘मुंबई तरुण भारत’तर्फे सिद्धाराम उर्फ शंकर रामण्णा संगपाळ यांना त्यांच्या पुढील सामाजिक, संघटनात्मक आणि राष्ट्रकार्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा!
९९६७०२०३६४